देवस्थानाला अर्पण केलेला निधी धर्मकार्यासाठी उपयोगात आणला जावा ! – श्री. सतिश कोचरेकर, प्रवक्ता, सनातन संस्था

जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवर देवस्थान देईल का दान ? या विषयावर चर्चासत्र

Satish_Kocharekar_Clr
श्री. सतिश कोचरेकर

मुंबई : देवस्थानांच्या निधीतील ५० टक्के निधी रुग्णसेवेसाठी उपयोगात आणावा, हा महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांचा हेतू उदात्त असल्याने आम्हाला त्यासंदर्भात काहीच वावडे नाही; मात्र भाविक जेव्हा मंदिरात धन अर्पण करतात, तेव्हा त्यांनी धार्मिक हेतूने अर्पण केलेले असते. याचा विनियोग धर्मकार्यासाठीच व्हायला हवा. देवस्थान सामाजिक कार्यासाठी सरकारला कराच्या रूपातून पैसा देतच आहे. हा पैसादेखील सरकारला अल्प पडत असेल, तर आमदारांचे वेतन वाढवण्यापेक्षा तो पैसा रुग्णांसाठी उपयोगात आणता येऊ शकतो. वक्फ बोर्डाकडेही पुष्कळ संपत्ती आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी ४ एकर परिसरात अफझलखानाचे स्मारक उभारले जाते. चर्चलाही सातत्याने निधी मिळतो. हा निधी धर्मांतरासाठी वापरण्यात येतो. सर्वांसाठी समान न्याय आहे तर ख्रिस्ती आणि मुसलमान यांनीही त्यांचा निधी मानवतावादी कार्यासाठी द्यावा, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. सतिश कोचरेकर यांनी केले. जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवर आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या, देवस्थानांनी ५० टक्के निधी रुग्णसेवेसाठी द्यावा या सूचनेच्या पार्श्‍वभूमीवर देवस्थान देईल का दान ? या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सतिश कोचरेकर यांच्यासह श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे माजी अध्यक्ष अधिवक्ता शशिकांत पागे, सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र राणे, श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, भाजपचे प्रवक्ता माधव भंडारी, शिर्डी नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष निलेश कोते तसेच हिंदु महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रमोद जोशी हे उपस्थित होते. प्रसन्न जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

श्री. सतिश कोचरेकर यांनी मांडलेली अन्य सूत्रे…

१. हिंदूंच्या मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत !

शिर्डीमध्ये धार्मिक ग्रंथांचे प्रदर्शन असायला हवे; मात्र तेथे दारूची दुकाने उभारली जात आहेत. परमिट रूम उभारली जात आहेत. लोक तेथे सुट्टीच्या दिवशी पर्यटनासाठी जातात. हा भाग कुणाच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी सांगत नसून साईभक्तांकडूनच आम्हाला ही माहिती मिळाली आहे. हिंदूंच्या कुठल्याच मंदिरांची अशी दुरावस्था होऊ नये.

२. तीर्थक्षेत्री सुविधा पुरवण्याचे दायित्व शासनाचे !

शिर्डी येथे पायाभूत सुविधांची वानवा आहे; मात्र जेव्हा राष्ट्रपती प्रतिभा पाटील शिर्डी येथे आल्या, तेव्हा देवस्थानच्या निधीतून ९० लक्षांहून अधिक रुपये खर्च करून त्यांच्यासाठी रस्ते उभारण्यात आले होते. मंदिरांमध्ये येणार्‍या भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे सरकारवर अतिरिक्त ताण येत असल्याचे सांगितले जात आहे; मात्र भाविकांची संख्या वाढल्यास सरकारला तितक्याच प्रमाणात करही मिळत आहे. तसेच येथील स्थानिकांनाही रोजगार मिळण्यास साहाय्य होत आहे. त्यामुळे भाविकांच्या वाढत्या संख्येला नागरी असुविधांसाठी उत्तरदायी ठरवण्यात येऊ नये.

३. रुग्णसेवेसाठी निधी दिल्यास त्यात भ्रष्टाचार होणार नाही, याची शाश्‍वती कोण देणार ?

हिंदु जनजागृती समितीने पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, पंढरपूर देवस्थान समिती या सर्वांमधील भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. हिंदु विधीज्ञ परिषदेने या भ्रष्टाचाराच्या विरोधात याचिका दाखल केल्या आहेत. तसेच आतापर्यंत १ सहस्र ३०० एकर शासकीय भूमी शासनाला परत मिळवून दिली आहे. देवस्थानांकडून निधी घेतल्यास, सर्वत्र भ्रष्टाचार चालू असतांना हा निधीही रुग्णसेवेसाठीच उपयोगात आणला जाईल, याची शाश्‍वती कोण देणार ?

देवस्थानांतील निधी हा भक्तांचा पैसा !
– अधिवक्ता शशिकांत पागे, माजी अध्यक्ष, श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती

मंदिरातील पैसा हा भक्तांचा असून त्यांच्या इच्छा काय आहेत, हे जाणून त्यानुसार त्याचा विनियोग व्हावा. तसेच निधी उपयोगात आणतांना कायद्यात तशी तरतूद आहे का, हे ही पहायला हवे. प्रत्येक मंदिर समितीचे कायदे वेगवेगळे असल्याने सरसकट सर्वांना एकच धोरण लागू करता येणार नाही. त्यासाठी कायद्यातही पालट करावा लागेल.

आमदार आणि खासदार यांनी स्वत:च्या निधीतील ५० टक्के निधी रुग्णसेवेसाठी द्यावा ! – प्रमोद जोशी, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु महासभा

देवस्थानची संपत्ती ही लोकांनी दिलेल्या दानाची संपत्ती आहे. देवस्थानांतील पैसा लोककल्याणासाठी उपयोगात आणण्यात काहीच अडचण नाही; मात्र सरकारच्या माध्यमातून उपयोगात आणणे हे सरकारचे अधिग्रहण आहे. आमदार, खासदार यांनी स्वत:च्या उत्पन्नातील ५० टक्के निधी यासाठी द्यावा. साईबाबा मंदिर व्यवस्थापन समिती आणि विश्‍वस्त मंडळ यांच्यावर राजकीय पगडा असल्यामुळे तेथे अव्यवस्था पसरली आहे. वर्षानुवर्षे काँग्रेसने तेथे राज्य करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे.

देवस्थानचा निधी रुग्णसेवेसारख्या सामाजिक
कार्यासाठी वापरणे हा मानवतावाद ! – माधव भंडारी, प्रवक्ता, भाजप

गिरीश महाजन अनेक वर्षांपासून रुग्णांसाठी कार्य करत आहेत. रुग्णसेवेत येत असलेल्या अडचणींची जाण असल्यामुळे त्यांनी अशाप्रकारची सूचना केली आहे. यापूर्वीही आम्ही दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर देवस्थानांकडे गोशाळा चालवण्याचा आग्रह धरला होता. रुग्णसेवेसाठी मागितलेला पैसा हा शासनाने स्वत:कडे मागितलेला नाही. कायद्यात देवस्थानचा निधी रुग्णसेवेसारख्या सामाजिक कार्यासाठी वापरण्याची तरतूद नसेल, तर कायद्यात पालट करून तशी तरतूद करता येईल. हा विचार कोणत्याही मानवतावादी व्यक्तीला पटण्यासारखाच आहे. मंदिरात येणार्‍या भाविकांच्या दैनंदिन आरोग्याचे दायित्व देवस्थानाने घेणे आवश्यक आहे. मंदिरात येणार्‍या भाविकांमुळे शिर्डीसारख्या नगरांमध्ये काही वेळा नागरिकांच्या संख्येत १० पटींनी वाढ होते. या नागरिकांना सुविधा देण्याचे कार्य शासनाच्या निधीतून केले जाते. तेथे रस्त्यांसारख्या सार्वजनिक सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत तर आपण सर्वजण शासनाला उत्तरदायी ठरवतो. शासन एवढा खर्च करू शकत नाही. (पूर्वीचे राजे त्या काळी धार्मिक यात्रा करणार्‍या भाविकांच्या रहाण्याची तसेच त्यांना सुविधा पुरवण्याची राज्यकोषातून व्यवस्था करायचे. भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी देवस्थानांचा निधी घेण्यापेक्षा शासन सध्या लोकप्रतिनिधींना दिले जाणारे अमाप वेतन अल्प करेल का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

साईबाबा संस्थानचा अधिकाधिक खर्च हा सामाजिक कार्यासाठीच होतो !
– नीलेश कोते, उपनगराध्यक्ष, शिर्डी नगरपंचायत

प्रत्येक वेळी साईबाबांच्या संपत्तीवर डोळा ठेवला जातो, हे दुर्दैव आहे. शिर्डीमध्ये मूलभूत सुविधा अत्यंत तुटपुंज्या प्रमाणात आहेत. शासनाकडून आम्हाला साहाय्य मिळत नाही. वर्ष १९६२ पासून साईनाथ रुग्णालयात गोरगरिबांची सेवा करण्यात येत आहे. लक्षावधी रुग्णांनी त्याचा लाभ घेतला आहे. वर्ष २००६ मध्ये सुपर हॉस्पिटल स्थापन करण्यात आले. अशाप्रकारे साईबाबा संस्थानचा अधिकाधिक खर्च हा सामाजिक कार्यासाठी होतो. आम्ही वारंवार सरकारला विश्‍वस्त मंदिर समिती नेमून प्रलंबित कामांचा विकास करण्यासाठी विनंती करत आहोत. सर्वजण साईबाबा मंदिराला श्रीमंत संस्थान म्हणत आहेत; पण २ महिन्यांपूर्वी दुष्काळात येथे पिण्यासाठी पाणीदेखील उपलब्ध नव्हते. तसेच भक्तनिवासही बंद होते.

मंदिराला मिळणार्‍या उत्पन्नाचा अधिकाधिक भाग सामाजिक कार्यासाठीच खर्च होतो ! – अशोक गोडसे, श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे

श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती विश्‍वस्त मंडळाने मिळणार्‍या उत्पन्नाचा विनीयोग कसा करायचा, यासंदर्भात पूर्वीच धोरण ठरवले आहे. जेथे गणपतीचा उत्सव साजरा होतो, तिथे देवदासींची मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे. ठरवलेल्या धोरणाप्रमाणे या वस्तीतील १०० मुलांच्या संगोपनाचा खर्च या उत्पन्नातून केला जातो. विश्‍वस्त मंडळाच्या माध्यमातून पुण्यात ६ रुग्णवाहिका विनामूल्य सेवेसाठी उपलब्ध असून रुग्णालयांनाही मंडळाच्या वतीने साहाय्य करण्यात येते. पुणे शहरातील शाळांच्या माध्यमातून आम्ही एक शैक्षणिक चळवळ चालवली असून त्यात ५० सहस्र विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याची योजना आहे. ग्रामसुधार योजनेचाही यात समावेश आहे. मंदिराला येणार्‍या उत्पन्नाचा अधिकाधिक सामाजिक कार्यासाठीच केला जातो.

मंदिराला मिळणार्‍या वार्षिक निधीपैकी ३० टक्के निधी लोकोपयोगी कामांसाठी वापरला जातो ! – नरेंद्र राणे, अध्यक्ष, सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट, मुंबई

सिद्धीविनायक मंदिराला मिळणार्‍या वार्षिक निधीपैकी ३० टक्के निधी हा लोकोपयोगी कामांसाठीच उपयोगात आणण्यात येतो. शैक्षणिक तसेच वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी हा खर्च करण्यात येतो. सर्व देवस्थानांनी एकत्र येऊन अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेले रुग्णालय उभे करण्यात काही तांत्रिक अडचणी असल्याने हा प्रस्ताव पूर्ण होऊ शकत नाही.

(म्हणे) मंदिरांतील संपत्तीमुळे मंदिरांवर आक्रमणे झाली !

कार्यक्रमाच्या शेवटी सूत्रसंचालकांनी, मंदिरांच्या संपत्तीसाठी या देशात पूर्वी आक्रमणे झाली. ती संपत्ती जर लोकोपयोगी कार्यासाठी वापरली गेली असती, तर मंदिरांवर आक्रमण झाले नसते. आज स्वत:च्याच धर्मातील लोक संपत्तीसाठी मंदिरात घुसतील, अशी वेळ आणायची नसेल, तर सर्वांनी देवस्थानातील संपत्ती लोकोपयोगी कामांसाठी उपयोगात आणावी यासंदर्भात सामोपचाराने निर्णय घ्यायला हवा, असे विचार मांडले. (आजपर्यंत मंदिरांवर झालेली आक्रमणे ही धार्मिक हेतूने झाली होती. असे असतांना आक्रमणांचा मंदिरातील संपत्तीशी संबंध लावणे आणि भविष्याविषयी तर्क लावणे ही सूत्रसंचालकांची बौद्धिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात