वाईट शक्तींनी केलेल्या आक्रमणामुळे सुकलेल्या पारिजातकाच्या वृक्षावर ‘शिवकवच’ पठणाचा होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

परिणाम अभ्यासण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’
या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

parijatak5
वाईट शक्तींनी केलेल्या आक्रमणामुळे सुकलेले पारिजातकाचे झाड

१. प्रस्तावना आणि उद्देश

सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाच्या परिसरात असलेला पारिजातक वृक्ष ऐन पावसाळ्यात पूर्णपणे सुकून गेला. सप्तर्षि जीवनाडीपट्टीतून मागदर्शन करणार्‍या महर्षींनी यामागील कारण स्पष्ट करतांना सांगितले, ‘वाईट शक्तींनी केलेल्या आक्रमणामुळे हा वृक्ष सुकून गेला आहे.’ सप्तर्षींनी यावर उपाय म्हणून पारिजातकाची नारळाने दृष्ट काढण्यास सांगितले. त्यानंतर ४ दिवसांनी त्यांनी पुढील उपायही सांगितला – ‘झाडापुढे दिवा आणि उदबत्ती लावावी. झाडाच्या रक्षणासाठी प्रार्थना करावी. त्यानंतर झाडाच्या मुळाशी मध, गव्हाचे पिठ आणि गुलाबपाणी घालावे. झाडाला नैवेद्य दाखवावा. त्यानंतर झाडाला उदबत्ती आणि दिवा यांनी ओवाळावे.’ त्याप्रमाणे हे दोन्ही उपाय केले.

भृगुसंहितावाचक डॉ. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार्‍या भृगुमहर्षींनीही पारिजातकासाठी उपाय सांगितला. ते म्हणाले, ‘पाण्यात सुवर्णाचा एक तुकडा घालून ते पाणी अर्धे होईपर्यंत उकळू द्यावे. अशा प्रकारे सिद्ध केलेले सुवर्णजल प्रत्येक रविवारी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पारिजातकाला घालावे.’ महर्षींनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरु बिंदाताई यांनी १३.११.२०१६ पासून प्रत्येक रविवारी सुवर्णजल पारिजातकाला घालण्यास आरंभ केला.’ तसेच पुणे येथील मंत्रोपचारतज्ञ डॉ. मोहन फडके यांनी पारिजातक वृक्षाची स्थिती सुधारण्यासाठी आध्यात्मिक उपाय म्हणून वृक्षाजवळ शिवकवचाचे पठण करण्यास सांगितले. या आध्यात्मिक उपायांपैकी शिवकवचाच्या पठणामुळे पारिजातक वृक्षावर झालेला परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी २९.८.२०१६ या दिवशी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाच्या परिसरात ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

२. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत पारिजातक वृक्षाचे शिवकवच पठणापूर्वी आणि शिवकवच पठणानंतरच्या स्थितीचे ‘यू.टी.एस्.’ या उपकरणाद्वारे निरीक्षण करण्यात आले. या दोन्ही निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

३. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती

३ अ. पारिजातक वृक्ष

हा सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाच्या परिसरातील पारिजातक वृक्ष आहे. हा वृक्ष वर्षभर पुष्कळ फुलांनी बहरलेला असायचा. २९.७.२०१६ ते २.८.२०१६ या कालावधीत या वृक्षाची हिरवीगार पाने पुष्कळ प्रमाणात गळू लागल्याचे लक्षात आले. वृक्षावर असलेली सर्व पाने कोमेजल्याप्रमाणे झालेली होती; म्हणजे पाने प्राण नसल्यासारखी लोंबत होती. ६.८.२०१६ ते २०.९.२०१६ या कालावधीत वृक्षाची सर्व पाने जळल्यासारखी होऊन गळून पडली आणि वृक्षावर एकही पान शिल्लक राहिले नाही.

३ आ. शिवकवच

प्राचीन काळापासून आपल्या थोर ऋषीमुनींनी मानवाच्या कल्याणासाठी अनेक प्रकारची स्तोत्रे, कवचं इत्यादी रचली आहेत. त्यांपैकी संकटनिवारणार्थ ‘शिवकवच’ हे अत्यंत प्रभावी असे कवच आहे. शिवकवच पठण केल्यामुळे आपल्या भोवती संरक्षक कवच निर्माण होऊन त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. मंत्रोपचारतज्ञ डॉ. मोहन फडके यांनी सांगितल्याप्रमाणे आध्यात्मिक उपाय म्हणून सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील ५ साधक-पुरोहितांनी २९.८.२०१६ या दिवशी पारिजातक वृक्षाकडे तोंड करून बसून शिवकवचाची एकूण ११ आवर्तने केली.

४. ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ उपकरणाद्वारे प्रभावळ मोजणे

४ अ. ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख : या उपकरणाला ‘ऑरा स्कॅनर’ असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकाची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि त्याची प्रभावळ मोजता येते. हे उपकरण भाग्यनगर, तेलंगणा येथील भूतपूर्व परमाणू वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी वर्ष २००३ मध्ये विकसित केले. ‘वास्तू, वैद्यकशास्त्र, पशूवैद्यक शास्त्र, तसेच वैदिक शास्त्र यांमध्ये येणार्‍या अडचणींचे निदान करण्यासाठी या उपकरणाचा वापर करता येतोे’, असे ते सांगतात.

४ आ. उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण

४ आ १. नकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा हानीकारक असते. याअंतर्गत पुढील २ प्रकार येतात.

अ. अवरक्त ऊर्जा (इन्फ्रारेड) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मोजतात.

आ. जंबुपार ऊर्जा (अल्ट्राव्हायोलेट) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी ‘अल्ट्राव्हायोलेट’ ऊर्जा मोजतात.

४ आ २. सकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा लाभदायी असून ती मोजण्यासाठी स्कॅनरमध्ये सकारात्मक ऊर्जा दर्शवणारा +Ve हा नमुना ठेवतात.

४ आ ३. ‘यू.टी.एस्’ उपकरणाद्वारे घटकाची प्रभावळ मोजणे : प्रभावळ मोजण्यासाठी त्या घटकाची सर्वाधिक स्पंदने असणारा नमुना (सॅम्पल) वापरतात, उदा. व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ किंवा तिचे छायाचित्र, वस्तूच्या संदर्भात त्याचे छायाचित्र, वनस्पतीच्या संदर्भात तिचे पान, प्राण्याच्या संदर्भात त्याचे केस, वास्तूच्या संदर्भात तेथील माती किंवा धूळ आणि देवतेच्या मूर्तीच्या संदर्भात मूर्तीला लावलेले चंदन, गंध, शेंदूर आदी.

४ इ. ‘यू.टी.एस्’ उपकरणाद्वारे करायच्या परीक्षणाची पद्धत

चाचणीत वस्तूतील अनुक्रमे इन्फ्रारेड ऊर्जा, अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा मोजतात. त्या मोजण्यासाठी लागणारे नमुने (सॅम्पल्स) ‘यू.टी.एस्’ या स्कॅनरसमवेत दिलेले असतात. वरील तीन परीक्षणांनंतर शेवटी वस्तूची प्रभावळ मोजतात आणि त्यासाठी सूत्र ‘४ आ ३’ मध्ये दिल्याप्रमाणे नमुने वापरतात.

वस्तूतील किंवा वास्तूतील ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मोजण्यासाठी ‘यू.टी.एस्’ या स्कॅनरमध्ये प्रथम ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मोजण्यासाठी लागणारा नमुना ठेवतात. त्यानंतर परीक्षण करणारी व्यक्ती स्कॅनर विशिष्ट पद्धतीने हातात घेऊन ज्या वस्तूचे परीक्षण करायचे आहे, त्या वस्तूच्या समोर साधारण एक फुटावर उभी रहाते. त्या वेळी स्कॅनरच्या दोन भुजांमध्ये होणारा कोन त्या वस्तूतील ‘इन्फ्रारेड’ ऊर्जेचे प्रमाण दर्शवतो, उदा. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास त्या वस्तूत ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा पूर्णपणे आहे आणि स्कॅनरच्या भुजा मुळीच न उघडल्यास (म्हणजेच ० अंशाचा कोन) त्या वस्तूत ‘इन्फ्रारेड’ ऊर्जा मुळीच नाही, हे कळते. स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्यास ‘भुजांनी केलेला हा कोन त्या वस्तूपासून किती दूरपर्यंत टिकून रहातो ?’, हे मोजतात. मोजलेले हे अंतर, म्हणजेच त्या वस्तूतील ‘इन्फ्रारेड’ ऊर्जेची प्रभावळ होय. स्कॅनरच्या भुजा १८० अंशापेक्षा अल्प अंशाच्या कोनात उघडल्यास त्याचा अर्थ ‘त्या वस्तूभोवती ‘इन्फ्रारेड’ ऊर्जेची प्रभावळ नाही’, असा होतो. अशाच प्रकारे अनुक्रमे अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा आणि त्या वस्तूतील विशिष्ट स्पंदनांची प्रभावळ मोजतात.

५. चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता

अ. उपकरण हाताळणारी व्यक्ती आध्यात्मिक त्रास (नकारात्मक स्पंदने) नसलेली होती.

आ. उपकरण हाताळणार्‍या व्यक्तीने परिधान केलेल्या वस्त्रांच्या रंगाचा परिणाम चाचणीवर होऊ नये, यासाठी त्या व्यक्तीने पांढरी वस्त्रे परिधान केली होती.

६. ‘यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner)’ उपकरणाद्वारे २९.८.२०१६ या दिवशी केलेली निरीक्षणे, त्यांचे विवेचन आणि निष्कर्ष

pg7_table

टीप : स्कॅनर १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच त्या घटकाची प्रभावळ मोजता येते. त्यापेक्षा अल्प अंशाच्या कोनात स्कॅनर उघडला, तर त्याचा अर्थ ‘त्या घटकाभोवती प्रभावळ नाही’, असा होतो.

६ अ. सारणीतील नकारात्मक ऊर्जेसंदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

६ अ १. शिवकवच पठणापूर्वी पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळणे : शिवकवच पठणापूर्वी इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट नमुना वापरून निरीक्षण करतांना स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्या. याचा अर्थ त्या ठिकाणी पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळली. तसेच इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा (नकारात्मक ऊर्जा) अनुक्रमे ४.३० मीटर अन् ३.८८ मीटर परिसरात प्रक्षेपितही होत आहे. यावरून ‘तेथील वातावरण नकारात्मक स्पंदनांनी भारित झाले आहेे’, हे लक्षात येते. अशा दूषित वातावरणात वावरणार्‍यांवर त्याचा अनिष्ट परिणाम होऊ शकतो.

६ अ २. शिवकवच पठणानंतर नकारात्मक ऊर्जा अल्प होणे : शिवकवच पठणानंतर इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट नमुना वापरून निरीक्षण करतांना स्कॅनरच्या भुजा केवळ ९० अंशाच्या कोनात उघडल्या. याचा अर्थ नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण अल्प झाले आहे. तसेच नकारात्मक ऊर्जेचे सभोवतालच्या परिसरातील प्रक्षेपणही थांबले आहे. शिवकवच पठणामुळे निर्माण झालेल्या चैतन्यमय संरक्षक कवचाचा तो परिणाम आहे.

६ आ. सारणीतील सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

६ आ १. पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळणे : सर्वच वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही; पण चाचणीतील या दोन्ही परीक्षणांच्या वेळी सकारात्मक नमुना वापरून निरीक्षण करतांना स्कॅनरच्या भुजा १८० अंश कोनात उघडल्या. याचा अर्थ तेथे पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळली. तसेच प्रभावळ ४.१४ अन् ५.०८ मीटर आहे; म्हणजे सकारात्मक ऊर्जा तेवढ्या परिसरात प्रक्षेपित होत आहे. सनातन आश्रमात संत आणि साधक यांचे असलेले वास्तव्य अन् तेथे चालू असलेले राष्ट्र-धर्म यांचे कार्य यांमुळे आश्रम आणि त्याचा परिसर अतिशय सात्त्विक झाला आहे. सात्त्विकतेचा परिणाम व्यक्ती आणि सजीव-निर्जीव वस्तूंवर होतो, तसा या पारिजातक वृक्षावरही झाला. त्यामुळे वृक्ष पूर्ण सुकलेला असतांनाही त्याची सात्त्विकता टिकून राहिली आहे आणि त्यातून सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होत आहे.

६ इ. सारणीतील वस्तूच्या प्रभावळीच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

६ इ १. शिवकवच पठणानंतर पारिजातक वृक्षाची प्रभावळ वाढणे : सामान्य व्यक्तीची प्रभावळ साधारण १ मीटर असते. शिवकवच पठणापूर्वी पारिजातक वृक्षाची प्रभावळ ५.४७ मीटर आहे; म्हणजे सामान्य व्यक्तीच्या प्रभावळीच्या तुलनेत पुष्कळ अधिक आहे. पारिजातक वृक्ष मुळातच सात्त्विक असल्याचा तो परिणाम आहे. शिवकवच पठणानंतर पारिजातक वृक्षाची प्रभावळ ६.४३ मीटर आहे; म्हणजे आधीपेक्षा १ मीटरने ती वाढली आहे. शिवकवच पठणामुळे निर्माण होणारे चैतन्य पारिजातक वृक्षाने ग्रहण केल्याचा तो परिणाम आहे. यावरून ‘सात्त्विक वस्तूत सकारात्मक स्पंदने असतात आणि आध्यात्मिक उपायांमुळे त्यांत आणखी वाढ होते’, हे लक्षात येते.

७. निष्कर्ष

‘आध्यात्मिक उपायांमुळे आपल्या भोवती चैतन्यमय संरक्षक कवच निर्माण होते. तसेच आपल्यातील नकारात्मक स्पंदने अल्प अथवा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते’, हे या चाचणीतून लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय (१३.१२.२०१६)

ई-मेल : [email protected]

घटकाची आध्यात्मिक स्तरावरील
वैशिष्ट्ये वैज्ञानिक उपकरणांद्वारे अभ्यासण्याचा हेतू

‘एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत ? तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही ?’, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. उच्च पातळीचे संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक संतांनी सांगितलेले शब्द ‘प्रमाण’ मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र ‘शब्दप्रमाण’ नाही, तर ‘प्रत्यक्ष प्रमाण’ हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात