लोकमान्य टिळकांनी प्रेरणा दिलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास आणि त्याद्वारे स्वातंत्र्य चळवळीला मिळालेली नवी दिशा !

tilak_banner

 

१. देशभरात अनेक राज्यांत सार्वजनिक
गणेशोत्सव चालू होण्यास लोकमान्यांची प्रेरणा
आणि ग्वाल्हेरचा गणपति अधिक कारणीभूत असणे

देशाच्या बहुतांश भागांत गणेशोत्सव हा जवळजवळ राष्ट्रीय महोत्सव म्हणूनच साजरा केला जातो. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. हा गणेशोत्सव चालू होण्यास लोकमान्यांची प्र्र्रेरणा कारणीभूत आहे, हे स्पष्ट आहे. तसेच गणपतीला सार्वजनिक गणेशाचे जे रूप मिळाले, त्याला ग्वाल्हेरचा गणपतिही कारणीभूत आहे.

 

२. पुण्याचे वैद्य खाजगीवाले ग्वाल्हेरच्या
सार्वजनिक गणेशपूजेमुळे प्रभावित होणे आणि
त्यांनी समवयस्क मित्रांना पुण्यात सार्वजनिक
गणेशोत्सव चालू करण्याविषयी मनातील विचार सांगणे
अन् सर्वानुमते पुण्यात प्रथम सार्वजनिक गणपती बसवणे

१८९१ च्या सुमारास पुण्याचे वैद्य खाजगीवाले ग्वाल्हेर येथे गेले होते. तेव्हा तेथे सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या गणेशपूजेमुळे ते प्रभावित झाले. त्यांना वाटले, हा उपक्रम पुण्यात चालू करावा आणि त्यासाठी लोकमान्यांची मान्यता मिळवावी. एकोणिसाव्या शतकातील शेवटची १५ – २० वर्षे पुण्यात टिळक वर्षेच मानली गेली होती. प्रत्येक गोष्टीवर लोकमान्य कसा विचार करतील, असा विचार करण्याची तरुणांच्यात एक प्रवृत्तीच निर्माण झाली होती. वैद्य खासगीवाले यांनी गणेशोत्सवाची ही कल्पना त्यांचे समवयस्क मित्र दगडू हलवाई, भाऊ रंगारी आदींना सांगितली. हा विषय आपण टिळकांना सांगू, अशी कल्पना पुढे आली; पण आधी केले मग सांगितले या विषयावर लोकमान्यांचे नुकतेच भाषण झाले होते. त्यामुळे या मंडळींनी प्रथम सार्वजनिक गणपति बसवला, काही कार्यक्रम ठरवले आणि नंतर ते लोकमान्यांना भेटायला गेले.

 

३. सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना
लोकमान्य टिळकांना आवडणे आणि ते विसर्जन
मिरवणुकीला उपस्थित राहिल्यावर ते वृत्त वार्‍यासरशी
दूरवर पसरणे अन् पुढे मिरवणुकीला प्रचंड गर्दी होणे

लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना अतिशय आवडली. त्या वेळी त्यांनी सांगितले, विसर्जनाच्या मिरवणुकीला आपण स्वतः येऊ. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत लोकमान्य आल्याची बातमी आजूबाजूला वार्‍यासरशी पसरली आणि पुढे प्रचंड गर्दीही झाली.

 

४. मिरवणुकीतून परतल्यावर टिळकांनी लिहिलेल्या
संपादकीय लेखाने स्वातंत्र्य चळवळीत एक अध्याय चालू
होणे आणि त्यातून स्वातंत्र्य चळवळीचे अनेक उपक्रम उभे रहाणे

मिरवणुकीतून परत आल्यावर त्यांनी आठवड्याचे संपादकीय लिहिले आपले राष्ट्रीय उत्सव ! त्यांच्या त्या संपादकीय लेखाने स्वातंत्र्य चळवळीत एक अध्यायच चालू झाला. गणेश मंडळाच्या निमित्ताने लोक एकत्र येऊ लागले आणि त्यातून स्वातंत्र्य चळवळीचे अनेक उपक्रम उभे राहिले.

 

५. लोकमान्य टिळक यांचा द्रष्टेपणा !

लोकमान्य एक शब्द बोलले आणि त्यातून एक चळवळ उभी राहिली, असे होऊ शकते का, याचे अनुमान आज काढता येणार नाही; पण लोकमान्यांनी एखादा शब्द बोलावा आणि त्याचा इतिहास व्हावा, असे त्या काळी अनेक घटनांसंबंधी झाले.

लोकमान्य टिळकांनी १९०० ते १९१५ या काळात असे लिहून ठेवले आहे की, अजून स्वातंत्र मिळायला किती वेळ लागेल, हे सांगता येत नाही; पण जेव्हा स्वातंत्र मिळेल, तेव्हाच्या तरुण पिढीने बृहद् भारताच्या सीमा निश्‍चित कराव्यात. त्या सीमा निश्‍चित करण्याचे सूत्र असे की, जेथे म्हणून गणपति हे दैवत पोचले आहे, तिथे बृहद् भारताच्या चतुःसीमांच्या खुंट्या ठोकाव्यात. विदेशातही जेथे आज गणपति आहे, त्या ठिकाणापर्यंत एकेकाळी बृहद् भारत विस्तारला होता, हे लक्षात घ्यावे. सध्याच्या पारतंत्र्याच्या काळात हे खरे वाटणार नाही आणि स्वातंत्र्य मिळाल्यावरही लगेच याची प्रचीती येणार नाही; पण त्या पुढील १०० वर्षांत हे स्पष्ट होणार आहे !

– श्री. मोरेश्‍वर जोशी (संदर्भ : आध्यात्मिक ॐ चैतन्य, गुरुपौर्णिमा विशेेषांक २०१५)

(अनेक संत-महंतांनी सांगितल्यानुसार वर्ष २०२५ पासून भारतात आणि पुढे जगभर हिंदु राष्ट्र (रामराज्य) स्थापन होणार आहे. त्या वेळी अन्य देशांतील नागरिकसुद्धा धर्माचरण (श्री गणपति आदी देवतांची उपासना) करतील. थोडक्यात सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांप्रमाणे जगभरातील नागरिक ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करतील. ही गोष्ट लोकमान्य टिळकांना साधनेद्वारे लाभलेल्या द्रष्टेपणामुळे वर्ष १९१५ पूर्वीच ठाऊक होती, असे त्यांच्या वरील वाक्यावरून स्पष्ट होते. – संकलक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात