पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा हिंदुत्वनिष्ठांच्या अपूर्व उत्साहात समारोप !

अधिवेशनस्थळ जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्च्या जयघोषाने दुमदुमले !    

भावपूर्ण वातावरणात हिंदुत्वनिष्ठांचा एकमेकांना निरोप

आगामी काळात हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य व्यापक स्तरावर अन् गतीने करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा संकल्प    

विद्याधिराज सभागृह, रामनाथ देवस्थान, रामनाथी (गोवा) : हिंदु राष्ट्र स्थापनेचे सोनेरी ध्येय उराशी बाळगून देशभरात, तसेच विदेशातही अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते निःस्वार्थीपणे धर्म अन् राष्ट्र रक्षणाचे कार्य करत आहेत. हिंदुत्वासाठी लढणार्‍या या शिलेदारांना एखाद्या माळेतील धाग्याप्रमाणे एकत्रित गुंफण्याचे कार्य अखिल भारतीय हिंदू अधिवेशन करत आहे. आध्यात्मिक अधिष्ठान ठेवून धर्मकार्य करणारे हे हिंदुत्वनिष्ठच भविष्यातील हिंदु राष्ट्राचे शिल्पकार आहेत. हिंदुत्वनिष्ठांना धर्मकार्यासाठी आध्यात्मिक आणि मानसिक उर्जा पुरवणारे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन गत ४ वर्षांप्रमाणे याही वर्षी हिंदुत्वनिष्ठांच्या अपूर्व उत्साहात यशस्वीरित्या पार पडले.    

१९ जूनपासून चालू झालेल्या या पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात भारतातील २२ राज्यांसह नेपाळ, श्रीलंका येथील १६१ हून अधिक संघटनांचे ४०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते.   

या अधिवेशनाच्या उत्तरार्धात म्हणजेच २३ ते २५ जून या कालावधीत आयोजित केलेले हिंदु राष्ट्र-संघटक अधिवेशनही हिंदुत्वनिष्ठांना दिशादर्शन करणारे आणि धर्मकार्यातील बारकावे शिकवणारे ठरले. अधिवेशनाच्या समारोप सत्रात देशविदेशातील धर्मबंधूंचा भावपूर्ण वातावरणात निरोप घेत उपस्थितांनी जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्च्या जयघोषात आगामी काळात धर्म अन् राष्ट्र कार्य अधिक व्यापक स्तरावर आणि गतीने करण्याचा संकल्प केला.  

सौ. सायली करंदीकर आणि कु. मयुरी आगावणे यांनी म्हणलेल्या संपूर्ण वन्दे मातरम्ने अधिवेशनाचा समारोप करण्यात आला. हिंदुत्वनिष्ठांचा आणि राष्ट्र्रप्रेमींचा अखिल भारतीय हिंदू अधिवेशनरूपी कुंभमेळा सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे वेध लावून गेला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात