सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनास बंदोबस्तातील पोलिसांसह २५ सहस्र भाविकांचा भरघोस प्रतिसाद !

कन्यागत महापर्वकाल

kanyagat
सनातनच्या प्रदर्शनाला मिळालेला पोलिसांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) : नृसिंहवाडी येथे ११ ऑगस्टपासून कन्यागत महापर्वकालास प्रारंभ झाला आहे. या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथील श्री दत्त विद्या मंदिर विद्यालयामध्ये ग्रंथप्रदर्शन आणि सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादने यांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनास २५ सहस्र जिज्ञासू आणि भाविक यांनी भेट देऊन प्रदर्शनाचा लाभ घेतला.

पोलिसांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

नृसिंहवाडीतील कन्यागत महापर्व सोहळ्यात धमकी देऊन घातपात होण्याचे संकेत मिळाल्याने येथे पोलिसांचा फौजफाटा नियोजनापेक्षा दुपटीने होता. त्यामुळे कन्यागत महापर्वकाल सोहळ्यास भाविकांची संख्या अल्प आणि पोलिसांची संख्या लक्षणीय होती. महापर्वकालानिमित्त २ सहस्र ३२४ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. या बंदोबस्तातील अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांनी सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाला पहिल्या दिवसापासून आवर्जून भेट देऊन प्रदर्शनाचा पूर्ण लाभ घेतला. विशेष म्हणजे या प्रदर्शनामुळे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीविषयी असलेली कडवट नकारात्मक भूमिका दूर करून पोलिसांनी सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने मोठ्या प्रमाणात खरेदी केेली, तसेच त्यांनी धर्मशिक्षण, शास्त्र आणि अध्यात्म यांची संपूर्ण माहिती जाणून घेतली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात