कन्यागत महापर्वाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या भव्य ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन

9

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी : ‘तुम्ही या जागेचे स्वरूपच पालटून टाकले. येथील वातावरणात चैतन्य जाणवते. हे कार्य समाजासाठी आवश्यक आहे. सनातन संस्थेचे कार्य इतके चांगले आहे, हे अजून अनेकांना ठाऊकही नाही. सनातन संस्था धर्मप्रसार यांसमवेत राष्ट्र-धर्म यांसाठी करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे’, असे गौरवोद्गार श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अरुंधती जगदाळे यांनी काढले. येथील कमानीशेजारी असलेल्या श्री दत्तविद्यामंदिरात लावण्यात आलेले सनातन संस्थेचे ग्रंथ, सात्त्विक उत्पादने आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

या वेळी सामाजिक कार्यकर्ते श्री. अभिजित जगदाळे (सरपंच सौ. जगदाळे यांचे पती), श्री दत्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. मुकुंद पुजारी (सावकार), तसेच सांगली येथील हिंदु धर्माभिमानी अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन या वेळी उपस्थित होते. या प्रसंगी सनातनच्या संत सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांची वंदनीय उपस्थिती होती.

11
पालखी मिरवणुकीचे स्वागत करतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

प्रारंभी श्री. अभिजित जगदाळे यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. नंतर सर्वांनी प्रदर्शन पाहिले. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते श्रीफळ, पुष्पगुच्छ, दैनिक सनातन प्रभात आणि ग्रंथ देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला.

सरपंच सौ. जगदाळे यांनी प्रदर्शन पाहून व्यक्त केलेले मनोगत

१. आमच्या सर्व नातेवाइकांना घेऊन प्रदर्शन पहाण्यास येऊ.

२. आम्ही गोव्यात जाणार आहोत. तेथील समुद्रकिनारा आणि पर्यटन पहाण्यापेक्षा आम्ही सनातन संस्थेच्या आश्रमात जाऊ, जेणेकरून मुलांवर चांगले संस्कार होतील.

३. हे कार्य करण्याची तुम्हा सर्वांची प्रचंड तळमळ आहे, ती कौतुकास्पद आहे.

विशेष

श्री. अभिजित जगदाळे यांनी संपूर्ण प्रदर्शन पाहिले, तसेच प्रदर्शन पाहून जगदाळे पती-पत्नी उभयतांनी आनंद व्यक्त केला. मी इथे आले, हे सर्व देवाचेच नियोजन आहे. आयुष्यात साधना करणे आवश्यक आहे. कोणतेही कार्य करतांना आध्यात्मिक पाठिंबा अत्यावश्यक आहे. आपल्याला साधनेचा साठा करून ठेवायला हवा; कारण त्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होऊ शकत नाही, असे सौ. जगदाळे म्हणाल्या.

क्षणचित्रे

2

१.प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन ११ ऑगस्टला झाले; मात्र प्रदर्शन लावत असतांनाच आदल्या दिवशीपासून बंदोबस्तासाठी असलेले पोलीस प्रदर्शन पाहून जात होते.

२. प्रदर्शन पहाण्यासाठी पादत्राणे घालण्याची अनुमती असूनही दोन महिला पोलीस बूट बाहेर काढून प्रदर्शनस्थळी गेल्या.

३. प्रदर्शनासाठी सकाळपासून भाविक, विद्यार्थी, तसेच पुजारीही प्रदर्शन पहाण्यासाठी येत होते. प्रदर्शन पाहून प्रत्येकाच्याच तोंडवळ्यावर इथे येऊन काहीतरी मिळाले, असे समाधान दिसत होते.

श्री विठ्ठल मंदिराशेजारी असलेल्या आणि श्री हनुमान मंदिराशेजारी, शिरोळ-वाडी रोड येथील ग्रंथप्रदर्शनांचेही ११ ऑगस्टला उद्घाटन करण्यात आले. श्री दत्तविद्यामंदिरात लावण्यात आलेल्या प्रदर्शनासह ही दोन्ही प्रदर्शने सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत भाविकांना पहाण्यासाठी उघडी असणार आहेत.

महापर्वाच्या निमित्ताने प.पू. अनिरुद्धबापू, स्वामी विवेकानंद यांसह अन्य आध्यात्मिक संस्था यांच्या वतीनेही प्रदर्शन कक्ष लावण्यात आले आहेत.

नृसिंहवाडी येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक भाविकांना श्री दत्तगुरूंच्या दर्शनापासून वंचित रहावे लागले. दर्शन घेण्यासाठी पुष्कळ लांब पादत्राणे काढण्याची व्यवस्था करण्यात आली होती, तसेच भाविकांना दर्शनासाठी पोलीस वेळही देत नव्हते. विशेषत: वृद्ध, महिला आणि लहान मुले यांना यामुळे त्रास सहन करावा लागला. काही भाविक महिला दूरभाषवरून त्यांच्या नातेवाइकांना भाविकांपेक्षा पोलीसच अधिक आहेत, असे सांगत होत्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात