सनातनने आरंभ केलेले राष्ट्रहितैषी उपक्रम

p_anutai_m_colस्वसंरक्षण प्रशिक्षण, प्रथमोपचार प्रशिक्षण, आपत्कालीन साहाय्य प्रशिक्षणवर्ग आणि अग्नीशमन प्रशिक्षणवर्ग या राष्ट्रहितैषी उपक्रमांचा आरंभ सनातनने १० – १५ वर्षांपूर्वीच अत्यंत दूरदृष्टीने केला. त्याविषयी सनातनचे विविध ग्रंथही प्रकाशित झाले आहेत. आताही सनातनचे साधक अन्य संघटना राबवत असलेल्या विविध राष्ट्रहितैषी उपक्रमांत सहभागी होतात.

संकलक : सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, प्रसारसेवक, सनातन संस्था.

१. प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग

prathamopchar
प्रथमोपचार प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक

एखाद्या व्यक्तीला अपघात झाल्यास वा तिला आकस्मिक त्रास चालू झाल्यास किंवा तिच्यावर अन्य एखादी आपत्ती कोसळल्यास तिला सहकार्य करणे आणि तिच्या प्राणाचे रक्षण करणे, हे देशातील प्रत्येक नागरिकाचे अलिखित कर्तव्यच आहे. हा समाजऋण फेडण्याचा एक भागही आहे. या दृष्टीने संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग आयोजित करण्यात येतात. यांमध्ये पीडित व्यक्तींची प्राथमिक तपासणी कशी करावी, हे शिकवण्यात येऊन विविध प्रकारच्या इजा आणि त्रास यांची सविस्तर माहिती देण्यात येते, तसेच त्या त्या प्रकारात प्रथमोपचाराची कोणती उपचारपद्धत अवलंबावी, हे सनातनकृतीसह शिकवते. त्याविषयी प्रथमोपचार प्रशिक्षण नावाचा सनातनचा ग्रंथही नुकताच जुलै २०१६ मध्ये प्रकाशित झाला आहे.

२. आपत्कालीन साहाय्य प्रशिक्षणवर्ग

apatkalin
आपत्कालीन साहाय्यता प्रशिक्षण वर्गात सहभागी झालेले प्रशिक्षणार्थी

पूर, वादळ, भूकंप, ज्वालामुखी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या रूपाने, तसेच युद्धजन्य परिस्थितीत वा अराजक माजले असताही मानवी जीवन धोक्यात येऊ शकते. देशातील मोडकळीस आलेली समाजव्यवस्था; राष्ट्ररक्षण, अर्थव्यवस्था, युद्ध यांच्या दृष्टीने स्फोटक परिस्थिती; देशविघातक कारवायांचे वाढते प्रमाण इत्यादींचा मोठा परिणाम नजीकच्या काळात मानवी जीवनावर होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर भावी काळात जर आपल्यावर एखादी आपत्ती ओढवली, तर तिच्यातून मार्ग काढण्यासाठी आपल्याला प्रशासकीय साहाय्य अथवा आवश्यक ते सर्व वैद्यकीय आणि इतर साहाय्य, साधनसामग्री कितपत उपलब्ध होईल ? याच दृष्टीकोनातून सनातन आपत्कालीन साहाय्य प्रशिक्षणवर्ग आयोजित करते. या प्रशिक्षणवर्गांत वेगवेगळ्या आपत्तींविषयी सविस्तर माहिती देण्यात येऊन प्रत्येक आपत्तीत साहाय्यताकार्य कसे करावे, याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येते. वर्ष २०१३ मध्ये उत्तराखंड मध्ये ओढवलेला महाप्रलय, वर्ष २०१५ मध्ये नेपाळमध्ये झालेला भूकंप या आपत्तींत अन्य समविचारी संघटनांसह सनातनच्या साधकांनीही साहाय्यता कार्यात सहभाग घेतला होता.

३. अग्नीशमन प्रशिक्षणवर्ग  

agnishaman
अग्निशमन प्रात्यक्षिके दाखवतांना प्रशिक्षक

अल्पावधीतच प्रचंड जीवितहानी आणि वित्तहानी करणार्‍या अग्नीप्रलयापासून वाचवण्याचे किंबहुना अशी आपत्ती उद्भवूच नये, यासाठी योग्य ती दक्षता घ्यावयाचे तंत्र सर्वांनी आत्मसात् करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्योत्तर काळात शालेय अथवा महाविद्यालयीन अभ्यासक्रम अशा कोणत्याही टप्प्यावर वा अन्य प्रकारे अशा आपत्तीच्या वेळी जनतेने कसे वागावे, हे नागरिकांना शिकवण्यात आलेले नाही. या ज्ञानाच्या अभावामुळेच जनसामान्य अशा आपत्तीच्या वेळी दिङ्मूढ झालेले दिसतात. सनातनच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या अग्नीशमन प्रशिक्षणवर्गात या आपत्तीला धिराने सामोरे जाण्याचे, तसेच ही आपत्ती अचूकपणे हाताळण्याचे तंत्र शिकवण्यात येते. या प्रशिक्षणवर्गांत आग लागण्याची आणि ती पसरण्याची विविध कारणे सांगण्यात येऊन आग पाहिल्याक्षणी कोणती कृती करावी, हे शिकवण्यात येते. आग विझविण्याच्या निरनिराळ्या पद्धती, त्यासाठी आवश्यक विविध माध्यमे आणि त्यांची कार्यपद्धत, चुकीचे माध्यम वापरल्याने होणारे दुष्परिणाम इत्यादींचे सविस्तर मार्गदर्शनही करण्यात येते. आग लागल्यावर सुरक्षात्मक उपाययोजना कशी योजावी, याची प्रात्यक्षिकेही या प्रशिक्षणवर्गांत अंतर्भूत आहेत. याविषयीचा अग्नीशमन प्रशिक्षण नावाचा ग्रंथही सनातनने वर्ष २००४ मध्येच प्रकाशित केला आहे.

४. राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा मोहीम      

देशाची अस्मिता असलेल्या राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी सनातनने पुढाकार घेऊन प्रयत्न केले. १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी आणि २६ जानेवारी या प्रजासत्ताकदिनी मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजांचे वितरण होते; मात्र नंतर तेच राष्ट्रध्वज कचर्‍यात किंवा कुठेतरी गटारात पडलेले आढळतात. असे होऊ नये, यासाठी सनातन समविचारी संघटनांना समवेत घेऊन गेली अनेक वर्षे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा यासंदर्भात कार्य करत आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी शाळांमधून मुलांचे प्रबोधन करणे, प्रशासनाला निवेदन देणे, दुकानदारांना प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विक्रीसाठी न ठेवण्याचे आवाहन करणे, तसेच दुसर्‍या दिवशी रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज एकत्रित करून विसर्जन करणे, अशा प्रकारे यासंदर्भात कार्य केले जाते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात