रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातून गो-सेवक (किंकर) यात्रेला प्रारंभ !

IMG_4249_Clr
डावीकडून सनातनचे संत पू. सीताराम देसाई, गोपूजन करतांना पू. (सौ.) मालिनी देसाई, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि अन्य
IMG_4314_Clr
गोसंवर्धनासाठीची प्रतिज्ञा घेतांना मान्यवर

रामनाथी, १६ सप्टेंबर (वार्ता.) – जगद्गुरु शंकराचार्य महासंस्थानम् श्रीसंस्थान गोकर्ण, श्रीरामचंद्रापूर मठाच्या वतीने गोव्यात १६ सप्टेंबर या दिवशी रामनाथी ते लोलये अशी गो-सेवक (किंकर) यात्रा काढण्यात आली. गोवंशरक्षणाविषयी जागृती करण्यासाठीच्या या यात्रेचा प्रारंभ १६ सप्टेंबर या दिवशी सकाळी रामनाथी, फोंडा, गोवा येथील सनातनच्या आश्रमात अनेक संतांच्या उपस्थितीत भावपूर्ण वातावरणात झाला.

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात संतांच्या उपस्थितीत सकाळी सवत्स धेनूचे भावपूर्ण पूजन आणि ध्वजवंदन झाले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात गोप्रेमींची उत्स्फूर्त भाषणे झाली. सनातनचे साधक दाम्पत्य श्री. घनश्याम गावडे आणि सौ. राधा गावडे यांनी गोपूजन केले. सनातनच्या साधक-पुरोहित पाठशाळेतील विद्यार्थ्यांनी पौरोहित्य केले. त्यानंतर सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस, गोवंश रक्षा अभियानचे अध्यक्ष श्री. हनुमंत परब, भारत स्वाभिमानचे गोवा प्रभारी श्री. कमलेश बांदेकर यांचे मार्गदर्शन झाले. सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर यांनी गोसंवर्धनासाठीची प्रतिज्ञा म्हटली. उपस्थित मान्यवरांचा या वेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शांभवी वझे यांनी केले. गोमातेसाठी आत्मबलीदान करणारे मंगल पांडे यांच्या प्रेरणेतून श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री राघवेश्‍वरभारती महास्वामीजी यांनी मंगल गोयात्रेचा संकल्प केला आहे. या मंगल गोयात्रेचा प्रसार करण्यासाठी ५ राज्यांतील श्रीक्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र), दोड्डबसव सन्निधी, बेंगळुरू (कर्नाटक), मंत्रालय (आंध्रप्रदेश), मधुरू (केरळ) आणि रामनाथी (गोवा) या ठिकाणांहून गो-सेवक (किंकर) यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

मान्यवरांचे विचार

श्री. चेतन राजहंस म्हणाले, गोमातेची हत्या करणार्‍यांबरोबर आपण बंधूभाव बाळगू शकत नाही. देशी गोवंश वाचवणे हे आपले कर्तव्य आहे. येणार्‍या आपत्काळात अ‍ॅलोपॅथीच्या औषधाचा तुटवडा होईल, तेव्हा पंचगव्यापासून बनवलेली औषधे आपले रक्षण करणार आहेत. सध्या गोवंशाची हत्या होत आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदूंना मानाचे स्थान असलेले हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक आहे. यासाठी हिंदूंनी प्रयत्न करायला हवा.

श्री. हनुमंत परब म्हणाले, गोमातेच्या विषयावर सर्व गोप्रेमींनी संघटितपणे कार्य करायला हवे. येणार्‍या काळात गोमातेचे रक्षण करणारे शासनच सत्तेवर असले पाहिजे.

श्री. कमलेश बांदेकर म्हणाले, सत्त्वगुण वाढवण्याच्या दृष्टीने गायीचे महत्त्व मोठे आहे. प्रत्येक हिंदूंचे गोपालनात योगदान असले पाहिजे. गोमातेला आपण हृदयात स्थान दिले पाहिजे.
उपस्थित संत आणि मान्यवर

या वेळी सनातनचे संत सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, पू. सिताराम देसाई, पू. (सौ.) मालिनी देसाई, तसेच जगद्गुरु शंकराचार्य महासंस्थानम् श्रीसंस्थान गोकर्ण, श्रीरामचंद्रापूर मठाचे उपाध्यक्ष श्री. सुब्राय भट, वाळपई येथील अखिल विश्‍व जय श्रीराम गोशाळेचे श्री. लक्ष्मण जोशी, गोप्रेमी श्री. रोहित लोधिया, तसेच गोप्रेमी आणि श्रीरामचंद्रापूर मठाशी संबंधित साधक उपस्थित होते.

क्षणचित्र : सनातन संस्था, सनातन आश्रम आणि सनातनचे साधक अशा तिघांचे आभार मानतो, असे जगद्गुरु शंकराचार्य महासंस्थानम् श्रीसंस्थान गोकर्ण, श्रीरामचंद्रापूर मठाचे गोवा समन्वयक श्री. कुमारजी आभारप्रदर्शनाच्या वेळी म्हणाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात