तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथे सनातन धर्माची पुनर्स्थापना होण्यासाठी नवचंडी यज्ञ !

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) : येथे प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिरात विविध संकल्पांची पूर्तता होण्यासाठी नवचंडी यज्ञ करण्यात आला. १९ ऑक्टोबरला सकाळी ८.३० वाजता चालू झालेल्या या यज्ञाची दुपारी ३.३० वाजता पूर्णाहुती होऊन सांगता झाली. या यज्ञाचे यजमानपद सनातनचे अंबाजोगाई येथील साधक श्री. धनंजय (बाळासाहेब) केंद्रे आणि त्यांच्या पत्नी सौ. योगिता केंद्रे यांनी भुषवले. या यज्ञाचे पौरोहित्य श्री. सुधेश हनुुमंताचार्य जेवळीकर यांनी केले.

या वेळी प्रथम दुर्गासप्तशतीचे १० पाठ करण्यात आले, नंतर एका पाठाच्या वेळी हवन करण्यात आले. या यज्ञाच्या वेळी तुळजापूर शहरातील सनातनचे साधक उपस्थित होते.

यज्ञाचे पौरोहित्य करण्यासाठी आलेले श्री. सुधेश हनुुमंताचार्य जेवळीकर म्हणाले, आता मी हिंदु राष्ट्र येण्यासाठी दोन घंटे जप करणार.

1
यज्ञस्थळी आहुती देतांना यजमान श्री. धनंजय (बाळासाहेब) केंद्रे आणि सौ. योगिता केंद्रे

 

नवचंडी यज्ञाच्या वेळी सनातनच्या साधकांना आलेल्या अनुभूती

2
यज्ञस्थळी आरती करतांना साधक

१. अग्निदेवाला प्रार्थना केल्यावर यज्ञातील अग्नी तत्परतेने प्रज्वलित होणे : यज्ञाचा अग्नी प्रज्वलित करण्यासाठी मंथा आणि उपमंथा याद्वारे मंथन करून अग्नी प्रज्वलित करण्यात आला. त्या वेळी पहिल्याच प्रयत्नात तत्परतेने अग्नी प्रज्वलित झाला. अग्नी प्रज्वलित करतांना मी अग्निदेवाला प्रार्थना केली, तेव्हा अग्निदेव सूक्ष्मातून म्हणाले, मी ताबडतोब प्रगट होतो आणि अग्नि प्रज्वलित झाला.

– श्री. बाळासाहेब केंद्रे, अंबाजोगाई (श्री. अमित कदम यांनाही अग्नी ताबडतोब प्रज्वलित होईल, असे जाणवले.)

२. हवनकुंडाजवळ बसल्यावर संपूर्ण शरीर हलके होणे आणि शरिरात थंडपणा जाणवणे : नवचंडी यज्ञाच्या वेळी प्रार्थना करून हवनकुंडाजवळ बसल्यावर संपूर्ण शरीर हलके झाले आणि शरिरात थंडपणा जाणवत होता. यज्ञकुंडातून चैतन्य बाहेर येत आहे, असे जाणवले, तसेच पुष्कळ शक्ती जाणवत होती. या वेळी उत्साह आणि आत्मविश्‍वास वाढला अन् सर्वत्र सुगंध येत होता. – श्री. विनोद रसाळ, तुळजापूर

३. यज्ञाच्या वेळी पुष्कळ चैतन्य, तसेच सर्व देवता सूक्ष्मातून उपस्थित आहेत, असेे जाणवले. – श्री. विलास पुजारी, तुळजापूर

४. यज्ञाच्या वेळी एक तास चंदनाचा सुगंध आला. – सौ. पुनाताई होरडे, तुळजापूर

५. मी यज्ञस्थळी उपस्थित नसतांनाही मला माझ्यातील वाईट शक्तींची स्थाने नाहिशी होत आहेत, असे जाणवले आणि त्रास अल्प झाला. – श्री. संदीप बगडी, तुळजापूर

६. यज्ञाचे यजमान असलेल्या सौ. योगिता केंद्रे यांच्या ठिकाणी सनातनच्या सद्गुरु (पू.) अंजलीताई बसल्या आहेत असे जाणवले ! – सौ. पुणाताई होरडे, तुळजापूर

७. यज्ञाच्या वेळी अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांचे अस्तित्व जाणवले ! – सौ. योगिता केंद्रे, अंबाजोगाई

नवचंडी यज्ञामध्ये सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आलेले संकल्प

१. संपूर्ण पृथ्वीवर रामराज्याची स्थापना होऊ दे.

२. परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट टळू दे.

३. परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांना आरोग्यसंपदा लाभू दे.

४. सर्व साधकांच्या शारीरिक व्याधी आणि तीव्र आध्यात्मिक त्रास दूर होऊ देत.

५. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या स्थापनेतील सर्व अडथळे दूर होऊन कार्याला गती मिळू दे.

६. हिंदु वाहिनी चालू करण्यासाठी ईश्‍वराचे सर्वतोपरी साहाय्य लाभू दे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात