हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याकडून शिक्षणमंत्र्यांना निवेदन सादर

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याकडून
शिक्षणमंत्र्यांना निवेदन सादर विज्ञापनाच्या माध्यमातून धर्मांतरास प्रोत्साहन देण्याचा शाळेचा प्रयत्न

nivedan
डावीकडून शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांना निवेदन देताना श्री.अभय वर्तक, मध्यभागी भाजपचे आमदार श्री.नरेंद्र पवार

नागपूर : नेरुळ, पनवेल येथील प्रसिद्ध दिल्ली पब्लिक स्कूलने विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी लावलेल्या विज्ञापनामध्ये एका लहान मुलीला मदर तेरेसा यांच्यासारख्या दिसणार्‍या ख्रिस्ती पंथीय ननच्या वेशात दाखवले आहे. त्यावर अशी शाळा जेथे इतरांविषयी दया कशी निर्माण करावी, हेे शिकवले जात नाही, तर ती तुमच्यात निर्माण करते, या अर्थाचे इंग्रजी भाषेत वाक्य लिहून धर्मांतरास प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दिल्ली पब्लिक स्कूलच्या व्यवस्थापनाने विज्ञापन त्वरित मागे घेऊन त्या विज्ञापनाविषयी शिक्षण संस्थेने माफी मागावी, तसेच अशा प्रकारचे विज्ञापन प्रसिद्ध करून धर्मांतराला चालना देणार्‍या शाळांची नोंदणी रहित करावी आणि अन्य ख्रिस्ती शाळांचीही त्या अनुषंगाने तपासणी करावी, अशी मागणी करणारे निवेदन राज्याचे शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांना १५ डिसेंबर या दिवशी दिले. त्यावर श्री. तावडे यांनी दिल्ली पब्लिक स्कूलची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले. (निवेदनाची नोंद घेऊन चौकशीचे आदेश देणारे शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांचे आभार ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे, सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक आणि समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी श्री. तावडे यांची भेट घेऊन वरील निवेदन दिले.

त्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, आपला देश हा धर्मनिरपेक्ष तत्त्वावर चालत असल्याचे सातत्याने सांगितले जाते. अशा वेळी विज्ञापनातून एका विशिष्ट धर्माचे चित्र दाखवून त्याचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे एक प्रकारे धर्मांतरास प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. अनेक पालकांचेही असेच म्हणणे आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या बालमनावरही चुकीचा संस्कार होत आहे. दया हे काही कुठल्या धर्माचे विशेषत्व नव्हे. भारतात सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत कार्य करणारे अनेक श्रेष्ठ महात्मे होऊन गेले आहेत; मात्र त्यांनी त्या कार्याचा वापर धर्मप्रसारासाठी केलेला नाही. तसेच या विज्ञापनातून ज्या मदर तेरेसा यांचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांनी स्वतःच्या संस्थेतून कसे गरिबांचे शोषण करून त्यांचे धर्मांतर केले, याविषयी देश-विदेशातील त्यांचे सहकारी आणि लेखक यांनी पुस्तकेही लिहिली आहेत. त्यामुळे शाळेने विज्ञापनातील त्यांचे चित्र त्वरित काढावे आणि ते न काढल्यास पालक आंदोलन उभारतील.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात