धर्माभिमान्यांनी साधनेचा पाया भक्कम करण्यासाठी गुरुकृपायोगानुसार साधना करावी ! – सद्गुरु पू. (कु.) स्वाती खाडये

कोल्हापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने
आयोजित कार्यशाळेत ५५ धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

sadguru_swatitai
सनातनच्या संत सद्गुरु पू. (कु.) स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन ऐकतांना धर्माभिमानी

कोल्हापूर : कलियुगात व्यक्ती तितक्या प्रकृतीनुसार आज अनेक मार्ग साधना करण्यासाठी उपलब्ध असून गुरुकृपायोगानुसार साधना करून आपण जलद आध्यात्मिक प्रगती करू शकतो. आनंदी जीवन जगण्यासाठी स्वभावदोष आणि अहं-निमूर्लन प्रक्रिया राबवणे महत्त्वाचे आहे. केवळ साधनेचा पाया असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी बोटावर मोजण्याइतक्या मावळ्यांना घेऊन पाच मोठ्या पातशाह्यांचा बीमोड केला. त्यामुळे सर्व धर्माभिन्यांनी साधनेचा पाया भक्कम करण्यासाठी गुरुकृपायोगानुसार साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातनच्या संत सद्गुरु पू. (कु.) स्वाती खाडये यांनी येथे केले. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि बेळगाव या चार जिल्ह्यांतील धर्माभिमान्यांना कृतीशील करण्यासाठी आयोजित केलेल्या एकदिवसीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. या वेळी ५५ धर्माभिमानी सहभागी झाले होते.

हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये, हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्ह्याचे समन्वयक श्री. अभिजीत देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. या वेळी आदर्श राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. धर्माभिमान्यांनी कृतीशील होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या हिंदु धर्मजागृती सभांमध्ये विषय मांडण्याचा प्रायोगिक भागही घेण्यात आला.

हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडयेे यांनी हिंदु धर्मजागृती सभांचा उद्देश, त्यानिमित्ताने करावयाचा प्रसार, गावागावांतील बैठकांचे नियोजन, तसेच धर्मजागृती सभा यांविषयी धर्माभिमान्यांना विषय मांडण्याची संधी प्रायोगिक भागात देण्यात आली. त्यांचे निरीक्षण करून विषयातील बारकावेही धर्माभिमान्यांना सांगण्यात आले.

सनातन संस्थेच्या कोल्हापूर येथील डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे म्हणाल्या की, स्वभावदोषांमुळेे शारीरिक आणि मानसिक आजारांवर नामजप, स्वभावदोष, अहं-निर्मूलन प्रक्रियेने मात करून प्रभावशाली आदर्श व्यक्तीमत्त्व घडवू शकतो. केवळ कार्य न करता साधनेचा पाया म्हणून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करून कार्याला गती देता येईल.

समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी धर्मकार्याला गती मिळून त्याची दिशा स्पष्ट व्हावी आणि प्रभावी कृती होण्यासाठी काय करायला पाहिजे, त्याची माहिती देऊन कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला.

कार्यशाळेसाठी येणार्‍या धर्माभिमान्यांना आलेले अडथळे !

१. बेळगाव जिल्ह्यातील धर्माभिमानी कार्यशाळेला येत असतांना एक चारचाकी धर्माभिमान्यांच्या चारचाकीला घासून गेली आणि पुढे जाऊन अन्य गाडीला धडकली. त्यामुळे मोठा अपघात टळला.

२. बेळगाव जिल्ह्यातील काही धर्माभिमानी कार्यशाळेसाठी येण्यास निघाल्यावर त्यांच्या चारचाकीचा गियर अडकला.

३. काही धर्माभिमान्यांना कार्यालयातील मालकांनी सुट्टी देण्यास नकार दिला. धर्माभिमान्यांनी त्यांना सांगितले, आम्ही रात्री अतिरिक्त काम करू; पण आम्हाला कार्यशाळेला जाण्याची अनुमती द्या.

४. एक धर्माभिमानी दुचाकीद्वारे कार्यशाळेत येत असतांना ती अचानक तिरपी झाली; मात्र त्यांना दुखापत झाली नाही.

विशेष

धर्माभिमान्यांनी जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्, सनातन धर्म की जय ! हिंदु धर्म की जय ! अशा घोषणा स्वयंस्फूर्तीने दिल्या.

भोजनाच्या वेळेत धर्माभिमान्यांनी साधनेविषयी शंकानिरसन करून घेतले. काहींनी सनातनने प्रकाशित केलेले स्वभावदोष-निर्मूलन, तसेच गुरुकृपायोगानुसार साधना हे ग्रंथ विकत घेतले. काहींनी जपमाळाही घेतल्या. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी धर्माभिमानी साधनेच्या संदर्भातील सूत्रे लिहून घेत होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात