अकोला येथे दोन दिवसीय प्रांतीय हिंदु अधिवेशन !

मान्यवरांचे विविध विषयांवर मार्गदर्शन

adhiveshan
डावीकडून ह.भ.प. श्री. निलेश महाराज मते, दीपप्रज्वलन करतांना पू. नंदकुमार जाधव आणि श्री. श्रीकांत पिसोळकर

अकोला : येथील खंडेलवाल भवनामध्ये दोन दिवसीय प्रांतीय हिंदु अधिवेशन पार पडले. अधिवेशनाचा शुभारंभ अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्‍वराला वंदन करून आणि संतांच्या कृपाशीर्वादाने झाला. समितीचे श्री. नरेश कोपेकर यांनी शंखनाद केला. सनातनचे पू. नंदकुमार जाधव, ह.भ.प. श्री निलेश महाराज मते आणि हिंदु जनजागृतीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. वेदशास्त्र अभ्यासक श्री. यज्ञेश जोशी यांनी वेदमंत्रांचे पठण केले. समितीचे पुसद येथील डॉ. विनायक चिरडे यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले. समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी अधिवेशनाचा उद्देश विशद केला. ह.भ.प. श्री निलेश महाराज मते यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी समर्पित भावाने कार्य करण्याचे महत्त्व सांगितले. सनातनचे पू. नंदकुमार जाधव यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी साधनेची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन केले. यानंतर गटचर्चा आयोजित करण्यात आली होती. श्री. गजानन अढाव आणि सौ. प्रतिभा जडी यांनी सामाजिक संकेतस्थळे आणि धर्मशिक्षण वर्ग यांच्या संदर्भात मार्गदर्शन केले.

अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी ह.भ.प. प्रकाश महाराज सुफलकर मुरब्बीकारंजा यांनी धर्महानी आणि त्यावरील उपाय यांवर मार्गदर्शन केले. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अभिषेक दीक्षित यांनी धर्माभिमान्यांना धर्मकार्य करण्यात येणार्‍या अडचणी याविषयी विचार व्यक्त केले. समितीचे श्री. अतुल अर्वेन्ला यांनी पाश्‍चात्त्यांंमुळे होणारी संस्कृतीची हानी या विषयावर मार्गदर्शन केले. धर्मकार्य करतांना येणार्‍या अडचणी श्री. संतोष परस्वार, डॉ. विनायक चिरडे, श्याम सांगूनवढे, सौ. माधुरी मोरे यांनी सांगितल्या.

अधिवक्त्यांच्या चर्चासत्रात सचिन बाळापुरे, मधुसूदन शर्माजी, उमेशजी तिवारी, पप्पू मोरवाल या अधिवक्त्यांनी कायदेशीर अडचणींविषयी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय हिंदू आंदोलन, लव्ह जिहाद यांत फसलेल्या तरुणीचे मतपरिवर्तन, स्वसंरक्षण प्रशिक्षण या विषयांवरील प्रात्याक्षिके दाखवण्यात आली. सनातनपर बंदीका वार पुन: एक बार या विषयावरील ध्वनीचित्र-चकतीही दाखवण्यात आली.

ह.भ.प. गोंजाटे महाराज आणि ह.भ.प. प्रकाश महाराज सुफलकर, पू. नंदकुमार जाधव आणि श्री. श्रीकांत पिसोळकर यांच्या मार्गदर्शनाने अधिवेशनाची सांगता झाली. शेवटी श्री. पिसोळकर यांनी उपस्थित धर्माभिमान्यांचे आभार मानले.

ह.भ.प. गोंडचर महाराज म्हणाले, निवडणुकीत निवडून येणारे संसदेत जातात; पण देवांनी निवडलेले हिंदु जनजागृती समितीत येतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात