ईश्‍वराचे भक्त होण्यासाठी स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन प्रक्रिया करणे आवश्यक ! – पू. नंदकुमार जाधव

श्रावण मासानिमित्त परभणी येथे ज्ञानेश्‍वरीवर प्रवचन

Nanded
भाविकांना मार्गदर्शन करतांना पू. नंदकुमार जाधव

सेलू (जिल्हा परभणी) : जीवनातील अनेक समस्यांचे कारण आपल्या अंतर्मनावर असलेले वाईट संस्कार म्हणजेच स्वभावदोष आणि अहं हेच आहे. दोष आणि अहं यांमुळे आपण स्वत:ला ईश्‍वरापासून वेगळे समजतो. त्यामुळे ईश्‍वराचे भक्त होण्यासाठी स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन प्रक्रिया करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातनचे संत पू. नंदकुमार जाधव यांनी केले. येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरातील सभागृहात सध्या श्रावण मासानिमित्त ज्ञानेश्‍वरीवर १ मास प्रवचन चालू आहे. त्या वेळी ज्ञानेश्‍वरीतील ९० व्या ओवीविषयी त्यांनी हे मार्गदर्शन केले. तसेच दोष आणि अहं यांमुळे घडणार्‍या प्रसंगांवर मात कशी करायची, हे त्यांनी उदाहरणासहित सांगितले. या वेळी मंदिराच्या वतीने पू. नंदकुमार जाधव यांचा पुष्पहार, शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

अनुमाने ४०० भाविकांनी या प्रवचनाचा लाभ घेतला. येथे सनातननिर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शनही लावले होते. याचाही भाविकांनी लाभ घेतला. मंदिराकडून गेल्या १२ वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून या कार्यक्रमाला नियमितपणे सनातन संस्थेच्या वक्त्यांना बोलवले जाते.

क्षणचित्र

१. घंटा होऊनही भाविक उठून न जाता एकाग्रतेने मार्गदर्शन ऐकत होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात