सहजता, प्रीती आणि साधकांना साधनेत पुढे नेण्याची तळमळ असलेल्या पू. (कु.) अनुराधा वाडेकर !

पू. (कु.) अनुराधा वाडेकर
पू. (कु.) अनुराधा वाडेकर

हे श्रीकृष्णा, पू. (कु.) अनुताईंच्या माध्यमातून तू मला साधनेत टिकवून ठेवले आहेस आणि पुढे पुढे नेत आहेस, त्याविषयी कृतज्ञता म्हणून मी अनुभवलेली तुझी कृपा मला शब्दात मांडता येऊ दे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना करते.

सध्या मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांच्या प्रसारसेवेचे दायित्व पू. (कु.) अनुताई (पू. (कु.) अनुराधा वाडेकर) यांच्याकडे आहे. खरेतर त्यांच्या संकल्पानेच या जिल्ह्यांमधील सनातनचे प्रसारकार्य चालू आहे. आमची पात्रता नसतांना पू. ताई आम्हाला अखंड मार्गदर्शन करून साधनेत पुढे नेत आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही ईश्‍वराचे सगुण रूपच अनुभवतो; पण आम्ही त्यांच्याकडून शिकण्यात न्यून पडतो. असे असूनही पू. अनुताईंकडून मला शिकायला मिळालेली सूत्रे मांडण्याचा मी प्रयत्न करते.

१. सहजता

१ अ. संत म्हणून कुठेच वेगळेपण न जपणे

सौ. अर्पिता पाठक
सौ. अर्पिता पाठक

 

पू. अनुताई आम्हा सर्व साधकांमध्ये वावरत असतांना त्यांच्या वागण्या-बोलण्यात सहजता असते. सेवाकेंद्रे, बैठका किंवा शिबीर यांमध्ये पू. ताई संत म्हणून कुठेच वेगळेपणा जपत नाहीत. बैठकांसाठी सतरंजी घालतांना साहाय्य करणे, उशिरा आलेल्या साधकांना पाणी देणे, या कृती त्या सहज करतात.

१ आ. अडचणीच्या वेळी सेवाकेंद्रातील साधकासाठी स्वतः पोळ्या बनवून देणे

दादर सेवाकेंद्रातील एका साधकाला सेवेसाठी सकाळी लवकर डबा घेऊन जावे लागते. एकदा त्यांचा डबा बनवणार्‍या साधिकेला अकस्मात् अडचण आली आणि पहाटेपर्यंत सेवा केल्याने आम्ही अन्य साधिका झोपलो होतो. पू. ताई स्वयंपाकघरात गेल्या, तेव्हा ही अडचण त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी स्वतःच पोळ्या बनवून दिल्या.

२. देवाला अपेक्षित अशी कृती करण्याची तळमळ

पू. ताई अगदी छोट्या छोट्या कृतीही देवाला अपेक्षित अशा कशा करायच्या ?, हे नेहमी सांगत असतात, उदा. बैठकांसाठी चटई घालतांना गडद रंगाची बाजू भूमीकडे केल्याने चटई जास्त खराब होत नाही, प्रत काढण्यासाठी पाठकोरे कागद ठेवतांना त्याच्या एका बाजूला लिहिलेल्या लिखाणावर पेनने काट मारावा, साधिकांनी साडी किंवा ओढणी योग्य प्रकारे कशी घ्यावी ? इत्यादी.

३. कोणत्याही अडचणीवर सहजतेने उपाययोजना सुचवणे

बैठकांमध्ये किंवा अन्य वेळीही आम्ही सांगत असलेली प्रसारातील सूत्रे, येणार्‍या अडचणी, साधकांची स्थिती हे सर्व पू. ताई मनापासून ऐकतात. प्रत्यक्षात आम्हीच त्या वेळी परिस्थिती हाताळायला न्यून पडलेलो असलो, तरी पू. ताई त्यावर काय उपाययोजना करू शकतो ? कसे असायला हवे ?, यांविषयी त्या आम्हालाच विचारून अगदी सहजतेने मार्ग सुचवतात.

४. प्रेमाने आणि तत्त्वनिष्ठतेने चुका सांगणे

४ अ. चुका प्रेमाने आणि परिणामांसह सांगण्याने साधकांमध्ये उभारी येणे

आम्हा साधकांकडून झालेल्या चुका त्या अगदी प्रेमाने; पण स्पष्ट शब्दांत सांगतात. चुकांमुळे स्थुलातून आणि सूक्ष्मातून होणारा परिणामही त्या सांगतात. हे सर्व सांगतांना साधकांनी साधनेत पुढे जावे, ही पू. ताईंची तळमळ प्रकर्षाने जाणवते आणि त्यामुळे आम्हाला प्रयत्न करायला उभारी येते.

४ आ. जेव्हा पू. ताई कठोर होऊन साधकांना चुकांची जाणीव करून देतात, तेव्हा कित्येकदा अनेक साधकांना पू. ताईंमध्ये दुर्गादेवीचे दर्शन झाल्याचे साधक सांगतात.

४ इ. चुकांमुळे होणारी हानी सांगण्यासमवेत त्या साधकाचे गुणही सांगणे

पू. ताई साधकांच्या चुका सांगतांनाही मनातून मात्र त्यांना साधकांविषयी प्रीतीच वाटत असते. साधकांमधील स्वभावदोषांमुळे त्यांच्यातील गुणांची कशी हानी होते ?, हे सांगून त्या साधकाचे गुणही सांगतात. त्यामुळे अन्य साधकांना अशा साधकांविषयी प्रीती वाटू लागते.

५. बैठकांत साधकांना सर्व सूत्रे एकाच वेळी सांगून वेळ वाचवणे

शिबीर किंवा बैठका यांसाठी जेव्हा साधक एकत्र येतात, तेव्हा सर्व साधकांना सांगण्याच्या दृष्टीने अजून काही सूत्रे राहिली नाहीत ना ?, याची पू. ताई निश्‍चिती करून घेतात. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या सर्व साधकांना एकाच वेळी महत्त्वाची सूत्रे सांगून त्या वेळेचा अपव्यय टाळतात.

६. साधकांना साधनेत साहाय्य करणे

६ अ. अडचणींवर उपाय सांगून आधार देणे

पू. ताईंच्या सर्व साधकांवर असलेल्या प्रीतीमुळे आम्ही आमच्या आध्यात्मिक अडचणींसह शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक अडचणीही त्यांना मोकळेपणे सांगू शकतो. पू. ताईही सर्व अडचणींवर उपाय सांगून आम्हाला आधार देतात.

६ आ. साधिकेची अडचण सोडवण्याचा प्रयत्न करणे

एकदा काही कारणाने आमच्याकडे अडचण निर्माण झाली होती. तेव्हा पू. ताईंशी बोलल्यावर त्यांनी ती सोडवली. त्यानंतरही काही लागले, तर सांग, असे त्या माझ्या यजमानांना २ – ३ वेळा म्हणाल्या. पू. ताईंच्या या आधार देणार्‍या कृपाशीर्वादानेच आम्ही दोघेही त्या प्रसंगात स्थिर राहू शकलो.

७. बारकाव्यांसह विचारपूस करून नंतर निर्णय घेणे

पू. ताईंना सेवेतील एखाद्या सूत्राविषयी विचारल्यावर त्या बारकाव्यानिशी विचारपूस करून निर्णय देतात, उदा. दादर सेवाकेंद्रात बांधकाम चालू असतांना एका साधकाने बांधकामातील एक उपकरण वैयक्तिक कारणासाठी नेऊ का ?, असे विचारले. तेव्हा पू. ताईंनी त्याला अनुमती दिली; पण ते उपकरण हाताळता येत नसेल, तर शिकून घे, असेही सांगितले.

८. पू. ताईंमध्ये असलेल्या साधकांना घडवण्याच्या तळमळीमुळेच आज आम्हा सर्व साधकांना शुद्धीकरण सत्संगांच्या माध्यमातून संतांचे मार्गदर्शन मिळत आहे.

९. आध्यात्मिक उपाय गांभीर्याने करणे

पू. ताईंना तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. त्यामुळे त्यांना थोडाही वेळ मिळाला, तर त्या लगेच न्यास आणि मुद्रा करत जप करतात. बैठकांमध्ये आणि प्रवासातही पू. ताई उपाय करत असतात.

१०. सौ. घोंगाणेकाकूंविषयी असलेला आदर

अ. पू. ताईंसमवेत सौ. घोंगाणेकाकू नेहमी असतात. काकूंच्या प्रसारातील अनुभवाचा पू. ताई पुष्कळ आदर करतात. त्या प्रत्येक सेवेत काकूंना सहभागी करून घेतात.

आ. काकूंचा आध्यात्मिक त्रास जेव्हा वाढतोे, तेव्हा पू. ताई त्यांना काय हवे-नको ?, ते सर्व पहातात. काकू त्रासाशी कशा लढतात आणि त्यांच्यातील भावामुळे त्या अनुसंधान कसे टिकवून ठेवतात ?, याविषयी आम्हाला सांगून आमची काकूंवरील श्रद्धा वाढवतात. काकूंनाही पू. ताईंविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते.

११. साधिकेच्या गर्भारपणात काळजी घेणे

अ. माझ्या गर्भारपणात पू. ताई एका साधिकेशी बोलतांना तिची काळजी घ्यायला देव आहे, असे म्हणाल्या होत्या. त्यांच्या या संकल्पाची प्रचीती गर्भारपणात मी पावलोपावली घेतली.

आ. त्या काळात माझ्याकडे दायित्वाची सेवा होती; पण माझ्याकडून चुकाही पुष्कळ होत होत्या, तरीही पू. ताई मला समजून घेऊन आणि चुकांची जाणीव करून देऊन पुन्हा सेवा करण्यासाठी प्रोत्साहन द्यायच्या.

इ. मी बाळंतपणासाठी सेवा थांबवल्यावर मला आध्यात्मिक त्रास जाणवू लागला. माझ्याकडून चुका होऊनही मला आध्यात्मिक त्रासापासून दूर ठेवण्यासाठीच पू. ताई मला सेवेची संधी पुनःपुन्हा देत होत्या, हे तेव्हा माझ्या लक्षात आले.

ई. त्याच काळात पू. ताई रायगड जिल्ह्यात आल्या होत्या. त्या वेळीही माझ्याकडून पुष्कळ चुका झाल्या. मी पू. ताईंची सेवा करण्याऐवजी पू. ताईच माझी सर्वतोपरी काळजी घेत होत्या !

उ. आम्हाला मुलगी झाल्यावर तिला घेऊन आम्ही पू. ताईंकडे गेलो होतो. त्या वेळी पू. ताई पुष्कळ व्यस्त होत्या, तरी त्यांनी वेळ काढून बाळाला घेतले आणि आम्हा कुटुंबियांशी बोलल्या.

१२. कृतज्ञता

पू. ताईंविषयीची ही स्थुलातील काही सूत्रे आहेत. प्रत्यक्षात पू. ताईंमधील चैतन्याने आम्हाला आध्यात्मिक स्तरावर जो लाभ होतो, त्यासाठी पू. ताई आणि प.पू. गुरुमाऊली यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केेली, तरी ती अल्पच आहे. अशा सद्गुरुपदावर असलेल्या संत प्रसारसेवक म्हणून आम्हाला दिल्याबद्दल प.पू. डॉक्टरांंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते आणि पू. ताईंचा आम्हा सर्व साधकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेता येऊ दे, अशी अनन्यभावाने प्रार्थना करते.
– सौ. अर्पिता पाठक, पनवेल, रायगड. (११.७.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात