चेन्नई येथे झालेल्या हिंदु स्पिरिच्युअल सर्व्हिस फेअर (HSSF) मधील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

२.८.२०१६ ते ८.८.२०१६ या कालावधीत चेन्नई येथे हिंदु स्पिरिच्युअल सर्व्हिस फेअर (HSSF) पार पडला. यामध्ये विविध हिंदुत्ववादी आणि आध्यात्मिक संघटना यांच्या वतीने ४०० स्टॉल्स लावण्यात आले होते. गेल्या ८ वर्षांपासून या प्रदर्शनात सनातन संस्था, तर ४ वर्षांपासून हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ग्रंथ अन् उत्पादने आणि बोधप्रद फ्लेक्स यांचे प्रदर्शन लावण्यात येते.

१. सनातनचे ग्रंथ नुसते न वाचता
त्यातील ज्ञान कृतीत आणणारे जिज्ञासू !

पूर्वी ग्रंथ खरेदी केलेले जिज्ञासू प्रदर्शनस्थळाला आवर्जून भेट देतात. ग्रंथांविषयी बोलतांना ते आपुलकीने ग्रंथांची वैशिष्ट्ये सांगतात. ग्रंथातील ज्ञान सोप्या भाषेत असून आम्ही प्रतिदिन ते कृतीत आणतो, असे ते सांगतात. या प्रदर्शनाला लक्षावधी जिज्ञासू भेट देतात. संस्थेच्या वतीने लावण्यात येणार्‍या आचारधर्म या विषयावरील फ्लेक्स प्रदर्शनाचे ते वेळ काढून वाचन करतात. अनेकांनी तमिळ भाषेतील धर्मशिक्षण फलक हा ग्रंथ विकत घेतला आहे.

२. ग्रंथ खरेदी करण्यासाठी रिक्शाने एक
घंटा प्रवास करून येणार्‍या जिज्ञासू महिला !

फेब्रुवारी २०१५ मध्ये प्रदर्शनातून सॉफ्टवेअर इंजिनीअर असणार्‍या एक जिज्ञासू महिलेने काही ग्रंथ घेतले होते. त्या ग्रंथांचा अभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांनी संस्थेच्या संकेतस्थळाला संपर्क करून चेन्नईमधील स्थानिक साधकांचा संपर्क क्रमांक घेतला. केवळ २ – ३ ग्रंथ घेण्यासाठी त्या रिक्शाने एक घंटा प्रवास करून आल्या होत्या. आता त्या नियमित ग्रंथ खरेदी करतात. त्या म्हणाल्या, हे ग्रंथ मी नुसते वाचत नाही, तर मी त्यांचा अभ्यास करते. ग्रंथ खरेदी केल्यानंतर दोन मासांनी (महिन्यांनी) कोणते ग्रंथ हवे आहेत ?, याची सूची त्या एक मास (महिना) आधीच कळवतात.

३. ग्रंथ विक्रीला मिळालेल्या प्रतिसादामुळे
सनातनचे ग्रंथच पुढे ज्ञानाचा प्रसार करतील,
या प.पू. गुरुदेवांच्या वाक्याची अनुभूती येणे

संस्थेच्या ग्रंथांना मिळालेला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिल्यावर प.पू. गुरुदेवांनी पूर्वीच सांगितलेले ग्रंथांचे महत्त्व आणि ग्रंथच पुढे ज्ञानाचा प्रसार करतील, याची अनुभूती आली. प.पू. गुरुदेव ग्रंथांना एवढे महत्त्व का देतात ?, याची जाणीव झाली. यावर्षी साधकसंख्या अल्प असूनही ग्रंथविक्रीवर त्याचा परिणाम झाला नाही. यावरून ईश्‍वराच्या, म्हणजेच आमच्या गुरुमाऊलीच्या मनात आलेला विचार हा संकल्पच असतो आणि तो कसा कार्य करतो, हे अनुभवण्याची संधी आम्हाला दिली; म्हणून कोटी कोटी कृतज्ञता !

४. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लावण्यात
आलेल्या प्रदर्शनाला युवा वर्गाचा चांगला प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनात लव्ह जिहाद, निधर्मी राजकारण्यांमुळे झालेली राष्ट्र अन् धर्म यांची हानी, गोरक्षण, हिंदु राष्ट्राची आवश्यकता आदी दर्शवणारे फ्लेक्स फलक लावण्यात आले होते. या वेळी लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला युवा वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळाला. बरेच हिंदुत्ववादी राजकीय नेते या कक्षाला भेट देत होते आणि समवेत आलेल्या नवीन धर्माभिमानी युवकांना हिंदु जनजागृती समितीचे वैशिष्ट्य सांगत होते.

– श्री. श्रीराम लुकतुके, चेन्नई (१७.८.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात