दिवसरात्र सेवेचा ध्यास असलेले आणि तत्त्वनिष्ठ राहून साधकांना खर्‍या अर्थाने घडवणारे अद्वितीय संतरत्न पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ !

pu_tai_lekh
पू. (सौ.) अंजली गाडगीळ (डावीकडे) यांनी विविध प्रश्‍नांद्वारे पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा साधनाप्रवास उलगडला

हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेसाठी अखंड कार्यरत असणार्‍या आणि साक्षात् महर्षींनी गौरवलेल्या सनातनच्या पू. (सौ.) अंजली गाडगीळ आणि पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ २४ जुलै या दिवशी सद्गुरुपदी विराजमान झाल्या. या भावसोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्या दोघींनीही एकमेकींना प्रश्‍न विचारून त्याद्वारे प्रत्येकीचा साधनाप्रवास उलगडला. या संवादातून सनातनच्या संतांमधील दुर्लभ आणि अनमोल गुण अनुभवण्याची संधी सर्व साधकांना मिळाली. सनातनच्या सर्वच साधकांना या अनमोल संतरत्नांची गुणवैशिष्ट्ये कळावीत, यासाठी हा साधनाप्रवास लेखाद्वारे उलगडून दाखवला आहे. श्रीकृष्णाने अशा महान संतांच्या सान्निध्यात सनातनच्या साधकांना रहाण्याची संधी दिली, यासाठी त्याच्या चरणी कृतज्ञता !

या लेखात पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना प्रश्‍न विचारल्यावर त्यांनी समष्टी सेवेचे दायित्व पार पाडतांना भगवंताचे मिळणारे साहाय्य, गुरुकार्याचा असणारा ध्यास आणि साधकांना घडवण्यासाठी देवाच्या कृपेने होणारे आध्यात्मिक स्तरावरील प्रयत्न यांविषयी केलेले मार्गदर्शन दिले आहे.

१. चैतन्यामुळे सहजतेने कार्य होणे
आणि सातत्याने गुरुकार्याचाच ध्यास असणे

पू. (सौ.) अंजली गाडगीळ : तुमच्याकडून अनेक साधक सेवेतील आणि साधनेतील अडचणींविषयी मार्गदर्शन घेत असतात. तसेच अखिल भारतीय हिंदू अधिवेशन, साधकांच्या कार्यशाळा अशा प्रसंगांतही सेवा असतात. या सर्व तुम्ही कशा करता ?

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ :

१ अ. स्वतः काही करत नसून ईश्‍वराचे चैतन्यच सर्वकाही करत असल्याचे जाणवणे : अध्यात्मप्रसार बुद्धीने नाही, तर अंत:प्रेरणेने होतो, तसेच आश्रमातील सेवाही बुद्धीने होत नसून अंत:प्रेरणेने होते. आपण काही करत नसून चैतन्याचा मोठा स्रोतच कार्यरत आहे. ईश्‍वरच सर्वकाही करत असून आपण केवळ आनंद अनुभवत आहोत. त्याची कृपाच आपल्या माध्यमातून कार्य करत आहे, हे गेल्या काही दिवसांपासून अनुभवायला मिळत आहे. साधकांशी बोलतांना कधी कधी सहजतेने, कधी चैतन्याची सुनामीच आली आहे, असे बोलले जाते. या चैतन्यामुळे सर्व सहजतेने आणि आपोआप होते.

१ आ. तहान, भूक आणि विश्रांती विसरून गुरुकार्य करणे : दिवसरात्र कितीही सेवा केली, तरी आणखी किती करू, असे होते. विश्रांतीसाठी रात्री डोळे मिटूच नयेत, केवळ सेवारत रहावे, असे वाटते. गुरुकार्याची व्याप्ती कशी वाढेल ?, याचाच ध्यास असतो. त्यामुळे जेवण-झोप यांची आठवणही येत नाही. करणारा देवच आहे. आता करत असलेले हे कार्य काहीच नाही. आपल्याला आणखी पुष्कळ करायचे आहे, असे वाटते.

१ इ. साधक हीच खरी संपत्ती असल्याचे वाटणे आणि त्यांच्यासाठी झिजण्याचा विचार मनात येणे : कधी सेवांच्या व्यस्ततेमुळे साधकांच्या अडचणी सोडवायला वेळ मिळाला नाही, तरी साधक समजून घेतात. स्वत: दायित्व घेऊन सेवेतील अडचणी सोडवतात. प.पू. डॉक्टर म्हणतात, त्याप्रमाणे साधक हीच खरी संपत्ती आहे, असे वाटते. साधकांशी एकरूप होऊन त्यांच्या अडचणी सोडवून शेवटच्या श्‍वासापर्यंत त्यांच्यासाठी झिजायचे आहे. सर्व आश्रमांत आणि प्रसारात चालणारे कार्य केवळ ईश्‍वर, महर्षि, संत यांची कृपा आणि साधकांचे प्रेम यांमुळेच चालू आहे.

२. साधकांना कसे हाताळावे,
याविषयी देवानेच आईप्रमाणे मार्गदर्शन करणे !

पू. (सौ.) अंजली गाडगीळ : प्रत्येक साधकाची प्रकृती ओळखून त्याप्रमाणे तुम्ही कसे मार्गदर्शन करता ? साधकांना मार्गदर्शन केले आणि त्यांना ताण आला, असेही होऊ शकते. त्यांना विकल्पही येऊ शकतात. अशा वेळी त्यांना यातून बाहेर कसे काढता ?

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ :

२ अ. साधकांना समजून न घेण्याच्या संदर्भात प्रसंग घडल्यावर निराश न होता देव समवेत आहे, या श्रद्धेने शिकण्याचा प्रयत्न करणे : साधकांना मार्गदर्शन करण्याचा पूर्वी मला अनुभव नव्हता. त्यामुळे साधकांना मार्गदर्शन करतांना काही प्रसंग असेही झाले की, ज्यात मी त्यांना समजून घेण्यात न्यून पडले किंवा त्यांना मी सांगितलेल्या सूत्रांचा ताण आला. त्या वेळी साधकांना कसे हाताळायचे ? त्यांचा अभ्यास कसा करायचा ? त्यांची स्थिती कशी ओळखायची ? त्यांना कोणत्या स्थितीला काय सांगायचे ?, ते देवानेच शिकवले. आई ज्याप्रमाणे एखाद्या बाळाला हाताला धरून चालायला शिकवते, त्याप्रमाणे देवानेच मला सर्वकाही शिकवले. शिकतांना अनेक चुका झाल्या, प्रसंगही घडले; पण साधकांना ओळखण्यात मी अल्प पडले किंवा त्यांना समजून घेता आले नाही, याची निराशा आली नाही. देव समवेत आहे, या श्रद्धेने शिकण्याचा प्रयत्न करून पुढे जात राहिले.

२ आ. साधकांना संपर्क करावासा वाटणे, प्रत्यक्षातही त्यांना आधाराची आवश्यकता असणे आणि देवच सर्वकाही करवून घेत असल्याचे जाणवणे : कधी कधी काही साधकांची आपोआप आठवण येते. त्यांना संपर्क करण्याचा विचार देवच देतो आणि संपर्क केल्यानंतर त्यांना आधाराची आवश्यकता असल्याचे समजते. आश्रमातही एखाद्या साधकाला साहाय्य हवे असेल, तर देव आपोआप त्याचे नाव सुचवतो. साधक त्यांच्या अडचणी घेऊन आल्यानंतर किंवा काही वेळा साधकांना मला काय सांगायचे आहे, हे त्यांनी सांगण्याआधीच कळते. देवाने ही सेवा दिली असल्यामुळे आपण बुद्धीने काही करत नसून देवच सर्व करवून घेत आहे, याची अनुभूती घेता येते. साधकांना मार्गदर्शन करतांना विश्‍वमन आणि विश्‍वबुद्धी यांच्याशी एकरूप झाल्याचेही जाणवते.

२ इ. साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी सूत्रे आपोआप सुचणे आणि सत्संगाच्या वेळी ब्रह्मांडाच्या पोकळीतूनच नाद येत असल्याची अनुभूती येणे : साधकांना सत्संगात मार्गदर्शन करतांना ईश्‍वर प्रत्येक साधकासाठी आवश्यक असलेली सूत्रे सुचवतो. पुढील २४ घंट्यांत प्रयत्न करण्यासाठी साधकांना काय सांगायचे, याविषयी मी बुद्धीने चिंतन करून आधी सूत्रे काढलेली नसतात. देवच त्या त्या वेळी योग्य ते सुचवतो. सत्संगाच्या वेळी मी ब्रह्मांड पोकळीत बसले आहे, तसेच मार्गदर्शन करतांना माझ्या आवाजाच्या ऐवजी पोकळीतून नाद येत आहे, अशी अनुभूती महर्षींच्या कृपेमुळे घेता येते.

३. साधकांना भेटण्याची पुष्कळ इच्छा असणे;
परंतु समष्टी सेवेला प्राधान्य देऊन गुरूंना अपेक्षित तेच करणे

पू. (सौ.) अंजली गाडगीळ : पू. ताईंनी आपल्याशी बोलावे, आपल्याकडे पहावे, असे प्रत्येक साधकाला वाटते; पण सेवेच्या व्यापातून सर्वांना वेळ देणे शक्य होत नाही. अशा वेळी साधकांना पू. बिंदाताईंनी आपल्यासाठी वेळ दिला नाही, असे वाटू शकते. या प्रसंगांना कसे सामोरे जाता ?

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ : सर्व सेवा बाजूला ठेवून साधकांना जाऊन भेटावे, त्यांना वेळ द्यावा, असे पुष्कळ वाटते; पण वेळेअभावी तसे करता येत नाही. अशा वेळी गुरूंना या क्षणाला काय अपेक्षित आहे ?, याचा विचार करून तत्त्वाला धरून पुढे जाण्याचा प्रयत्न करते. समष्टी सेवेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याने सेवेतून वेळ मिळेल त्याप्रमाणे ज्यांनी बोलण्याची इच्छा व्यक्त केली असेल, त्या साधकांना वेळ देते.

४. साधकांना मानसिक नव्हे, तर आध्यात्मिक स्तरावरच हाताळणे

पू. (सौ.) अंजली गाडगीळ : अध्यात्मात तत्त्वनिष्ठतेला धरूनच पुढे जावे लागते. तुम्ही कधी मानसिक स्तराला उतरतच नाही. सातत्याने आध्यात्मिक स्तरावरच मार्गदर्शन करता. हे तुम्ही सहज कसे साध्य केले ?

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ :

४ अ. मानसिक स्तरावर तात्पुरता आधार देण्यापेक्षा आध्यात्मिक स्तरावर राहून साधकांना कायमची दिशा देणेे : मी साधकांच्या अडचणी सोडवतांना त्यांना कधी मानसिक स्तरावर हाताळत नाही. मानसिक स्तरावर तात्पुरता आधार देण्यापेक्षा कायमची दिशा कशी देता येईल, याचाच विचार सतत मनात असतो. काही वेळा साधकांना ते स्वीकारता येत नाही; पण साधनेत भावनेला थारा नाही, हे लक्षात घेऊन त्यांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होईल, अशीच सूत्रे सांगते.

४ आ. साधकांना तत्त्वनिष्ठतेकडे जाण्यासाठी आवश्यक आधार देणे : साधकांना आध्यात्मिक स्तरावर हाताळतांना त्या साधकाविषयी आतून प्रेमच असते. साधकांना तत्त्वनिष्ठतेकडे जाण्यासाठी, तसेच आध्यात्मिक स्तरावर रहाण्यासाठी आधार आवश्यक असतो. पुढच्या टप्प्याला आधार देण्याचा प्रयत्न करते.

५. साधकांच्या साधनेसाठी कठोर रहातांना
देवाचा त्यामागील कार्यकारणभाव लक्षात येणे

पू. (सौ.) अंजली गाडगीळ : प्रेमाने बोलणे सोपे असते; परंतु दोषांच्या मुळाशी जाऊन साधकाला चुकांची जाणीव करून देणे, प्रसंगी व्यष्टी साधनेसाठी कठोर होणे, हे कठीण असते. ते तुम्हाला कसे जमते ? साम-दाम-दंड-भेद यांतील दंड हाही ईश्‍वराचा एक गुणच आहे. त्यातूनही जिवाचा उद्धार होत असतो. हा गुण तुम्ही कसा आत्मसात केलात ?

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ :

५ अ. साधकांचे भले व्हावे, यासाठी आवश्यकतेनुसार त्यांच्याविषयी कठोर रहातांना ईश्‍वराच्या अस्तित्वाची प्रचीती येणे : गुरूंच्या आज्ञेत बुद्धी आणि भावना यांचा अडथळा न आणता ती अधिक चांगली करण्याचा प्रयत्न असतो. काही साधकांसंदर्भात कठोर राहून जर त्यांचे भले होणार असेल, तर त्यांना तसे सांगितले जाते. त्या वेळी मी बोलत असलेले शब्द आणि विचार ईश्‍वराचेच आहेत, अशी अनुभूती येते.

५ आ. साधकांची कालांतराने आध्यात्मिक प्रगती झाल्यानंतर ईश्‍वराचा प्रत्येक निर्णय जिवाच्या उद्धारासाठीच असल्याची जाणीव होणे : काही साधकांना मी कठोर राहून सांगितलेले स्वीकारता येत नाही; परंतु काही दिवसांनी त्यांची आध्यात्मिक प्रगती झाल्यानंतर देव कठोर राहिल्याविषयी त्यांना कृतज्ञता वाटते. आई जसे आपले मूल ऐकत नसेल, तर ते सुधारण्यासाठी त्याला जेवण न देणे, घराबाहेर उभे रहायला सांगणे, अशा शिक्षा करते, तसे ईश्‍वर प्रत्येक जिवावर पुष्कळ प्रेम करतो. देवाची शिकवण प्रत्येक जिवाच्या उद्धारासाठीच आहे. त्यात कुणाचीही हानी नाही, तर कल्याणच आहे, हे अनुभवता येऊन त्याविषयी कृतज्ञता वाटते.

६. ईश्‍वराचा आदर्श समोर ठेवून स्वत:मध्ये
प्रीती निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे

पू. (सौ.) अंजली गाडगीळ : साधनेत प्रत्येक साधक स्वत:त प्रेमभाव निर्माण करण्यासाठी धडपडत असतो. प्रेमभावानंतर प्रीती हा पुढचा टप्पा असतो. प्रीती हा ईश्‍वराचा सर्वोच्च गुण आहे. प्रेमभाव ते प्रीती हा प्रवास तुम्ही कसा केला ?

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ : पूर्वी माझा स्वभाव अबोल होता. सेवाही प्रकृतीला धरून नव्हती; पण प.पू. डॉक्टरांनीच साधकांवर प्रेम कसे करायचे ? त्यांच्याशी कसे बोलायचे ? हे शिकवून मला घडवले. प.पू. डॉक्टर म्हणजे साक्षात् प्रीतीचे मूर्तीमंत रूपच आहे. त्यामुळे देवाचा आदर्श ठेवून आपणही सर्वांवर निरपेक्ष प्रेम कसे करू शकतो. यासाठी प्रयत्न केले. (प.पू. डॉक्टरांप्रती भाव असल्याने पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी प.पू. डॉक्टरांनीच शिकवले आहे, असे म्हटले आहे. – संकलक, दैनिक सनातन प्रभात)

७. कोणताही निर्णय घेण्याची प्रक्रिया देवानेच शिकवणे

पू. (सौ.) अंजली गाडगीळ : स्वत:मध्ये नेतृत्वगुण आणतांना दायित्व घ्यावे लागते. दायित्व घेतल्यावर चुकांची भीती असते. या भीतीमुळे साधक पुढे जात नाहीत. तुम्ही सेवांचे दायित्व समर्थपणे घेता. त्यामागचे रहस्य सांगा.

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ :

७ अ. प्रत्येक गोष्ट ठरवतांना देवानेच अभ्यास करवून घेतल्याने दायित्व सहजतेने घेता येणे : कुठलाही विषय घेतला, तरी त्याचा आरंभ देवापासूनच होतो आणि शेवटही त्याच्यापाशीच होतो. प्रत्येक गोष्ट ठरवतांना अभ्यास कसा करायचा, काहीही ठरवतांना अभ्यास कसा करायचा, हेही देवाने लहान लहान प्रसंगांतून लक्षात आणून दिले. ते आत्मसात करण्यासाठी बळही दिले. आता सर्वच विषयांच्या अभ्यासाच्या प्रक्रिया देवाच्या कृपेने लक्षात येतात.

७ आ. विषयाचा अभ्यास करण्यासह जाणकार साधकांकडून मार्गदर्शन घेणे आणि त्यातून निर्णय घेतांना दिशा मिळणे : आपल्या स्तरावर भगवंताचे साहाय्य घेऊन परिपूर्ण अभ्यास करण्याची धडपड असते. तसेच संबंधित क्षेत्रातील दायित्व असणार्‍या साधकांशी बोलणे, त्यांची विचारप्रक्रिया जाणून घेणे, यातूनही पुष्कळ शिकता येते. आपल्याला ठाऊक नसलेल्या अनेक गोष्टी असतात; मात्र इतरांकडून शिकल्यामुळे निर्णय घेतांना दिशा मिळते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात