आज हिंदूंनी सिंहासारखे व्हायला हवे ! – श्रद्धेयप्रवर पू. श्री त्र्यंंंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज

उज्जैन येथील सिंहस्थपर्वामध्ये सनातन
 
संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या
 
धर्मशिक्षण फलक आणि ग्रंथप्रदर्शन कक्षांचे उद्घाटन ! 

 

USK_Pradarshan-Udghatan

ग्रंथप्रकाशन करतांना डावीकडून श्रद्धेयप्रवर पू. गुणप्रकाश चैतन्यजी
महाराज, श्रद्धेयप्रवर पू. श्री त्रंंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज, पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

 

ujjain_pu-pingle-kaka

प्रदर्शनाची माहिती देतांना (उजवीकडे) पू. डॉ. चारुदत्त पिंगळे,
त्यांच्या उजवीकडे श्रद्धेयप्रवर  पू. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज,
श्रद्धेयप्रवर पू. श्री त्रंंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज आणि इतर मान्यवर

उज्जैन, २४ एप्रिल (वार्ता.) – आज हिंदु धर्मियांची स्थिती ही बकर्‍यासारखी झाली आहे. इतिहासामध्ये सिंहाचा बळी गेला आहे, असे कधी ऐकले आहे का ? याचे उत्तर नाही असे असून कायम बकर्‍याचा बळी दिला जातो. त्यामुळे हिंदूंनी सिंहासारखे बनायला हवे. हिंदु आणि हिंदुत्व हे सिंहासारखे शक्तीशाली झाल्यास खर्‍या अर्थाने शांती आणि समृद्धी येईल, असे क्षात्रयुक्त प्रतिपादन श्रद्धेयप्रवर पू. श्री त्रंंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज यांनी केले. येथील उजाडखेडा हनुमान मंदिराजवळ सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लावण्यात आलेल्या धर्मशिक्षण फलक आणि ग्रंथप्रदर्शन कक्षाचे उद्घाटन अखिल भारतवर्षीय धर्मसंघ आणि स्वामी करपात्री फाऊंडेशनचे श्रद्धेयप्रवर पू. श्री त्रंंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज यांच्या शुभहस्ते २३ एप्रिल या दिवशी करण्यात आले. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते.
     या वेळी व्यासपिठावर श्रद्धेयप्रवर पू. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, उज्जैन नगरपालिकेचे सभापती श्री. सोनू गेहलोत, उज्जैन नगरपालिकेचे माजी महापौर आणि कुंभमेळा संत सत्कार समितीचे अध्यक्ष श्री. प्रकाश चित्तौडा, हिंदु शौर्य जागरण अभियानचे अध्यक्ष श्री. कैलाश शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी सनातनच्या संत पू. (कु.) स्वाती खाडये यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

संत आणि मान्यवर यांनी केलेले मार्गदर्शन

राष्ट्रीय चेतना जागृत करण्यासाठी सिंहस्थक्षेत्री राष्ट्ररक्षण
 
आणि धर्मजागृती प्रदर्शनाचे आयोजन !  – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

सर्वत्र दिवसेंदिवस भ्रष्टाचार आणि अनैतिकता वाढत आहे. धर्माच्या नावाखाली सर्वत्र अनाचार वाढला आहे. थोडक्यात, सनातन धर्माचा आत्मा अदृश्य झाला आहे आणि त्याचा प्राणहीन देह तेवढा शेष राहिला आहे. अशा स्थितीत हा देश आणि धर्म यांचे सर्वांग असलेला हिंदु समाज धार्मिकदृष्ट्या जागृत होणे आणि त्यात राष्ट्रीय चेतना जागणे महत्त्वाचे आहे. यासाठीच सिंहस्थक्षेत्री राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सनातन संस्थेचे कार्य धर्मानुरूप आहे ! 
– श्रद्धेयप्रवर पू. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज

सदा भव सनातन म्हणजे जे सदैव सनातन आहे. ब्रह्मा, विष्णु, महेश हे सनातन आहेत. तशाच प्रकारे सनातन संस्था आहे. ही संस्था ऋषि आणि महर्षि यांची आहे. संस्थेचे कार्य धर्मानुरूप चालू आहे. चांगला मनुष्य होण्यासाठी सनातन धर्मामध्ये सांगितलेल्या नियमांचे पालन करायला हवे.

सनातन संस्था समाजाला दिशा देण्याचे कार्य करत आहे ! सोनू गेहलोत

सनातन संस्थेचे कार्य हे घनघोर अंधार्‍या रात्रीमध्ये एका दिव्याप्रमाणे आहे. सध्या असलेल्या अनेक संस्था या स्वतःचा विचार आधी करतात; परंतु सनातन संस्था धर्माद्वारे समाजव्यवस्था चांगली करण्यासाठी प्रयत्नरत आहे. संस्थेद्वारे विविध ठिकाणी लावण्यात येणारे प्रदर्शन, भिंतींवर लिहिण्यात येणारी वाक्ये या माध्यमातून समाजाला मार्गदर्शन होते. त्या मार्गदर्शनाची समाजाला आवश्यकता आहे. संस्था संख्यात्मकदृष्ट्या जरी छोटी असली, तरी तिचे विचार आणि कृती ही मोठी आहे.

संस्थेचा उद्देश पवित्र असल्यामुळेच ध्येय निश्‍चितच यशस्वी होणार !
–  प्रकाश चित्तौडा

आज राष्ट्र आणि धर्म यांची अशी स्थिती आहे की, हिंदूंना आपल्या हक्कांसाठी संघर्ष करावा लागतो आहे. त्यामुळेच हिंदूंना संघटित होण्याची आवश्यकता आहे. सनातन संस्था ही हिंदूंना संघटित करण्याचे कार्य करत आहे. संस्थेची शिस्त आणि पवित्र उद्देश यांमुळेच त्यांचे ध्येय निश्‍चितच सफल होणार आहे.

सनातन धर्म, परंपरा, हिंदुत्व यांच्या 
रक्षणासाठी सर्व हिंदूंनी संघटित होणे आवश्यक !

पू. श्री त्रंंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज पुढे म्हणाले, आज राष्ट्रामध्ये अराजकतेचे वातावरण आहे. सध्या भारतीय समाज आशा-निराशेमध्ये जगत आहे. आज अनेक पक्षांच्या विचारांची दलदल झाली आहे. अशा परिस्थितीत सनातन धर्म, परंपरा, हिंदुत्व यांच्या रक्षणासाठी सर्व हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. संघे शक्ति कलौयुगे । या वचनानुसार, एकत्र येणे ही काळाची आवश्यकता आहे.
       या कार्यक्रमाचा प्रारंभ श्रीकृष्णाच्या श्‍लोकाने करण्यात आला. त्यानंतर श्रद्धेयप्रवर पू. श्री त्रंंंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी उपस्थित संत, हिंदुत्ववादी आणि मान्यवर यांचे सन्मान अन् सत्कार करण्यात आले. श्रद्धेयप्रवर पू. श्री त्रंंंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते सनातन संस्थेच्या इंग्रजी भाषेतील कॉम्पोनंट रिक्वायर्ड फॉर कुकींग मिल (Components Required For Cooking A Meal) या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आनंद जाखोटीया यांनी केले.

उपस्थित अन्य मान्यवर

  • हिंदु शौर्य जागरण अभियानचे सचिव श्री. अरविंद जैन
  • गोरक्षा दल अध्यक्ष श्री. राकेश वानवट
  • लेखापरीक्षक आणि रामलीला समितीचे श्री. प्रशांत शर्मा
  • सक्षम संस्थेचे अध्यक्ष श्री. सुभाष पालीवाल
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अवधूत काळे

श्रद्धेयप्रवर पू. श्री त्रंंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज
यांनी 
सनातनच्या स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचे केलेले कौतुक

सनातनचे साधक प्रत्येक दिवशी आत्मावलोकन करतात. आपल्याकडून झालेल्या चुका शोधून त्यावर प्रायश्‍चित्त घेतात. पृथ्वीवर मनुष्य हा एकमेव प्राणी आहे की, त्याच्याकडून चुका होतात. इतर प्राणिमात्रांकडून कोणतीही चूक होत नाही. चुका परत परत करणे, हे घातक आहे. त्यामुळे आपणच आपल्या चुकांचे आत्मावलोकन केल्यास आपल्यात पालट होऊ शकतो. प्रदर्शनामध्ये लावलेल्या फलकांतील विचारांतून आपण आचरण केल्यास आपल्यात मानसिक पालट होऊन आपल्या क्रिया पालटतील.
      सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा देश, राष्ट्र्र आणि हिंदुत्व यांसाठीचा त्याग अनुकरणीय आहे.

–  श्री. अरविंद जैन, सचिव, हिंदु शौर्य जागरण अभियान

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात