काश्मीर खोर्‍यात काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन ही १०० कोटी हिंदूंची मागणी ! – श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस
श्री. चेतन राजहंस

देशात राष्ट्रवादी शासन आलेले असल्याने काश्मिरी हिंदूंचे काश्मीर खोर्‍यात सन्मानाने पुनर्वसन व्हावे, या मागणीला अनुसरून भारत रक्षा मंच, हिंदु जनजागृती समिती आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी एक भारत अभियान-कश्मीरकी ओर हे राष्ट्रव्यापी अभियान आरंभले आहे. या अभियानांतर्गत गोव्यातील म्हापसा येथील श्री देव बोडगेश्‍वर मंदिर सभागृहात २.१०.२०१६ या दिवशी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ता, श्री. चेतन राजहंस यांनी मांडलेले विचार आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांनी मांडलेले विचार येथे देत आहोत.

१. सैन्यकारवाईद्वारे संपूर्ण काश्मीर
मुक्त करण्याचे धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवावे !

गांधीजींचे सर्वच विचार आपल्याला पटतील, असे नाही; तरीही त्यांच्या राष्ट्रभक्तीविषयी कोणाच्याही मनात संशयही नाही ! जेव्हा १९४८ मध्ये पापीस्थानचे सैन्य टोळीवाल्यांच्या रूपात काश्मीरमध्ये घुसले, तेव्हा नेहरूंनी गांधीजींना विचारले होते की, महात्माजी, भारताने या परिस्थितीत काय केले पाहिजे, तेव्हा गांधी म्हणाले, सैन्य कारवाईद्वारे पापीस्थानचा पराभव केला पाहिजे; कारण काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग आहे ! दुर्दैवाने सैन्यकारवाईद्वारे संपूर्ण काश्मीर मुक्त करण्याचे धाडस नेहरूंनीच काय, देशातील एकाही राज्यकर्त्यांने आजपर्यंत दाखवले नाही. मोदीजींनी ते धाडस दाखवून गांधींचे आपण सच्चे अनुयायी आहोत, हे सिद्ध करावे.

२. सनातन संस्थेवरील आरोप आणि वस्तूस्थिती

kashmir_panunसध्या एकीकडे पाकिस्तान देशभर आतंकवाद पसरवत आहे आणि दुसरीकडे सेक्युलर पुरोगामी वैचारिक आतंकवाद पसरवत आहेत. भारतकी बरबादी तक, कश्मीरकी आझादी तक जंग रहेगी जंग रहेगी । किंवा भारत तेरे तुकडे होंगे । अशा घोषणा विद्यापिठातून दिल्या जातात आणि त्याचे समर्थन देशातील पुरोगामी करतात, हे भीषण आहे. हे सेक्युलर महाराष्ट्रात आल्यानंतर दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी या धर्मद्वेष्ट्यांच्या हत्यांची चर्चा करतात; पण काश्मीरमध्ये जे जवान वीरमरण पत्करत आहेत किंवा ज्यांची जिहाद्यांनी हिंदू म्हणून काश्मीर खोर्‍यात हत्या केली, त्याविषयी हे ब्रही काढत नाहीत.

स्वीस एड फाऊन्डेशन ही एक भारतद्वेषी अशासकीय संघटना (NGO) आहे. हे फाऊन्डेशन नेहमीच काश्मीरचा नकाशा पाकिस्तानच्या नकाशात दाखवते. या फाऊन्डेशनकडून भारतातील काही NGO ना निधी पुरवला जातो. त्यापैकी महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समिती नावाची NGO आहे. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा हिंदुविरोधी चेहरा उघड करतांना त्यांच्या या राष्ट्रविरोधी कृत्यावरही बोट ठेवले होते; पण आज दुर्दैवाने महाराष्ट्रात डॉ. दाभोलकर यांना महात्मा बनवले जात आहे आणि आम्ही त्यांचे खरे स्वरूप उघड करतो; म्हणून आम्हाला आतंकवादी किंवा नथुरामी प्रवृत्ती ठरवले जात आहे. सनातन संस्थेला या वर्षी २५ वर्षे पूर्ण झाली आहेत; या २५ वर्षांत आम्ही राष्ट्रभक्तीने अध्यात्माचा प्रसार केला. १९९९ मध्ये कारगिलमध्ये लढाई चालू होती, तेव्हा आम्ही लोकांमध्ये राष्ट्रभावना वृद्धींगत व्हावी, या हेतूने संरक्षणविषयक ग्रंथमालिका प्रकाशित केली. काश्मीरची समस्या, कारगीलची लढाई ही सारी पुस्तके आम्ही राष्ट्रभक्तीने प्रकाशित केली. आम्ही कधीही पाकिस्तानवादी नव्हतो, तर भारतात हिंदु राष्ट्राची मागणी करणारे होतो. काही राजकारण्यांनी आम्हाला मडगाव स्फोटात गुंतवण्याचा प्रयत्न केला; पण सत्यमेव जयति या संविधानातील घोषवाक्यावर आमची श्रद्धा असल्याने न्यायदेवतेने आम्हाला निर्दोषत्व बहाल केले.

३. काश्मिरी संस्कृतीचे हिंदुत्व

काश्मीरला भारतवर्षाची बुद्धी म्हणतात. यामागील आध्यात्मिक कारण म्हणजे मां सरस्वतीचे शारदापीठ ! ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केल्यानंतर ज्ञानाची देवता सरस्वतीने जे स्थान पसंत केले, ते काश्मीर होय ! येथील मां सरस्वतीच्या अस्तित्वामुळे केरळमधील जगद्गुरु आद्यशंकराचार्य काश्मीरमध्ये पोेचले आणि त्यांनी तेथे धर्मग्रंथांची रचना केली. आपण हिंदू प्रतिदिन शारदादेवीचा श्‍लोक म्हणतो,

नमस्ते शारदे देवि काश्मीरपुरवासिनि ।
त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे ॥

अर्थ : हे काश्मीरवासिनी सरस्वतीदेवी, तुला माझा नमस्कार असो. तू आम्हाला विद्या दे, अशी मी तुला नित्य प्रार्थना करतो. सध्या हे शारदापीठ पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे.

आम्ही सरस्वतीपुत्र म्हणजे विद्येचे उपासक आहोत. आपले शारदापीठ हे पुन्हा भारतभूमीतील विद्येचे माहेरघर बनण्यासाठी आपल्याला आपले कर्तव्य बजावायचे आहे.

अ. किती जणांना माहीत आहे की, कश्यप ऋषींच्या नावावरून या भूभागाला काश्मीर हे नाव पडले आहे किंवा सम्राट अशोकाने श्रीनगरी या राजधानीची स्थापना केली होती ? आज काश्मीरमधील सर्व स्थानांच्या नावांचे इस्लामीकरण करण्यात आले; परंतु आजही ते काश्मीरचे आणि श्रीनगरचे नाव बदलू शकलेले नाहीत ! ज्या काश्मीरची राजधानीच श्रीनगर आहे, ते राज्य स्वतःचे हिंदुत्व कसे झाकू शकेल ?

आ. महाभारताच्या युद्धात सर्व राजांनी धर्मयुद्धात भाग घेतला; मात्र काश्मीरचा राजा गोकर्ण याने त्यात भाग घेतला नाही. तेव्हा श्रीकृष्णानेे त्या अधर्मीचा वध केला आणि त्याच्या जागी त्याची पत्नी यशोमती हिचा राज्याअभिषेक केला. अशा प्रकारे जगामध्ये पहिल्यांदा एका महिलेला राज्यकर्ता बनवण्यात आले आणि त्याचा प्रारंभही काश्मीरपासूनच झाला. तिचा अभिषेक करतांना स्वतः कृष्णाने सांगितले की, काश्मीरची भूमी म्हणजे साक्षात पार्वतीचे रूप आहे. या भूमीवर केवळ शिवतत्त्वाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करत असलेल्यांनाच राज्य करण्याचा अधिकार आहे. अन्य लोकांना या भूमीवर रहाण्याचा कोणताही अधिकार नाही.

दुर्दैवाने आम्ही भगवान श्रीकृष्णाची शिकवण विसरलो. त्यामुळे काश्मीरमधील आजचे अधर्मी अमरनाथ यात्रेला विरोध करत आहेत आणि खरे शिवभक्त असलेले काश्मिरी हिंदू विस्थापित झाले आहेत.

इ. काश्मिरी हिंदू हे केवळ आमचे राष्ट्रबंधू आणि धर्मबंधू नव्हेत, तर आमचे नाते एका रक्ताचे आहे. काश्मीर ही कश्यप ऋषींची भूमी आहे आणि आपल्यातील कोट्यवधी हिंदूंचे गोत्र कश्यप आहे. ज्यांचे गोत्र मिळत नाही, त्यांना कश्यप गोत्राचे मानले जाते; कारण सर्वच जीव कश्यपऋषींपासून निर्माण झाले, अशी आमची श्रद्धा आहे. यामुळे काश्मीर ही आमची वडिलोपार्जित संपत्ती आहे.

ई. आमच्या गोव्यातील शांतादुर्गा आणि काश्मीरमधील महाकाली दुर्गा या दोन्ही एकाच जगदंबेची रूपे आहेत.

उ. गोव्याप्रमाणेच काश्मीर खोरेही एकेकाळी भव्यदिव्य आणि ऐश्‍वर्यशाली मंदिरांसाठी सुप्रसिद्ध होते. मूर्तीभंजक पोर्तुगिजांप्रमाणेच काश्मीर खोर्‍यात इस्लामी आक्रमकांनी या मंदिर संस्कृतींचा विध्वंस केला !

ऊ. युगानयुगे आम्ही आचार-विचार, आहार-विहार आदींमध्ये एक समान सांस्कृतिक वारसा जोपासत आहोत. हिंदु संस्कृतीत १६ संस्कारांना विशेष महत्त्व आहे. जे कोणी उपनयन संस्कार करतात, ते त्यानंतर मुलाला सात पावले उत्तरेच्या दिशेने, म्हणजे काश्मीरच्या दिशेने चालायला सांगतात. यावरून काश्मीरचे महत्त्व लक्षात येईल. संस्कृत भाषा हा हिंदु संस्कृतीचा गाभा आहे. या देववाणीत सर्व धार्मिक विधींची रचना झाली आहे. हे सर्व धार्मिक विधी काश्मीरपासून केरळपर्यंत केवळ संस्कृत भाषेत म्हटले जातात.

ए. कालिदासाने काश्मीर म्हणजे दुसरा स्वर्गच असे लिहून ठेवले आहे. सर काल्टर लारेन्स याने म्हटले आहे की, एकेकाळी काश्मिरात इतकी सुबत्ता आणि निरामयता होती की, तेथील स्त्रिया सृजनशीलतेत जणू भूमीशी स्पर्धा करीत असत. भूमी जशी सकस धान्यसंपदा देई, तशी सकस संतती त्या जन्मास घालीत; पण आज काय घडत आहे ? त्याच काश्मीर खोर्‍यात ३० वर्षांच्या महिलांची मासिक पाळी बंद होत आहे.

सहस्रो वर्षे विद्येचे माहेरघर असलेले काश्मीर काही वर्षांत अतिरेक्यांचे माहेरघर बनले.

४. १९९० मध्ये असे काय घडले ?

दुर्दैवाने माझ्या वयातील पिढीला हे माहीत आहे. मी माझे करीयर करत राहिलो असतो, तर मलाही हे भीषण सत्य कळले नसते. १९ जानेवारी १९९० या दिवशी संपूर्ण काश्मीरमधून हिंदूंनी निघून जावे, असे आदेश ठिकठिकाणी देण्यात आले. जाहीरपणे सांगण्यात आले, वर्तमानपत्रात जाहिराती देण्यात आल्या आणि संपूर्ण हिंदु समाजाला तिथून निघून जावे लागले. त्यांच्यासमोर तीन पर्याय ठेवण्यात आले होते. रलिव्ह, चलीव्ह या गलिव्ह । म्हणजे धर्मांतर करा, काश्मीर सोडून चालते व्हा किंवा मृत्यू स्वीकारा. आमच्या बांधवांनी फार मोठा त्याग केला. धर्म वाचवण्यासाठी त्यांनी आपली भूमी, आपल्या आठवणी, आपले बालपण सर्वांचा त्याग केला. धर्मासाठी हा विलक्षण त्याग आजच्याही काळामध्ये केला जातो, हे एका अर्थी स्पृहणीय आहे; परंतु दुसर्‍या अर्थी त्यांचे आम्हाला वैषम्य वाटले पाहिजे की, हे असे करण्याची पाळी येते आणि ही पाळी हिंदूंच्या राष्ट्रामध्ये हिंदूंवर येते, याचे कारण काय ? काश्मिरी हिंदूंवर आपल्याच देशात विस्थापित होण्याची पाळी यावी, यापेक्षा अन्य कुठलीही दुर्दैवी गोष्ट नाही. त्या वेळी देशातील असहिष्णुतेविषयी बोलणारे शांत राहिले होते, हेही विसरता कामा नये. काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन गेल्या २६ वर्षांत होऊ नये, हे दुर्भाग्यपूर्ण आहे. किंबहुना हा भारतीय लोकशाहीवरील एक कलंकच आहे.

५. मोदी शासनाने काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे !

आमच्या काश्मिरी धर्मबांधवांचे काश्मीर खोर्‍यात पुनर्वसन होणे, हा त्यांचा जन्मजात, घटनात्मक, नैसर्गिक, धार्मिक आणि राष्ट्रीय अधिकार आहे. हिंदूंच्या काश्मीर खोर्‍यातील पुनर्वसनामुळे भारतियांच्या अस्मितेचे रक्षण होणार आहे. भारत शासनाने काश्मीर खोर्‍यात पनून कश्मीर नावाचे होमलँड निर्माण करणे, हे अनेक वर्षे विस्थापित जीवनाच्या यातना भोगलेल्या काश्मिरी हिंदूंच्या जखमेवरील छोटीशी फुंकर असेल. काश्मिरी हिंदूंचे काश्मीर खोर्‍यातील पुनर्वसन करा, ही काही पनून कश्मीर किंवा ७ लाख काश्मिरी हिंदूंची मागणी नाही, तर १०० कोटी हिंदूंची मागणी आहे, हे केंद्रशासनाने लक्षात घेतले पाहिजे. आम्ही देशवासियांनी सुरक्षित जीवनासाठी २०१४ मध्ये सत्तापरिवर्तन घडवून मोदी शासनावर विश्‍वास दाखवला. केंद्रशासनाने या विश्‍वासाचा गळा घोटू नये, एवढीच आमची विनंती आहे.

६. गोवा आणि काश्मीर

काश्मीरमधील आतंकवाद आणि हिंदूंची दुःस्थिती यांचे गोव्याच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. काश्मीरमध्ये पाकसमर्थक हुरियतवाले सुरक्षित जीवन जगत आहेत आणि आमच्या वास्कोमध्ये पाकपुरस्कृत आतंकवादाचा भागीदार असलेला भटकळ सुरक्षित जीवन जगत होता. भारत स्वतंत्र झाला, तरी काश्मीर १ सहस्र वर्षे इस्लामने लादलेल्या गुलामीत जीवन जगत आहे आणि आमचे गोवाही स्वतंत्र झाले, तरी पोर्तुगालच्या सांस्कृतिक गुलामीत जीवन जगत आहोत. तेथे क्रिकेटमध्ये पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके फुटतात आणि येथे पोर्तुगाल फुटबॉलमध्ये जिंकल्यानंतर फटाके फुटतात. कधी कधी तर गोव्याची व्यवस्था काश्मीरपेक्षाही असहिष्णु होते. काश्मीरमध्ये ३७० कलम असूनही आपण तेथे जाऊ शकतो; कारण राज्यघटनेने दिलेले संचारस्वातंत्र्य ! जम्मूमध्ये जाऊन प्रमोद मुतालिक भाषणे देऊ शकतात; पण गोव्यात ३७० कलम नसूनही येथे ते येऊ शकत नाहीत. हे घटनात्मक संचारस्वातंत्र्याचे हनन आहे, असे दुर्दैवाने येथील व्यवस्थेला वाटत नाही. येथे रशियन्स येतात, रेव्ह पार्ट्या करतात, नायजेरीयन येतात, अमली पदार्थांचा व्यापार करतात, येथे विदेशी टुरिस्ट येतात, येथील महिलांवर बलात्कार करतात, हे सारे येथील व्यवस्थेला चालते आणि या अपप्रवृत्तींना विरोध करणारे प्रमोद मुतालिक या व्यवस्थेला चालत नाहीत, हे अत्यंत गंभीर आहे.

७. इस्लामिक स्टेट कि हिंदु स्टेट ?

आज आपण इस्लामिक स्टेटचे भीषण अत्याचार ऐकतो. १९९० मध्ये काश्मीरमध्ये एक घोषणा दिली जात होती. कश्मीर क्या होगा ? निझाम-ए-मुस्तफा होगा । म्हणजे काय तर महंमदाचे शासन म्हणजेच आजच्या भाषेत इस्लामिक स्टेट ! खरे तर तेव्हाच तेथे इस्लामिक स्टेटचा आरंभ झाला होता. आम्हाला धर्मनिरपेक्ष राष्ट्र हवे आहे कि हिंदु राष्ट्र हवे आहे, हा प्रश्‍न काश्मीरमध्ये मोडित निघाला आहे. आज तेथे ना धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे ना हिंदु राष्ट्र ! येत्या २-३ वर्षांत हा प्रश्‍न भारतातही उरणार नाही; कारण त्या वेळी आपल्याला ठरवावे लागेल की, आपल्याला इस्लामिक स्टेट हवे आहे कि हिंदु स्टेट हवे आहे ? आम्हाला इस्लामिक स्टेट नको असल्याने आम्ही आतापासूनच हिंदु राष्ट्राचा मार्ग स्वीकारला आहे. जम्मू येथील संघटनासाठी २६ डिसेंबरची दिनांक ठरलेली आहे. यात आपल्यासारख्या धर्मप्रेमींची साथ हवी आहे, एवढेच आवाहन करतो आणि माझ्या वाणीला श्रीगुरुचरणी विराम देतो. जय गोमंतक । जय काश्मीर । जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात