ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मंदिरांच्या संरक्षणाविषयी शासन उदासीन !

Anil_Dhir_june2016_c

रामनाथी, गोवा येथे १९ जून ते २५ जून २०१६ या कालावधीत पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात विविध राज्यांतील हिंदूंची असुरक्षितता या सत्रात भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय महासचिव श्री. अनिल धीर यांनी सांगितलेले त्यांचे अनुभव येथे देत आहोत.

१. ओडिशातील कोणार्क येथील
सूर्यमंदिराचा केवळ २५ टक्केच भाग शिल्लक असणे !

हिंदूंची मंदिरे किंवा हिंदूंच्या कोणत्याही गोष्टींविषयी आर्कियॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ही पुरातत्व अवशेषांचे संरक्षण करणारी संस्था काहीच करत नाही. ताजमहालला जागतिक दर्जाचे पुरातत्व संरक्षण मिळते. याउलट मी तुम्हाला ओडिशातील कोणार्क येथील सूर्यमंदिराचे उदाहरण देतो. तुम्ही जे सूर्यमंदिर पहाता, ते केवळ ३५ टक्केच आहे. त्याचा ६५ टक्के भाग कोसळला आहे. प्रत्येक वर्षी कोणार्कच्या सूर्यमंदिरात पाणी भरते. आर्कियॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे कार्यालय त्या ठिकाणी आहे. कोट्यवधी रुपये त्यांना संमत होतात; पण मंदिराची अशी स्थिती आहे.

कोणार्क येथील सूर्यमंदिर
कोणार्क येथील सूर्यमंदिर

२. सूर्यमंदिरातील नवग्रहाचा दगड
पहाण्यासाठी भक्तांना शुल्क आकारणारे शासन !

त्या ठिकाणी नवग्रहाचा एक २९ टन वजनाचा मोठा दगड आहे. इंग्रजांनी तो नेण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी वर्ष १८९० मध्ये त्यांनी रेल्वेमार्गही बनवला होता; परंतु ते दगड नेऊ शकले नाहीत. आज कोणार्क सूर्यमंदिराच्या बाहेर बसस्थानकाप्रमाणे जागा तयार करून तेथे तो दगड ठेवला आहे. सर्व हिंदूंना त्या ठिकाणी ३० रुपये प्रवेशशुल्क भरून त्याचे दर्शन घ्यावे लागते. हा एक प्रकारचा कर आहे. ही गोष्ट चुकीची वाटल्याने आम्ही चार वर्षांपूर्वी त्या ठिकाणी आंदोलन चालू केले होते. हे आमचे मंदिर आहे. विदेशी लोकांकडून दोन रुपये घ्या किंवा शंभर रुपये घ्या; मात्र हिंदूंना त्या ठिकाणी विनामूल्य प्रवेश मिळाला पाहिजे, अशी आमची मागणी होती; परंतु सरकारने ही गोष्ट मान्य केली नाही. प्रशासनाने सांगितले की, हे शक्य नाही. भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील या कोणार्क सूर्यमंदिराला भेट देण्यासाठी आल्या होत्या. त्या वेळी आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी भेट घेण्याची मागणी केली, अन्यथा त्यांचा मार्ग अडवण्याची चेतावणी दिली. श्रीमती प्रतिभा पाटील यांनी याविषयी काहीतरी करू, असे आश्‍वासन दिले; परंतु काही झाले नाही. त्यानंतर हमीद अन्सारी उपराष्ट्रपती झाले. त्यांच्याकडे मी वैयक्तिकरित्या जाऊन हिंदूंना आठवड्यातून एक दिवस तरी मंदिरात विनामूल्य प्रवेश देण्याची विनंती केली. ताजमहाल बघण्यासाठीसुद्धा शुक्रवारी मुसलमानांव्यतिरिक्त इतरांना प्रवेशपत्र घ्यावे लागते, असे सांगितले; परंतु त्यांनीही नकार दर्शवला. कोणार्क खूप मोठे शहर नसून समुद्रकिनारी वसलेले ५००-७०० परिवारांचे एक छोटेसे गाव आहे. कोणार्क गावाच्या उत्पत्तीपासून हे सर्व परिवार या ठिकाणीच रहात आहेत. ते गरीब आहेत. गावातून ३०-४० लोक येतात किंवा एखाद्या परिवारातील २० लोक दर्शनासाठी येतात, त्यांच्यासाठी हे प्रवेशशुल्क अधिक होते. कितीतरी लोक त्यांच्या मुलांना मंदिराच्या बाहेर बसवून दर्शन घेतात आणि प्रदक्षिणा घालतात, हे आम्ही बघितले आहे.

३. पुरी येथील जगन्नाथ मंदिर कोसळण्याच्या
स्थितीत येईपर्यंत त्याचे संरक्षण न करणारे शासन !

काही दिवसांपूर्वी पुरी येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराचे काही दगड पडत होते. लहान नाही, तर २, ३, ७ टन वजनाचे दगड खाली पडतात. त्या वेळी खूप गोंधळ होतो. तात्पुरता बाहेरून आधार दिला जातो; पण कायमची उपाययोजना केली जात नाही. या विषयातले तज्ञ सांगतात की, अशाने पूर्ण मंदिरच पडणार. अलीकडेच एका तज्ञ व्यक्तीने त्यांचे कोणीच ऐकत नाही म्हणून मंदिर समितीवरील पदाचे त्यागपत्र दिले. त्यांनी त्यागपत्र दिल्यावर खूप खळबळ माजली आणि ही गोष्ट पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत गेली. त्यांनी ५ – १० कोटी रुपये साहाय्य दिले आणि महेश शर्मा नावाच्या व्यक्तीची मंत्री म्हणून नेमणूक केली. आता काहीतरी काम चालू झाले आहे. जगन्नाथ मंदिरात हिंदूंव्यतिरिक्त इतरांना प्रवेश नाही, तरीही मंदिर सुरक्षित रहावे, यासाठी एखाद्या विदेशी तज्ञाची नियुक्ती करण्यासाठीही आम्ही तडजोड केली आहे.

४. कोलकाताहून जगन्नाथ मंदिराकडे जाणार्‍या प्राचीन
जगन्नाथ मार्गावरील ऐतिहासिक अवशेषांकडे शासनाचे दुर्लक्ष !

जगन्नाथ मंदिर प्राचीन काळातील आहे. संपूर्ण भारतातून लोक त्या ठिकाणी येतात. कोलकाताहून जगन्नाथपुरीला येणार्‍या एका रस्त्याचे नाव जगन्नाथ सडक असे आहे. नानक, कबीर, चैतन्य महाप्रभू यांसारखे महान संत या रस्त्यावरून चालत गेले होते. तोच रस्ता मुघल, अफगाण आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्या लोकांनी वापरला. त्यानंतर ब्रिटिशांनी ओडिशा स्वत:च्या कह्यात घेतले.

मी इतिहासाचा विद्यार्थी आहे. या रस्त्यावरून जे लोक जातात, ते त्या मार्गाला आजही डोके टेकवून नमस्कार करतात. याचे कुतुहल वाटून मी त्यावर संशोधन करण्याचा प्रयत्न केला; परंतु मला काही कळले नाही. ५१२ किलोमीटर अंतराचा हा मार्ग कोलकातापासून चालू होतो. कितीतरी वेळेला मी या मार्गावरून गेलो आहे; परंतु मला काहीच कळू शकले नाही. १८९८ पर्यंत हा मार्ग वापरात होता, त्यानंतर रेल्वेलाईन घातली गेली. त्यामुळे १४ – १५ दिवसांचा प्रवास ३० घंट्यांचा झाला. चार वर्षांपूर्वी बैलगाडी करून, जगन्नाथ यात्रेच्या वेळी घेतात तसा धर्मध्वज, छत्री वगैरे साहित्य घेऊन आम्ही २५ जण भूगोलाच्या विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन विचारत विचारत जगन्नाथपुरीला गेलो होतो. १५ दिवसांत आम्ही पूर्ण रस्त्याचा नकाशा बनवला. १५० वर्षानंतरसुद्धा आम्ही २०० ऐतिहासिक गोष्टींचा शोध लावला, त्याचे मोजमाप करून त्याचा नकाशा बनवला. त्या ५१२ कि.मी. मार्गावर काही धर्मशाळा, मंदिरे, विहिरी, तलाव, घाट, नदी ओलांडण्यासाठी लहान लहान पूल होते. काहींचे आम्ही चित्रीकरण केले. या मार्गाचा खूप मोठा इतिहास आहे. आसपासच्या गावातील लोकांना विचारले, तर प्रत्येक जागेची एक कहाणी असल्याचे लक्षात येते. गावातील ८० – ९० वर्षे वयाच्या जवळजवळ १०० लोकांची मुलाखत घेतली आणि त्याचे चित्रीकरणही केले. हा सर्व अहवाल बनवून आम्ही ओडिशा सरकारकडे दिला. आम्ही त्यांना सांगितले की, ज्या मार्गाला तुम्ही राष्ट्रीय महामार्ग असे नाव दिले आहे, ते पालटून त्याला जगन्नाथ मार्ग असे नाव द्या. त्या वेळच्या साम्यवादी सरकारने हे म्हणणे मान्य केले; परंतु आपल्या शासनाने ही गोष्ट अजूनही मान्य केलेली नाही. हे एक छोटे उदाहरण आहे. अशा आणखी कितीतरी गोष्टी असतील.
– श्री. अनिल धीर, राष्ट्रीय महासचिव, भारत रक्षा मंच, ओडिशा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात