हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या संदर्भात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा वारकरी संप्रदायासमवेत खांद्याला खांदा लावून दिलेला लढा !

नागपूर विधीमंडळाबाहेर आंदोलन करतांना वारकर्‍यांसमवेत सनातनचे साधक
नागपूर विधीमंडळाबाहेर आंदोलन करतांना वारकर्‍यांसमवेत सनातनचे साधक
 पू. (कु.) अनुराधा वाडेकर आणि व्यासपिठावर वर्तुळात धर्माचार्य ह.भ.प. वक्ते महाराज
पू. (कु.) अनुराधा वाडेकर आणि व्यासपिठावर वर्तुळात धर्माचार्य ह.भ.प. वक्ते महाराज

हिंदु धर्म, संत, राष्ट्रपुरुष यांच्यावर विविध माध्यमांतून जे आघात होत आहेत. त्या आघातांच्या विरोधात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी वारकर्‍यांसमवेत खांद्याला खांदा लावून लढा दिला आहे. हिंदु धर्मावर आघात करणारे जादूटोणा कायद्याच्या विरोधातील आंदोलन, वारकर्‍यांना सुविधा मिळण्यासाठी केलेले आंदोलन, पंढरपूर-कोल्हापूर-तुळजापूर येथील मंदिर समित्यांचा भ्रष्टाचार आणि अनियमितता बाहेर काढण्यासाठी केलेले आंदोलन, विडंबनात्मक नाटक थरारली वीट याच्या विरोधात केलेले आंदोलन अशा अनेक घटनांत केलेल्या आंदोलनाची नोंद शासनालाही घ्यावी लागली आणि समाजातही मोठ्या प्रमाणात जागृती झाली. त्यातील काही निवडक उदाहरणे देत आहे.

१. कोल्हापूर येथे हिंदुधर्मविरोधी दलित पँथर या संघटनेने केशव ढवळे यांनी प्रकाशित केलेली संत तुकाराम गाथा आम्हाला मान्य नाही, असे कारण पुढे करत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संत तुकाराम महाराज यांची गाथा जाळली होती. याला वारकरी संप्रदायाने मोठ्या प्रमाणात विरोध करत कोल्हापूरात दोन मोर्चे काढले, तसेच निवेदने दिली. यात ह.भ.प. भानुदास यादव महाराज, तसेच अन्य वारकरी सहभागी झाले होते. सांगली येथे ह.भ.प. रमाकांत बोंगाळे महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यामुळे पोलिसांना संबंधितांना अटक करावी लागली होती.

२. पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने केलेला जमीन घोटाळा, देणगी पावत्यांमधील घोटाळा, दागिन्यांच्या मोजमापात घोटाळा, तसेच अन्य घोटाळा हिंदु विधीज्ञ परिषदेने पत्रकार परिषद घेऊन बाहेर काढला होता. या वेळी ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते ह.भ.प. बापू महाराज रावकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट, तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित होते.

३. पंढरपूर येथे मद्य-मांस बंदीच्या विरोधात वारकर्‍यांचे धरणे आंदोलन झाले. यात ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज, ह.भ.प. शिवणीकर महाराज, ह.भ.प. निवृत्ती वक्ते महाराज यांसह समितीचा सहभाग होता.

४. आळंदी येथे गेली १२ वर्षे वारकरी संप्रदायाचे अधिवेशन होते. या अधिवेशनात गोवंश हत्या बंदीची मागणी, धर्मांतर, वारकर्‍यांचे विविध प्रश्‍न, हिंदूंवर होत असलेले अत्याचार यांवर मंथन होते. यासाठी राज्यातून मोठ्या प्रमाणात वारकरी सहभागी होतात. या अधिवेशनाच्या रेट्यामुळेच गोवंश हत्या बंदी होण्यास साहाय्य झाले होते. यातही प्रत्येक वर्षी समितीचा सहभाग असतो.

५. मुंबई येथे केलेली विविध आंदोलने….

अ. मुंबई येथे एका नाट्य निर्मात्याने थरारली वीट या वारकरी, वारी यांच्यावर अश्‍लाघ्य चिखलफेक करणार्‍या नाटकाची निर्मिती केली होती. यात वारीत वेश्या व्यवसाय चालतो, वारकरी व्यसनी असतात, अशा प्रकारे वारकर्‍यांची अयोग्य प्रतिमा रंगवण्यात आली होती. या नाटकावर बंदी येण्यासाठी समितीने वारकर्‍यांसह मुख्यमंत्री, गृहमंत्री, सांस्कृतिक खाते यांना निवेदने दिली, तसेच यावर वारकर्‍यांनी आंदोलनाची चेतावणी दिली होती. यामुळे शासनाला या नाटकावर बंदी आणवी लागली होती. यात ह.भ.प. बापू महाराज रावकर, ह.भ.प. गणेश महाराज पाटील, ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते महाराज यांसह अन्य वारकर्‍यांचा सहभाग होता.

आ. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या घोटाळ्याची चौकशी होण्यासाठी वारकर्‍यांनी आझाद मैदानात आंदोलन केले होते, तसेच वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प रहित होण्यासाठी आंदोलन केले होते.

इ. पंढरपूर येथे मद्य-मांस यांवर बंदी आणावी यांसाठी ह.भ.प. रामेश्‍वर शास्त्री महाराज, ह.भ.प. कृष्णा महाराज अहिरे, तसेच अन्य वारकर्‍यांच्या पुढाकाराने यशस्वी आंदोलन केले होते.

ई. प्रत्येक जिल्ह्यात वारकरी भवन असावे, वारीला अनुदान मिळावे यांसह अन्य मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनात प्रत्येक वेळी हिंदु जनजागृती समितीचा सहभाग होता.

ऊ. सध्या संमत झालेला जादूटोणा कायदा हा हिंदु धर्मावर घाला घालणारा आहे. त्यामुळे तो न होण्यासाठी गेली अनेक वर्षे वारकरी संप्रदायाने हिंदु जनजागृती समितीच्या खांद्याला खांदा लावून आंदोलन केली. यात अनेक वेळी मोर्चा, धरणे आंदोलन, निवेदन यांचा सहभाग होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात