मकरसंक्रांतीला पाठवण्यात येणार्‍या हिंदुद्वेष्ट्या संदेशाचे खंडण !

‘आम्ही एकाला ‘दारू’ पाजली आणि एकाला ‘तिळगुळ’ दिले… दारू पाजलेला वर्षभर गोड बोलत होता’, अशा प्रकारचे संदेश मकरसंक्रांत या सणाच्या आदल्या दिवशी अर्थात् १३ जानेवारीला ‘व्हॉट्स ऍप’वरून प्रसारित करण्यात येत होते.

हिंदु सणांचे विडंबन करणारे आणि सणामागील अध्यात्मशास्त्राचे महत्त्व न जाणता त्यावर विनोद करणारे असे हिंदुद्वेष्टे संदेश पसरवण्याचे षड्यंत्र जाणीवपूर्वक आखले जात आहे. कधी मुसलमान अथवा ख्रिस्ती सणांच्या निमित्ताने असे विडंबनात्मक संदेश पाठवले जातात का, हा विचार करणे आवश्यक आहे. हिंदूंमधील धर्मशिक्षणाचा अभाव आणि हिंदू संघटित नसल्यानेच हिंदुद्वेष्ट्यांचे फावते. याहून पुढे जाऊन असे संदेश बहुतांश वेळा जन्महिंदूच आपली मित्र-मंडळी, नातेवाइक इत्यादींना पाठवतात. हे हिंदूंसाठी लज्जास्पद आहे. यामुळे हिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी झाले आहेत, हे पुन्हा एकदा अधोरेखित होते.

 

मकरसंक्रांतीला दिल्या जाणार्‍या तिळगुळाचे महत्त्व

तिळामध्ये सत्त्वलहरींचे ग्रहण अन् प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असल्यामुळे तीळगुळाचे सेवन केल्याने अंतर्शुद्धी होऊन साधना चांगली होते. भारतीय संस्कृतीत मकरसंक्रांत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी इतरांना तीळगूळ देण्यापूर्वी देवाच्या समोर ठेवावा. त्यामुळे तीळगुळातील शक्ती आणि चैतन्य टिकून रहाते. तीळगूळ देतांना आपल्यात चैतन्य आणि अवर्णनीय भाव जागृत होतो. तसेच जिवाला नकारात्मक दृष्टीकोनातून सकारात्मक दृष्टीकोनात जाण्यास साहाय्य होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment