बालाजीनगर येथील ज्ञानेश प्राथमिक शाळेत क्रांतीकारकांचे फलकप्रदर्शन !

‘सनातन संस्था चेन्नई’ न्यासाच्या वतीने…

बालाजीनगर (पुणे) क्रांतिकारकांच्या शौर्याची, त्यांनी देशासाठी केलेल्या त्यागाची माहिती आणि आपल्या जाज्वल्य इतिहासाची ओळख विद्यार्थ्यांना करून दिल्यास त्यांच्यात शौर्य, धाडसीपणा, राष्ट्रप्रेम आदी विकसित होण्यास साहाय्य होते. याचप्रमाणे बाल वयातच मुलांमधील राष्ट्रप्रेम जागृत व्हावे, क्रांतिकारकांचा आदर्श समोर ठेऊन राष्ट्र आणि समाज यांच्या उत्कर्षासाठी कृती करण्याचे बीज त्यांच्यात रोवले जावे, यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम करणे आवश्यक आहे.

यासाठीच येत्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सातारा रस्ता येथील ‘ज्ञानेश प्राथमिक स्कूल’ या शाळेत ‘सनातन संस्था चेन्नई’ न्यासाच्या वतीने ८ ऑगस्ट २०१६ या दिवशी क्रांतिकारकांचा गौरवशाली इतिहास फलकांमधून स्पष्ट करणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या मध्ये क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद, देशासाठी १९ व्या वर्षी प्राणार्पण करणारे अनंत कान्हेरे, देशाच्या अखंडतेसाठी लढणारे खुदीराम बोस, क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांसह अनेक राष्ट्रपुरुष, क्रांतिकारक यांची माहिती आणि शौर्यगाथा सांगणारे फलक लावण्यात आले होते. या वेळी अनेक विद्यार्थ्यांनी फलकांवरील माहिती उत्स्फूर्तपणे लिहून घेतली.

या प्रदर्शनाचा प्राथमिक व माध्यमिक शाळेतील ८१५ विद्यार्थ्यांनी आणि शाळेतील शिक्षकांनी लाभ घेतला. या प्रदर्शनासाठी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सविता सणस आणि प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा जाधव यांचे सहकार्य लाभले. उपक्रमाच्या आयोजनासाठी श्री. गजानन मुंज, श्री. निलेश गोऱ्हे, सौ. सुनंदा वैद्य, सौ. सुलोचना कुंभार यांनी परिश्रम घेतले आणि उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केला.

revolutionaries_3 freedom_fighters_exhibition_1 revolutionaries_2