सनातन संस्थेच्या संपर्कात राहून वरळी येथील गणेशोत्सव मंडळाचा ‘आदर्श गणेशोत्सव’ साजरा करण्यासाठी प्रयत्न !

असा आदर्श सर्वत्रच्या गणेशोत्सव मंडळांनी घ्यावा !

मुंबई, २३ सप्टेंबर (वार्ता.) – वरळी येथील ‘हिंदचा राजा हिंदसायकल महाराजा गणेशोत्सव मंडळा’च्या वतीने गणेशोत्सवात राष्ट्र आणि धर्म यांविषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मागील ३ वर्षांपासून हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संपर्कात राहून हे मंडळ आदर्श गणेशोत्सव साजरा होण्यासाठी प्रयत्नरत आहे.

या मंडळाच्या वतीने २१ दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी मंडळाच्या वतीने गणेशोत्सवात धर्मशिक्षण देणारे तसेच राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांच्या कार्याची माहिती देणारे फलक लावणे, श्री गणेशोत्सवाची शास्त्रीय माहिती देणारी ध्वनीचित्रचकती दाखवणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हळदी-कुंकू समारंभात महिलांना धर्माचरणाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच भजनांसारख्या धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. यासह फळेवाटप, विसर्जन मिरवणुकीत भाविकांसाठी पाणीवाटप असे सामाजिक उपक्रमही राबवण्यात आले. उत्सवात चित्रपटगीते लावणे, अनावश्यक विद्युत रोषणाई करणे आदी गैरप्रकारांना हे मंडळ स्थान देत नाही. ऐच्छिक वर्गणीदारांकडूनच अर्पण घेण्यात येते. हे सर्व उपक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री. संघटन शर्मा यांनी पुढाकार घेतला. मंडळाचे प्रमुख सल्लागार श्री. मोहन म्हामूणकर यांसह श्री. रमेश मंथेना आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी अन् कार्यकर्ते यांनी आदर्श गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी सक्रिय सहभाग घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात