सनातन संस्था सातारा यांच्या वतीने तणावमुक्तीसाठी अध्यात्म या विषयावर मार्गदर्शन !

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे

बेळगाव, ६ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील कर्नाटक लॉ सोसायटीच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षक आणि कार्यालयीन शिक्षक, कर्मचारी वर्ग यांच्यासाठी सनातन संस्था सातारा न्यासाच्या वतीने तणावमुक्तीसाठी अध्यात्म या विषयावर मार्गदर्शन घेण्यात आले. हे मार्गदर्शन सनातन संस्था साताराच्या डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी केले. याचा लाभ ५० जणांनी घेतला. या वेळी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे विषय समजावून सांगण्यात आला.

आपल्या मार्गदर्शनात डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी तणाव म्हणजे काय, त्याचा समाज आणि व्यक्ती यांवर होणारा परिणाम, तणावासाठी उत्तरदायी घटक कोणते, यातील ९५ प्रतिशत उत्तरदायी आंतरिक घटक कसे कार्य करतात, एखाद्याच्या व्यक्तीमत्त्वातील स्वभावदोषांमुळे ताणाशी असलेले संबंध यांविषयी सविस्तर माहिती दिली. स्वभावदोष ओळखणे आणि ते अल्प करण्यासाठी प्रयत्न कसे करावेत, म्हणजे तणाव अल्प होऊ शकेल, यांचीही सविस्तर माहिती सांगण्यात आली. या वेळी प्राचार्या सौ. सारिका नाईक, उपप्राचार्य, तसेच अन्य शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

विशेष

१. तेथील प्रदर्शनात स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया यांविषयी अधिक माहिती देणारे ग्रंथ, तसेच सनातन पंचांग २०१७ तेथे प्रदर्शनात मांडण्यात आले होते. याला उपस्थितांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

२. मार्गदर्शन झाल्यावर शिक्षकांनी सांगितले, हा विषय आम्हाला अत्यंत उपयुक्त आहे. आमच्यासाठी पुन्हा एक व्याख्यान घ्या. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी असा उपक्रम राबवण्याची आवश्यकता आहे. याच समवेत अनेकांना नामजप कसा करायचा याविषयी जाणून घेऊन तणावमुक्तीसाठीची प्रक्रिया राबवण्यास चालू करणार असे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात