उपजतच देवाप्रती श्रद्धा आणि भाव असणार्‍या फोंडा, गोवा येथील सनातनच्या ६२ व्या संत पू. सुमन नाईक यांचा जीवनपट !

suman_naik

१. पू. सुमनमावशींचे लहानपण

१ अ. लहानपण हसत-खेळत आणि लाडात जाणे

‘पू. सुमनमावशी त्यांच्या आई-वडिलांच्या पुष्कळ लाडक्या होत्या. त्यांचे लहानपण आई-वडिलांसमवेत हसत-खेळत गेले. लहानपणी त्या त्यांच्या मामांकडे १४ वर्षे राहिल्या. मामांच्या कुटुंबात भावंडांसह ४० जण रहात असत.

१ आ. सर्व भावंडांमध्ये स्वतःला सर्वांत अधिक चिंचा मिळण्यासाठी झाडाखाली दगड ठेवून
‘तो दगड म्हणजे गणपती आहे आणि तोच अधिक चिंचा मिळवून देईल’, असा भाव ठेवणे

त्यांच्या वाड्यामधे एक मोठे चिंचेचे झाड होते. पू. मावशी सर्व भावंडांसह चिंचा आणायला जायच्या. अधिक चिंचा मिळाव्यात; म्हणून पू. मावशींनी झाडाखाली एक दगड ठेवला आणि भाव असा ठेवला की, तो गणपति आहे. हाच मला सर्वांत अधिक चिंचा मिळवून देईल. त्या तेव्हाही गणपतीशी सहजपणे बोलायच्या. त्यामुळे त्यांनाच सर्वांत अधिक चिंचा मिळायच्या. सर्व भावंडे विचारायची, ‘‘तुलाच अधिक चिंचा कशा काय मिळतात ?’’ तेव्हाही पू. मावशींमधे ‘सर्वकाही देवच देतो’, असा भाव आणि श्रद्धा होती.

२. विवाहानंतरचे कष्टप्रद जीवन

२ अ. शेतात उन्हात कामे करावी लागणे आणि ऊन लागू नये; म्हणून सूर्यदेवतेला प्रार्थना करणे

विवाहानंतर त्यांचे जीवन कष्टाचे होते. त्यांना शेतामधे काम करायला लागायचे. तेव्हा प्रखर ऊन असायचे. त्या वेळी पू. मावशी सूर्यदेवतेला प्रार्थना करायच्या, ‘तुझी सावली आमच्यावर असू दे.’

२ आ. जळणासाठी लाकडे तोडायला रानात जाण्याचा असह्य त्रास होणे
आणि याविषयी देवाला सांगितल्यावर दुसर्‍या दिवसापासून घरच्यांनी रानात पाठवणे बंद करणे

बर्‍याच वेळा त्यांना जळणासाठी (सरपणासाठी) रानात जाऊन लाकडे तोडून आणावी लागायची. त्याचा त्यांना पुष्कळ त्रास व्हायचा. त्या ते यजमानांना सांगू शकत नव्हत्या. एकदा त्रास असह्य झाल्यावर त्या देवापाशी बसून रडून देवाला सांगत होत्या, ‘आता हा त्रास सहन होत नाही. मी काय करू ?’ दुसर्‍या दिवसापासून घरच्यांनी त्यांना लाकडे आणण्यासाठी रानात पाठवणे बंद केले.

२ इ. कुटुंबात होणारा त्रास निमूटपणे सहन करणे आणि त्रास असह्य झाल्यावर जीवन
संपवण्यासाठी रात्री तळ्यातल्या पाण्यात गेल्यावर शेजारील व्यक्तीने समजूत घालून घरी परत आणणे

पू. मावशींच्या कुटुंबात त्यांना पुष्कळ त्रास व्हायचा. नातेवाईक विनाकारण उलट-सुलट बोलायचे, जाणीवपूर्वक चुकीच्या कृती करून मावशींना दुखावेल असे ते करत होते ! पू. मावशी काहीही न बोलता हे सर्व निमूटपणे सहन करायच्या. तेव्हाही त्यांचा दृष्टीकोन ‘कुटुंबात कुणी चुकीचे वागतात; म्हणून आपण तसे वागायचे नाही’, असा होता. एक दिवस त्यांना हा त्रास असह्य झाला आणि रात्री ११.३० वाजता त्या आपले जीवन संपवायला तळ्याकडे निघाल्या. त्या तळ्याकडे रात्री ८.३० नंतर कोणीही जात नसे. पाण्यात उतरून पुढे-पुढे जातांना पाणी गळ्यापर्यंत आले आणि त्यांच्या शेजारी रहाणार्‍या एका व्यक्तीने त्यांना ‘सुमन’ अशी हाक मारली. त्यांना हटकले आणि समजूत घालून घरी परत आणले. या प्रसंगावर पू. मावशी म्हणतात, ‘‘देवाला माझ्याकडून साधना करवून घ्यायची होती; म्हणूनच देवाने मला वाचवले.’’ या प्रसंगानंतर मात्र मावशी काही वर्षे माहेरी राहिल्या.

२ ई. घराच्या ठिकाणी असलेले वारूळ स्वच्छ करूनही पुन्हा सिद्ध होणे आणि
श्री कपिलेश्‍वराला प्रार्थना करून तेथील विभूती वारूळाच्या स्थानावर टाकल्यावर वारूळ होणे बंद होणे

थोड्या दिवसांनी त्या यजमान आणि मुले यांसह एका पडक्या घरात राहू लागल्या. त्या ठिकाणी वारूळ होते. मावशींनी ते स्थान स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला, तरी १५ दिवसांनी पुन्हा तेथे वारूळ सिद्ध व्हायचे. तेव्हा मावशींनी घरासमोर असणार्‍या कपिलेश्‍वर मंदिरामधे जाऊन कपिलेश्‍वराला प्रार्थना केली, ‘देवा, आता तूच काय ते बघ !’ असे म्हणून त्यांनी मंदिरातील विभूती आणून वारूळ असणार्‍या स्थानावर टाकली. त्यानंतर तेथे पुन्हा वारूळ झाले नाही. तेव्हा शेजार्‍यांनाही आश्‍चर्य वाटले.

२ उ. मुलांवर चांगले संस्कार करणे

पू. मावशींची आर्थिक स्थिती पुष्कळ हलाखीची होती. मावशींचे शिक्षणही अल्प होते; परंतु त्यांनी मुलांना शिकवले, त्यांच्यावर चांगले संस्कार केले आणि चांगले घडवलेही ! त्या मुलांना नेहमी सांगायच्या, ‘‘कोणाचीही वस्तू घ्यायची नाही. कोणाच्या झाडाची फळे तोडायची नाहीत.’’ पू. मावशी शिकलेल्या नसतांनाही मुलांकडून अभ्यास करवून घ्यायच्या.

२ ऊ. पू. मावशींना काही दुःख किंवा त्रास असेल, तर त्या देवालाच सांगायच्या आणि देवाजवळच रडायच्या.

२ ए. कुटुंबातील व्यक्तीविषयी पूर्वग्रह न ठेवता त्यांची सेवा करणे

काही दिवसांनी कुटुंबातील व्यक्ती त्यांच्या घरी रहायला आल्या. तेव्हा मनामधे त्यांच्याविषयी कोणताही पूर्वग्रह न ठेवता पू. मावशी त्यांच्याशी प्रेमाने वागल्या आणि त्यांची सेवा केली.

३. साधना

३ अ. कर्मकांडाची आवड असणे

पू. मावशींना कर्मकांडाची आवड होती. त्यांनी १७ वर्षे शुक्रवारचे कडक उपवास केले. शुक्रवारी रात्री त्या थोडे खायच्या. त्या अनेक व्रत-वैकल्ये करायच्या.

३ आ. साधना करायला लागल्यावर होणार्‍या विरोधाला
तोंड देणे आणि प.पू. डॉक्टरांविषयी मनात श्रद्धा अन कृतज्ञता असणे

काही दिवसांनी त्या साधनेत आल्या. साधना करायला लागल्यावर ‘प.पू. डॉक्टर आपल्याला न मागताच सर्वकाही भरभरून देत आहेत’, असा त्यांचा कृतज्ञतेचा भाव असायचा. साधनेत आल्यावर पू. मावशींना त्यांच्या नातेवाइकांकडून विरोध होऊ लागला. पू. मावशी त्यांना उत्तरे देऊन समजावत. त्यांचा ‘प.पू. डॉक्टर सर्वकाही योग्यच करतील’, असा भाव असतो.

३ इ. पू. मावशी करत असलेली प्रार्थना !

पू. मावशी प.पू. गुरुदेवांना प्रार्थना करतात, ‘प.पू. गुरुमाऊली, आपल्या चरणांखालची धूळ बनून रहाता येऊ दे. त्या धुळीचा वास माझ्या हृदयात सतत राहू दे’, हीच आपल्या चरणी प्रार्थना !’

४. पू. मावशींच्या मुखातून वरील प्रसंग ऐकतांना पुष्कळ भावजागृती होणे
आणि प्रसंग लिहितांना संत सखुबाईंचे जीवनचरित्र अनुभवत आहोत,’ असे वाटणे

पू. मावशींचे साखळी येथे मार्गदर्शन झाल्यावर परतीच्या प्रवासात पू. मावशींनी हे प्रसंग सांगितले. त्या वेळी पुष्कळ भावजागृती होत होती. ‘हे सर्व लिहून द्यावे,’ असा विचार देवाने दिला. प्रसंग लिहित असतांना ‘संत सखुबाईंचे जीवनचरित्र अनुभवत आहोत,’ असे वाटले.

प.पू. डॉक्टरांनीच हे सर्व अनुभवण्याची आणि लिहिण्याची संधी दिली, त्यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता !’

– श्री. अमोल वानखडे, फोंडा, गोवा. (२२.१०.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात