उज्जैन येथील कार्तिक मेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून जनजागृती !

1
ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेतांना जिज्ञासू

उज्जैन (मध्यप्रदेश) : येथे उज्जैन नगरपालिकेच्या वतीने प्रतिवर्षी होणार्‍या सुप्रसिद्ध कार्तिक मेळ्यात ८ ते ११ डिसेंबर या कालावधीत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या यांच्या वतीने प्रदर्शनाद्वारे जनजागृती करण्यात आली. याकरता मेळ्यात एक कक्ष उभारून त्यात आचारधर्म, राष्ट्र-धर्म, धर्मशिक्षण, हिंदु राष्ट्र आदी विषयांवर ‘फ्लेक्स’ फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले. तसेच संस्थेने प्रकाशित केलेले विविध विषयांवरील ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे विक्रीकेंद्रही या ठिकाणी उभारण्यात आले होते. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हे प्रदर्शन लावण्यासाठी नगरपालिकेच्या महापौर सौ. मीना जोनवाल, सभापती श्री. सोनू गेहलोत, आयुक्त श्री. सुबोध जैन आणि श्री. धीरज श्रीवास्तव यांनी सहकार्य केले.

अभिप्राय

श्री. राहुल जोशी, विद्यार्थी, विधी शाखा, उज्जैन.

मी मागच्या कार्तिक मेळ्यात सनातनचे प्रदर्शन पाहिले. त्या वेळी पुष्कळ प्रभावित झालो. कुठेही अशा प्रकारचे ज्ञान मिळत नाही. साधनेविषयी इतकी सुटसुटीत आणि नेमकी माहिती मिळाल्याने मला पुष्कळ आनंद झाला. त्या वेळी येथून घेतलेला ‘सनातन नीम साबण’ मला त्वचारोगासाठी अत्यंत गुणकारी ठरला. त्या वेळी मी विचार केला, ‘‘ज्या संस्थेचे उत्पादन इतके चांगले आहे, त्या संस्थेचे विचार किती चांगले असतील.’’ तेव्हापासून मी संस्थेच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहे.

श्री. करण यादव, उज्जैन

सनातन संस्थेकडून ठिकठिकाणी भिंतींवर केले जाणारे जागृतीपर लिखाण मी कुंभमेळ्यापासून वाचत आहे. हे लिखाण वाचून मी पुष्कळ प्रभावित झालो. ‘मला हिंदु धर्माविषयी जाणून घ्यायची पुष्कळ जिज्ञासा आहे, ती या संस्थेकडून पूर्ण होईल’, असे वाटते.

श्री. संजय यादव आणि श्री. शैलेंद्र दवे, उज्जैन

मागच्या वर्षी सनातनचे प्रदर्शन पाहिल्यानंतर आम्ही धर्माचरणास आरंभ केला. तसेच नामजपही चालू केला. त्यामुळे आम्हाला धर्माचरणाचा आनंद मिळत आहे. नवनवीन विचार शिकायला मिळत आहेत.

क्षणचित्रे

१. अनेक पालकांना हे प्रदर्शन पाहून आनंद झाला. ‘धर्माचरणाविषयी सध्याची पिढी उदासीन आहे. अशा प्रकारच्या जागृतीतून ते धर्माचरण करण्यास आरंभ करतील’, असा विश्‍वास पालकांनी व्यक्त केला.

२. अनेक युवकांनी प्रदर्शन कक्षात येऊन नमस्कार करण्याचे लाभ, भोजन खाली बसून करण्याचे लाभ इत्यादींविषयी आपल्या मनातील शंकांचे निरसन करून घेतले. सामाजिक संकेतस्थळांद्वारे ही माहिती मिळण्यासाठी नावनोंदणी केली.

३. ‘विश्‍वात एकही हिंदु राष्ट्र नाही. त्यामुळे भारताला हिंदु राष्ट्र बनवायला हवे’, हा प्रदर्शनात लावलेला फलक वाचून अनेकांनी ‘हे व्हायलाच हवे’, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात