चिंचवड (पुणे) येथे ७ व्या दिवशीही श्री गणेशमूर्तींचे विसर्जन नदीच्या वहात्या पाण्यात करण्याकडे भाविकांचा कल

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनेही
विसर्जनासाठी नदीमध्ये पाणी सोडलेच नाही !

चिंचवड, १२ सप्टेंबर (वार्ता.) – चिंचवड परिसरातील मोरया गोसावी घाट, थेरगाव घाट, रावेत घाट येथे हिंदु जनजागृती समिती आणि लष्कर-ए-हिंद या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भाविकांचे प्रबोधन केल्यावर अनेक भाविकांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन नदीच्या वहात्या पाण्यात केले. या वेळी हिंदुत्ववाद्यांनी हातात प्रबोधनात्मक फलक, प्रबोधनात्मक हस्तपत्रके, उद्घोषणा या माध्यमातून भाविकांना गणेशमूर्ती विसर्जनाचे शास्त्र सांगून धर्मशास्त्रानुसार नदीच्या वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन केले. थेरगाव घाटावर प्रशासनाने नदीमध्ये पाणी न सोडल्यामुळे श्री गणेशमूर्ती या पाण्यावर तरंगत होत्या. पाणी मुबलक प्रमाणात असूनही काही भाविक श्री गणेशमूर्तीदान करत होते.

क्षणचित्रे

१. थेरगाव घाटावर संस्कार प्रतिष्ठानचा एक कार्यकर्ता हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांचे प्रबोधन करत असतांनाचे चित्रीकरण करत होता.

२. संस्कार प्रतिष्ठानचे मोहन गायकवाड यांनी ‘श्रीगणेश मूर्ती नदीच्या वहात्या पाण्यात विसर्जन करण्याच्या’ सूत्रावरून ‘लष्कर-ए-हिंद’चे प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता देवदास शिंदे यांच्यासमवेत वाद घातला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात