हिंदु राष्ट्राची स्थापना या उद्बोधन सत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन

संत आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी मैदानात उतरा !
– साध्वी तरुणा बहेन, धर्मप्रचारक, पूज्यपाद संतश्री आसारामजी आश्रम

taruna_behen
साध्वी तरुणा बहेन

संतांची मांदियाळी हे भारताचे वैशिष्ट्य आणि गौरवाचे स्थान आहे; मात्र आज जीवनाच्या उन्नतीचा मार्ग दाखवणार्‍या संतांवर हिंदूंकडूनच खोटे आरोप केले जात आहेत. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यावर खोटे आरोप होऊन ३ वर्षे झाली. आतापर्यंत त्यांच्यावरील एकही आरोप सिद्ध झाला नाही, तरीही त्यांना कोणतीही सवलत दिली गेली नाही. निरपराध माणसांची हत्या करणार्‍या सलमान खानच्या खटल्याची जलद सुनावणी होते; मात्र संतांना खोट्या आरोपांखाली कारागृहात डांबून ठेवले जाते, हे दुर्दैवी आहे. चित्रपटांमधनूही हिंदु संतांना दोषी ठरवले जाते. संत आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी आपण सिद्ध झाले पाहिजे. महाभारतकाळात एकच धृतराष्ट्र होता; मात्र आजच्या समाजात अनेक धृतराष्ट्र असून समाज आंधळा होत चालला आहे. न्याययंत्रणेत अनेक त्रुटी असल्यामुळे आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा नाही; म्हणूनच संत आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी मैदानात उतरण्याची वेळ आली आहे.

साध्वी तरुणा बहेन यांचे क्षात्रतेजयुक्त आवाहन….

* जर कुराण वाचून मुसलमान अत्याचार करू शकतात, तर भगवद्गीता वाचून आपण अन्यायाचा प्रतिकार का करू शकत नाही ?

* आता आम्ही जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् असा जयघोष केवळ शाब्दिकदृष्ट्या करणार नाही, तर तो प्रत्यक्ष आचरणातही आणून दाखवू.

* जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् हा संपूर्ण भारताचा नारा बनायला हवा.

आधुनिकतावाद्यांचा हिंदूविरोधी प्रचार रोखण्यासाठी परिणामकारक
जागृती आवश्यक ! – अधिवक्ता देवदास शिंदे, सचिव, हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान, पुणे

devdas_shinde
अधिवक्ता देवदास शिंदे

हिंदु राष्ट्राची संकल्पना हिंदूंना समजावत असतांना आधुनिकतेच्या नावाखाली पुरोगामी, बामसेफ, संभाजी ब्रिगेड यांसारख्या विविध राज्यांत विविध नावांनी कार्यरत असणार्‍या संघटना अडथळे निर्माण करतात. हिंदूंच्या रामनवमीच्या वेळी ते वानरसेना लिहिणे-वाचणे कोणत्या शाळेत शिकली ? असा एक संदेश पाठवून हिंदु विद्यार्थ्यांची दिशाभूल करतात. त्यामुळे त्यांचा विखारी प्रचार रोखण्यासाठी आपल्याला धर्मशिक्षण, राष्ट्रप्रेम शिकवणारे ग्रंथ, सनातन प्रभात आदींच्या माध्यमातून जनजागृती करणे अत्यावश्यक आहे, असे मार्गदर्शन पुणे येथील अधिवक्ता श्री. देवदास शिंदे यांनी केले.

अधिवक्ता श्री. शिंदे म्हणाले की,

१. मेकॉलेकृत शिक्षणपद्धतीमुळे आज एम्पीएस्सी अन् युपीएस्सी यांद्वारे संस्थानिक निर्माण करण्यात येत आहेत.

२. त्या शिक्षणात क्रांतीकारक भगतसिंह यांना अतिरेकी ठरवले जाते आणि छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध अपशब्द वापरले जातात.

३. मूलनिवासींच्या चळवळीच्या माध्यमातून बामसेफसारख्या संघटना देशभरात विविध नावांनी कार्यरत असून ती हिंदूंमध्ये फूट पाडत आहे.

४. कन्हैयाकुमार यांच्यासारख्या अपप्रवृत्तींना अकारण मोठे केले जाते.

५. त्यासाठी हिंदूंनी हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गात जावे.

६. हकिकत राय यांच्यासारख्या राष्ट्रप्रेमींच्या ग्रंथांचे वाचन करावे.

७. आत्मबळ वाढवण्यासाठी साधनाही केली पाहिजे.

धर्माधारित राज्यघटनाच हिंदूंवरील अन्याय थांबवेल !
– डॉ. शिवनारायण सेन, सचिव, शास्त्र-धर्म प्रचार सभा, बंगाल

shivnarayan_sen
डॉ. शिवनारायण सेन

सनातन हिंदु धर्माची पहिली आचारसंहिता स्वयं ब्रह्मदेवाने बनवली होती. त्यानंतर इंद्र, प्रजापति, मनु आदींनीही धर्मनियम बनवले. ते नियम हे शाश्‍वत आणि त्रिकालाबाधित आहेत; मात्र भारतीय राज्यघटनेत आजवर १०० सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या अशाश्‍वत राज्यघटनेचा अपलाभ उठवत हिंदूंवरील अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हिंदूंवरील अन्याय रोखण्यासाठी धर्माधारित राज्यघटनाच आवश्यक आहे. आज आक्रमकांना अल्पसंख्यांक दर्जा दिला गेला असून त्यामुळे बहुसंख्यांकांवर अन्याय होत आहे. आजवरची भारताची अर्थव्यवस्था, राहणीमान आदी केवळ अहिंदूंच्या आक्रमणामुळे खालावले आहे. ते सुधारण्यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक आहे.

श्री. सेन यांनी सांगितलेली अनुभूती

श्री. सेन म्हणाले की, वर्षभरापूर्वी माझी एक शस्त्रक्रिया करायची होती; मात्र आधुनिक वैद्यांच्या अनुपलब्धतेमुळे ती ६ मास पुढे ढकलली गेली. त्यानंतर मी एका संतांच्या सांगण्यानुसार ती केली. तेव्हा शस्त्रक्रिया झालेल्या भागातच कर्करोगाची गाठ सापडली. ती काढली; म्हणजे माझे आजचे आयुष्य हे संतांच्या कृपेने वाढलेले बोनस आयुष्य आहे.

या सत्रात काही तथाकथित हिंदुत्ववाद्यांच्या अपप्रवृत्तींमुळे होत असलेली हिंदुत्वाची हानी आणि ती रोखण्याची आवश्यकता या विषयावर सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी, तर हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा या विषयासंदर्भात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात