सगुणातील ईश्‍वराची अनुभूती देणारे एकमेवाद्वितीय संत प.पू. परशराम पांडे महाराज (वय ८९ वर्षे) !

pp_pandye_maharaj
प.पू. परशराम पांडे महाराज

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्माण केलेल्या या साधनेच्या विश्‍वातील एक उच्च विभूती म्हणजे प.पू. परशराम माधव पांडे महाराज (प.पू. बाबा) ! ३० नोव्हेंबर २०१६, म्हणजेच मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा या दिवशी त्यांनी ९० व्या वर्षात पदार्पण केले . त्यानिमित्ताने त्यांचे चरणी उतराई होण्यासाठी देवद आश्रमातील साधकांनी ही शब्द सुमनांजली अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे. हे लिखाण म्हणजे देवद आश्रमातील सर्व साधकांचे मनोगत आहे.

प.पू. बाबांचे देवद आश्रमातील साधकांच्या हृदयातील असे अद्वितीय स्थान आहे. परात्पर गुरु डॉक्टरांची देवद आश्रमातील साधकांवर असलेली ही कृपाच आहे, यासाठी ही कृतज्ञतापुष्पांची आेंजळ त्यांच्या चरणी रीती करत आहोत.’

प.पू. परशराम पांडे महाराज यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. गुणवैशिष्ट्ये

pande_maharaj
प.पू. पांडे महाराज यांची भावमुद्रा ! (वर्ष २००९)
shu_yogini_pppandem1
कु. योगिनी आफळे (वय १४ वर्षे) हिने प.पू. पांडे महाराजांना दिलेले कृतज्ञतापत्र

१ अ. व्यष्टी गुणवैशिष्ट्ये

१ अ १. रूप मनोहर !

‘प.पू. बाबांचे रूप पुष्कळ मनोहर आहे. त्यांच्याकडे पहातच रहावेसे वाटते. त्यांचे खाणे, पिणे, बोलणे, चालणे, झोपणे, वाचणे, लिहिणे इत्यादी सर्वच कृती सुंदर आहेत. त्या कृती पहाण्यातही आपल्या दृष्टीला एक वेगळाच आनंद आहे. त्यांच्याकडेच दृष्टी खिळून रहाते. त्यांचे चरणही पुष्कळ सुंदर आहेत. ‘त्यातच सर्व आनंद सामावला आहे’, असे वाटते. त्यांच्या दर्शनाने एक वेगळीच स्थिती होते.’ – सौ. अश्‍विनी अतुल पवार

१ अ २. आनंदी आणि उत्साही

‘प.पू. बाबांना कधीही कोणत्याही क्षणी पाहिले, तरी ते नेहमी आनंदी आणि उत्साही असतात. त्यांचे विश्‍व निराळेच आहे.

१ अ ३. मानवी गुणांची खाणच !

‘प.पू. बाबा म्हणजे मानवी गुणांची खाणच आहेत. आपल्याकडेच ‘त्यांच्यातील देवत्वाचे दर्शन सर्वांना घडावे’, याचे वर्णन करण्याचे शब्द नाहीत. स्थूल दृष्टीने जे कळते, त्यातच त्यांची महानता, श्रेष्ठत्व अन् गुरुतत्त्व यांचे वर्णन करतांना मती कुंठीत होते. ‘त्यांना जाणण्यासाठी अजून साधनाच पुष्कळ वाढायला व्हायला हवी’, असे वाटते. – कु. पूजा जठार आणि कु. स्नेहा झरकर

१ अ ४. दैनंदिन सर्व कृतींमध्ये अखंडत्व असणे

‘वयाच्या ९० व्या वर्षी पहाटे ४.३० वाजता उठल्यानंतर दिवसभर व्यस्त दिनक्रम ठेवणारे संत विरळेच आहेत. उठणे, औषध घेणे, मुखमार्जन, फिरणे, अंघोळ, व्यायाम, पूजा, दैनिक सनातन प्रभातचे वाचन करून त्यातील चुका काढणे, साधकांसाठी नामजप करणे, नंतर ग्रंथाची सेवा इत्यादी कृती करत रात्री मर्दन करून घेऊन झोपणे इत्यादी कृती ते न कंटाळता करतात. वयपरत्वे एखाद्याला वाटू शकते ‘एवढे काय आवश्यक आहे’; मात्र ते दैनिकातील प्रत्येक चौकटीनुसार आज्ञापालन, स्वयंशिस्त आणि अखंड समष्टीचा विचार करत असल्याने प्रत्येक कृती नेटाने पूर्ण करतात. त्यांचे म्हणणे असते की, मला कुणाचे बंधन नाही; पण मी ईश्‍वराला बांधील असल्यामुळे या सर्व कृती करत असतो.’ – श्री. यज्ञेश सावंत आणि सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ

१ अ ५. आदर्श आचरण

१ अ ५ अ. ‘दैनिकातील सूचनांचे आज्ञापालन : महर्षींनी सांगितल्यापासून ते रात्री झोपण्यापूर्वीही कुंकू लावून झोपतात. दिवसाही नेहमी कपाळावर कुंकवाचा टिळा असतो.’ – सौ. अश्‍विनी अतुल पवार (१९.११.२०१६)

१ अ ५ आ. उपाय तत्परतेने करणे : ‘दैनिक सनातन प्रभात मध्ये येणारे लहानसहान आयुर्वेदिय उपचार, जे त्यांना करणे सोपे आणि आवश्यक आहेत, ते सर्व उपाय ते तत्परतेने करतात.’ – सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ

१ अ ६. इतरांना समजून घेणे : ‘मी सेवेत नवीन असल्यामुळे माझ्याकडून झालेल्या चुका ते समजून घेतात. ते उच्च कोटीचे संत असून वयोवृद्धही असल्याने त्यांना त्रास होऊ नये, यासाठी मी प्रयत्न करतांना मला ताणही येत असे. तेव्हा प.पू. बाबा म्हणाले, ‘‘घाबरू नकोस. समजून घेऊन आणि भावाच्या स्तरावर प्रयत्न केले की, जमेल.’’ त्या वेळी प.पू. बाबांचा प्रत्येक शब्द पुष्कळ मौल्यवान वाटून बळ आणि उत्साह देतो.’ – श्री. संदेश नाणोसकर आणि कु. सोनाली गायकवाड

१ अ ७. सेवेतील तळमळ

१ अ ७ अ. चिकाटी : ‘मी आणि आई त्यांच्याकडे वैशिष्ट्यपूर्ण आणि विविध आकारातील असणार्‍या संग्राह्य दगड सेवेतील दगड घेऊन सेवेला जातो. त्या वेळी ते नुकतेच ध्यानातून उठलेले असतात. तेव्हा विश्रांती न घेता ते लगेच सेवेला बसतात. यातून त्यांची सेवेतील चिकाटी लक्षात येते.

१ अ ७ आ. सेवा परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न : प.पू. बाबांना सेवेत चूक झालेली आवडत नाही. ते नेहमी एक सेवा झाल्यावर ती लगेच पडताळतात आणि ‘त्यात काही त्रुटी राहिली नाही ना’, हे पहातात. यातून त्यांची सेवा परिपूर्ण होण्याची तळमळ लक्षात येते. – कु. योगिनी आफळे (वय १४ वर्षे)

१ अ ८. परिपूर्णता

‘लिखाणाची सेवा चालू असतांना त्यांना एखाद्या विषयावर अनेक दिवस ज्ञान येत रहाते. जोपर्यंत त्यांना ‘हा विषय पूर्ण झाला’, असे वाटत नाही, तोपर्यंत ते लिखाण पुढे पाठवण्यास सांगत नाहीत. यामध्ये त्या विषयावर कितीही पाने लिखाण झाले, तरी ते पूर्ण होईपर्यंत ते थांबत नाहीत. प.पू. बाबांकडून येणारे ज्ञान परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्या धारिका प्रदीर्घ असतात. यावरून त्यांची सेवा परिपूर्ण कशी करायची असते, हे लक्षात येते.

१ अ ९. स्मृतीची विलक्षण कार्यक्षमता

कोणत्याही विषयावरील लिखाण करतांना ते प्रत्येक वेळी संदर्भ ग्रंथानुसार पडताळणी करूनच सूत्र लिहितात. ते कधीच गृहीत धरत नाहीत. तसेच त्यांनी फार पूर्वी वाचलेलेसुद्धा त्यांच्या अजून स्मृतीत आहे. ‘कोणते सूत्र कुठे सापडेल’, हे ते तंतोतंत सांगतात. त्यांची स्मृती कमालीची कार्यक्षम आहे.’
– सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ

१ अ १०. इतरांचा विचार करणे

अ. आश्रमातील परिसरात कधी कुत्रा आला, तर त्याला भाकरी देण्यास सांगतात. त्यांचे सर्व प्राणीमात्रांवर पुष्कळ प्रेम आहे.

आ. नामजपाला गेल्यानंतर कधी खोलीत पंखा चालू असेल आणि आपल्याला शिंक आली, तर ते पंख्याची गती न्यून करण्यास सांगतात. ‘उपस्थित साधकांना पंखा लागणार का ?’, असे तत्परतेने विचारून बंद करण्यास सांगतात. ते पुष्कळ सतर्क असतात. त्यांचे प्रेम पुष्कळ निराळेच आहे.’

इ. ‘आश्रमातील एक वृद्ध रुग्णाईत साधकाला प.पू. बाबांना भेटायचे होते. प.पू. बाबा तळमजल्यावर रहातात आणि ते साधक पहिल्या मजल्यावर रहातात. त्या वेळी प.पू. बाबांनी स्वतःहून विचारले ‘‘ते कसे येणार ? मीच त्यांना भेटायला जातो.’’

ई. प.पू. बाबांच्या खोलीत नामजपासाठी कुणी येणार असल्यास ते येण्यापूर्वीच त्यांच्यासाठी आसंदी आणून ठेवायला सांगतात. आसंदीची दिशा कशी असायला पाहिजे, तेही सांगतात.’ – सौ. अश्‍विनी अतुल पवार

१ अ ११. साधकांना स्वतःहून साहाय्य करणे

अ. ‘प.पू. बाबांकडे कुणी साधक गेला आणि त्याची पाठ दुखत असेल, तर ते त्याची पाठ दाबून देतात. कुणाचा घसा दुखतो, तर त्याला औषध लावून देतात; एखाद्याचे डोके दुखल्यास दाबून देतात. एखाद्याला काही शारीरिक किंवा आध्यात्मिक त्रास होत असेल, तर प.पू. बाबा तो साधक बरा होईपर्यंत त्याची पुष्कळ काळजी घेतात आणि निरनिराळे उपाय अन् मंत्रोपाय सांगत असतात.’ – सौ. अश्‍विनी अतुल पवार

आ. ‘प.पू. बाबा म्हणतात, ‘आपल्याकडे साहाय्य मागायला आलेल्याला कधीच रित्या हाती मागे पाठवायचे नाही. त्यात भगवंताचे रूप पहायचे आणि त्याला साहाय्य करायचे.’ असे प.पू. बाबांचे तत्त्व आहे.’ – सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ

१ अ १२. देवद आश्रमातील चुकांसाठी स्वत:ला उत्तरदायी धरणे

‘काही वर्षांपूर्वी देवद आश्रमात अनेक चुका लक्षात आल्या होत्या. खरेतर साधकांतील दोषांमुळे या चुका झाल्या होत्या; मात्र त्याविषयी प.पू. महाराज यांनी ‘मी स्वत: या चुकांसाठी उत्तरदायी आहे. मीही आश्रम परिसरात फिरत असतो’, असे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सांगितले.’ – श्री. यज्ञेश सावंत

१ अ १३. सनातन संस्थेशी पूर्वीपासून, सध्या आणि पुढेही एकरूप असणे

‘सनातन संस्थेत येण्यापूर्वी त्यांनी ‘श्री गणेश अध्यात्म दर्शन’ हा ग्रंथ लिहिला आहे. तो ग्रंथ सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथासारखाच आहे. त्यामध्ये चित्रे, सारणी, तक्ते, टक्केवारी अशी आधुनिक वैज्ञानिक भाषा आहे. यावरून ‘ते सनातन संस्थेशी पूर्वीपासून एकरूप होते, सध्या आहेत आणि पुढेही असणार आहेत’, हे लक्षात येते.’ – श्री. शिवाजी वटकर

१ अ १४. कर्तेपणा नसणे

‘प.पू. बाबा साधकांना त्रासावर उपाय सांगून व्यायाम करायला सांगतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधकांनी कृती केली की, साधकांना लगेच फरक पडतो. हे प.पू. बाबांना सांगितल्यावर ते म्हणतात, ‘‘मी काय डॉक्टर आहे का लगेच फरक पडायला ? हे परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे झाले.’’ – श्री. सचिन हाके

१ अ १५. अंतर्मुखता

‘प.पू. बाबा कमालीचे अंतर्मुख असतात. त्यांना बाहेरील सगुणातील विश्‍वात भगवंताविना दुसरे काही दिसतच नाही. तसेच ते इतके पारदर्शक आहेत की, त्यांना स्वतःच्या ठिकाणी भगवंताविना कुणी दिसतच नाही. भगवंताची लीलाच ते सदैव अनुभवत असतात. त्या आनंदात ते तल्लीन असतात.

१ अ १६. ६५ वर्षांची सोबत दिलेली सहचारीणी कायमची सोडून गेल्याच्या भाव-भावना त्यांना सद्गतित करून गेल्या होत्या, हे त्यांच्या स्वरात झालेल्या पालटामुळे जाणवणे

‘‘ती. सौ. पांडेआजींच्या मृत्यूनंतर पुढील ८ दिवस ‘प.पू. बाबांनी आजींचा मृत्यू अक्षरशः गिळला’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही; कारण या दिवसांत त्यांचा कंठस्वर नीट प्रगट होत नव्हता; परंतु त्यांनी आम्हा कुणालाच याविषयी काही जाणवू दिले नाही. ‘६५ वर्षांची सोबत दिलेली सहचारीणी कायमची सोडून गेल्याच्या भाव-भावना त्यांना सद्गतित करून गेल्या होत्या’, हे त्यांच्या स्वरात झालेल्या पालटामुळे जाणवले. ‘प्रभु रामचंद्राने सीतेचा विरह, कसा अनुभवला असेल’, हे प.पू. पांडे महाराज यांच्या या पालटातून अनुभवता आला.’ – सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ

१ अ १७. प्रत्येक गोष्ट स्वत: आचरणात आणतात.

१ आ. समष्टी गुणवैशिष्ट्ये

१ आ १. साधकांना शिकवणे

अ. ‘प.पू. बाबा कोणतीही गोष्ट सांगतांना किंवा कृती करतांना ती आध्यात्मिक स्तरावर करतात. त्यामागील मूळ तत्त्व सांगतात. त्यासाठी ते वेद, उपनिषद, भगवत्गीता आदींचा संदर्भ देतात.

आ. प.पू. बाबांना व्यष्टी आणि समष्टी यांविषयीची कोणतीही समस्या किंवा अडचण सांगितल्यावर ते त्वरित आध्यात्मिक स्तरावर निराकरण करतात. त्या समस्येचे विश्‍लेषण करून आध्यात्मिक सूत्र सिद्ध करतात. त्या सूत्रात तो प्रश्‍न किंवा गणित बसवून उत्तर देतात. त्यामुळे त्या प्रकारचा कोणताही प्रश्‍न (गणित) त्या सूत्राच्या आधारे सोडवता येतो. अशा रीतीने ते साधकांना स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी बनवतात.

इ. प.पू. बाबा साधना आणि सेवा यांविषयी पुनः पुन्हा सांगून तो संस्कार साधकाच्या मनावर करतात. साधकांच्या भल्यासाठी किंवा समष्टीसाठी ते साधना आणि उपाय सांगतात; मात्र साधक ती पूर्ण करण्यास अल्प पडतात. तेव्हा साधकांच्या भल्यासाठी आणि साधना होण्यासाठी ती गोष्ट तडीस जाईपर्यंत ते पाठपुरावा करतात.’ – श्री. शिवाजी वटकर

ई. ‘एकदा प.पू. बाबांनी सकाळी ५.४५ वाजता दाढी करण्यासाठी आरसा मागितला. मी तो आरसा पुसून ठेवला होता. प.पू. बाबा दाढी करायला बसल्यावर त्यांनी विचारले, ‘‘अरे आरसा नीट पुसला नाही का ? आरसा पुसतांना नीट पुसला पाहिजे. आपण एखादी सेवा करतांना ‘देवाला काय आवडेल ? कसे आवडेल ?’ अशी सेवा करायला हवी.’’ त्या चुकीतून मला शिकायला मिळाले, ‘आरसा म्हणजे माझे हृदय आहे. त्यात भगवंत पहाणार आहे. माझे हृदय भगवंत पहाणार, तर ते कसे असायला हवे ? ते पारदर्शकच असले पाहिजे, तरच भगवंताला आवडेल आणि तो तेथे वास करेल.’ – श्री. सचिन हाके

१ आ २. तळमळ

१ आ २ अ. राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे समष्टी कार्य तळमळीने करणे : ‘हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभा आणि विविध उपक्रम सनदशीर मार्गाने घेतले जातात. त्या वेळी काही कारण नसतांना पोलीस अनुमती मिळण्यास अडचणी येणे, सभेला अडथळा आणण्यासाठी मोठ्या वाईट शक्तींनी मैदानात यंत्र ठेवणे, घारीच्या माध्यमातून वातावरणात काळी शक्ती सोडणे, कार्यकर्त्यांच्या मनात विकल्प पसरवणे, असे सूक्ष्मातील अनेक अडथळे आणले जातात. प.पू. बाबांना याविषयी कळवल्यावर ते त्वरित सूक्ष्मातून आध्यात्मिक स्तरावर उपाय करून सर्व अडथळे दूर करतात. त्यांचे समष्टी कार्याला साहाय्य आणि आशीर्वाद लाभतात. ‘संतच राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे खरे समष्टी कार्य तळमळीने करू शकतात’, हे यावरून लक्षात येते.

१ आ २ आ. सनातनच्या प्रत्येक साधकाची आध्यात्मिक प्रगती व्हावी, अशी त्यांची तळमळ असून त्यानुसार त्यांनी प्रत्येकाला साहाय्य करणे : वर्ष २०१० मध्ये माझ्या दोषांमुळे माझी आध्यात्मिक पातळी ११ टक्क्यांनी घसरली होती. त्यामुळे मी नकारात्मक स्थितीत गेलो होतो. तेव्हा मी प.पू. बाबांच्या संपर्कात नव्हतो, तरीही त्यांनी मला बोलावून सकारात्मक स्थितीत येण्यासाठी मार्गदर्शन केले आणि आध्यात्मिक स्तरावर आधार दिला. त्यांच्या संकल्प शक्तीने आणि चैतन्यामुळे मला व्यष्टी साधना गांभीर्याने करण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर ७० दिवसांनी (गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी) प.पू. बाबांनी मला बोलावून ते म्हणाले, ‘‘मासिकामध्ये तुमचे नाव आले असून प.पू. डॉक्टरांच्या कृपेने तुमची पातळी ६१ टक्के झाली आहे.’’ त्या वेळी त्यांना फार आनंद झाला होता. त्यांचे ‘त्या ७० दिवसांच्या काळात माझ्यावर लक्ष होते आणि त्यांची संकल्प शक्ती कार्यरत होती’, असे जाणवते. – श्री. शिवाजी वटकर

१ आ २ इ. ‘साधकांची प्रगती होऊन त्यांनी अध्यात्मात लवकर पुढे जावे’, याविषयीची तीव्र तळमळ : ‘प.पू. बाबांच्या मनात सतत एकच विचार असतो, तो म्हणजे ‘साधकांची प्रगती व्हावी. साधकांनी अध्यात्मात लवकर पुढे जावे.’ त्यातून त्यांची तळमळ दिसून येते. एकदा रात्री मी प.पू. बाबांचे पाय चेपत होतो. त्या वेळी प.पू. बाबांनी त्यांचे गुरु प.पू. बाबाराव महाराज यांचे उदाहरण दिले. ते म्हणाले, ‘‘मी तुम्हाला पाय चेपायला सांगतो, त्यामागे काहीतरी उद्देश असतो. संतांना काही त्रास होत नसतो. ते त्याच्या पलीकडे गेलेले असतात. या सेवेच्या माध्यमातून साधकांना चैतन्य ग्रहण करता यावे; म्हणून संत पाय चेपायला सांगतात.’’ काही दिवसांनी असाच प्रसंग घडला. प.पू. बाबा झोपले असतांना एक साधक त्यांचे पाय चेपत होता. प.पू. बाबांनी मला पाठ चेपण्यास सांगितले. त्या वेळी मी त्यांचे चैतन्य ग्रहण करता यावे यासाठी नामजप आणि प्रार्थना करत होतो. १० मिनिटांनी प.पू. बाबा झोपेतून उठले आणि त्या साधकाला म्हणाले, ‘‘तू पाय चेपू नकोस. तुझ्या मनात काय विचार चालू आहेत. किती अनावश्यक विचार करतोस. ‘काय काय विचार येतात ?’, ते सांग. तू पाय चेपतोस; पण त्याचा लाभ तुलाही होत नाही आणि मलाही होत नाही. त्यामुळे तू पाय चेपू नकोस.’’ – श्री. सचिन हाके

१ आ २ ई. ‘एकदा प.पू. बाबांना रात्री अडीचच्या दरम्यान एक सूत्र सुचले. त्या वेळी त्यांनी उठून बेसिनकडील दिव्याच्या प्रकाशात ते सूत्र त्याच वेळी लिहून काढले.’

१ आ २ उ. सत्संगातील सूत्रे जाणून घेणे : ‘सेवेतील साधकांचा सत्संग झाल्यानंतर सत्संगामध्ये काय सूत्रे घेतली, याविषयी ते साधकांना त्याच वेळी विचारून घेतात. त्यांना प्रत्येक सूत्र जाणून घेण्याची पुष्कळ उत्सुकता आणि तळमळ असते. खरे पहाता, त्यांना अशा प्रकारच्या कोणत्याच गोष्टीची आवश्यकता नाही; पण ‘आम्ही शिकावे, यासाठी भगवंत कृतीतून आपले आचरण कसे असावे ?’, हे दाखवत आहे’, असे वाटते.’– कु. पूजा जठार आणि कु. स्नेहा झरकर

१ आ २ ऊ. बांधकाम क्षेत्राच्या अनुभवाचा वापर आश्रमाच्या ‘ड्रेनेज लाईन’च्या कामासाठी करवून घेणेे : ‘पूर्वी प.पू. महाराज जलसिंचन खात्यात नोकरी करत असल्यामुळे त्यांना पाण्याची संबंधित बांधकामाचा अनुभव आहे. देवद आश्रमातील ‘ड्रेनेज’ मार्गाची दुरुस्ती, नूतनीकरण, नवीन मार्ग करणे इत्यादी स्वरूपाची मोठी कामे चालू झाली होती. त्या ठिकाणी प.पू. महाराज पहिल्या दिवसापासून ते कामे पूर्ण होईपर्यंत जातीने उभे राहून बांधकामातील बारकावे सांगणे, ‘ते झाले कि नाही’ याची निश्‍चिती करणे, अडचणी सोडवणे, नवीन पद्धतीने काय करू शकतो, याची सूचना करणे, कागदावर आकृती काढून दाखवणे, अशा विविध सेवा उन्हातान्हाची पर्वा न करता केल्या. परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्या आश्रमातील प्रत्येक गोष्ट परिपूर्ण व्हावी, यासाठी महाराज तळमळीने प्रयत्नशील असतात. – श्री. यज्ञेश सावंत

१ आ ३. जाज्वल्य कृतीशीलता

१ आ ३ अ. वयाच्या १५ व्या वर्षी शाळेत ९ वीचा वर्ग चालू करून त्यासाठी लागणारी प्रयोगशाळाही उघडण्यास साहाय्यभूत होणे : ‘प.पू. बाबा इयत्ता ९ वीत असतांना त्यांना विज्ञान आणि गणित विषय घ्यायचे होते. ते त्या वेळी ज्या गावी रहात, त्या गावातील चांगल्या शाळेत हे विषय शिकवले जात नव्हते. तेव्हा त्यांनी शाळेतील गणिताच्या शिक्षकांना ‘याविषयी काय करावे ?’ असे विचारले. तेव्हा त्या शिक्षकांनी त्यांना एक कल्पना सुचवली. महाविद्यालयाचे व्यवस्थापक याला सिद्ध असतील, तर ही गोष्ट साकार होऊ शकते, असे ठरले. हे शिक्षक (श्री. देशमुख) स्वतः विज्ञानाचे पदवीधर असल्याने ते विज्ञान शिकवण्यास सिद्ध झाले. विज्ञान शिकवण्यासाठी लागणार्‍या उपकरणांसाठी जी प्रयोगशाळा लागते, त्यासाठी लागणारे धन जमवण्यासाठी प.पू. बाबा शाळेच्या संचालकांना भेटले. त्यांनी त्यांना एक पर्याय सांगितला. त्याप्रमाणे शाळेच्या वार्षिक गणेशोत्सवसाठी गोळा केलेल्या वर्गणीतून बाहेरचे कार्यक्रम करण्याऐवजी शाळेतीलच कार्यक्रम करायचे ठरले. यासाठी प.पू. बाबांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे मन वळवले. आता या वर्गात शिकण्यासाठी कमीतकमी १० – १२ विद्यार्थ्यांची आवश्यकता होती. यासाठी प.पू. बाबांनी विद्यार्थ्यांना गोळा केले आणि शाळेत वर्ग चालू झाला.’

या प्रसंगातून प.पू. बाबांच्या अंगी मूळातच संघटितपणा, चिकाटी, तळमळ, नियोजनकौशल्य, धैर्य, निर्भयता, दूरगामीपणा, असे अनेक गुण दिसून येतात. ‘वयाच्या १५ व्या वर्षी शाळेत एक वर्ग निर्माण करून त्यासाठी शाळेत प्रयोगशाळा आणणे, हा प्रसंग प.पू. बाबांच्या समष्टी जीवनातील मैलाचा दगड असावा’, असे वाटते.

१ आ ३ आ. ‘जागतिक स्तरावर होणार्‍या अराजक सदृश परिस्थितीवर उपाययोजनात्मक कृती कोणती करायची ?’ याविषयावर युनो, भारताचे पंतप्रधान आणि ‘पेट्रियॉटिक फोरम’ नावाच्या एक हिंदुत्ववादी संघटनेला प्रदीर्घ लेख लिहून अभ्यासण्यासाठी पाठवणे : ‘जागतिक स्तरावर होणार्‍या अराजक सदृश परिस्थितीवर उपाययोजनात्मक कृती कोणती करायची ?’ या विषयावर प.पू. बाबा यांनी ‘युनो’ला पत्र लिहिले आहे. तसेच भारताच्या पंतप्रधानांनाही एक प्रदीर्घ पत्र लिहून देशाची स्थिती सुधारण्यासाठी कृतीच्या स्तरावर काय करायला पाहिजे, हे त्यात लिहिले आहे. तसेच त्यांनी ‘पेट्रियॉटिक फोरम’ नावाच्या एक हिंदुत्ववादी संघटनेलाही या विषयावर पत्र लिहून जागृतीसाठी प्रोत्साहित केले आहे.– सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ

१ आ ३ इ. धर्मशिक्षणविषयक सूत्र समाजापर्यंत जाण्यासाठी पाठपुरावा घेणे : ‘सध्याच्या हिंदु धर्माच्या दयनीय स्थितीचे महत्त्वाचे कारण म्हणजे ‘धर्मशिक्षणाचा अभाव’, असे त्यांनी सांगितले. धर्मशिक्षण लहान वयापासूनच देणे आवश्यक आहे. त्यानुसार त्यांनी प्रसारप्रमुखांना कळवून त्याची कार्यवाही होते कि नाही, ते पाहिले. एके दिवशी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार’ यामध्ये ‘हिंदु राष्ट्र म्हणजे सज्जन लोकांचे राज्य असेल. त्यात मुसलमान, ख्रिश्‍चन, हिंदु असे काही असणार नाही’, असे आले होते. ‘हे विचार संपूर्ण समाजापर्यंत गेले पाहिजेत’, असे प.पू. बाबांना वाटले. हे विचार संकेतस्थळ, फेसबूक आदी सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसारित होण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. ‘प.पू. बाबा परात्पर गुरु डॉक्टरांच्या हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्याशी एकरूप झाले आहेत’, असे वाटते. ‘संत दिसती वेगळाले, परि अंतरी ते स्वस्वरूपी मिळाले’, असे त्यांच्याविषयी झाले आहे. – श्री. शिवाजी वटकर

१ आ ४. प्रीती

अ. ‘कुणी साधक इतर सेवाकेंद्रात किंवा आश्रमात जाणार असल्याचे त्यांना कळल्यास ते लगेच तेथील साधकांना खाऊ पाठवण्याचा निरोप देतात. त्यांच्यातील प्रीती पुष्कळ व्यापक आहे. तिची व्याप्ती आपल्याला कळूच शकत नाही.’ – कु. पूजा जठार आणि कु. स्नेहा झरकर

आ. ‘पितृपक्षाच्या कालावधीत आध्यात्मिक त्रासाचे प्रमाण अधिक असते. या पितृपक्षाच्या पहिल्या आठवड्यात प.पू. बाबांनी त्यांच्या सेवेतील साधकांना प्रतिदिन प्रसाद दिला. यातून ‘ते आम्हाला शक्ती आणि चैतन्य देत आहेत’, असे वाटले आणि पुष्कळ कृतज्ञता वाटली.’ – श्री. संदेश नाणोसकर

इ. ‘काही महिन्यांपूर्वी देवद आश्रमातील एक साधक सकाळी ५.३० वाजता प.पू. बाबा फिरायला आरंभ करतांना भेटले आणि त्यांनी सांगितले की, कोल्हापूर येथील साधक फार अत्यवस्थ आहेत. त्यांना अतीदक्षता विभागात भरती केले आहे. मध्यरात्री त्यांना हा निरोप आला आहे. त्या वेळी प.पू. बाबा म्हणाले, ‘‘मला त्याच वेळी सांगायला हवे होते. आता आपण त्यांना त्वरित मंत्रोपचार देऊ.’’ त्यांनी त्यांचे फिरणे आणि वैयक्तिक गोष्टी बाजूला ठेवून सकाळी ५.३० ते ७.३० मंत्रोपचार देण्यासाठी वेळ दिला. त्या साधकाला उपचार प्राप्त होऊन ते चालू होईपर्यंत त्यांनी पाठपुरावा केला. त्यानंतरच स्वत:चे वैयक्तिक आवरणे चालू केले. ते साधकांचे त्रास स्वत: सहन करतात. अशा प्रकारे ते शेकडो साधक, त्यांचे नातेवाईक, सनातनचे हितचिंतक आणि हिंदुत्ववादी यांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उपाय सांगून साहाय्य करतात. देशभरातील साधकांसाठी गेली अनेक वर्षे ते प्रतिदिन नामजपाला बसतात.’ – श्री. शिवाजी वटकर

ई. साधकांवर उपाय करून त्यांना बरे करणे : ‘शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांवर उपाय म्हणून त्यांनी शेकडो मंत्र आतापर्यंत शोधून काढले आहे. त्यांचा साधकांना पुष्कळ लाभ होत आहे. साधकाला मंत्र दिल्यावर तो पूर्ण बरा होईपर्यंत प.पू. महाराज स्वत:हून पाठपुरावा करतात. एखाद्या वेळी साधक ‘त्याला काय मंत्रजप दिला आहे’, हे विसरलेला असतो; मात्र प.पू. महाराज विसरत नाहीत. तो साधक भेटेल, तेव्हा त्याला त्याविषयी आढावा विचारतात.’ – श्री. यज्ञेश सावंत आणि सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ

१ आ ५. साधकांच्या सेवेविषयी कौतुक करून त्यांना सेवेत प्रोत्साहन देणे

एके दिवशी मी प.पू. बाबांच्या खोलीबाहेर दगड पिशवीत घालून पॅकींग (बांधणी) करत होते. त्यांना आम्ही बाहेर सेवा करत आहोत, हे कळल्यावर ते लगेच खोली बाहेर आले आणि सेवा पाहू लागले. मी पॅकींग करत असलेले दगड पाहून ते आईला म्हणाले, ‘‘किती छान पॅकींग केले आहे ना ! तुला सेवेला चांगला जोडीदार मिळाला आहे ना !’’ तेव्हापासून मला सेवेत आनंद मिळू लागला आणि सेवेला प्रोत्साहन मिळू लागले. – कु. योगिनी आफळे

१ इ. आध्यात्मिक वैशिष्ट्ये

१ इ १. ‘प.पू. बाबांमध्ये ध्यानयोग, कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग असे सर्वच योग आहेत’, असे वाटते.’ – कु. सोनाली गायकवाड

१ इ २. ‘प.पू. बाबांची कार्यक्षमताही अफाट आहे. ते एकाच वेळी अनेक कार्ये स्थुलातून आणि सूक्ष्मातून करू शकतात.

१ इ ३. असा कोणताच विषय नाही की, ज्यावर प.पू. बाबा भाष्य करू शकत नाहीत. जणू ब्रह्मांडातील सर्व ज्ञान त्यांच्या वाणीतून स्त्रवण्यास सिद्धच असते.

१ इ ४. स्वतःवरील नियंत्रणात्मक आत्मशक्ती

प.पू. बाबा यांचे अलौकिकत्व निर्विवाद असूनही ते स्वतःविषयी बोलतांना म्हणतात, ‘मी कसा आहे, हे मी जाणून आहे.’ त्यांच्या अशा बोलण्याने त्यांची स्वतःवरील नियंत्रणात्मक आत्मशक्तीची जाणीव होते.

१ इ ५. सिद्ध पुरुष आणि ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्व !

ते सिद्ध पुरुष असून ऋषीतुल्य आहेत. ‘ते पृथ्वीवरील सगुणातील सप्तर्षींपैकी एक आहेत’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही; कारण सप्तर्षीनी एखादे सूत्र सांगण्यापूर्वी प.पू. बाबा यांनी ते आधीच सांगितले असते आणि त्यानुसार त्यांची कृतीही चालू झालेली असते. याचे आम्ही देवद आश्रमातील प्रत्येक जण साक्षी आहोत.’ – सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ

१ इ ६. परात्पर गुरु डॉक्टरांचे प्रतिरूपच !

‘प.पू. बाबा म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांचे प्रतिरूपच आहेत. देवद आश्रमाचा तेच खरा आधार आहेत. त्यांच्याशिवाय आश्रमाला शोभाच नाही. त्यांच्यामुळेच आम्ही सर्व आहोत. त्यांचे साधकांवरील निरपेक्ष प्रेम, त्यांना पुढे घेऊन जाण्याची तळमळ, याला काही शब्दच नाहीत. ‘ते केवळ अनुभवू शकतो’, असेच वाटते.’ – कु. स्नेहा झरकर

१ इ ७. एका जागृत देवस्थानातील चैतन्यमय मूर्ती असणे

‘एक उच्च कोटीचे संत असतांनाही त्यांचा अहं अत्यल्प असल्यामुळे ते ‘मी एक दगड आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी मला देवद आश्रमात आणून बसवले आहे. तेच सर्व कार्य करत आहेत’, असे ते म्हणतात. ते प्रत्यक्षात एका जागृत देवस्थानातील चैतन्यमय मूर्ती आहेत. सनातनच्या साधकांसाठी एक वंदनीय आधारस्तंभ आहेत.

१ इ ८. सनातन संस्थेच्या देवद आश्रमाचे वैभव

प.पू. बाबा हे सनातन संस्थेच्या देवद आश्रमाचे वैभव आहे. त्यांचे चैतन्यरूपी अस्तित्व हीच आम्हा साधकांची श्रीमंती आहे. त्यांना एकदा भेटलेली व्यक्ती त्यांची होऊन जाते. आश्रमात पहाटे फिरायला जातांना रस्त्यात कुत्रा भेटला, तरी ते त्यांच्या चैतन्यमय काठीने त्याच्यावर उपाय करतात. यावरून ती व्यक्ती किंवा प्राणी कोण आहे, काय करते, कशी वागते, आदीचा विचार न करता निरपेक्ष भावाने त्या जिवाचा उद्धार होण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करतात. जिवाचे शिवाशी नाते जोडतात. ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ।’ हे प.पू. बाबा यांच्या उदाहरणावरून शिकायला मिळते.

१ इ ९. ‘त्यांचे मन विश्‍वमनाशी आणि बुद्धी विश्‍वबुद्धीशी जोडले आहे. त्यांचे आणि परात्पर गुरु डॉक्टरांचे विचार एकच असतात. प.पू. बाबा सनातन संस्थेशी समरूप झाले आहेत.’ – श्री. शिवाजी वटकर

१ इ १०. ज्ञानगंगेचा स्रोत

१ इ १० अ. भगवंताकडून मिळणारा ज्ञानाचा अखंड ओघ चालूच असणे : ‘प.पू. बाबांना भगवंताकडून मिळणारा ज्ञानाचा अखंड ओघ चालूच असतो. दिवसभरही त्यांच्या मुखातून ज्ञानगंगा वहात असते. याविषयी आश्रमातील आणि सेवेतील साधकांशी प.पू. बाबा सहजपणे बोलतात. त्यात ज्ञानामृत ओतप्रोत भरलेले असते. त्या ज्ञानाचा स्तर उच्च असतो. प.पू. बाबा अखंड याच स्थितीत असतात. भगवंताचा हा आनंद ते स्वतःही घेतात आणि समवेतच्या साधकालाही ते चाखायला शिकवत असतात.’– सौ. अश्‍विनी अतुल पवार आणि सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ

१ इ १० आ. अनेक ग्रंथांचा संग्रह असणे आणि त्यांतील ज्ञान मुखोद्गत असणे : ‘प.पू. महाराजांचा वेद, उपनिषदे, पुराणे, भागवत्, श्रीमद्भगवत्गीता, श्रीकृष्णावरील अनेक ग्रंथ, कल्याण उपासना अंक, आयुर्वेद आणि अन्य असंख्य विषय यांचा प्रचंड अभ्यास आहे. जणू ते सर्व त्यांना मुखोद्गतच आहे. आजवर त्यांनी स्वत:कडे १,२०० हून अधिक ग्रंथ विविध ठिकाणांहून संग्रहित केेले आहेत. त्यांचा आवश्यकतेनुसार उपयोग करतात.’– श्री. यज्ञेश सावंत आणि सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ

१ इ १० इ. पहाटे फिरायला गेल्यावरही साधकांना ज्ञान देणे : ‘पहाटे फिरायला जाण्यापूर्वी ते दैनिक सनातन प्रभात अभ्यासतात. ‘राष्ट्र आणि धर्माला आलेली ग्लानी अन् त्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय काय असावेत’, याविषयी ते पहाटे फिरायला गेल्यावर बोलतात. आम्ही ते ध्वनीमुद्रित करून त्याचे टंकलेखन करून समष्टीसाठी पुढे पाठवतो. ते केवळ तात्त्विक माहिती न देता कृतीशील आणि प्रायोगिक असे ज्ञान देतात.’ – श्री. शिवाजी वटकर आणि सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ

१ इ १० ई. अतुलनीय ग्रंथलिखाण : ‘प.पू. बाबांनी आतापर्यंत पुष्कळ लिखाण केले आहे. त्यांचे ‘श्री गणेश अध्यात्म दर्शन’, ‘पंढरीचा वारकरी’ हे ग्रंथ प्रसिद्ध झालेले असून ‘जीवन सागरातील मोती’, ‘दिशा चक्र’, ‘ऋतु चक्र’, ‘त्रिसुपर्ण, ‘कलियुग खत्म – सत्ययुग लग गया’ या हिंदी ग्रंथाचा मराठी अनुवाद असलेले ‘युगपरिवर्तन अर्थात् कलियुगाचा अंत आणि सत्ययुगाचा आरंभ’ या ग्रंथांचे लिखाण पूर्ण होऊन ते पुढे पाठवले आहे. ‘भगवद्ध्वज’ या विषयावरील लिखाणाशी संबंधित सर्व साहित्य एकत्र केले असून ‘आत्मवृत्त’ लिखाणाची सिद्धताही होत आहे. याच जोडीला मागील ३ वर्षात ४०० पेक्षा अधिक संगणकीय धारिकांमधून विविध विषय संकलनासाठी पाठवले असून त्यांतील अनेक विषय सनातन प्रभातमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या २०० पेक्षा अधिक संगणकीय धारिका अंतिम टप्प्यात आहेत. त्यांनी लिहिलेला ‘श्रीगणेश अध्यात्म दर्शन’ हा ग्रंथ म्हणजे अध्यात्माची ‘डिक्शनरी’च आहे. या ग्रंथाविषयी ते म्हणतात, ‘‘यात माझा काही सहभाग आहे, असे मला वाटतच नाही.’’ – सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ

१ इ १० उ. प.पू. पांडे महाराजांच्या ज्ञानगंगेने मनाची मलीनता दूर करून साधकांना ईश्‍वरप्राप्तीची दिशा देणे : ‘ज्ञान मनुष्याला शुद्ध करते. त्याचप्रमाणे प.पू. पांडे महाराज यांची ज्ञानगंगा आपल्या मनाची मलीनता दूर करून साधकांना ईश्‍वरप्राप्तीची दिशा देते. प.पू. पांडे महाराजांना कोणत्याच विषयाचे ज्ञान नाही, असे नाही. कोणताही विषय आला, तरी त्यावर ते सविस्तर सांगतात.

– सौ. अश्‍विनी अतुल पवार

१ इ ११. सर्वज्ञता

अ. एकदा धान्य निवडण्याच्या कक्षाच्या बाहेरील परिसरात काही साधकांनी फ्लेक्स अव्यवस्थित ठेवला होता. प.पू. बाबांनी त्याविषयी तेथील साधकांना जाणीव करून दिली. त्या वेळी लक्षात आले की, त्या फ्लेक्सच्या खाली एक मोठा साप होता. कदाचित तो फ्लेक्स वेळीच काढला नसता, तर तो साप आश्रमातसुद्धा येऊ शकला असता. प.पू. बाबा अशा अनेक गोष्टी लक्षात आणून देत असतात. त्यांच्यातील सर्वज्ञता सामान्य बुद्धीला कळूच शकत नाही.

आ. एकदा भाजी खरेदी करून आल्यानंतर आणलेल्या फ्लॉवरला दुर्गंध येत होता. त्या वेळी संबंधित साधकाला त्यांनी विचारले, अशी भाजी का आणली ? त्या वेळी त्यांनी प.पू. बाबांना अशीच मिळाली, असे उत्तर दिले. त्यावर ते त्या साधकाला म्हणाले, व्यवस्थित विचार कर, भाजी मिळाल्यानंतर ती गाडीत ठेवतांना तुझे लक्ष नव्हते का ? फोनवर बोलत होतास का ? हे सत्य होते. साधकाकडून असेच झाले होते. भाजी पाहून घेतली नव्हती. त्यानंतर त्या साधकाने प.पू. बाबांची येऊन क्षमा मागितली.

इ. मनातील जाणणे : मला कधीही त्रास झाला, तरी त्यांना काही सांगितलेले नसतांनाही ते बरोबर ओळखतात. लगेच उपाय, प्रार्थना सांगतात आणि त्रास उणावेपर्यंत ते उपाय करायलाच लावतात. एकदा मला त्रास होत असतांना सेवेत पुष्कळ अडचणी येत होत्या आणि मला सेवा करायला जमणार नाही, असा नकारात्मक विचार मनात आला. त्यानंतर मी त्यांच्या खोलीत उपायांसाठी गेले होते. त्या वेळी त्यांनी मला विचारले काय होेते ? तेव्हा मी त्यांना सांगितले, त्रास होत आहे. त्यावर त्यांनी मला पुढील प्रार्थना लिहून ती करण्यास सांगितली. हे भगवन, अपने मन के वश में होकर, मैंने जो न करने योग्य अत्यंत पापपूर्ण चिंतन किया हो, उसे शांत कीजीए ! त्यानंतर माझ्या मनाची स्थिती सुधारली. माझ्या मनात नकारात्मक विचार येत आहेत, हे मी न सांगताच प.पू. बाबांना कळले. – सौ. अश्‍विनी अतुल पवार

ई. मनातील अचूक ओळखणे : साधकाच्या मनातील चुकीचा विचार सांगण्यासमवेतच काही वेळा स्थुलातील साधकाने न सांगितलेली माहितीही प.पू. महाराज अचूक सांगतात. त्यांना एकदा एक साधिका आणि तिचे साधक नसलेले पती भेटायला आले होते. तेव्हा पहिल्याच भेटीत साधिकेच्या पतीला तुम्हाला २ लाख रुपये पगार मिळतो ना, असे सांगितले. तेव्हा साधिकेचे पती एकदम अवाक झाले. त्यांच्याशी काही ओळख नसतांनाही त्यांना कसे कळले माझ्या नोकरीविषयी ? असे त्यांना वाटले. – श्री. यज्ञेश सावंत

उ. प.पू. बाबांना सर्वच कळते याचा अनुभव मला आणि माझ्यासारख्या अनेक साधकांनाही आला आहे. एखादा प्रश्‍न प.पू. बाबा विचारतात आणि पुढच्याच क्षणी स्वत:च त्याचे उत्तर देऊन तसेच आहे ना, असे विचारतात. प.पू. बाबांनी सांगितलेले उत्तर अचूकच असते. त्यांच्या सेवेत असणार्‍या साधकाच्या मनातील विचारही प.पू. बाबा अचूक ओळखतात. एखाद्याची स्थिती चांगली नसेल, तर लगेच ओळखतात आणि त्याला त्यातून बाहेर काढतात.

ऊ. एक साधिका गावाहून आली होती. तेव्हा सेवेत असणार्‍या साधकासमवेत पहाटे फेर्‍या मारतांना प.पू. बाबांनी त्या साधिकेला पाहिले. तेव्हा त्यांच्यासमवेत असणार्‍या श्री. सचिन हाके यांना प.पू. बाबा म्हणाले, अरे सचिन, तिला थांबव थांबव ! तिच्या बॅगमध्ये पेढे आहेत ! खरेच त्या साधिकेच्या बॅगमध्ये पेढे असल्याचे तिने त्या वेळी सांगितले. – श्री. संदेश नाणोसकर

ए. एकदा मला काय त्रास होत होते, हे कळत नव्हते. सेवाही नीट होत नव्हती, तसेच उपायांचा कालावधीही पूर्ण झाला नव्हता. त्या वेळी मी त्यांच्या खोलीत उपायांना गेले होते. त्यांनी मला लगेच सांगितले, मी सांगतो, ती प्रार्थना कर. ती प्रार्थना अशी होती, हे चैतन्यमूर्ते, तूच माझे शरीर निर्माण केले आहेस. तूच माझ्यात विलसत आहेस. मी तुला शरण आले आहे. तू सर्व दृष्टीने समर्थ आहेस. मला जी शक्ती त्रास देत आहे, ती नष्ट कर आणि तुझ्या सेवेची संधी दे..! अशी प्रार्थना केल्यानंतर १० ते १५ मिनिटांतच मला पुष्कळ चांगले वाटले आणि मी पुन्हा सेवेला गेले. त्रासासंदर्भात मी प.पू. बाबांना काहीच सांगितले नव्हते. ते सर्व जाणतात. त्यांची सर्वज्ञता आपल्या अल्प मतीला ज्ञातही होऊ शकत नाही. – कु. स्नेहा झरकर

ऐ. मी काही दिवस चिपळूण येथे उपचारांसाठी आणि काही दिवस रामनाथी येथे शिकण्यासाठी गेलो होतो. त्यानंतर मी प.पू. बाबांकडे गेल्यावर त्यांनी सर्व विचारपूस केली. काय काय उपचार केले ? रामनाथी येथे काय शिकलास ? मी सांगण्यास आरंभ केल्यावर मी जे काही सांगणार होतो, ते प.पू. बाबांनी आधीच सांगितले. मी त्यांना म्हणालो, बाबा, तुम्ही जे सांगितले, तेच तेथे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, अरे मी तिथे होतो. तू मला पाहिले नाहीस का ? यावरून देव सतत आपल्या सोबत असतो, आपणच अनुभवायला कमी पडतो, हे त्यांनी शिकवले. – श्री. सचिन हाके (२२.११.२०१६)

२. देवद आश्रमातील साधकांना घडवणारे
देवद आश्रमाचे आधारस्तंभ प.पू. पांडे महाराज !

२ अ. चुका सांगण्याची आगळीवेगळी पद्धत

सेवेतील साधकाची अथवा भेटायला आलेल्या साधकाकडून काही चूक झाली असल्यास आणि त्याची मन:स्थिती ठीक नसल्यास प.पू. महाराज आज माझ्याकडून अमूक चूक झाली किंवा आज माझी स्थिती ठीक नाही, असे म्हणतात. तेव्हा प्रथम त्या साधकाच्या तोंडवळ्यावरील हावभाव प्रश्‍नार्थक होतात. नंतर ते आपलीच (साधकाची) चूक सांगत आहेत, हे साधकाच्या लक्षात येते अन् साधक शिकण्याच्या स्थितीत येतो. एखाद्या वेळी साधकाच्या अंतर्मनातील चुकीचा विचार प.पू. पांडे महाराज थेट सांगून सावध करतात. तेव्हा साधकालाही प्रथम जाणीव नसते. थोड्या वेळाने चिंतनानंतर अशी विचारप्रक्रिया झाली होती, हे त्याच्या लक्षात येते आणि साधक कृतज्ञता व्यक्त करतो. – श्री. यज्ञेश सावंत 

२ आ. ‘चुकांमुळे साधना खर्च होते’, याची जाणीव
करून देऊन ‘ती होऊ नये’, यासाठी प्रयत्न करवून घेणे

‘माझी सेवेची गती न्यून पडत असल्याने सेवा वेळेत झाली नाही किंवा सेवेत चुका झाल्यास ते जाणीव करून देतात, प्रसंगी रागावतातही. ते चूक काय झाली आणि योग्य कसे असायला हवे, हे आपल्याकडूनच वदवून घेतात. नंतर ‘झालेल्या चुकीचा परिणाम कसा होतो’, याची जाणीव करून देतात. या सर्वांमुळे चुकांविषयीचे गांभीर्य वाढायला साहाय्य होते. ते म्हणतात, ‘‘तुम्ही सर्वांनी लवकर पुढे जावे’, असे मला वाटते. चुकांमुळे साधना खर्च होते. आधिच्यांनी तसेच केले. तुम्हीही तसेच करू नका. चांगल्याचे अनुकरण करावे. ‘माझी कृती देवाला अपेक्षित अशी आहे का ?’, याचा विचार करून तशी कृती करायला पाहिजे. योग्य-अयोग्य समजून घ्यायला पाहिजे. अधिक योग्य करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे.’’ – श्री. संदेश नाणोसकर

२ इ. साधकांच्या चुका सांगतांना ‘साधकांनी घडावे’, असा हेतू असणे

‘प.पू. बाबांना निरोप देण्यासंदर्भात आमच्याकडून एक गंभीर चूक झाली होती. तेव्हा त्यांनी आम्हाला या चुकीची पुष्कळ कठोर शब्दांत जाणीव करून दिली होती. बाह्यत: त्यांचे शब्द आम्हाला कठोर वाटले, तरी त्या प्रत्येक शब्दाच्या आणि वाक्याच्या मागे प्रेम दडले होते. ते पुनः पुन्हा त्याची जाणीव करून देत होते. त्या वेळी त्यांचा प्रत्येक शब्द आणि वाक्य अंतर्मनापर्यंत जात होते. त्यांच्या सांगण्यात ‘आम्हाला जाणीव व्हावी आणि आम्ही घडावे’, अशी त्यांचीच अधिक तळमळ होती.

२ ई. साधकांना वेळेचे महत्त्व लक्षात आणून
देऊन प्रत्येक कृती वेळेवर करण्याचा संस्कार करणे

‘एखाद्या साधकाला प.पू. बाबांच्या खोलीतील सेवेसाठी जाण्यास विलंब झाला, तर ते त्या संदर्भात उपस्थित असणार्‍या साधकास लगेचच विचारतात. ते स्वत:सुद्धा त्यांच्या दैनंदिन कृती वेळेतच करतात. त्याप्रमाणे त्यांच्या सेवेतील साधकांमध्येही ते त्या माध्यमातून संस्कार करत आहेत आणि साधकांना वेळेचे महत्त्व लक्षात आणून देत आहेत’, असे वाटते.

२ उ. ‘प्रत्येक सेवा वेळेत आणि परिपूर्ण
होण्यातच साधना आहे’, याची जाणीव करून देणे

‘एकदा एका सेवेसंदर्भात प.पू. बाबांच्या खोलीत काही साहित्य नेले होते. सेवा झाल्यानंतर खोलीत नेलेले साहित्य खोलीच्या बाहेर अव्यवस्थित ठेवले होते. प.पू. बाबा फिरायला जाण्यासाठी खोलीच्या बाहेर आले असतांना त्यांनी लगेचच त्या चुकीची जाणीव करून दिली आणि लगेचच त्या साधकांना ते साहित्य जागेवर ठेवण्यास सांगितले. ‘प्रत्येक सेवा वेळेत आणि परिपूर्ण होण्यातच साधना आहे’, याचे महत्त्व त्यांनी लक्षात आणून दिले.’  – कु. पूजा जठार आणि कु. स्नेहा झरकर

२ ऊ. आश्रमातील प्रत्येक गोष्ट व्यवस्थित होत आहे ना, याकडे लक्ष देणे

१. ‘एकदा सर्व साधकांसाठी केलेली आमटी पुष्कळ तिखट झाली होती. प.पू. बाबांनी त्याच वेळी आमटी बनवणार्‍या संबंधित साधकाला बोलावून सांगितले, ‘‘तिखट आणि मीठ अल्प घालायचे. ते घातल्यावर काढू शकत नाही. ज्याला पाहिजे तो वरून घालून घेऊ शकतात.’’ त्यानंतर काही दिवस त्यांनी ‘आमटीची चव आता व्यवस्थित असते ना’, याचा आढावाही घेतला.’ – सौ. अश्‍विनी अतुल पवार आणि कु. मनीषा शिंदे

२. ‘बांधकाम, दैनिक आणि व्यवस्थापन या सर्वच विभागातील सेवांच्या दृष्टीने काही पालट, तसेच चुका ते अखंड सांगतात. त्यांना सर्वच विषयांतले ज्ञान आहे, ‘त्यांना काही ठाऊक नाही’, असे नाहीच. त्यांचे प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असते.’ – सौ. अश्‍विनी अतुल पवार

३. ‘प.पू. बाबांच्या खोलीतील वेगवेगळ्या सेवा करण्यासाठी ४ – ५ साधक आहेत. पूर्वी त्यांच्या खोलीत आल्यावर साधकांचे अनावश्यक बोलणे व्हायचे. तेव्हा प.पू. बाबा आम्हाला म्हणाले, ‘‘सेवेला आल्यावर अनावश्यक बोलायचे नाही. येथेच नव्हे, तर आश्रमातही सेवा करतांना अधिक बोलणे टाळावे. त्यात आपली ऊर्जा व्यय होते. त्यामुळे माझ्याकडे सेवेला आल्यावर चैतन्याविना काही बोलायचे नाही.’’ – श्री. सचिन हाके

२ ए. सेवेतून साधक घडवणे

१. प.पू. बाबांच्या खोलीत सेवेला जाण्याचा माझा पहिलाच दिवस होता. त्या दिवशी सेवेतील कृती माझ्यासाठी नवीन असल्याने आणि पहिल्यांदाच करत असल्याने मी लक्षपूर्वक सेवा ऐकत होतो. ते पाहून प.पू. बाबा म्हणाले, ‘‘असेच करायला हवे. सेवा नवीन असली की, आपण ती शिकण्याचा प्रयत्न करतो. एकदा सेवेची सवय झाली की, ‘मला ती सेवा जमते’, या विचारामुळे आपल्याकडून ‘करायची म्हणून करायची’ अशा प्रकारे सेवा होते. त्यापुढे जाऊन ती भावपूर्ण आणि परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत.’’ प.पू. बाबांनी हे सांगितल्यावर मला पुष्कळ आनंद झाला.

२. आपल्याला दिलेल्या प्रत्येक सेवेची पूर्वसिद्धता आपणच पहायला हवी. त्यामुळे दुसर्‍या दिवशी संबंधित व्यक्तीलाही अडचण येणार नाही आणि सेवाही योग्य पद्धतीने होईल. सेवांची पूर्वसिद्धता पहाणे, हासुद्धा त्या सेवेचाच भाग आहे. ‘इतरांवर अवलंबून रहाण्यापेक्षा माझ्याकडे ती सेवा आहे, तर तिचे दायित्व मला माझे वाटले पाहिजे आणि देवाला अपेक्षित असे करायला हवे’, हे प.पू. बाबांनीच आम्हाला शिकवले.

३. ‘काही वेळा एखाद्या साधकाकडून चूक झालेली नसतांना प.पू. बाबा त्याला रागावतात. त्यामध्ये काही वेळा सहसाधकाची चूक असते. एखाद्या सेवेविषयी प.पू. बाबांनी त्यांच्या सेवेतील एका साधकाला सांगितले. त्याच्याकडून ते पूर्ण करायचे राहिले, तर काही वेळा नंतर दुसरा साधक सेवेसाठी गेल्यावर त्याला त्या सेवेविषयी विचारतात. त्याला माहित नसले, तर त्याची जाणीवही करून देतात. या सर्वांतून ‘सेवेतील साधकांमध्ये समन्वय किती आहे’, हे ते पहात असतात. तसेच ‘दुसर्‍याची चूक असली, तरी ती माझी वाटली पाहिजे’, हे मनावर बिंबवतात आणि त्यादृष्टीने साधकांना घडवतात.’ – श्री. संदेश नाणोसकर

४. ‘प.पू. बाबा खोलीतच असतात; पण आश्रमातील प्रत्येक सेवेकडे त्यांचे लक्ष असते. ‘कोण पाहुणे आले ? त्यांना आश्रम बघून काय वाटले ? त्यांचा अभिप्राय घेतला ना ?’, असे बाबा विचारतात.’ – कु. सोनाली गायकवाड

५. ‘प.पू. बाबांच्या सेवेच्या वेळी मनात बरेचदा अनावश्यक, निरर्थक विचार येतात. जेव्हा आपण त्यावर मात करण्यासाठी भावाची जोड देऊन, नामजप, प्रार्थना करून शरणागतीने प्रयत्न करतो, तेव्हा प.पू. बाबा काही म्हणत नाहीत. ‘आपण त्या विचारांशी लढतो का ? त्यावर मात करण्यासाठी आपल्याकडून प्रयत्न होतात का ?’ हे प.पू. बाबा पहातात आणि जेव्हा आपण त्यांच्या आहारी जातो, तेव्हा मात्र ते ओरडतात अथवा जाणीव करून देतात.’– श्री. संदेश नाणोसकर

२ ऐ. धर्माचरण करण्यासाठी सांगणे

‘आश्रमात रहाणार्‍यांना सात्त्विक पोशाख, कुंकू लावणे, सात्त्विक आहार यांसारख्या गोष्टींविषयी प.पू. बाबा सारखे सांगतात. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे धर्माचरण व्हावे आणि त्यातून चैतन्य मिळावे’, हा त्यांचा उद्देश असतो. प.पू. बाबा धर्माचरणाला प्राधान्य देतात. धर्माचरण करणार्‍यांचे ते नेहमी कौतुक करतात.’ – श्री. संदेश नाणोसकर आणि कु. सोनाली गायकवाड

२ ओ. सर्वांकडून योग्य कृती व्हावी, याकडे लक्ष देणे

‘प.पू. बाबांना व्यवस्थित राहिलेले पुष्कळ आवडते. ते माझ्या ओढणी लावण्याच्या पद्धतीचे कौतुक करत असतात. त्यांनी मला एकदा विचारले, ‘‘असे बोलल्यावर तुझा अहं नाही ना वाढत ?’’ यावरून ते साधकांचा अहं वाढणार नाही, याचीही ते काळजी घेतात. ‘आश्रमातील सर्व साधकांनी व्यवस्थित रहायला हवे, मुलींनी ओढणी नीट लावायला हवी’, असे बाबांना वाटते. एकदा मला प.पू. बाबांनी सर्व साधिकांची बैठक घेऊन ओढणी कशी लावावी, ते सांगायला सांगितले. यासंदर्भात त्यांनी माझा पाठपुरावाही घेतला. बैठक झाल्यानंतर प.पू. बाबांनी मला सांगितले, ‘‘तू सर्वांना सांगितले वाटते. बघ तुझ्यामुळे बर्‍याच जणांमधे पालट झाला आहेे.’’ प्रत्यक्षात प.पू. बाबांनी माझ्याकडून पाठपुरावा घेऊन ते करवून घेतले होते आणि तेच माझे कौतुक करत होते.’ – कु. सोनाली गायकवाड

३. परात्पर गुरु डॉक्टरांविषयी असलेला उत्कट भाव !

३ अ. सतत परात्पर गुरु डॉक्टरांविषयी बोलल्याने साधकांची भावजागृती होणे

‘प.पू. पांडे महाराजांना प.पू. गुरुदेवांचे गुणवर्णन करण्यात पुष्कळ आनंद वाटतो. उठल्यानंतर पहिल्या क्षणापासून ते रात्री झोपेपर्यंत ते परात्पर गुरु डॉक्टरांविषयी बोलत असतात. प.पू. बाबा हे सांगत असतांना त्यांना समोर केवळ परात्पर गुरु डॉक्टरच दिसत असतात. प.पू. बाबा परात्पर गुरु डॉक्टरांचे वर्णन पुष्कळ सुंदर शब्दांत करतात. त्यांचे ते बोल सतत ऐकत रहावेसे वाटतात. ‘परात्पर गुरु डॉक्टर आपल्यासाठी किती करतात, त्यांचे कार्य अवतारी कसे आहे, तेच ईश्‍वर कसे आहेत’, याविषयी ते सांगत असतात. त्या वेळी पुष्कळ भावजागृती होत असते. हे सर्व ऐकतांना वाटते, ‘परात्पर गुरु डॉक्टरांना जाणले आहे, ते प.पू. बाबांनीच ! आपल्याला अजून परात्पर गुरु डॉक्टर कळलेच नाहीत.’ परात्पर गुरु डॉक्टरांविषयी त्यांच्या मनात पुष्कळ उच्च प्रतीचा भाव आहे. प.पू. पांडे महाराज परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राकडे पाहून पुष्कळ आर्ततेने, शरणागतीने आणि भावपूर्ण प्रार्थना करत असतात. दिवसभरात कधी कधी त्यांच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यांत अश्रूही येतात.’– सौ. अश्‍विनी अतुल पवार

३ आ. कृतीचे श्रेय परात्पर गुरु डॉक्टरांना देणे

एक उच्च कोटीचे संत असतांनाही त्यांच्या कृतीचे सर्व श्रेय ते परात्पर गुरु डॉक्टरांना देतात. ‘मी एक दगड आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे मला देवद आश्रमात यायला मिळाले आहे.’, असे ते म्हणतात. ‘केवळ त्यांनीच समष्टीचा विचार समाजासमोर ठेवला’, असे ते नेहमी सांगतात. – श्री. शिवाजी वटकर आणि सौ. आनंदी पांगुळ

३ इ. साधकांच्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांविषयी श्रद्धा निर्माण करणे

प.पू. बाबा म्हणतात, ‘‘महाभारतामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर लढाईचे शिक्षण न देता साधना सांगून धर्मशिक्षण दिले. तसेच सध्याच्या आपत्काळात परात्पर गुरु डॉक्टर साधकांना स्वभावदोष निर्मूलन करून गुरुकृपायोगानुसार साधना सांगत आहेत. त्यांनी हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याचे ध्येय ठेवले आहे. ते श्रीकृष्णासारखे आहेत. साधनेविषयी सर्वकाही करून नामानिराळे रहातात.’’ – श्री. शिवाजी वटकर

४. देवत्वाची अनुभूती

४ अ. प.पू. बाबांनी स्वतःतील दिव्य सामर्थ्याने साधकांना प्रश्‍न विचारून ‘नेमका कोणता त्रास आहे’, तो शोधून काढणे आणि त्यावर उपाय करणे

‘प.पू. बाबांकडे ज्या साधकांची त्रासांची सूत्रे येतात, ती धारिका दाखवतांना त्यात त्या साधकाच्या व्याधीची जी लक्षणे लिहिलेली असतात, त्यावरून त्याला उपाय सांगायचे असतात; मात्र काही साधकांविषयी असे घडते की, त्यांचे प्रत्यक्ष त्रास एक असतो आणि त्यामागील कारणे भलतीच असतात. प.पू. बाबा त्यांच्या दिव्य सामर्थ्याने त्या साधकाचा नेमका त्रास कोणता आहे, हे विविध प्रश्‍न विचारून त्याच्याकडूनच जाणून घेतात. त्यामुळे त्या रुग्ण साधकाला नेमका उपाय मिळतो आणि तो लवकर बरा होतो. असे अनेकांंनी अनुभवले आहे.

४ आ. धर्मग्रंथात संदर्भ पडताळतांना ग्रंथ
उघडल्यावर आवश्यक तेच पृष्ठच उघडले जाणे

प.पू. बाबा कोणतेही लिखाण करतांना प्रत्येक सूत्राचा संदर्भ धर्मग्रंथात पडताळून पहाण्यास सांगतात. ते पडताळत असतांना कितीही मोठा ग्रंथ असला, तरी त्यांना जे पृष्ठ येणे अपेक्षित असते, ते पृष्ठ त्यांनी ग्रंथ उघडल्यावर नेमके तेच पृष्ठ आलेले दिसते. असे प्रत्येक वेळी घडते, हे मी प्रत्यक्ष अनुभवते. तेव्हा वाटते की, जणू हे ग्रंथही प.पू. बाबांच्या सेवेसाठी आपले सर्वस्व अर्पण करत आहेत. त्यांना त्या वेळी जे ज्ञान हवे असते, ते ज्ञान ग्रंथ त्यांना उपलब्ध करून देतात.’ – सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ

४ इ. प.पू. बाबांनी उपाय केलेल्या तीर्थाला दिव्य सुगंध येणे

‘काही दिवसांपूर्वी प.पू. बाबांच्या खोलीत उपायांच्या वेळी गेले होते. त्या वेळी त्यांनी ‘‘तुळशीच्या पानाने शुद्धी करणे’, हा प्रयोग केला का ?’’ असे मला विचारले. ते मी केलेले नव्हते. तेव्हा मला त्यांनी तुळशीपत्र आणि पाणी आणण्यास सांगितले अन् त्यांनीच माझ्या डोक्याभोवती ७ वेळा त्या तुळशीपत्रांनी पाणी शिंपडले. नंतर ते पाणी पिण्यास सांगितले. तेव्हा पाणी पितांना लक्षात आले की, पाण्याला एक वेगळाच सुगंध येत आहे. तो सुगंध कोणत्याच अत्तराचा नव्हता; पण पुष्कळ छान होता. त्यानंतरही साधारण दीड दिवस पाण्याला तो सुगंध येत होता. त्या वेळी वाटले, त्यांच्या स्पर्शाने पाण्यालाही सुगंध येतो. त्यांच्या चैतन्याची अन् महानतेचे वर्णन शब्दात करणे कठीणच आहे.

४ ई. नामातील खरा आनंद अनुभवणे

एकदा सकाळच्या नामजपाची वेळ संपायला ५ मिनिटे राहिली होती. त्या वेळी त्यांनी मला सांगितले, ‘‘५ मिनिटे ‘ओम चैतन्य’ असा नामजप कर.’’ त्यानुसार मी जप केला. त्या वेळी मलाही पुष्कळ चांगले वाटले होते. म्हणजे २ घंटे नामजप करूनही जितका हलकेपणा आला नसता, तितका हलकेपणा त्या ५ मिनिटांत आला होता. ‘‘जप केल्यावर काय जाणवले ?’’ असे त्यांनी मला विचारले. तेव्हा त्या नामजपाने मला आलेली अनुभूती मी त्यांना सांगितली. त्यावर प.पू. बाबा म्हणाले, ‘‘या नामजपाने मला रात्रभर झोपच लागत नाही.’’ यातून ते किती नामातला आनंद घेतात. ‘‘नाम, अनुसंधान’, हेच त्यांचे जीवन आहे; तेच सर्वस्व आहे; त्यातच त्यांना आनंद आहे’, हे शिकायला मिळाले.

४ उ. सहवासात मन निर्विचार होणे

त्यांच्या सहवासात अन्य कोणतेच विचार मनात येत नाहीत. मन निर्विचार होते. ‘भगवंताची प्राप्ती करायची आहे, यासाठीच प्रत्येक क्षण भगवंताने मला दिला आहे’, याची मनाला आपोआप जाणीव होऊन प्रयत्नांना आरंभ होतो.’ – सौ. अश्‍विनी अतुल पवार

४ ऊ. प.पू. बाबांच्या खोलीच्या संदर्भातील अनुभूती

४ ऊ १. खोलीत वेगळाच सुगंध येणे : ‘प.पू. बाबांच्या खोलीत एक वेगळाच सुगंध येतो. त्यांच्या खोलीतील वस्तूंनाही तोच सुगंध असतो. त्यांच्या खोलीतील एखादी वस्तू बाहेर आणली किंवा साधक त्यांच्या खोलीत जाऊन बाहेर आले, तरी त्यांना तोच सुगंध येत असतो. त्याने पुष्कळ हलके वाटते आणि ‘तो सुगंध घेतच रहावा’, असे वाटते. प.पू. बाबा यांचे स्मरण जरी झाले, तरी तो गंध अवतीभवती दरळतो.’ – कु. सोनाली गायकवाड, सौ. आनंदी पांगुळ

४ ऊ २. खोलीतील चैतन्यात वाढ होणे : ‘दसर्‍यानंतरच्या कालावधीत प.पू. बाबांच्या खोलीतील चैतन्य पुष्कळ प्रमाणात वाढले असून खोलीत गेल्यावर खोली प्रकाशमान वाटते. खोलीतील वस्तूही आपल्याशी संवाद साधत आहेत’, असे वाटते. ‘वेगळ्याच उच्च लोकात गेलो आहोत’, असे वाटते. – श्री. संदेश नाणोसकर आणि सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ

४ ऊ ३. खोलीच्या बाहेर फेर्‍या मारत असतांना तिथून चैतन्याचा ओघ येत असल्याचे जाणवणे : ‘एके दिवशी सकाळी फिरत असतांना मी आपोआपच प.पू. बाबांच्या खोलीकडे खेचले गेले. खिडकीतून आत पाहिल्यावर प.पू. बाबांचे मस्तक दिसत होते. त्यांच्याकडून पुष्कळ मोठ्या प्रमाणात चैतन्याचा ओघ येत आहे आणि मी त्यात जात आहे’, असे जाणवले. तेव्हा मी कितीतरी फेर्‍या त्यांच्या खोली बाहेरून मारल्या. ‘जसा भाव असेल, तशी देव आपल्याला अनुभूती देत असतो’; म्हणून प्रत्येक वेळी भावाच्या स्तरावर प्रयत्न करायला हवे, हे शिकायला मिळाले.’ – कु. मनीषा शिंदे

४ ए. भगवंत भावाच्या स्वरूपात प्रकट होऊन
आपल्यासोबत चालतो, फिरतो, रहातो, खेळतो ते प.पू. बाबांच्या रूपात !

‘भगवंत भावाच्या स्वरूपात प्रकट होऊन आपल्यासोबत चालतो, फिरतो, रहातो, खेळतो ते प.पू. बाबांच्या रूपात ! गोपी अन् राधेची रासक्रीडा आपल्याला कळू शकत नाही; पण प.पू. बाबांनी कथित केलेला भगवंताचा एकेक उपकार म्हणजे ती एक प्रकारची रासक्रीडाच वाटते.

४ ऐ. ‘ज्यांनी भगवंताचे सत्यस्वरूप जाणून त्याला पुष्कळ जवळून अनुभवल्यामुळे ‘तो कसा आहे ? १०० टक्के सत्य कसे आहे ?’, हे विश्‍वासाने सांगू शकतात, ते म्हणजे प.पू. पांडे महाराज…!’ – सौ. अश्‍विनी अतुल पवार

४ ओ. प.पू. बाबा म्हणजे सूक्ष्म जगातील एक ज्ञानी विभूती असल्याविषयीचे विविध प्रसंग

४ औ १. ओळख नसतांना सर्व काही ज्ञात असल्याप्रमाणे पहाणे : प.पू. बाबा म्हणजे सूक्ष्म जगातील एक ज्ञानी विभूती आहेत. मी मे २०१६ मध्ये देवद आश्रमात पहिल्यांदाच आलो होतो. ज्या दिवशी मी आश्रमात आलो, त्याच दिवशी मी त्यांच्या खोलीसमोरून जात असतांना त्यांनी खिडकीतून माझ्याकडे हसतमुखाने पाहिले. खरे तर मी त्यांना यापूर्वी कधीच भेटलेलो नाही; परंतु ते माझ्याविषयी सगळे काही जाणतात, अशा भावाने माझ्याकडे पहात होते. नंतर काही अनुभूतींमुळे मला जाणवले की, एखाद्या व्यक्तीला पाहिले की, तिच्याविषयीची सगळी माहिती प.पू. बाबांंना लगेच कळते. खरंच प.पू. बाबा म्हणजे सूक्ष्म जगातील एक ज्ञानी विभूती आहेत. व्यक्तीला पहिल्याबरोबर त्या व्यक्तीचा सर्व इतिहास त्यांच्या डोळ्यांसमोर उभा रहातो.

दुसर्‍या दिवशी मी अतिथीकक्षात बसलो असतांना प.पू. बाबा फिरण्यासाठी खोलीच्या बाहेर आले. तेव्हासुद्धा मला पाहून ते पुन्हा हसले आणि पुन्हा खोलीकडे वळले, मध्येच थांबले आणि वळून माझ्याकडे पाहून मला बोलावले आणि म्हणाले, माझ्या गावाकडचा असून माझ्याशी बोलत नाहीस ? मी कारंजा गावचा आहे, हे त्यांना कसे कळले, हे देवच जाणे !

४ औ २. शालेय परीक्षेतील गुणांना अध्यात्मात काहीच महत्त्व नसल्याचे सांगणे : मी मार्च २०१६ मध्ये १० वीची परीक्षा दिली. त्यात मला ८६ टक्के गुण मिळाले. तेव्हा बाबांनी मला बोलावले आणि म्हणाले, या ८६ टक्के गुणांना काहीच महत्त्व नाही. आता तू पूर्णवेळ झाला आहेस. तुझी खरी अध्यात्माची परीक्षा आता आहे. शाळेतील परीक्षा स्वार्थासाठी असते, तर अध्यात्मातील परीक्षा तुझ्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी आहे. तुझे वय किती आहे ? मी म्हणालो, १६ वर्षे ! बाबा म्हणाले, तुझे उत्तर चुकले आहे. आपले आधी कितीतरी जन्म झाले आहेत. ती वर्षे आणि या जन्मीची १६ वर्षे असे मिळून X+१६ वर्षे असे तुझे वय आहे.

४ औ ३. प.पू. बाबांना उपाय करण्यासाठी प्रार्थना केल्यावर त्यांनी बोलावल्याचा निरोप मिळणे आणि त्यांनी सांगितलेले उपाय केल्यावर बरे वाटणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी बालवयापासूनच मला अनेक कलागुण देऊन त्या गुणांच्या माध्यमातून माझी साधना आणि धर्मकार्य करवून घेतले. त्याविषयी एका साधिकेने बाबांना सांगितले. तेव्हा बाबा माझ्याविषयी म्हणाले, हा तर माझा जवळचा मित्र आहे. त्यानंतर एके दिवशी मला अचानक तोंड आले. मला बोलता येईना. मी परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण करतांना मला प.पू. बाबाच दिसायचे. मला कळत नव्हते, असे का होत आहे ? नंतर मी प.पू. बाबांनाच मनातून हाक मारली आणि म्हणालो,

मी तुमचा मागील जन्मांचा मित्र आहे ना, तर माझ्यावर उपाय करा ना ! मला बोलताही येत नाही. पूर्ण शरीर जड झाले आहे. एवढ्यात एक साधक प.पू. बाबांनी मला बोलावल्याचा निरोप घेऊन आला. मी त्यांच्या खोलीत गेल्यावर मला उपायांना न बसवता ते म्हणाले, मित्रा, तू आजारी आहेस ना ? जेवला नाहीस ना ? जा प्रथम जेव. केवळ भात खा. मी भात खाल्ल्यावर माझे शरीर एकदम हलके झाले. ताप उतरला आणि आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे माझे आलेले तोंडसुद्धा नाहीसे झाले. प.पू. बाबांनी भात खाण्यास सांगून माझ्यावर उपाय केले. ते जे सांगतात ते १०० टक्के सत्य असते. – कु. तुषार काकड (वय १६ वर्षे)

४ अं. प.पू. बाबांचे कपडे धुण्याची तीव्र इच्छा
निर्माण होणे आणि त्यांच्या कृपेने ती दुसर्‍याच दिवशी पूर्ण होणे

एकदा मी एका संतांचे कपडे धुण्यासाठी प्रसाधनगृहात गेलो होतो. तेथे एक साधक प.पू. बाबांचे कपडे धूत असतांना मला ते धुवायला कधी मिळणार ? अशी तीव्र इच्छा मनात निर्माण झाली. त्या वेळी मी स्वत:ला सावरले आणि कपड्यांकडे बघूनच आनंद घेतला. दुसर्‍या दिवशी आमच्या विभागाकडे प.पू. बाबांचे कपडे धुण्याची पाळी होती. तेव्हा ती सेवा मला मिळाली. – एक साधक.

५. परात्पर गुरु डॉक्टरांनी प.पू. बाबांचा केलेला गुणगौरव !

अ. प.पू. बाबांनीच देवद आश्रमाला लहानाचे मोठे केले.

आ. तुम्ही एका ध्रुवावर, तर मी एका ध्रुवावर आहे. दोन ध्रुवावर आपण दोघे..!

– सौ. अश्‍विनी पवार आणि कु. स्नेहा झरकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.११.२०१६)

इ. तुमच्याशी बोलतांना पुष्कळ ज्ञान मिळते. तसेच ते मध्ये मध्ये तुमच्या लेखांतून मिळतच असते. हे आमचे केवढे पुण्य आहे !

ई. प.पू. बाबांचे बोलणे म्हणजे एक लेख असतो. प.पू. महाराजांशी संभाषण म्हणजे एका ग्रंथाचा मजकूर झाला. (समाप्त)

– सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ (१९.११.२०१६)
——————————————

प.पू. बाबा यांच्या पूर्वायुष्यातील प्रसंग

प्रामाणिक अभियंत्याचे नोकरीत असतांनाचे जीवन

‘प.पू. महाराज सरकारी खात्यात अभियंता म्हणून कार्यरत असतांना त्यांनी स्वत: प्रामाणिकपणे काम केले आणि इतरांनाही भ्रष्टाचार करू दिला नाही. त्यांना कार्यालयात नेण्यासाठी शासकीय चारचाकी वाहन येत असे; मात्र कार्यालयातील कामकाज झाल्यावर ते स्वत: सायकलवरून घरी यायचे. त्यांच्या प्रामाणिक स्वभावामुळे इतरांना भ्रष्टाचार करता यायचा नाही; परिणामी त्यांना अडकवण्यासाठी त्यांच्याविरुद्ध त्यांच्या खात्यातील काही विघ्नसंतोषी लोकांनी इतरांचे कान फुंकले. प.पू. महाराजांकडे पुष्कळ संपत्ती आहे इत्यादी बातम्या पेरल्या. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येऊ लागले. प.पू. महाराजांचा तेव्हाचा गाडीने जाऊन सायकलवरून येण्याचा दिनक्रम पाहून लक्ष ठेवणार्‍या व्यक्तीने एक दिवस स्वत:हून ‘मला तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सांगण्यात आले होते; मात्र तसे काहीच तुमच्याविषयी जाणवले नाही’, असे सांगितले आणि ती व्यक्ती निघून गेली. नोकरीवर असतांना धरणाच्या बांधकामाच्या वेळी २ वेळा ‘प्राणावर बेतणार’, असे प्रसंग झाले होते; मात्र त्यातून देवाच्या कृपेने ते सुखरूपपणे वाचले. – श्री. यज्ञेश सावंत
——————————————

एकमेवाद्वितीय प.पू. परशराम पांडे महाराज यांच्या
चरणी शिरसाष्टांग नमस्कार ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘सनातन संस्थेचे भाग्य आहे की, प.पू. पांडे महाराज यांच्यासारखे एकमेव ज्ञानी भक्त सनातन संस्थेच्या देवद आश्रमात राहून सनातन संस्थेला सर्व प्रकारे साहाय्य करत आहेत ! ‘बुद्धीने व्यक्त होणारे आध्यात्मिक विचार, साधकांना साधनेच्या आणि त्रासांवरील उपायांच्या संदर्भात मार्गदर्शन, तसेच मनाने व्यक्त होणारी प्रीती, ही त्यांची गुणवैशिष्ट्ये आम्हा सर्वांमध्ये निर्माण होवोत’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना ! असे संतरत्न आम्हाला लाभले, यासाठी भगवंताच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. ‘ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध आणि तपोवृद्ध प.पू. पांडे महाराज यांच्या चरणी त्यांच्या ८९ व्या वाढदिवसानिमित्त शिरसाष्टांग नमस्कार !’
——————————————

सनातन संस्थेचे महत्त्व सांगणे

‘प.पू. पांडे महाराजांना सत्याची पारख आहे. सनातन संस्थेत येण्यापूर्वी त्यांनी अनेक संप्रदाय आणि आध्यात्मिक संस्था यांचा अभ्यास केलेला आहे.’ ते तत्त्वनिष्ठ आहेत. ‘गीतेचे कृतीरूप दर्शन म्हणजे सनातन संस्था !’ अर्थात् ‘सनातन संस्थेचे कार्य म्हणजे भगवद्गीतेच्या प्रत्येक श्‍लोकाचे कृतीत रूपांतर आहे’, असा त्यांचा भाव असतो.

१. प.पू. पांडे महाराज यांच्या सेवेत असणार्‍या साधकांचे त्यांच्याविषयीचे मनोगत

१ अ. प.पू. बाबा यांचे श्रेष्ठत्व आणि महानता

pp_pande_maharaj
प.पू. पांडे महाराज

‘मागील एक वर्षापासून परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला प.पू. बाबांसमवेत प्रतिदिन पहाटे ५.३० वाजता फिरण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे मला पहाटे उठणे, सकाळीच संतांचे ज्ञानमोती वेचणे आणि सूक्ष्मातून प्रचंड चैतन्य मिळणे असे अनेक लाभ होत आहेत. माझे आवरण दूर होऊन मी चैतन्याने भारीत होऊन दिवसभर आनंदी रहात आहेेे. स्थुलातील आणि मायेतील मिळणार्‍या गोष्टींचा हिशोब करून आपण त्याचे उतराई होण्याचा प्रयत्न करू शकतो; मात्र प.पू. बाबा यांच्याकडून मिळणारे विचारधन आणि चैतन्य याविषयी समजून घेण्याची किंवा त्याविषयी लिहिण्याची माझी योग्यता नाही. त्यांनी मला केलेल्या साहाय्याविषयी जे स्थुलातून आकलन झाले, त्याविषयी थोडेसे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ‘शितावरून भात शिजल्याची परीक्षा करता येते’, या नियमानुसार प.पू. बाबा यांचे श्रेष्ठत्व आणि महानता काही उदाहरणावरून लक्षात येते.

१ अ १. बाह्यतः कडक स्वभावाचे आणि कडक शिस्तीचे वाटले, तरी ते साधकांना घडवण्यासाठीच तसे वागत असल्याचे लक्षात येणे : ‘पूर्वी प.पू. बाबांचा माझा एवढा जवळून संपर्क होत नसे. त्या वेळी माझ्या दोषांमुळे माझ्या मनात त्यांच्याविषयी काही गैरसमज होते, उदा. प.पू. बाबा फार कडक स्वभावाचे आणि कडक शिस्तीचे आहेत; मात्र सध्याच्या माझ्या अनुभवावरून ते अत्यंत साधे आणि निरपेक्ष आहेत. साधकांमध्ये शिस्त आणि परिपूर्ण गुरुकार्य करण्यासाठी गुण यावेत, यासाठी ते हे सर्व करतात. त्यांना वैयक्तिक स्तरावर कशाचीच आवश्यकता किंवा अपेक्षा नाही. ते स्वयंपूर्ण आणि समर्थ आहेत.

१ अ २. त्यांच्या संपर्कात आल्यावर त्यांचा उद्देश लक्षात येणे : पूर्वी मला ‘ते कर्मकांड करणारे आहेत’, असे वाटायचे. माझ्यासारख्या सर्वसाधारण साधकाला कर्मकांडही योग्य पद्धतीने करता येत नाही; मात्र साधकांना अध्यात्माच्या प्राथमिक टप्प्यापासून ते आध्यात्मिक सूक्ष्मातील उपायापर्यंत ते शिकवत आहेत. अधिकाधिक सात्त्विकता येण्यासाठी ते प्रत्येक गोष्ट आध्यात्मिक स्तरावर करतात.

१ अ ३. मनातील भीती सांगितल्यावर आनंदाने जवळ करणे : पूर्वी मला ‘ते एक कर्मठ ब्राह्मण आहेत’, असे वाटे. मी दलित समाजातील असल्याने माझ्यात न्यूनगंड होता आणि मी माझी प्रतिमा जपत होतो. ‘मी त्यांच्याजवळ जाऊ शकेन कि नाही’, अशी मला भीती वाटत असे. त्यांना मी हे सांगितल्यावर त्यांनी मला आनंदाने मनापासून जवळ केले. ‘एकनाथ महाराज यांनी काशीहून आणलेले गंगेचे पाणी तहानलेल्या गाढवाला पाजले. तसेच हे आहे’, असे वाटते.’

१ अ ४. ‘कलियुगात विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांनी जातीव्यवस्थेचा कलंक पुसून चातुर्वर्णाच्या आधारावर गुरुकृपायोगाद्वारे मानवजातीचे कल्याण केले आहे’ याविषयी लेख लिहिण्यास प्रोत्साहन देणे : ‘जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले । तोची साधु ओळखावा । देव तेथेची जाणावा ।’ या संतवचनावरून प.पू. बाबांचे देवत्व लक्षात येते. प.पू. बाबा एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी माझ्याकडून एक लेख लिहून घेतला. धर्मसंस्थापना करतांना श्रीकृष्णाने जशी चातुर्वर्ण व्यवस्था केली, त्याप्रमाणेच ‘सध्याच्या कलियुगात विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांनी जातीव्यवस्थेचा कलंक पुसून चातुर्वर्णाच्या आधारावर गुरुकृपायोगाद्वारे मानवजातीचे कल्याण केले आहे’, ही गोष्ट त्या लेखातून समाजाला कळली पाहिजे’, हा समष्टीचा विचार करणारा प.पू. बाबांचा उदात्त हेतू होता.’

– श्री. शिवाजी वटकर, देवद आश्रम, पनवेल

१ आ. प.पू. पांडे महाराज यांच्या सेवेत राहिल्यापासून
त्रासाची तीव्रता न्यून होणे आणि वाईट सवयी न्यून होणे

‘मी प.पू. पांडे महाराज यांच्या खोलीच्या बाहेर असलेल्या सोफ्यावर बसून नामजप केल्यावर माझ्या मनातील नकारात्मक विचार ७० – ८० प्रतिशत न्यून होऊन आनंद मिळायला लागला. मला घरी असतांना २ – ३ चुकीच्या सवयी होत्या. त्या बाबांना प्रार्थना केल्यामुळे पूर्णपणे न्यून झाल्या आहेत. मला आता वाईट शक्तीच्या प्रकटीकरणावर नियंत्रण मिळवायला जमू लागले. माझ्या तोंडवळ्यावर २ – ३ दिवसांनी त्रासामुळे काळपटपणा यायचा. तो आता येत नाही. तोंडवळा तेजस्वी झाल्याचे जाणवत आहे. मला माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांची जाणीव होऊन मला प्रत्येक प्रसंगात स्थिर रहाता येऊ लागले आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या अनुसंधानात असतांना प.पू. बाबांचे अनुसंधान होते. अनेक वेळा बाहेर सेवेला असतांना ‘प.पू. पांडे महाराज माझ्याकडे बघत आहेत’, असा विचार असतो. त्यामुळे बाहेरही एक आदर्श साधक म्हणून वागण्याचा प्रयत्न वाढला आहे.’ – एक साधक

प.पू. पांडे महाराज यांच्या चैतन्यमय सहवासाने जागृत झालेली साधकांची प्रतिभा !

प.पू. पांडे महाराज विभूती आहे महान ।
प.पू. बाबा म्हणजे सर्व योगांचे योगी ।
आहेत हे परात्पर गुरु सत्यलोकी ।
परात्पर गुरु डॉक्टरांच्या महतीचे अखंड पारायण करूनी ।
अवतरले या भूवरी घेऊन जाण्या भक्तांना मोक्षासी ॥ १ ॥

गुरुदेवांचा संकल्प साकार होण्या असे त्यांचे नेहमी समर्पण ।
कशी करावी गुरुभक्ती याची देती शिकवण ।
नसे गुरुसेवेत कधीही खंड कितीही येवो आजारपण ।
त्यासाठीच ते प्रत्येक श्‍वास अन प्रत्येक क्षण करतात अर्पण ॥ २ ॥

करतात सतत भगवंतनिर्मित सृष्टीचे परीक्षण ।
त्याचे करतात कितीतरी सुंदर वर्णन ।
तेव्हा आम्हासी अल्पसे कळे, कसे असते भगवंताचे नियोजन ।
प्रत्येक प्रसंगातून ते घडवतात भगवंताचे दर्शन ॥ ३ ॥

मार्ग दावितात साधकांसी त्यांच्या ज्ञानामृतातून ।
त्यांच्यामुळेच अनुभवता येतात कृतज्ञतेचे क्षण ।
अन् मनी लागते सदा आस मिळावेत श्रीगुरुचरण ।
प.पू. बाबा काय आहेत, याची आम्हा जिवांना नाही जाण ॥ ४ ॥

परि प.पू. गुरुदेवांनी दिले आम्हांसी हे अनमोल धन ।
कसे फेडावे दोन्ही श्रीगुरूंचे ऋण ।
प.पू. पांडे महाराज विभूती आहे महान ।
जाणूनि श्रीगुरूंचे मन प्रयत्नरूपी पुष्प करतो चरणी अर्पण ॥ ५ ॥

– कु. स्नेहा झरकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

प.पू. बाबा परात्पर गुरु डॉक्टरांचे प्रतिरूप ।

एके दिवशी भावजागृतीचे प्रयत्न करतांना परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण करत होतो; परंतु प.पू. बाबांचेच स्मरण होत होते. पुष्कळ प्रयत्न करत असूनही प.पू. बाबांचेच स्मरण होत होते. तेव्हा प्रश्‍न पडला असे का ? आज त्याचे उत्तर देवाने दिले…

प.पू. बाबा परात्पर गुरु डॉक्टरांचे प्रतिरूप ।
प.पू. बाबा आणि परात्पर गुरु डॉक्टर दोघे एकरूप ॥ १ ॥

साठवावे मनी त्यांचे स्वस्वरूप ।
आनंद मिळे मना खूप खूप ॥ २ ॥

साधण्या षड्रिपूंवर शरसंधान ।
चालू झाले देवा प.पू. बाबांशी अनुसंधान ॥ ३ ॥

परात्पर गुरूंच्या सेवेच्या निमित्ताने ।
सहवास मिळतसे प.पू. बाबांचा प.पू.च्या कृपेने ॥ ४ ॥

मन डोलत असे सेवेत सदैव आनंदाने ।
शांत होई तवचरणी कृतज्ञतेने ॥ ५ ॥

श्री. संदेश नाणोसकर (वय १९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात