पनवेल येथे श्री गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा आणि सनातनच्या सात्त्विक गणेशमूर्तींचे प्रदर्शन !

श्री गणेश कला केंद्र आणि इरा फॉर वुमन यांचा उपक्रम

P_20160820_122009
ओरियन मॉलचे श्री. मंगेश परुळेकर (डावीकडे) यांना श्री गणेशमूर्ती देतांना पू. रमेश गडकरी, समवेत श्री. प्रमोद बेंद्रे

पनवेल : श्री गणेश कला केंद्र आणि इरा फॉर वुमन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ओरियन मॉलमध्ये २० आणि २१ ऑगस्ट या दिवशी श्री गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा, तसेच सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सिद्ध करण्यात आलेल्या सात्त्विक गणेशमूर्तींचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन सनातनचे संत पू. रमेश गडकरी, तसेच ओरियन मॉलचे श्री. मंगेश परुळेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यशाळेमध्ये सनातन संस्थेच्या वतीने सौ. वंदना आपटे यांनी ‘श्री गणेशचतुर्थीचे शास्त्र’ अन् ‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’ या विषयांवर मार्गदर्शन केले. मार्गदर्शनाचा लाभ ७०० जिज्ञासूंनी घेतला. या वेळी ‘गणेशोत्सव : वास्तव आणि आदर्श’ या विषयावरील ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली.

कार्यशाळेच्या समारोपाच्या दिवशी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे श्री. संजय भुस्कुटे यांनी कार्यशाळेला भेट दिली. ते म्हणाले, “हा उपक्रम स्तुत्य आहे. यातून यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि आदर्श होण्यास साहाय्य होईल.” त्यांनी श्री गणेश कला केंद्राचे श्री. प्रमोद बेंद्रे यांच्याशी संवाद साधतांना ‘या उपक्रमाविषयी आपली भेट मुख्यमंत्र्यांशी घालून देतो’, असे त्यांनी सांगितले.

क्षणचित्रे

१. कार्यशाळेत सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

२. ‘इरा फॉर वुमन’च्या सौ. रूपाली मदन यांनी रणरागिणी शाखेच्या सौ. वंदना आपटे यांचा तुळशीचे रोप देऊन सत्कार केला.

३. पूर्वा फाउंडेशनच्या गतीमंद, तसेच मतीमंद विद्यार्थ्यांचा कार्यशाळेत सहभाग होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात