पंचगंगा घाटावर प्रबोधनानंतर असंख्य भाविकांकडून विसर्जन कुंडाऐवजी वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

    कोल्हापूर येथे आदर्श गणेशोत्सव विसर्जन मोहीम !

    मूर्तीदान मोहिमेचा फज्जा !

Aamdhar-Rajesh-Shirsagar--2
मूर्तीविसर्जन मोहिमेत सहभागी सनातनचे साधक, समितीचे कार्यकर्ते आणि सोबत हिंदुत्वनिष्ठ, वर्तुळात आमदार श्री. राजेश क्षीरसागर
Gatavar-Gardhi-Murti-Visrajan
वहात्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी घाटावर बहुसंख्येने जमलेले भाविक !
Kolhapur_Visarjan_Mohim-(2)
फलक आणि उद्घोषणा यांद्वारे मूर्तीविसर्जनाचे धर्मशास्त्र सांगून प्रसार ! संकलक श्री. सचिन कौलकर आणि छायाचित्रकार : श्री. गजानन नागपुरे, कोल्हापूर.

        कोल्हापूर, ११ सप्टेंबर (वार्ता.) – हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १० सप्टेंबर या दिवशी येथील पंचगंगा घाटावर आदर्श गणेशोत्सव मोहीम राबवण्यात आली. या ठिकाणी कोल्हापूर महापालिका आणि पंचगंगा घाट संवर्धन समितीच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव २०१६ अशी मूर्तीदान मोहीम राबवण्यात येत होती; मात्र समिती आणि सनातन संस्था यांनी केलेल्या शास्त्रानुसार मूर्ती विसर्जनाच्या आवाहनामुळे असंख्य भाविकांनी पंचगंगा नदीच्या वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन केले. त्यामुळे कोल्हापूर महापालिका आणि संवर्धन समितीच्या मूर्तीदान मोहिमेचा फज्जा उडाला.

१. पंचगंगा घाटावर दुपारी २ वाजल्यापासून मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. या वेळी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्थेच्या वतीने अशास्त्रीय मूर्तीदान करू नका, मूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते, हा अपप्रचार थांबवा अशा प्रकारचे प्रबोधन फलक आणि भाविकांना शास्त्रानुसार वहात्या पाण्यात मूर्ती विसर्जन करण्याचे ध्वनीक्षेपकावरून आवाहन करण्यात येत होते.

मोहिमेतील सहभागी हिंदुत्वनिष्ठ

या मोहिमेत शिवसेनेचे आमदार सर्वश्री राजेश क्षीरसागर, शिवसेना महिला आघाडी प्रमुख सौ. वैशाली क्षीरसागर, युवा नेतृत्व ऋतुराज क्षीरसागर, कुंभार समाजाचे बाळासाहेब निगवेकर, हिंदु महासभेचे संजय कुलकर्णी, ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय सचिव शामराव जोशी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, इस्कॉनचे सुरेंद्र पुरेकर, पुरोहित संघटनेचे सुहास जोशी, राजाराम तरुण मंडळाचे उपाध्यक्ष सतीश अतिग्रे, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक रणजीत आयरेकर, बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख संभाजी साळुंखे, दैवज्ञ समाजाचे गजानन भुर्के, पंतजली योग समितीचे घनशाम पटेल, गोरखनाथ संप्रदायाचे दीपक कोरडे, धर्माभिमानी निखिल कांबळे, अनिल कोळी, नितीश कुलकर्णी, ज्ञानेश्‍वर अस्वले, रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे मधुकर नाझरे, शिवानंद स्वामी, किरण दुसे, बाबासाहेब भोपळे, अमोल कुलकर्णी, सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या सौ. शिल्पा कोठावळे, आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे, रणरागिणीच्या सौ. अंजली कोटगी आदी सहभागी झाले होते.

कोल्हापूर महापालिका आणि
पंचगंगा घाट संवर्धन समिती यांचा
भाविकांना धर्मद्रोह करायला लावण्यासाठी ७ लक्ष रुपये खर्च !

दान केलेल्या मूर्तींचे इराणी खाणीत विसर्जन !

कोल्हापूर महापालिका आणि पंचगंगा घाट संवर्धन समितीच्या वतीने घाटावर भव्य मंडप उभा करून भाविकांना ध्वनीक्षेपकावरून मूर्तीदान करण्याचे आवाहन करण्यात येत होते. भाविकांनी मूर्तीदान केल्यानंतर संवर्धन समितीकडून मंडळांना विसर्जन कुंडामध्ये मूर्तीविसर्जन करून पुढील पिढीसमोर चांगला आदर्श निर्माण केला आहे, असे प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात येत होते. (अशी धर्मद्रोही कृती करून संवर्धन समिती आणि महापालिका यातून काय साध्य करत आहे ? धर्माचरण कसे करावे आणि धर्मशास्त्राची माहिती नसल्याने संवर्धन समितीकडून अशी चुकीची कृती होत आहे. – संपादक) तसेच भाविकांनी मूर्तीदान केल्यानंतर त्या मूर्ती ट्रॅक्टर ट्रॉलीत घालून इराणी खणीत विसर्जित करण्यात येत होत्या. संवर्धन समितीचे कार्यकर्ते ट्रॉलीत मूर्ती अयोग्य पद्धतीने ठेवत असल्याने अनेक मूर्ती भग्न पावल्या. दान केलेल्या मूर्ती खणीवर घेऊन जाण्यासाठी महापालिकेने ५ ट्रॅक्टर ट्रॉली ठेवल्या होत्या. पंचगंगा संवर्धन समितीने अंदाजे ७ लक्ष रुपये खर्च करून पंचगंगा घाटावर भव्य मंडप उभा केला होता. (हा पैसा वहात्या पाण्यात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याच्या कामासाठी वापरला असता, तर संवर्धन समितीवर श्री गणेशाची कृपा झाली असती. – संपादक) तेथे ६ विसर्जन कुंड सिद्ध करण्यात आले होते. या समितीचे २० कार्यकर्ते भाविकांकडून मूर्तीदान करवून घेण्यासाठी ठेवले होते. महापालिकेचे कामगार भाविकांकडून आलेले निर्माल्य एका कुंडात जमा करत होते. विशेष म्हणजे महापालिकेने निर्माल्य ट्रकमध्ये टाकण्यासाठी जेसीबीची व्यवस्था घाटावर केली होती.

मूर्तीदान होत नसल्याने पंचगंगा
संवर्धन समितीच्या कार्यकर्त्यांनी केली वादावादी !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्थेच्या वतीने पंचगंगा घाटावर गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात येत होते. हिंदुत्वनिष्ठ भाविकांनी उदंड प्रतिसाद दिला. या संस्थांच्या आवाहनामुळे मूर्तीदान होत नसल्याचे पाहून पंचगंगा घाट संवर्धन समितीच्या कार्यकर्त्यांनी रात्री ८ वाजता सनातनचे साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्याशी वादावादी करणे चालू केले. त्या वेळी साधक आणि हिंदुत्वनिष्ठ त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतांना संवर्धन समितीचे कार्यकर्ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. या वेळी संवर्धन समितीचे कार्यकर्ते म्हणत होते, तुम्ही मूर्ती विसर्जनाचे आवाहन न करता मधला मार्ग काढा. मूर्तीदान होऊ द्या. त्यावर साधक म्हणाले, तुम्हाला खरेच पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करायची असेल, तर तुम्ही शाडूच्या मातीची मूर्ती आणि नैसर्गिक रंग याविषयी का आग्रही रहात नाही ? बकरी ईददिवशी सहस्रों बकर्‍यांची कत्तल करून ती घाण नदीत टाकली जाते. त्याविषयी तुम्ही काय करणार आहात ?, असा प्रश्‍न विचारल्यानंतर ते कार्यकर्ते निरुत्तर राहिले. हे सूत्र संवर्धन त्यांना मान्य न झाल्याने त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

क्षणचित्रे

१. वहात्या पाण्यात मूर्तींचे विसर्जन करा, असे केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन असंख्य भाविक मूर्ती वहात्या पाण्यात विसर्जन करून घरी जात असतांना मोहिमेतील साधकांना आम्ही वहात्या पाण्यात मूर्ती विसर्जन केले आहे, असे आर्वजून सांगत होते !

२. अनेक भाविक मोहिमेतील प्रबोधन फलकांची छायाचित्र काढून ते व्हॉट्सअ‍ॅपवर या सामाजिक संकेतस्थळाद्वारे इतरांना पाठवून देत होते.

३. गणेशोत्सवाच्या संदर्भातील हस्तपत्रक आणि दैनिक सनातन प्रभातच्या अंकाचे वितरण करण्यात आले. या वेळी एक धर्माभिमानी श्री. कोतमिरे हे स्वतःहून दैनिकाचे वर्गणीदार झाले.

४. एका अपंग व्यक्तीचे प्रबोधन केल्यानंतर ती व्यक्ती गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी घेऊन गेली.

५. असंख्य भाविक आणि मंडळांचे कार्यकर्ते तुम्ही योग्य मोहीम राबवत आहात. तुमचे सांगणे योग्य आहे. तुम्ही आणखी जोरदार प्रचार करा, असे साधकांना सांगून जात होते.

६. पंचगंगा घाटावर हिंदु जनजागृती समितीचा फलक वाचून अनेक भाविक सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी पंचगंगा घाटावर मूर्तीविसर्जन करण्याची सोय केली आहे, असे एकमेकांना सांगत होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात