आदर्श नवरात्रोत्सव साजरा करण्यासंदर्भात राज्यभरात निवेदने

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा आदर्श नवरात्रोत्सव उपक्रम !

सध्या सार्वजनिक नवरात्रोत्सवात अनेक अपप्रकार शिरले आहेत. चित्रपटगीतांच्या तालावर गरबा खेळणे, मद्यपान करणे, बळजोरीने वर्गणी गोळा करणे, सजावटीवर अनाठायी व्यय करणे, मंडपात जुगार खेळणे आदी कारणांनी उत्सवाचे पावित्र्य नष्ट होत आहे. परिणामी या उत्सवाच्या काळात अनैतिक कृत्यांमध्ये वाढ होऊन नंतरच्या काळात गर्भपाताच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होते. हे सर्व थांबून आदर्श नवरात्रोत्सव साजरा करण्यात यावा, याविषयीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने राज्यभरात पोलीस आणि प्रशासन यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, नवरात्रोत्सवाच्या काळात आतंकवादी कारवाया आणि धर्मांधांकडून होणार्‍या दंगली यांचा धोका असतो. गर्दीच्या ठिकाणी अनोळखी अथवा धर्मांध व्यक्ती कार्यक्रमात घुसून उत्सवात तणाव निर्माण करण्याची शक्यता असते. या पार्श्‍वभूमीवर सर्वांनी सतर्क रहाणे आवश्यक असून समारंभाच्या ठिकाणी ओळखपत्र पडताळूनच प्रवेश देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पोलिसांनी आयोजित केलेल्या बैठकांना हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधींना निमंत्रित केल्यास उत्सव शांततापूर्ण आणि धार्मिक वातावरणात होण्यासाठी समिती आणि रणरागिणी शाखा आपल्याला साहाय्य करील.

कोल्हापूर

1
कोल्हापूर येथील पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना निवेदन देतांना धर्माभिमानी

नवरात्रोत्सवाचा विषय मांडण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि
रणरागिणी शाखा यांना बोलावण्यासाठी प्रयत्न करणार ! – पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे

हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या वतीने येथील पोलीस अधीक्षक श्री. प्रदीप देशपांडे आणि पोलीस उपअधीक्षक श्री. भारतकुमार राणे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी नवरात्रोत्सवाचा विषय मांडण्यासाठी हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखा आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यकर्त्यांना आमच्या बैठकीत बोलावण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे श्री. प्रदीप देशपांडे यांनी सांगितले. या वेळी शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु एकता आंदोलनाचे श्री. शिवाजीराव ससे, विहिंपचे श्री. अशोक रामचंदानी आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ठाणे

2
राबोडी पोलीस निवेदन स्वीकारतांना

ठाणे, राबोडी येथील आणि डोंबिवली, रामनगर येथील पोलीस स्थानक, टिळक नगर पोलीस स्थानक आणि विष्णुनगर पोलीस स्थानक येथेही निवेदन देण्यात आले.

नाशिक

3
निवेदन स्वीकारतांना नाशिकचे उपजिल्हाधिकारी

समितीचे कार्य आदर्श असून समितीला पूर्णपणे सहकार्य करू !
– श्री. रामदास खेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी, नाशिक

येथील निवासी उपजिल्हाधिकारी श्री. रामदास खेडकर यांना धर्माभिमानी आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी श्री. खेडकर यांनी समितीचे कार्य आदर्श असून समितीला पूर्णपणे सहकार्य करू असे सांगितले. निवेदन देतांना धर्माभिमानी श्री. दीपक पाटील, कु. प्रेरणा मोराडे, तसेच सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यवतमाळ

4
निवेदन स्वीकारतांना यवतमाळचे नायब तहसीलदार

जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रतिनिधी नायब तहसीलदार दिलीप राठोड यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यावर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे राठोड यांनी सांगितले. २४ सप्टेंबर या दिवशी झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनातील स्वाक्षर्‍यांचे निवेदनही या वेळी देण्यात आले.

सांगली

येथेही समितीच्या वतीने सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत उपमहापौर श्री. विजय घाटगे आणि सांगली शहर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी श्री. गुजर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्री संतोष देसाई, तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

नंदुरबार

5
निवेदन स्वीकारतांना नंदुरबारचे जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे

आदर्श नवरात्रोत्सव कसा साजरा करावा आणि उत्सवादरम्यान येणार्‍या अडीअडचणी कशा सोडवाव्यात, याविषयी चर्चा करण्यासाठी हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत सार्वजनिक उत्सव महामंडळातर्फे २९ सप्टेंबरला नवरात्रोत्सव मंडळांची एकत्रित बैठक नंदुरबार येथील श्रीराम मंदिर, मंगलभवनजवळ, जैन मंदिरामागे, नंदुरबार या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.

महामंडळाने कळवले की, हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत श्री गणेशोत्सव महामंडळाच्या माध्यमातून सर्व मंडळे एकत्रित आल्याने आदर्श गणेशोत्सव साजरा करणे आणि त्यांच्या अडचणी सोडवणे या कार्यात यश आले होते. त्याच धर्तीवर नवरात्रोत्सव साजरा करतांना येणार्‍या अडचणी सोडवण्याविषयी तसेच आदर्श नवरात्रोत्सव साजरा करण्याविषयी चर्चा करण्यासाठी सर्व नवरात्री (गरबा) मंडळांच्या सदस्यांनी आणि पदाधिकार्‍यांनी बैठकीस उपस्थित रहाण्याचे आवाहनही महामंडळाने केले होते.

नवरात्रोत्सवात कडक धोरण अवलंबणार ! – पोलीस अधीक्षकांचे आश्‍वासन

येथे समितीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांना निवेदन देण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांनी निवेदन स्वीकारतांना त्यातील सूत्रांवर चर्चा केली आणि त्यांना अनुषंगून नवरात्रोत्सवात कडक धोरण अवलंबले जाईल, असे आश्‍वासन दिले. निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

वर्धा येथेही विविध विषयांवर निवेदन

6
वर्ध्याचे पोलीस उपअधीक्षक रवींद्र किल्लेकर निवेदन स्वीकारतांना

वर्धा : येथे कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या आरोपाखाली विनाकारण अटकेत असलेले डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा छळ थांबवावा आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत भोंग्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने अधीक्षक श्री. प्रमोद कदम यांना निवेदन देण्यात आले. अनधिकृत भोंग्यांवर कायदेशीर कारवाई आणि आदर्श नवरात्रोत्सव साजरा व्हावा, यासाठी पोलीस अधीक्षकांच्या वतीने पोलीस उपअधीक्षक श्री. रवींद्र किल्लेेकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधक उपस्थित होते.

धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासाच्या वतीने वर्धा येथे विविध समाजोपयोगी उपक्रम !

7
प्रबोधन करतांना सौ. माणिकपुरे

धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासाच्या वतीने २६ सप्टेंबर या दिवशी ज्ञानेश्‍वर मंदिर, आर्वी नाका येथे प्रदूषणमुक्त नवरात्रोत्सव कसा साजरा करावा, याविषयी न्यासाच्या सौ. जयश्री माणिकपुरे यांनी मार्गदर्शन केले. न्यासाच्या वतीने गरजूंना कपडे वाटप, अन्नदान, तसेच नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे, तणावमुक्त जीवन कसे जगावे, याविषयी प्रबोधन करण्यात आले. आरोग्यविषयक तपासणीही करण्यात आली. या उपक्रमाचा लाभ २७ महिलांनी घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात