दैवी प्रवासाच्या माध्यमातून सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा मिळणारा अनमोल सत्संग आणि या सत्संगात येणार्‍या अनुभूती !

१. पूजेसाठी श्री दुर्गादेवीची अपेक्षित अशी मूर्ती न मिळाल्याने सद्गुरु
(सौ.) गाडगीळकाकूंना प्रार्थना करणे आणि लगेचच हवी ती मूर्ती मिळणे

गोवा येथील रामनाथी आश्रमात पूजेसाठी काही देवतांच्या मूर्ती हव्या होत्या. या मूर्ती पहाण्यासाठी आम्ही एका दुकानात गेलो होतो. तेथे आपल्याला अपेक्षित अशा मूर्ती मिळाल्या; मात्र श्री दुर्गादेवीची मूर्ती मिळाली नाही. दुकानदाराने ती इतरत्र आणि त्याच्या गोडाऊनमध्ये पाहूनही ती मिळाली नाही. त्यानंतर मी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू यांना मनोमन प्रार्थना केली आणि त्या दुकानात मूर्ती शोधण्यास आरंभ केल्यावर थोड्या वेळातच आपल्याला अपेक्षित अशी मूर्ती मिळाली.

२. सद्गुरु गाडगीळकाकूंनी सांगितल्यानुसार रस्त्यातील
एका दुकानात साडी घेण्यास जाणे, दुकानमालकांनी
सनातन संस्थेची माहिती समजून घेऊन साडी वाजवी मूल्यात देणे

एकदा नवीन साडी घेण्यासाठी आम्हाला दुकानात जायचे होते. श्री. विनायक शानबाग यांनी आम्हाला २ – ३ दुकानांची नावे सांगितली होती. सद्गुरु गाडगीळकाकूंनी रस्त्यातून जातांना वळणावर असलेल्या एका दुकानात जाण्यास सांगितले. त्या दुकानातून आम्ही साडी विकत घेतली. त्या दुकान मालकाला आम्ही सनातन संस्थेची माहिती सांगून आश्रमातील साधकांसाठी खरेदी करत आहोत, असे सांगितले. त्यामुळे दुकानदाराने साडीची रक्कम न्यून केली.

३. सद्गुरु गाडगीळकाकूंसह चिदंबरम्ला जातांना
पुष्कळ दिवसांपासून संपर्क होत नसलेल्या चिदंबरम् येथील
धर्माभिमान्यांचा अकस्मात् भ्रमणभाष येऊन त्यांनी भेटीची उत्सुकता दर्शवणे

आम्ही महर्षींच्या आज्ञेनुसार चिदंबरम् येथे जाण्यास निघालो. वाटेत चिदंबरम् गावातील एका धर्माभिमान्यांचा भ्रमणभाष आला. त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीकडे अमूल्य अशा वनस्पती असून त्यांना त्या कोणाला तरी द्यायच्या होत्या. त्या धर्माभिमान्यांनी विचारले, या वनस्पती तुम्हाला मिळाल्या, तर बरे होईल. मी त्या व्यक्तीला तुमच्याकडे घेऊन येऊ का ? सद्गुरु काकूंनी हो असे सांगितले. वास्तविक या धर्माभिमान्यांना पुष्कळ दिवसांपूर्वी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो आणि आज त्यांनी स्वतःहूनच आम्हाला भ्रमणभाष करून विचारले. सद्गुरु काकूंनी हे सर्व देवाचेच नियोजन आहे, असे सांगितले.

सद्गुरु काकूंच्या सत्संगात येणार्‍या नित्य अनुभूती पाहून गुरु थोर कि देव थोर म्हणावा या ओळीची आठवण झाली. प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे सदगुरु सौ. अंजली गाडगीळ यांच्यासोबत दैवी प्रवासाच्या माध्यमातून आम्हा सर्व साधकांना सर्व देवतांचे दर्शन घडत आहे. त्यांच्या सत्संगाचा लाभ आम्हा सर्व साधकांना करून घेता येऊ दे, हीच देवाच्या चरणी प्रार्थना आहे.

– गुरुसेवक, श्री. विनीतकुमार देसाई (२२.८.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात