सर्वांगीणदृष्ट्या आदर्श असलेल्या सनातनच्या आश्रमांची वैशिष्ट्ये !

pu_bindatai
सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

आज अनेक संतांचे आश्रम शिष्यवर्गाला दिशादर्शन करत असले, तरी राष्ट्र अन् धर्म यांसाठीचे कार्य करणारे आश्रम दुर्लभ आहेत. दगड-विटांची केवळ वास्तू म्हणजे आश्रम नव्हे, तर साधनेचे परिपूर्ण धडे देणारे, ईश्‍वराच्या अस्तित्वाची ठायी ठायी अनुभूती देणारे आश्रम परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घडवले. रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम म्हणजे हिंदु राष्ट्राची छोटी प्रतिकृतीच आहे. सनातनचे आश्रम सर्वदृष्ट्या आदर्श का आहेत, याचे गमक आज आपण या लेखाद्वारे जाणून घेऊया.

संकलक : सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

ashram

 

१. वास्तूरचनेचा सात्त्विकतेच्या दृष्टीने अभ्यास

आश्रमात संगणकाच्या पटलांची रचना करतांना, निवासी खोल्यांतील पलंगांची रचना ठरवतांना, भिंतींचे, कपाटांचे रंग ठरवतांना, तसेच अन्य प्रकारच्या फर्निचरचीही रचना करतांना सात्त्विकतेचा आणि रचनेमुळे निर्माण होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास केला जातो. कोणतेही कर्म करतांना डोळ्यांना चांगले दिसते का, यांसह त्याकडे पाहून मनाला काय वाटते, याचा अभ्यास करणे आता साधकांना सवयीचे झाले आहे.

 

२. झाडावरून फुले खुडण्याची आदर्श पद्धत

आश्रमातील ध्यानमंदिर आणि विविध कक्षांतील देवतांच्या प्रतिमांच्या पूजनासाठी लागवडीतून फुले आणली जातात. फुले खुडतांनाही रोपाच्या दर्शनी भागातील फुले तशीच ठेवली जातात; कारण ते त्या रोपाचे सौंदर्य असते. आतील भागातील फुले खुडली जातात. आश्रमातील देवतांच्या प्रतिमांची संख्या जितकी आहे, तेवढीच फुले आणली जातात.

 

३. काटेकोरपणे केली जाणारी मासिक स्वच्छता

आश्रमात झाडणे, पुसणे, जळमटे काढणे, पंखे आणि खिडक्यांचे गज पुसणे आदी सेवा नियमित केल्या जातात. महिन्यातून एकदा सर्व साहित्य धुतले किंवा पुसले जाते आणि सर्व साहित्याची बारकाईने स्वच्छता केली जाते. सर्वजण आपापली अंथरूणे-पांघरूणे मासातून एकदा धुतात. तीन मासांनी आश्रमातील सर्वच कक्षांतील लादी घासली जाते. कचरापेटी आणि केर भरण्याची सुपलीही प्रतिदिन धुवून स्वच्छ केली जाते. झाडूवर आलेले आवरण दूर होण्यासाठी झाडूही पंधरवड्यातून एकदा धुतला जातो. कचरापेटीच्या तळाशीही रद्दी कागद घालून नंतरच तिच्यात कचरा टाकला जातो. अडगळीचे, न लागणारे सामानही सात्त्विक पद्धतीने रचून ठेवलेले आढळते.

 

४. कचर्‍याचे व्यवस्थापन

आश्रमातील कचरा सुका कचरा आणि ओला कचरा असा विभाजित केला जातो. ओल्या कचर्‍याचे कंपोस्ट खत तयार करण्यात येते, तर सुका कचरा जळाऊ म्हणून वापरला जातो. आश्रमात निर्माण होणार्‍या जळाऊ कचर्‍याचा पाणी तापवण्यासाठी उपयोग केला जातो.

 

५. काटकसर

सनातनचे आश्रम साधक आणि हितचिंतक यांनी दिलेल्या अर्पणावर चालवले जातात. अर्पणदात्यच्या अर्पणाचा एक पैसाही अनावश्यक व्यय होऊ नये, यासाठी काळजी घेतली जाते. काटकसर या ईश्‍वरी गुणाचे प्रतिबिंबही आश्रमात ठिकठिकाणी दिसून येते.

५ अ. लिखाण, तसेच संगणकीय प्रतींसाठी पाठकोर्‍या कागदांचा वापर

आश्रमातील व्यवस्थापकीय सेवांसाठी, तसेच सनातन प्रभात नियतकालिकांच्या निर्मितीसाठी धारिकांच्या संगणकीय प्रती काढाव्या लागतात. या संगणकीय प्रती एका बाजूने वापरलेल्या; म्हणजेच पाठकोर्‍या कागदांवर काढल्या जातात. साधकांच्या नियमित सूत्रे लिहिण्याच्या वह्याही बहुदा अशाच कागदांपासून; मात्र अत्यंत सुबक आणि रेखीवपणे बनवल्या जातात.

५ आ. पाण्याची बचत, तसेच वीजेचा काटकसरीने वापर

आश्रमांमध्ये पाण्याचा वापर काटकसरीने केला जातो. त्यात बेसिनवर चूळ भरतांना पूर्णवेळ नळ चालू न ठेवता आवश्यक तेवढेच पाणी वापरून नळ बंद करणे, घासलेली भांडी विसळतांना त्याखाली अन्य खरकटी भांडी भिजण्यासाठी ठेवणे आदी बारकाव्यांचेही कटाक्षाने पालन केले जाते. विजेचाही काटकसरीने वापर केला जातो.

५ इ. अन्य आश्रमांत येणार्‍या-जाणार्‍या साधकांबरोबर साहित्य पाठवणे

भारतभरात कार्य चालू असल्यामुळे एका आश्रमातून दुसर्‍या आश्रमात किंवा दुसर्‍या शहरात प्रसारसाहित्य, साप्ताहिके पाठवणे ओघाने येतेच. अशा वेळेला अल्प तातडीचे साहित्य अन्यत्र जाणार्‍या साधकांसह बहुतांश वेळा पाठवले जाते.

५ ई. सौरऊर्जेवर पाणी तापवणे

आश्रमात निवासाला असणार्‍या साधकांच्या स्नानासाठी सौरऊर्जेवर पाणी तापवले जाते. त्यामुळे सकाळी ठराविक वेळी सर्वांना उनपाणी मिळते, तसेच वीजेचीही बचत होते. केवळ पावसाळ्यात बंबाद्वारे पाणी तापवले जाते.

 

६. टाकाऊतून टिकाऊ वस्तूंची
निर्मिती करून अत्यंत सुसज्ज केलेला आश्रम

आश्रमात वापरली जाणारी संगणकांची पटले, लाकडी खुर्च्या, कपाटे, निवासी खोल्यांतील पलंग आदी इतरांनी अर्पण म्हणून दिलेले किंवा अनेक वर्षे वापरून भंगारात दिलेले साहित्यच पुन्हा दुरुस्त करून वापरले जाते. साधकांकडून ही दुरुस्ती इतकी सुबक आणि कुशलपणे केली जाते की, आश्रम पहातांना हे कुणाच्या लक्षातही येणार नाही. यामुळेच अत्यल्प व्ययात साधकांना सेवा करण्यासाठी सुलभ सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. आश्रमाच्या प्रत्येक कक्षासमोर घातले जाणारे पायपोसही जुने सुती कपडे, फाटलेल्या चादरी आणि पलंगपोस (बेडशीट) वापरून बनवले जाते. ते बनवतांनाही सौंदर्यदृष्टीने विचार केल्यामुळे ते जरी टाकाऊ कपड्यांपासून बनवलेले असले, तरी आकर्षक दिसतात.

 

७. स्वच्छ अन् सात्त्विक अन्नपूर्णा कक्ष

आश्रमांतील स्वयंपाकघर हा साक्षात् अन्नपूर्णाकक्षच आहे. उत्तम नियोजनामुळे कधी महाप्रसाद तयार होण्यास विलंब झाला, असे येथे होत नाही.

७ अ. प्रसाद-महाप्रसादाच्या अचूक नोंदी करणे

भोजनाच्या वेळी आधीचे अन्न प्राधान्याने संपवणे, ही आश्रमातील शिस्त आहे. साधकसंख्या गृहीत धरून सरसकट स्वयंपाक न करता आदल्या दिवशीच दुसर्‍या दिवशी प्रसाद-महाप्रसादाला किती साधक असणार, हे पाहून त्याप्रमाणे पूर्वसिद्धता केली जाते. दुसर्‍या दिवशी कोणी महाप्रसादासाठी आश्रमात नसणार असल्यास अन्नपूर्णा कक्षात तशी कल्पना आधीच दिली जाते. आश्रमात अन्न वाया जाण्याचा प्रसंग अगदी अभावानेच घडत असावा.

७ आ. आईच्या मायेने साधकांचे भरणपोषण करणे

आश्रमात सणांच्या दिवशी किंवा संतसन्मानासारख्या आनंदाच्या क्षणी साधकांचे तोंड गोड करण्यासाठी आवर्जून गोडधोड केले जाते. दीपावलीच्या कालावधीत अनेक साधक त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी घरी जातात, अशा वेळेला जे साधक आश्रमातच रहाणार आहेत, त्यांच्यासाठी प्रतिदिन विशेष पदार्थ बनवून त्यांना घरची उणीव भासू दिली जात नाही. सनातनचे अनेक साधक विविध जिल्ह्यांत, विविध राज्यांत धर्मप्रसारासाठी जातात. अशा वेळेला इतर प्रांतात गेल्यावर तेथे जे उपलब्ध होईल, ते प्रसाद म्हणून ग्रहण करून ते आनंदाने धर्मप्रसार करत असतात. अखिल भारतीय हिंदू अधिवेशन किंवा साधनाविषयक शिबिर यांच्या निमित्ताने जेव्हा सर्वत्रचे साधक एकत्र येतात, तेव्हा काही कारणाने दूर गेलेली लेकरे घरी परतल्यानंतर आईला जसा आनंद होतो, तशाच आनंदाने विविध पदार्थ केले जातात. वर्षातून कधीतरी गुरुमाऊलीच्या कुशीत येणार्‍या या साधकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन निरनिराळे पदार्थ बनवून त्यांना खाऊ घालण्याची शिकवणही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचीच ! घरी राहून प्रसारसेवा करणार्‍यांना किंवा आश्रमांत राहून धर्मसेवा करणार्‍या साधकांना आपसूकच काही ना काही कारणाने गोडधोड दिले जाते. जे साधक बाहेरच्या प्रांतांत जाऊन धर्मसेवा करतात, त्यांचे प.पू. डॉक्टरांना विशेष कौतुक आहे.

७ इ. साधकांचे पथ्यपाणी लक्षात घेऊन स्वयंपाक बनवणे

साधकांना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ज्या प्रकारचे भोजन ग्रहण करावे लागते, त्या प्रकारचे भोजन, अल्पाहार त्यांना उपलब्ध करून दिला जातो, उदा. काही साधकांना तिखट पदार्थ वर्ज्य असतात, तर काही साधकांना ठराविक भाज्या किंवा ठराविक डाळी वर्ज्य कराव्या लागतात. काहींना गव्हाची पोळी लागते, तर काहींना केवळ भाकरी चालते. प्रत्येक साधकाला त्याच्या पथ्याप्रमाणे भोजन दिले जाते. सर्वांसाठी केलेली भाजी, आमटी एखाद्या साधकालाही चालणार नसेल, तरी त्याच्यासाठी वेगळी भाजी केली जाते. पिण्याचे पाणीही उकळून गार केलेले असते. थंड पाण्यासाठी शीतयंत्रही (कूलर) असते.

७ ई. प्रत्येक प्रकारचा खाऊ सर्वांना मिळेल, असे नियोजन

आश्रमातील साधकांसाठी अन्य शहरांतील साधक, हितचिंतक, अर्पणदाते खाऊ पाठवतात. कोणता खाऊ प्राधान्याने संपवायचा आहे, तो आधी सर्वांना दिला जातो. आश्रमात एखादा खाऊ थोडा असला, तरी त्याचा घास तरी प्रत्येकाला मिळेल, याची दक्षता घेतली जाते.

७ उ. अल्पाहारसेवा सर्व साधकांनी मिळून करणे

साधकांसाठी सकाळी अल्पाहार बनवण्याची सेवा, तसेच दुपारी प्रसादाच्या वेळी चहा अन् कशाय बनवण्याची सेवा आश्रमातील सर्वच साधक आळीपाळीने करतात. अन्नपूर्णा कक्षातील साधकांना महाप्रसाद बनवण्याची सेवा असते, त्यामुळे त्यांच्यावर या सेवांचा भार पडू दिला जात नाही.

७ ऊ. प्रसाद-महाप्रसादाची वेळ झाल्याची साधकांना आठवण करून देणे

साधक सेवांमध्ये इतके मग्न होतात की, बर्‍याचदा त्यांना प्रसाद-महाप्रसादाची वेळ झाल्याचेही लक्षात येत नाही. अशा वेळी उद्घोषणा यंत्रणेद्वारे प्रसाद-महाप्रसादाची वेळ झाल्याचे सर्वांना कळवण्यात येते. केवळ स्वयंपाक केला; म्हणजे झाले, असे नाही, तर सर्व साधक पोटभर जेवले का, याकडेही अत्यंत प्रेमाने लक्ष दिले जाते.

७ ए. भाजी ठेवण्याची आदर्श मांडणी (रॅक)

येथे पिकलेली, तातडीने वापरण्यायोग्य भाजी मांडणीत पुढील बाजूला ठेवली जाते, तर काही दिवसांनी वापरले, तरी चालेल, अशी भाजी मागे ठेवली जाते जेणेकरून सुयोग्य वापराअभावी कोणतीही भाजी खराब होऊ नये.

 

८. आजारी साधकांची काळजी

आश्रम हे शेकडो सदस्यांचे कुटुंबच असते. येथे आजारी असलेल्या सहसाधकाचीही सर्वतोपरी काळजी घेतली जाते. त्याच्या व्याधीनुसार पथ्यपाणी, मर्दन, औषधोपचार, तसेच वैद्यांनी सांगितलेल्या भोजन आणि अल्पाहार यांच्या वेळा अगदी काटेकोरपणे पाळले जाते. त्या साधकाच्या खोलीत रहाणारे साधक त्याला हवे-नको ते पहातातच; मात्र त्याच्यासमवेत सेवा करणारे साधकही काही उणे पडू देत नाहीत. आजारी साधकाचे कपडे धुण्यापासून ते आजारी साधिकांची केसांची वेणी घालून देण्यापर्यंत अगदी आपुलकीने अन् प्रेमाने केले जाते. खोलीत झोपून रहावे लागल्यास त्याला भेटून साधनाविषयक सूत्रे सांगून प्रोत्साहित करणे, वाचनासाठी ग्रंथ उपलब्ध करून देणे, हेही ओघानेच होते. खरंच, या प्रेमाला उपमाच नाही !

 

९. साधकांच्या जीवनातील आनंदाच्या प्रसंगात सहभागी होणे

आश्रमातील साधकांचे वाढदिवस, व्यावहारिक यश आणि अन्य आनंदाचे क्षण अगदी उत्साहाने; मात्र धर्मशास्त्रानुसार साजरे केले जातात. अशा प्रसंगी साधक त्याच्या पुढील आध्यात्मिक प्रगतीसाठी स्वहस्ते बनवलेले कल्पक शुभेच्छापत्र देऊन आनंद व्यक्त करतात. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे लिखाण आश्रमातील फलकावर लिहिले जाते.

 

१०. प्रत्येक साधकाच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचा विचार

सनातनच्या आश्रमात साधकांची साधना होण्याकडे काटेकोरपणे लक्ष दिले जाते. साधक साधनेसाठी आश्रमात आले आहेत, तर त्यांची योग्य प्रकारे साधना करवून घेणे अन् त्यांना साधनेच्या प्रगतीपथावर नेणे सनातन संस्था आपले कर्तव्य समजते. कार्य नाही, तर साधक मोक्षाला जाणार आहे, हे मनावर बिंबवले जाते. त्यामुळे प्रसंगी कार्याची हानी होत असूनही साधकाच्या साधनेकडे लक्ष दिले जाते. साधकांना व्यष्टी साधनेत मार्गदर्शन करण्यासाठी साप्ताहिक सत्संग, भावसत्संग आदी घेतले जातात. समष्टी साधनेतील चुका, फलनिष्पत्ती वाढवण्यासाठीचे प्रयत्न यांविषयीही सत्संग आयोजित केले जातात. त्यात सर्वांना आतापर्यंतच्या सेवेत झालेल्या चुका अन् यापुढील प्रगती होण्यासाठीचे मार्गदर्शन अध्यात्मातील उन्नत साधक करतात.

ज्या साधकांचे व्यष्टी-समष्टी साधनेचे प्रयत्न अल्प पडतात, त्यांच्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्या साधनेची घडी बनवण्यासाठी प्रतिदिन मार्गदर्शन केले जाते.

१० अ. सणांच्या दिवशी आध्यात्मिक ध्वनीचित्र-चकती दाखवणे

आश्रमात सणांच्या दिवशी सर्व जण भरजरी, पारंपरिक पोशाख परिधान करतात. संतांचे मार्गदर्शन, संतांचे सन्मानसोहळे किंवा साधनेत प्रगती केलेल्या साधकांची मुलाखत अशा ध्वनीचित्र-चकती दाखवल्या जातात. त्यामुळे सण आध्यात्मिक स्तरावर साजरा होतो.

१० आ. प्रार्थना आणि कृतज्ञता यांची उद्घोषणा

आश्रमात प्रत्येकी १५ मिनिटांनी ईश्‍वरचरणी प्रार्थना, कृतज्ञता व्यक्त करण्याची आठवण करून दिली जाते. यामुळे साधकांना प्रार्थनेची आठवण होऊन कार्याला साधनेची जोड देता येते. प्रत्येक सेवा ईश्‍वराला स्मरून केल्याने तिच्यात ईश्‍वरी चैतन्याचे प्रमाणही सर्वाधिक असते.

 

११. साधनेतील मार्गदर्शक – चुकांचा फलक

आश्रमाचे अद्वितीय वैशिष्ट्य म्हणजे येथे साधकांकडून झालेल्या चुका लिहिण्यासाठी फलक आहे. त्यावर साधक स्वतःकडून झालेल्या चुका लिहितात. त्यामागे स्वतः शिकून इतरांना तशा प्रकारच्या चुका टाळता याव्यात, असा उद्देश असतो. सर्वांसमोर चुका स्वीकारल्याने संबंधित साधकाचा अहंही न्यून होण्यास साहाय्य होते. येथे स्वतःतील षड्रिपू-निर्मूलनासाठी चुका इतरांसमोर मोकळेपणाने मांडल्या जातात. त्यामुळे आश्रमातील वातावरण पारदर्शक असते, तसेच कार्यही अचूक होते. साधकांची साधनेत उन्नती होते.

 

१२. साधकांचा आश्रमाप्रतीचा भाव
आणि स्वयंस्फूर्तीने होणारे साधनेचे प्रयत्न

आश्रम माझा नाही, तर मी आश्रमाचा आहे, या भावाने अन् दिसेल ते कर्तव्य या प्रकारे साधक आश्रमात वास्तव्य करतात. येथे सर्व जण ईश्‍वरप्राप्तीसाठी समर्पित झालेले आहेत. आश्रमातील सर्व सेवा सुरळीत व्हाव्यात, यासाठी प्रत्येक जण प्रयत्नरत असतो. त्यामुळेच येथे चालणारे एवढे व्यापक कार्यही सुरळीतपणे पार पडते. मोठ्या समारंभांच्या वेळीही कुठेही गडबड-गोंधळ दिसत नाही कि व्यवस्थापनाची सेवा करणार्‍या साधकांवर साधकांकडून सेवा करवून घेण्याचा भार पडत नाही. एकदा ठरवून दिलेली कार्यपद्धत कसोशीने पाळण्याचा प्रयत्न प्रत्येक साधक करतो. कोणाकडून तसे होत नसल्यास साधक नम्रपणे त्याला तशी जाणीवही करून देतात. कुणाला काही अयोग्य किंवा साधनेच्या तत्त्वांत न बसणारे घडतांना दिसल्यास तत्परतेने त्याची व्यवस्थापनाला कल्पना नेतात. श्रीगुरूंच्या आश्रमातील पावित्र्य टिकून रहावे, असा त्यामागील उद्देश असतो.

सनातनच्या आश्रमांत अशा अनेक लहान-मोठ्या कार्यपद्धती आहेत. त्यांच्यामुळेच आश्रमात ईश्‍वराचे चैतन्य आहे. लेखातून सर्व मांडण्याला अनेक मर्यादा आहेत. त्यामुळे या आश्रमांना भेट देऊन येथील ईश्‍वरी राज्य अनुभवणे, हाच खरा आनंद आहे. असे आश्रम घडवणे, हे सामान्य व्यक्तीचे काम नाही, असे भेट देणारे सहजपणे बोलून जातात. या आश्रमांमध्ये अनुभवण्यास मिळणारे दैवी वातावरण हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेची चिरंतन शिकवण देऊन त्यांच्यात साधकत्वाचा विकास केल्याचे फलित आहे. हे आश्रम घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी या निमित्ताने कोटी कोटी नमन !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात