सनातनच्या विरोधात सीबीआय आणि प्रसिद्धीमाध्यमांतील काही लोक नियोजनबद्धरितीने षड्यंत्र रचत आहेत ! – श्री. चेतन राजहंस, सनातन संस्था

प्रूडंट वृत्त वाहिनीवरील मुलाखतीत सनातन संस्थेचे
प्रवक्ता चेतन राजहंस यांनी घेतला विरोधकांचा समाचार !

Chetan_rajhans
वाहिनीवर बोलतांना श्री. चेतन राजहंस

पणजी, २५ जून (वार्ता.) – केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) अधिकृतपणे माहिती दिली नसतांना कपोलकल्पित कहाण्या प्रसिद्ध करून सनातन संस्थेची काही सुपारीबाज पत्रकारांकडून अपकीर्ती केली जात आहे. सनातनच्या विरोधात सीबीआय आणि प्रसिद्धीमाध्यमांतील काही लोक नियोजनबद्धरितीने षड्यंत्र रचत आहेत, असे परखड सत्य सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी प्रूडंट वाहिनीचे संपादक प्रमोद आचार्य यांनी घेतलेल्या मुलाखतीत मांडले. सनातनवर धादांत खोटे आरोप होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रूडंट वाहिनीवरील ‘हेड ऑन’ या कार्यक्रमात श्री. राजहंस यांची ही मुलाखत घेण्यात आली होती. मुलाखतीत आचार्य यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना श्री. राजहंस यांनी दिलेली समर्पक उत्तरे पुढील प्रमाणे आहेत.

मडगाव स्फोट प्रकरणी सनातनला गोवणे हे
तत्कालीन काँग्रेस शासनाचे राजकीय षड्यंत्र !

प्रश्‍न : सनातन संस्थेवर पूर्वी आरोप झाले आहेत. मडगाव स्फोट, तसेच कॉ. गोविंद पानसरे, डॉ. दाभोलकर यांच्या हत्या या शृंखलेचा संबंध सनातनशी जोडला जात आहे. याविषयी तुम्हाला काय वाटते ?

उत्तर : मडगाव स्फोटाच्या प्रकरणी सनातनला राजकीय षड्यंत्राखाली गोवण्यात आले होते. सनातन संस्थेला गोवण्याच्या हेतूनेच प्रथमदर्शनी अहवाल बनवण्यात आला होता, असे न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे. त्या वेळी राज्याचे गृहमंत्री कोण होते, कुठल्या पक्षाचे होते, हेही सर्वश्रृत आहे. प्रत्यक्षात खटल्यास जिल्हाधिकार्‍यांची अनुमती आवश्यकता असतांना तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम् यांच्या आदेशावरून सनातनविरोधात कारवाईचा आदेश देण्यात आला होता. केंद्रीय गृहखाते भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी सनातनचा बळी देण्याचा प्रयत्न करत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ठोका आणि सत्तेत या ही काँग्रेसची मनोवृत्ती होती. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोठा झाला आहे. त्यामुळे सनातन संस्थेला लक्ष्य केले जात आहे.

सरकार पालटले, तरी प्रशासकीय यंत्रणा,
तसेच सीबीआयमधील अधिकारी तेच !

प्रश्‍न : सध्या केंद्रात, गोव्यात आणि महाराष्ट्रात भाजप शासन आहे. अशा परिस्थितीत सनातन संस्थेवर एवढे गंभीर आरोप होत आहेत, त्याविषयी तुमचे काय मत आहे ?

उत्तर : डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआय चौकशी ६ जून २०१४ या दिवशी काँग्रेस शासनाच्या काळात चालू झाली. सनातनच्या आश्रमावर छापा घालणार कि नाही, याविषयी सीबीआय प्रथम आपचे आशिष खेतान यांना माहिती देते. यावरून सीबीआयवर शासनाचे नियंत्रण आहे कि नाही, हे स्पष्ट होते. भाजप शासन आले, तरी प्रशासकीय अधिकारी पूर्वीचेच आहेत. यंत्रणा तशीच आहे. सीबीआयने डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी केरळमधून नंदकुमार नायर नावाच्या अधिकार्‍याला चौकशीसाठी नेमले होते. हेच नंदकुमार नायर यांच्यावर सीबीआयच्या अधिकार्‍यांना फसवणे आदी आरोप झाला आहेत. सर्वोच्च न्यायालयाने असे अधिकारी म्हणजे सीबीआयला लागलेला डाग आहे. अशा अधिकार्‍याला काढून टाकले पाहिजे, असे ताशेरे ओढले होते. अशी डागाळलेली प्रतिमा असलेल्या व्यक्तीला सनातनला गोवण्यासाठी काँग्रेसने चौकशी अधिकारी म्हणून नेमले. अशा अधिकार्‍याकडे चौकशीची सूत्रे असू नयेत, अशी मागणी सनातनने केली. त्यांना सेवामुक्त करा, अशी मागणीही पत्रकार परिषदेतून केली. त्यामुळे नायर आणखी दुखावले गेले. हा अधिकारी आता वचपा काढण्यासाठी खोट्या बातम्या प्रसिद्धमाध्यमांत पेरत आहे. सीबीआयच्या अधिकार्‍यांनी अधिकृतपणे सनातनच्या विरोधात कुठलेही वक्तव्य केलेले नाही. टाइम्स ग्रूपच्या मुंबई मिरर या दैनिकाच्या माध्यमातून सीबीआयचे लोक खोट्या बातम्या पसरवत आहेत. इतर वृत्तपत्रे हीच बातमी घेऊन छापतात. सनातनच्या विरोधात सीबीआय आणि प्रसिद्धीमाध्यमांतील काही लोक नियोजनबद्धरितीने षड्यंत्र रचत आहेत.

मडगाव स्फोटात सनातनच्या साधकांचा
सहभाग नव्हता, हे न्यायालयात सिद्ध झाले !

प्रश्‍न : मलगोंडा पाटील, योगेश नाईक, रुद्र पाटील यांचा मडगाव स्फोटात सहभागच नव्हता, असे तुम्हाला म्हणायचे आहे का ?

उत्तर : हो. आमचे दोन साधक मडगाव स्फोटात मृत्यूमुखी पडले आहेत. याची चौकशी व्यवस्थित व्हायला हवी होती; मात्र तत्कालीन गृहमंत्र्यांनी स्फोट झाल्यानंतर लगेच सनातनवर आरोप करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे आम्हाला या स्फोटाची व्यवस्थित चौकशी करण्याची मागणी करता आली नाही.

प्रश्‍न : मडगाव स्फोटात आरोप असलेले साधक अजूनही फरारी का ? सरकार पालटले आहे. परिस्थितीही पालटलेली आहे. या फरारी साधकांचा बाकीच्या गुन्ह्याशी संबंध जोडला जात आहे. हे साधक शरण आले असते, तर संस्थेला ते चांगले झाले नसते का ?

उत्तर : हो, निश्‍चितच. मी तुमच्या वाहिनीवरून आवाहन करतो की, जिथे कुठे ते असतील, त्यांनी पुढे यावे. ते फरार का आहेत, याचा प्रश्‍न त्यांनाच विचारायला हवा. यापूर्वी अटक झालेल्या साधकांची साडेचार वर्षे कारागृहात वाया गेली, हेही आपण लक्षात घ्यायला हवे. कारागृहात बसून वर्षे वाया जातील, असे कुठेतरी त्यांना वाटत असेल; म्हणून ते शरण येत नसतील, असे आम्हाला वाटते.

प्रश्‍न : फरारी होणे, म्हणजे त्यांचा हात या स्फोटात होता, असा अर्थ काढला जाऊ शकतो ? संशयाचे धुके अजून गडद होत आहे, असे तुम्हाला वाटत नाही का ?

उत्तर : कोणी कसाही अर्थ काढू शकतो. व्यक्ती फरार का होतात, याचाही विचार व्हायला हवा. सध्या खटल्यांतील ९१ टक्के लोक निर्दोष सुटतात, असे एका अहवालातून समोर आले आहे. अटकेच्या काळात निर्दोष आरोपींचे अर्थाजन थांबते, सामाजिक अप्रतिष्ठेला सामोरे जावे लागते. या दृष्टीनेही विचार व्हायला हवा.

प्रश्‍न : बॉम्बस्फोटाचा गुन्हा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा आहे. अशा मोठ्या गुन्ह्यात फरार आरोपी शरण आले असते, तर चांगले झाले नसते का ?

उत्तर : अगदी बरोबर आहे. त्यांनी शरण येऊन न्यायालयीन प्रक्रियेतून जाऊन निर्दोषत्व सिद्ध केले असते, तर बरे झाले असते.

प्रश्‍न : मडगाव स्फोटाच्या दिवशी आरोपींशी डॉ. तावडे यांचे २४ वेळा संभाषण झाले होते, असे समोर आले आहे. या तांत्रिक गोष्टी परिस्थितीजन्य पुरावे म्हणून पुढे येतील का ?

उत्तर : या सर्व कपोलकल्पित गोष्टी आहेत. सीबीआयने अधिकृत पत्रकार परिषद घेतली आहे का ? या आरोपांविषयी काही पुरावे आहेत का ? जेव्हा हे आरोप न्यायालयात येतील, तेव्हा त्यांची छाननी होईल. आज या सगळ्या सुपारीबाज पत्रकारांनी रचलेल्या कहाण्या आहेत. या पत्रकारांच्या कहाण्यांची उत्तरे आपण का द्यायची ?

प्रश्‍न : सनातनवर जे आरोप होत आहेत, त्याचे पुरावे पत्रकार परिषदेत द्या, असे तुमचे सीबीआयला आव्हान आहे का ?

उत्तर : हो. एखाद्या पत्रकाराने उद्या नरेंद्र मोदींवर आरोप केला, तर मोदी यांनी त्याचे उत्तर द्यायला हवे का ? हिंदु जनजागृती समितीवाले ‘आदल्या दिवशी मूर्तीभंजन करायचे आणि दुसर्‍या दिवशी आंदोलन करायचे’, असे विचार दैनिक लोकमतचे संपादक राजू नायक यांनी मांडले आहेत. याला हिंदु जनजागृती समितीने उत्तर द्यायला हवे का ? खोटी कहाणी कशीही रचली जाऊ शकते.

प्रश्‍न : सीबीआयने जनतेला पुरावे दाखवावे, असे तुमचे म्हणणे आहे ?

उत्तर : सीबीआयने याविषयीचे पुरावे न्यायव्यवस्थेसमोर किंवा लोकांसमोर ठेवावे. सनातन संस्थेला काहीही अडचण नाही.

सनातनची शिकवण अध्यात्मावर आधारित आहे !

प्रश्‍न : साधकांवर आरोप होत आहेत. त्यांचे चुकले आहे, असे तुम्हाला वाटते का ? सनातन संस्थेची शिकवण कुठेतरी चुकली आहे का ?

उत्तर : सनातन संस्थेची शिकवण अध्यात्मशास्त्रावर आधारित आहे. त्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म जागृतीचे कार्य चालू आहे. या शिकवणीतून सनातनचे ६५ साधक संत झाले आहेत. सनातनच्या उदात्त शिकवणीमुळे कोणी साधक अशी चूक करुच शकत नाही. सनातनच्या एकाही साधकाला आतापर्यंत शिक्षा झालेली नाही. अटकेत असलेल्या समीर गायकवाडविरोधात सीबीआय साधा पुरावा सादर करू शकलेली नाही. खरे आरोपी सापडलेले नाहीत; म्हणून सनातनच्या साधकांचा बळी देण्याचा प्रकार चालू आहे. डॉ. तावडे आणि समीर गायकवाड हे निर्दोष सुटतील, याची आम्हाला निश्‍चिती आहे. संजय साडविलकर नावाचा खोटा साक्षीदार सीबीआयने उभा केला आहे. कोल्हापुरातील देवस्थान समितीकडून झालेल्या कोट्यवधीच्या चांदीच्या घोटाळ्यात त्याचा हात आहे. घोटाळा सनातनने उघड केल्यामुळे सनातनवर वचपा काढण्यासाठी साडविलकर खोटी जबानी देण्यास पुढे आला आहे.

प्रश्‍न : डॉ. तावडेंना सूचना देणारा (हॅण्डलर) हा सनातनच्या रामनाथी आश्रमात आहे, असे सीबीआयने म्हटले आहे. या दृष्टीकोनातून संस्था अंतर्गत चौकशी करणार आहे का ?

उत्तर : हॅण्डलर कोणीही नाही. वर्ष २००७ मधील समितीच्या कार्याविषयीच्या इमेलचा उल्लेख करून केलेला आरोप चुकीचा आहे. आरोप खरा असता, तर सीबीआयने त्यांना लगेच अटक केली असती.

सनातन संस्था नेहमी वैध मार्गानेच विरोध करते !

प्रश्‍न : डॉ. दाभोलकर यांच्यावर सनातन प्रभातच्या माध्यमातून जहाल टीका केल्यामुळे सनातनच्या साधकांनी पराकोटीची कृती केली, असे तुम्हाला वाटते का ?

उत्तर : सनातन वैध मार्गाने विरोध करते. आम्ही डॉ. दाभोलकर यांच्याविरोधात हानीभरपाईचे खटले दाखल केले होते. लोकशाही मार्गाने आम्ही त्यांना विरोध केला. अंनिसचा कायदा, तसेच डॉ. दाभोलकर यांची प्रत्येक कृती हिंदुविरोधी असल्याचेही लक्षात आले. या व्यक्तीचे नक्षलवादाशी संबंध असल्याचा आरोप झाला. विदेशातून मोठा निधी परिवर्तन ट्रस्टच्या नावाने आणून त्याचा हिशोब शासनाला दिला जात नव्हता. याविषयी तक्रारी केल्या. त्यावरून डॉ. दाभोलकर ६ मासांत कारागृहात गेले असते; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याने सनातनची हानी झाली. साधक विनाकारण या प्रकरणात अडकले आहेत.

समाजाला जागृत करणे, हा संविधानाने दिलेला अधिकार !

प्रश्‍न : जहाल लिखाण करून कडवटपणा निर्माण केल्यामुळे साधक पराकोटीचा निर्णय घेऊन असे कृत्य करू शकतात का ?

उत्तर : साधनेमुळे आत्मबल वाढलेले साधक भावनेच्या भरात कोणतेही अपकृत्य करणार नाहीत. त्यामुळे सनातनच्या साधकांनी १०० टक्के हे कृत्य केलेले नाही. निद्रिस्त समाजाला जागृत करण्यासाठी, तसेच लोकजागृतीसाठी जहाल भाषेत लिहिण्यात गैर नाही. समाजाला जागृत करणे हा संविधानाने आम्हाला दिलेला अधिकार आहे. त्यामुळे सनातन प्रभातच्या माध्यमातून आम्ही लोकशाही मार्गाने लिहितो.

स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे प्रयोजन समाजाचे मनोबल वाढण्यासाठी !

प्रश्‍न : सनातन संस्था ही शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देते ? हे खरे आहे का ?

उत्तर : पत्रकारांना कहाण्या रचायच्या असतात. अलका धूपकर ही पत्रकार रामनाथी येथील सनातन आश्रम बघायला आली. त्यांनी सनातन संस्थेचे विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांची मुलाखत घेतली आणि सनातन शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देते, अशी चुकीची बातमी प्रसिद्ध केली. याविरोधात आम्ही दावा केला आहे. नागरिकांना प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीकोनातून साधकांना प्रशिक्षण दिले जाते. शस्त्रांचे प्रशिक्षण न देता केवळ लाठीकाठी आणि कराटे यांचे प्रशिक्षण देतात. राष्ट्रजागृतीच्या दृष्टीने समाजाला जागरूक करायचे आहे. समाज सामर्थ्यशाली बनला पाहिजे, यासाठी हे प्रशिक्षण दिले जाते. ६ मासांंपूर्वी काश्मीरमध्ये दोन शेतकरीपुत्रांनी नावेद नावाच्या सशस्त्र जिहादी आतंकवाद्याला पकडून दिले होते. त्यांच्यात असलेल्या मनोबलामुळे या दोन शेतकरीपुत्रांनी हे शौर्य केले. समाजामध्येही असेच शौर्य जागृत करण्यासाठी आम्ही समाजाला स्वसंरक्षण प्रशिक्षण देत आहोत. आतंकवादाशी लढण्याचे मनोबल समाजामध्ये निर्माण होण्याचा विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी आम्ही हे प्रशिक्षण दिले.

प्रश्‍न : वैचारिक लढा असला, तरी डॉ. दाभोलकर यांना शत्रू म्हणून संबोधणे कितपत योग्य आहे ?

उत्तर : निरीश्‍वरवादी आणि ईश्‍वरवादी यांच्यातील संघर्षातून समाजात मंथन होत असते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावाने नास्तिकतेचा प्रसार केला जायचा. हिंदु धर्मावर त्यांनी पुष्कळ टीका केली. यामागे साम्यवादी पक्ष होता. जेव्हा सनातनने हिंदु धर्माचा तेजस्वी प्रचार केला, तेव्हा या नास्तिकतावाद्यांचे धंदे बंद व्हायला लागले. आम्ही श्रद्धेचा प्रसार केला, तेव्हा आम्ही अंधश्रद्धा पसरवतो, असा खोटा आरोप या अंनिसवाल्यांनी पत्रकार परिषदांद्वारे केला. आम्ही त्यांच्याविरोधात खटले टाकले. त्यांच्याविरोधात आम्ही वैध मार्गाने लढा उभा केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात