फेअरनेस क्रिम आरोग्यासाठी हानीकारक !

Article also available in :

देहली इन्स्टीट्यूट ऑफ फार्मास्यूटिकल सायन्सेस अ‍ॅण्ड रिसर्चचा निष्कर्ष

नवी देहली – प्रत्येक व्यक्तीला आपण गोरे दिसावे, असे वाटत असते. त्यासाठी ती कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यास सिद्ध असते. त्यामुळे बाजारात फेअरनेस क्रिमला मोठ्या प्रमाणात मागणी असते; मात्र त्वचेला गोरे बनवणार्‍या या क्रीम व्यक्तीच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते आणि त्यामुळे व्यक्तीला अनेक प्रकारचे आजार जडण्याची शक्यता असतेे, असा निष्कर्ष देहली इन्स्टीट्यूट ऑफ फार्मास्यूटिकल सायन्सेस अ‍ॅण्ड रिसर्च या संस्थेने केलेल्या चाचणीतून पुढे आला आहे.

१. या संशोधन संस्थेने बाजारात मिळणार्‍या ११ प्रसिद्ध आस्थापनांच्या फेअरनेस क्रिम्सची चाचणी केली.

२. या संस्थेनुसार भारतात कॉस्मेटिकच्या उत्पादनांमध्ये पार्‍याच्या वापराला अनुमती नसतांनाही या आस्थापनांच्या उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात पारा आढळून आला आहे.

३. पारा एक प्रकारचा न्यूरोटॉक्सिन आहे. जे किडनी, लिव्हर आणि गर्भात वाढणार्‍या मुलांना हानी पोचवू शकते.

४. पारा शरीरात गेल्यामुळे तो कर्करोगाला कारण ठरू शकतो.

५. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (व्हूनुसार) क्रिम आणि साबण यांच्यात आढळणारा पारा त्वचेच्या संबंधित आजारांसह नैराश्य, घाबरणे यांसारख्या आजारांचे कारण ठरू शकतो.

६. पारा पाण्यात मिसळल्यामुळे पर्यावरणाची हानी होते.

७. व्हूच्या मते चीनमध्ये ४० टक्के महिला आणि भारतात ६१ टक्के लोक त्वचेला गोरेपणा आणणार्‍या क्रिमचा वापर करतात.

८. क्रिमच्या विज्ञापनांमध्येही बहुतेकवेळा गोरेपणाला व्यक्तीच्या यशाशी जोडले गेले आहे. याचा भारतियांवर मोठा प्रभाव आहे. देशात चेहरा उजळणार्‍या क्रिमचा व्यापार ३ सहस्र कोटी रुपयांचा आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात