श्री महाकालेश्‍वराच्या नगरीतील मोक्षदायीनी क्षिप्रा नदीत संत आणि भाविक यांनी अमृत स्नान केले !

kumbh_kshipra_snana

क्षिप्रा नदीच्या तिरावर जमलेल्या साधू-संतांच्या मेळाव्यात सनातनचा अध्यात्मप्रसार

उज्जैन सिंहस्थपर्वातील पहिले अमृत (शाही) स्नान !
अमृत स्नानाला एकही शंकराचार्य नाही ! 
संतांच्या आधीच भाविकांनी स्नान केले !

महाकाल सरिक्षिप्रा गतिस्कवा सुनिर्मला ।
उज्जैनियम विशालाक्षी वसाह कस्या नरोचते ॥ – स्कंदपुराण

अर्थ : येथे महाकालाचे देवस्थान आहे. येथे क्षिप्रा नदी आहे आणि हे निश्‍चित आहे की येथे मोक्ष मिळेल. अशा स्थानावर विशालाक्षी प्रिय पत्नी, कोण निवास करू इच्छिणार नाही ?

उज्जैन (मध्य प्रदेश) – जिथे श्री महाकालेश्‍वर आणि क्षिप्रा नदी आहे, तेथे निश्‍चित मोक्ष मिळेल, असे ब्रह्मर्षी वसिष्ठ ऋषींनी आपल्या पत्नीला (अरुंधतीला) सांगितल्याचा स्कंदपुराणात श्‍लोक आहे. उज्जैन या मोक्षदायिनी क्षेत्री २२ एप्रिल या दिवशी सिंहस्थपर्वाच्या निमित्ताने जगभरातून आलेल्या कोट्यवधी श्रद्धाळू भाविक अन् संत-महंत यांनी पहिले अमृत (शाही) स्नान करून अमृततुल्य तृप्ती अनुभवली. संतांच्या पदस्पर्शाने क्षिप्रा नदीही कृतार्थ झाली. या वेळी देशभरातून आलेले विविध आखाडे, खालसे, संप्रदाय आणि आध्यात्मिक संस्था यांचे महंत, महामंडलेश्‍वर, संत, साधू, नागा साधू आणि श्रद्धाळू भाविक यांचे सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विनम्रपणे स्वागत करण्यात आले.

कडक उन्हाळ्यामुळे भाविकांची संख्या घटली !

उज्जैन येथील सिंहस्थपर्वाच्या कालावधीत कडक उन्हाळ्यामुळे साधू-संत, तसेच भाविक यांची संख्या अपेक्षेपेक्षा अल्प झाल्याची माहिती उपस्थित पोलिसांनी दिली. कडक उन्हाळा नसता, तर कितीतरी पटीने भाविकांची संख्या वाढली असती. महाराष्ट्राच्या तुलनेत मध्यप्रदेश शासनाने सिंहस्थपर्वाची व्यवस्था अत्यंत चांगली ठेवली असून एकाही साधू-संतांची नाराजी ओढावली जाऊ नये; म्हणून वरिष्ठ अधिकार्‍यांपासून कर्मचार्‍यांपर्यंत सर्वजण योग्य ती काळजी घेत आहेत. साधू-संतांना हवी तशी सुविधा दिली जात आहे.

प्रथा-परंपरा डावलून संतांच्या आधीच भाविकांनी स्नान केले !

स्नानाची संधी मिळण्यासाठी दूर अंतरावरून आलेल्या भाविकांनी रात्री १२ वाजण्याच्या आधीपासूनच क्षिप्रा तिरी अलोट गर्दी केली होती. त्यामुळे पोलिसांना भाविकांना सांभाळणे कठीण जात होते. रामघाट, नृसिंह घाट आणि अन्य घाट यांचा परिसर दीड किलोमीटरचा असल्यामुळे एकाच ठिकाणी गर्दी झाली नाही. सर्वांना स्नानाची सहज संधी मिळाली; मात्र सिंहस्थपर्वात ब्राह्ममुहूर्तावर विविध आखाड्यांच्या संतांनी स्नान केल्यानंतर दुपारी २ नंतर सर्वसामान्य भाविकांना स्नानाची संधी होती; मात्र भाविकांनी काळ-वेळ न पहाता संतांच्या आधीच स्नान करून प्रथा-परंपरा मोडीत काढली. मध्यप्रदेश शासनानेही महाराष्ट्राप्रमाणे प्रथम संतांचे स्नान झाल्याशिवाय भाविकांना न सोडण्याची कार्यवाही परिणामकारकपणे राबवली नाही. केवळ भाविकांना लष्करी जवानांच्या साहाय्याने रामघाट वगळून अन्य घाटावर स्नानासाठी पाठवण्याचा सोपस्कर पार पाडला.

एकही शंकराचार्य आले नाहीत !

१२ वर्षांतून एकदा उज्जैन येथे भरणार्‍या सिंहस्थपर्वासाठी एकही शंकराचार्य उपस्थित राहिले नाहीत. नुकत्याच महाराष्ट्रात झालेल्या सिंहस्थपर्वाला पूर्णकाळ शारदा आणि द्वारका पीठाधीश्‍वर जगद्गुरु शंकराचार्य श्री स्वरूपानंद सरस्वती उपस्थित होते. तसेच नाशिकचे पालकमंत्री श्री. गिरीष महाजन नाशिक येेथील प्रत्येक पर्वाला जातीने उपस्थित राहून सुव्यवस्था पहात होते.

शैव आणि वैष्णव आखाड्यांचे अमृत स्नान !

सकाळी ५.१५ वाजता शैव आखाड्यांपैकी श्री पंच दशनाम जुना आखाड्याच्या (दत्त आखाड्याच्या) साधूंनी पहिल्या अमृत स्नानाचा मान रामघाटावर मिळवला. त्यानंतर अनुक्रमे श्री पंचायती आवाहन आखाडा, श्री पंचायती अग्नि आखाडा, श्री तपोनिधी निरंजनी आखाडा, श्री पंचायती आनंद आखाडा, श्री पंचायती महानिर्वाणी आखाडा, श्री पंच अटल आखाडा, श्री पंचायती बडा उदासीन आखाडा, श्री पंचायती नया उदासीन आखाडा यांनी सकाळी ११.३० वाजेपर्यंत रामघाटावर स्नान केले, तर वैष्णव आखाड्यांपैकी श्री निर्मोही आखाडा, श्री दिगंबर आखाडा आणि श्री निर्वाणी आखाडा यांनी दुपारी १२ वाजेपर्यंत अमृत स्नान केले, तर सर्वांत शेवटी श्री निर्मल आखाड्याने दुपारी १२.४५ वाजता स्नान केले. सर्व आखाड्यांनी अमृत स्नान करण्यापूर्वी आपल्या आखाड्यांची देवता, शस्त्रदेवता यांचे विधीवत् पूजन करून त्यांना स्नान घातले. त्यानंतर महंत, महामंडलेश्‍वर आणि त्यानंतर साधू अन् नागासाधू यांनी स्वतःच्या शस्त्रास्त्रांसह स्नान केले.
या वेळी मध्यप्रदेश पोलीस, निम्न लष्करी दल, शीघ्र कृती दल, नागरी संरक्षण दल, पाण्यात बुडण्यापासून वाचवण्यासाठी भारत सेवाश्रम संघाचे स्वयंसेवक, तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान बोटींसह तैनात होते.

सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने स्वागत !

पहाटे अमृत स्नानाच्या मार्गावर मिरवणुकांसह आखाड्यांचे साधू-संत येत असतांना सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्या वतीने कापडी फलक घेऊन त्यांचे भावपूर्ण स्वागत करण्यात आले होते. २१ एप्रिल या दिवशी रात्री २ वाजल्यापासून साधक आणि कार्यकर्ते कुंभक्षेत्री स्वागतासाठी आले होते; मात्र पोलिसांच्या असहकार्यामुळे काही काळ अडचण आली. श्री महाकालेश्‍वराच्या कृपेमुळे सकाळी अमृत स्नानासाठी जाणार्‍या मिरवणुका चालू झाल्यावर संत आणि भाविक यांचे स्वागत करण्याची संधी मिळाली.

सिंहस्थपर्वात धर्मशिक्षणाच्या अभावामुळे होत असलेले अपप्रकार

१. उज्जैन येथील सिंहस्थर्वातील पहिल्या अमृत स्नानासाठी आलेले नागा साधू लोकांना आकर्षित करण्यासाठी डोळ्यांवर गॉगल (चष्मा) लावणे. स्वतःची गांजा ओढतांनाची छायाचित्रे विदेशी व्यक्तींना काढण्यासाठी देणे, भाविकांसमोर नग्न उभे राहणे, त्यांच्याकडून पैसे मागणे आणि अन्य विकृत प्रकार भाविकांसमोर करत होते.

२. एका महामंडलेश्‍वरांनी स्वतःच्या अंगावर सोन्याचे खूप दागिने घातले होते. ते सकाळी स्नानासाठी येतांना अंगावरील सोन्याचे दागिने दाखवून जमाना चाहे कुछभी कहे, पर गोल्डनबाबा तो है शिवजी का दिवाना ! या हिंदी गाण्यावर नाचत होते. त्यावर रस्त्यावरील लोक हसून चेष्टा करत होते.

३. एका बहुरूप्याने भगवान शंकराचा वेश परिधान केला होता.

क्षणचित्रे

१. अमृत स्नानासाठी घाटाकडे जाणार्‍या मार्गावर भाविकांनी गर्दी केली होती. साधूसंतांची मिरवणूक घाटाकडे जावी, यासाठी हा मार्ग मोकळा करण्यासाठी पोलिसांनी भाविकांना धक्काबुक्की करत बळाचा वापर केला, तसेच काही ठिकाणी घाटाकडे जाणार्‍या रस्त्यावर निमलष्करी पोलीस भाविकांना फिरू देत नव्हते.

२. पहाटे ५ वाजता विविध आखाड्यांचे महंत आणि महामंडलेश्‍वर हे अमृत स्नान करण्यासाठी घाटावर जातांना आपल्या अनेक भक्तांसमवेत विविध प्रकारच्या रथांतून जात होते.

३. सकाळी घाटावर स्नान करण्यासाठी नागा साधूंचे आगमन झाले. त्या वेळी पोलिसांनी नदीमध्ये स्नान करणार्‍या भाविक महिलांना खेचून बाहेर काढले.

४. घाटावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनीही कर्तव्य बजावत असतांना नदीमध्ये स्नान केले.

५. परमहंस नित्यानंद स्वामी यांच्या आखाड्यामध्ये अनेक विदेशी नागरिक सहभागी झाले होते.

६. प्रत्येक आखाड्यातील महंत, महामंडलेश्‍वर आणि नागा साधू यांच्या स्नानाच्या वेळी हर हर महादेव, जय महाकाल असा जयघोष भाविकांकडून उत्स्फूर्तपणे करण्यात येत होता.

७. घाटावर दोन्ही बाजूला जय गुरुदेव असे ध्वज मोठ्या प्रमाणात लावण्यात आले होते.

८. काही नागा साधू तलवारबाजी करणे आणि इतर साहसी खेळ खेळणे यांची प्रात्यक्षिके भाविकांना दाखवत होते.

९. घाटावर एका बाजूच्या चौथर्‍यावर शिवपिंड होती. त्या पिंडीला अनेक भाविकांचे पाय लागत होते. हे सनातनच्या एका साधकाने पाहिल्यावर संबंधित भाविकांना त्या चुकीच्या कृतीची जाणीव करून दिली आणि होणारी विटंबना थांबवली. (सनातनचे असे साधक हीच हिंदु धर्माची खरी शक्ती आहे ! संपादक) सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते घाटाकडे जात असतांना एका पोलिसाने अडवले. त्या वेळी साधकांनी पुढे जाऊ देण्याविषयी विनवणी केली; परंतु पोलिसाने सोडले नाही. साधकही त्या वेळी तेथेच बाजूला थांबले. त्या वेळी त्या पोलिसाने साधकांशी बोलतांना सांगितले की, सिंहस्थपर्वाची ही सेवा आमच्याकडून श्री महाकालच करवून घेत असतो; म्हणूनच ती पूर्ण होत असते. तुम्ही लोक सात्त्विक दिसता, हे तुमच्या चेहर्‍यावरूनच कळते. थोड्या वेळानंतर अनेक नागरिक पोलिसांना न जुमानता घाटाकडे जात होते. हे पाहून त्या पोलिसाने आपणहून साधकांना घाटाकडे जाण्यास सांगितले.

 संदर्भ : दैनिक सनातन प्रभात