अधिग्रहित मंदिरे आणि अंनिसचे आर्थिक घोटाळे यांविषयी कारवाई करू !

विधी आणि न्याय मंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे आश्‍वासन श्री. श्रीकांत पिसोळकर

1
डावीकडून श्री. बाळासाहेब मुरकुटे, डॉ. रणजीत पाटील, श्री. श्रीकांत पिसोळकर आणि श्री. अभय वर्तक

नागपूर : अधिग्रहित मंदिर, अंनिसचे आर्थिक घोटाळे, तसेच सोलापूर जिल्ह्यातील अवैध पशूवधगृह हे विषय मला चांगल्या पद्धतीने माहिती असून मी यात लक्ष घालून योग्य कारवाई करतो, असे आश्‍वासन गृह विभागाचे विधी आणि न्याय राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले. वरील विषयांंच्या संदर्भातील मागण्यांचे निवेदन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी डॉ. पाटील यांना दिले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भाजपचे आमदार श्री. बाळासाहेब मुरकुटे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे आणि समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर हेही उपस्थित होते.

सुयोग्य व्यवस्थापन देण्याच्या नावाखाली श्री तुळजाभवानी, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती आणि पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत येणारी मंदिरे सरकारने अधिग्रहित केली आहेत. अशा शासननियंत्रित देवस्थानांत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार, सहस्रो एकर जमिनींचे घोटाळे, दान केलेल्या गायींचे मृत्यू अन् त्यांची कसायांना विक्री आदी अनेक अपप्रकार हिंदु जनजागृती समिती, हिंदु विधीज्ञ परिषद आणि अन्य भक्त यांनी वेळोवेळी पुराव्यानिशी उघड केले.

परिणामी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि तुळजापूर देवस्थान समिती यांच्या घोटाळ्यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी चालू झाली; मात्र जाणीवपूर्वक वर्षानुवर्षे या चौकशा लांबवल्या जात आहेत.

तरी शासनाने या सर्व देवस्थानांतील घोटाळ्यांच्या चौकशा येत्या ३ मासांत पूर्ण कराव्यात आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच शासनाने सर्व भ्रष्ट शासकीय देवस्थान समित्या तात्काळ विसर्जित (बरखास्त) कराव्यात. ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ ट्रस्टने शासनाचा निधी बुडवला आणि अनेक आर्थिक घोटाळे केले, हे धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ट्रस्टवर प्रशासक नेमावा, तसेच सोलापूर जिल्ह्यातील ‘सोनअंकुर एक्सपोर्ट्स प्रा. लि.’ हे अवैध पशूवधगृह सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणारे असल्याने ते तात्काळ बंद करावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन गृह विभागाचे विधी आणि न्याय राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांना या वेळी देण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात