सावित्री नदीतून २ बसगाड्यांसह काही वाहने आणि ३० हून अधिक जण वाहून गेल्याची शक्यता !

रायगडमधील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पोलादपूर-महाड पूल कोसळला !

savitri_river_flood_4

savitri_river_flood_1

savitri_river_flood_3 savitri_river_flood_2 

  • ब्रिटीशकालीन पूल कमकुवत होऊनही वाहतूक चालूच ठेवल्यामुळेच घडली दुर्घटना

  • विधीमंडळात पडसाद !

पनवेल, ३ ऑगस्ट (वार्ता.) – मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील राजेवाडी फाट्याजवळील सावित्री नदीवर असलेला ब्रिटीशकालीन पोलादपूर-महाड पूल २ ऑगस्टला रात्री ११.३० वाजता पाण्याच्या प्रचंड वेगामुळे तुटला. या वेळी पुलावरून जाणार्‍या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या २ बसगाड्यांसह अंदाजे १५ वाहने आणि ३० हून अधिक प्रवासी वाहून गेल्याची शंका व्यक्त केली जात आहे. विविध आपत्कालीन यंत्रणांद्वारे येथे मोठ्या प्रमाणात शोधकार्य चालू असूनही ३ ऑगस्टला रात्री उशिरापर्यंत दासगावजवळ सापडलेल्या २ मृतदेहांव्यतिरिक्त विशेष काही हाती आलेले नव्हते. या दुर्घटनेचे तीव्र पडसाद ३ ऑगस्टला राज्य विधीमंडळात उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मदत आणि पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील आणि सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांनी घटनास्थळी भेट दिली.    राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलाचे (एन्डीआर्एफ्चे) ११५ जवान, नौदल आणि तटरक्षक दल (कोस्ट कार्ड) यांच्या १२ बोटी अन् हेलिकॉप्टर, तसेच रिव्हर राफ्टिंग टीम यांच्यासह अन्य संस्थांकडून सकाळी १० वाजल्यापासून सूर्यास्तापर्यंत बेपत्ता वाहने आणि लोक यांचा शोध घेण्याचे कार्य चालू होते. 

पाण्याचा प्रचंड दाब, वारा आणि पाऊस असल्याने शोधकार्यात अडथळे येत होते. कोणाचाही शोध लागल्याची वृत्ते नाहीत, असे शिवसेनेचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री रवींद्र वायकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. 

२ ऑगस्टला रात्री या पुलावरून जाणार्‍या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राजापूर-बोरीवली आणि जयगड-मुंबई या दोन बसगाड्यांसह त्यांचे चालक, वाहक आणि प्रवासी असे २२ जण बेपत्ता आहेत. रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी आवाहन केले आहे की, ज्यांचे नातेवाईक या पुलावरून गेले असून जे घरी पोचले नसतील, त्यांनी आणि कोणाला बेपत्ता गाड्या दिसल्यास त्यांनी आपत्कालीन कक्षाशी संपर्क करावा. 

१०० वर्षे जुन्या असणार्‍या या ब्रिटीशकालीन दगडी पुलावर झाडे उगवल्याने पूल कमकुवत झाला होता. त्यासाठी शेजारी नवीन पूल बांधला होता; परंतु या जुन्या पुलावरील वाहतूक चालूच असल्याने ती बंद करण्याची मागणी स्थानिकांनी केली होती; परंतु राष्ट्रीय महामार्ग खात्याने हा पूल बंद केला नव्हता. (अक्षम्य हलगर्जीपणा करून जीवितहानी होण्यास उत्तरदायी असलेल्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी, जेणेकरून पुढे अशा अक्षम्य चुका कोणी करणार नाही ! – संपादक) काहींनी पुलाच्या कठड्यांचे चित्र सामाजिक संकेस्थळावर प्रसिद्ध करून याचा पुरावा म्हणून वापर करू, असे शासनाला कळवले होते. 

महाबळेश्‍वर येथे गेले तीन दिवस मुसळधार पाऊस असल्याने तेथे उगम पावणार्‍या सावित्री नदीच्या पाण्याला प्रचंड वेग होता आणि या ठिकाणी नदीचे पात्र खोल आहे. ही नदी पुढे हरिहरेश्‍वरला समुद्राला जाऊन मिळते.

 

महर्षींनी प्रलयाविषयी सतर्क करणे

 

१५.७.२०१६ या दिवशी चेन्नई येथे झालेल्या नाडीवाचन क्रमांक ८८मध्ये महर्षी म्हणतात, येणार्‍या काळात मोठी नैसर्गिक आपत्तीही येणार आहे. पुढे पुढे मुंबई – गोवा मार्गावरून प्रवास करणेही कठीण होईल. (मुंबई-गोवा मार्गावरील रायगड येथील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पोलादपूर-महाड पूल कोसळला आहे. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! – संपादक)

 

अतीवृष्टी आणि अनावृष्टी यांसारख्या संकटांपासून
जनतेचे रक्षण होण्यासाठी शासन काही करणार नाही,
तर प.पू. नाना काळेगुरुजी यांच्यासारखे संतच
यज्ञ-यागादी विधी करून जनतेला वाचवू शकतात !

महाराष्ट्रासह देशभरातील दुष्काळग्रस्त स्थिती दूर होऊन निसर्गदेवतेची कृपा व्हावी, यासाठी आतापर्यंत बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील श्री योगिराज वेद विज्ञान आश्रमाचे संस्थापक प.पू. नाना काळेगुरुजी लाखो रुपये खर्च करून १२ सोमयाग करत आहेत. याचा परिणाम म्हणजे ज्या ठिकाणी दुष्काळग्रस्त स्थिती होती, तेथे पाऊस पडला आणि तेथील दुष्काळग्रस्त स्थिती निवारण्यास मोठे साहाय्य झाले. हे शासनामुळे नाही, तर संतांच्या आध्यात्मिक सामर्थ्यामुळेच शक्य झाले. 

आता देशभरात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी होत आहे. अतीवृष्टी (पूरस्थिती) आणि अनावृष्टी (दुष्काळ) निर्माण होऊन हानी होणे, हे मानवाने केलेल्या पापाचे भोग आहेत. हे पाप अल्प होऊन निसर्गदेवतेची कृपा व्हावी, यासाठी मानवाने साधना करणे आवश्यक आहे, असे एकही राजकारणी सांगत नाही. पूरस्थितीसारख्या नैसर्गिक आपत्तीपासून जनतेचे रक्षण होण्यासाठी आता प.पू. नाना काळेगुरुजी यांच्यासारख्या संतांना यज्ञ-यागादी विधी करावे लागणार आहेत.