नवरात्रीचे व्रत आणि पूजन

 १. नवरात्रीचे व्रत आणि पूजन

नवरात्रारंभाच्या तिथीविषयी देवीपुराणात पुढील संदर्भ दिला आहे,
अमायुक्ता न कर्तव्या प्रतिपत्पूजने मम ।
मुहूर्तमात्रा कर्तव्या द्वितीयादिगुणान्विता ॥

अर्थ : नवरात्रीचे व्रत आणि पूजन अमावास्यायुक्त प्रतिपदेस करू नये. अशा वेळी प्रतिपदायुक्त द्वितीयेस व्रताचा प्रारंभ आणि पूजन करणे श्रेयस्कर असते.

२. कलश स्थापना

हस्त नक्षत्रयुक्त प्रतिपदेस कलश स्थापना करणे उत्तम असते.

३. हवन

आपल्या कुल परंपरेनुसार अष्टमी किंवा नवमी या तिथीस हवन करावे. त्यानंतर अन्न ग्रहण (भोजन) करावे.

४. विसर्जन

संपूर्ण पूजा-सामग्रीचे, तसेच देवीच्या प्रतिमेचे विसर्जन याच दिवशी करावे.

५. देवीपूजन

देवीच्या पूजेत हळद-कुंकू, बेल इत्यादी असलेले उत्तम आहे. या पूजेत तुळस आणि दुर्वा वर्ज्य आहेत.

६. देवीची उपासना

खालीलप्रमाणे कोणत्याही एका प्रकारे उपासना करता येईल.

अ. श्री दुर्गासप्तशतीचा पाठ करावा.

आ. श्रीसूक्ताचे प्रतिदिन १५ पाठ करावेत. त्या आधी सूर्यमंत्राचा जप १ माळ करावा.

७. श्रीसूक्ताची तांत्रिक उपासना

ही उपासना प्रतिदिन पहाटे २.३० वाजता चालू करावी.

अ. प्रथम विनियोग, न्यास इत्यादी करावेत. (काही विधी करण्यापूर्वी मंत्र सिद्ध होण्यासाठी दुसरा मंत्रजप किंवा अन्य काही कृती करायला सांगितल्या जातात. त्याला विनियोग म्हणतात.)

आ. त्यानंतर श्रीयंत्रावर श्रीलक्ष्मीची (कमळात बसलेली/उभी) मूर्ती ठेवून श्रीसूक्ताच्या २१ पाठांनी अभिषेक करावा.

इ. नंतर ११ पाठांनी तूप आणि गुग्गुळ यांनी हवन करावे.
यामुळे लक्ष्मीमाता प्रत्यक्ष दर्शन देईल. तिला नित्य आपल्या घरातच रहाण्याची प्रार्थना करावी.

८. मंत्रजप

८ अ. मंत्रजपाची पद्धत

गुरूंनी कोणत्याही देवीचा मंत्र दिला असेल, तरी त्याचा प्रतिदिन १ माळ जप रक्तचंदनाच्या माळेने करावा. दोन मंत्रजपांत थोडे अंतर ठेवावे.

८ आ. जपाच्या वेळी ठेवायचा भाव

जप करतांना मीच अव्यय, अविनाशी भगवती आहे, हा भाव ठेवावा. हे अंतर जेवढे अधिक ठेवता येईल, तेवढे ठेवावे, म्हणजे भाववृद्धी होते आणि स्वतःच जगदंबा आहोत, अशी अनुभूती येते. शक्ती-उपासक अशीच उपासना करतात आणि अनुभूती घेत असतात; मात्र ते विनियोग, न्यास, मुद्रा इत्यादी कठीण क्रिया आधी करतात. भगवतीचे सान्निध्य प्राप्त करून संपूर्ण देह मंत्रमय करून ते अशी उपासना करतात.

९. मंत्रदीक्षा

अ. नवार्ण मंत्राची दीक्षा घेतली असेल, तर त्याचा प्रतिदिन १ सहस्र वेळा जप करावा.

आ. दीक्षा नसेल, तर मंत्राचे उत्कीलन, संजीवन या क्रिया आधी करून मग जप करावा.
नवरात्रीत नवनाथपंथीय लोक नाथांची उपासना करतात.
– श्री. अनिल. गो. बोकील, पुणे (१८.९.२०१३)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात