आंदोलनांच्या प्रसारासाठी प्रसारसाहित्य आणि सामाजिक प्रसारमाध्यमे यांचा परिणामकारक वापर करा !

हिंदु राष्ट्र-संघटक अधिवेशनात
सनातन संस्थेच्या कु. कृतिका खत्री यांनी केलेले मार्गदर्शन

१. प्रसारसाहित्य आणि सामाजिक
प्रसारमाध्यमे यांचा प्रभावी वापर करण्याची आवश्यकता

IMG_6966_krutika_khatri_june2016_c१ अ. जगभरात सामाजिक प्रसारमाध्यमांचा वाढता वापर : जगभरात सध्या सामाजिक प्रसारमाध्यमांचा (सोशल मिडीयाचा) वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जगभरात १६५ कोटी जण फेसबूक, ३२ कोटी लोक ट्वीटर आणि १०० कोटी नागरिक व्हॉटस्अप या माध्यमांचा वापर करतात. भारताची लोकसंख्या १३० कोटींच्या आसपास असून यापैकी १४ कोटी लोक फेसबूक, अडीच कोटी लोक ट्विटर आणि १० कोटी लोक व्हॉटस्अप वापरतात. भारतात इंटरनेटचा वापर वाढत असून सामाजिक प्रसारमाध्यमांचा वापरही वाढण्याची टक्केवारी जगभरातून भारतात सर्वाधिक आहे, असे अनेक जागतिक सर्व्हेक्षणे सांगतात. या ठिकाणी जमलेले आपण सर्वजण धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत आहोत. इतक्या मोठ्या प्रमाणात जर जनता या माध्यमांत कार्यरत आहे, तर आपल्यालाही या माध्यमांचा वापर धर्मप्रसारासाठी प्रभावीपणे करण्याची आवश्यकता आहे, हे लक्षात आले असेल. याचे एक चांगले उदाहरण म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी मा. नरेंद्र मोदी यांनी सामाजिक प्रसारमाध्यमांचा प्रभावी वापर करून जनमानसात स्वतःची प्रतिमा निर्माण केली आणि प्रसार चांगल्या प्रकारे केला. त्याचा मोठा लाभ त्यांना निवडणुकीत भरघोस यश मिळण्यातही झाला. आजही अनेक राजकीय पक्ष, संस्था, संघटना या माध्यमांकडे वळत आहेत आणि याचा वापर वाढतच आहे.

१ आ. हिंदुत्वाचे कार्य समाजाभिमुख होण्यासाठी सामाजिक प्रसारमाध्यमे आवश्यक : आपली कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही; मात्र हे हिंदु राष्ट्र व्हावे, ही व्यापक संकल्पना प्रत्येक हिंदुमनापर्यंत पोचवणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळेच सामाजिक प्रसारमाध्यमांचा वापर आपल्यासाठीही महत्त्वाचा आहे. आपल्यापैकी अनेक हिंदुत्ववादी संघटना आणि कार्यकर्ते जीव तोडून हिंदुत्वासाठी कार्य करतात; मात्र त्याला प्रसिद्धी मिळण्यात वा समाजाभिमुख होण्यात आपण कमी पडतो, असे अनेकदा लक्षात येते. हीच उणीव भरून काढण्यासाठी आपल्याला याकडे गांभीर्याने पहायला हवे.

आजच्या घडीला हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने संघटनेचे कार्य करण्यासाठी संतांचे मार्गदर्शन, योग्य वैचारिक दिशा, हिंदूंचे सर्व स्तरावर संघटनासाठीचे प्रयत्न (आंदोलने, सभा, बैठका आदी) आणि समाजमनावर ही संकल्पना बिंबवण्यासाठी प्रभावी जागृती (प्रसिद्धी) या गोष्टी आवश्यक आहेत. यापैकी एखादा घटक कमी पडला, तरी आपली परिणामकारकता कमी होते.

सध्याची बहुतांश मुख्य प्रसारमाध्यमे हिंदूविरोधी बनल्याने आणि प्राप्त परिस्थितीत हिंदूंना स्वतःचे माध्यम चालू करणे शक्य नसल्याने या माध्यमांचा प्रभावी प्रचार करणे आवश्यक आणि सर्वाधिक उपयुक्त आहे. या दृष्टीने याकडे पहायला हवे.

२. सामाजिक प्रसारमाध्यमांचे महत्त्व आणि होणारे लाभ

२ अ. मालदा, तसेच बंगाल येथील दंगलींच्या वेळी सामाजिक प्रसारमाध्यमांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका : दंगलीच्या काळात जेव्हा सेक्युलर वृत्तवाहिन्या हिंदूंवरील अन्याय दाबण्याचा प्रयत्न करतात किंवा खोट्या बातम्या देतात, तेव्हा सत्यस्थिती समोर आणण्यासाठी उपयुक्त असते. काही मासांपूर्वी बंगालमधील मालदा येथे झालेली दंगल, तसेच बंगालमधील हिंदूंवरील अन्याय दाबले गेल्यावर सामाजिक प्रसारमाध्यमांतून त्याची छायाचित्रे आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात प्रसारित केले. त्यानंतर त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित झी न्यूजने हा विषय घेतला आणि देशभरात हा विषय पोहोचला. याद्वारे प्रथमच हिंदूंवर अन्याय होत असल्याचे आणि मुसलमानांना साहाय्य होत असल्याची वस्तुस्थिती समाजापुढे आली.

२ आ. धर्मविरोधकांचे राजकीय षड्यंत्र उघड करण्यासाठीचे प्रभावी माध्यम : धर्मविरोधक ज्या ज्या माध्यमांतून सक्रीय आहेत, त्या त्या सर्व स्तरांवर आपण त्यांना प्रतिकार करायला हवा. आज अनेक धर्मद्रोही वा देशद्रोही लोक या माध्यमांत खूप सक्रीय असल्याने जनमानसांत त्यांचे विचारही पसरत आहेत. एखादी रेघ न पुसता लहान करण्यासाठी, त्यापुढे मोठी रेघ मारावी, त्यानुसार या धर्मविरोधी विचारांचे खंडन करण्यात वेळ देण्यापेक्षा धर्मप्रसाराची मोठी रेघ ओढणे, हे आपल्याला याद्वारे करायचे आहे. काही वेळा खंडन करावेही लागेल; कारण धर्म काय सांगतो, हे लोकांना समजणे आवश्यक आहे. उदा. तृप्ती देसाई यांच्या मंदिरातील गाभारा प्रवेशाच्या आंदोलनाच्या वेळी धर्मशास्त्र काय सांगते, हाच विषय सांगणे अधिक महत्त्वाचे होते. तो सांगत असतांना भूमाता ब्रिगेडवाल्यांचा खोटारडेपणा उघड करणारी छायाचित्रे, वर्तमानपत्रातील बातम्या, तसेच काँग्रेसच्या नेत्यांसोबतची छायाचित्रे वेळोवेळी प्रसारित केल्याने तिच्या आंदोलनातील फोलपणा आणि राजकीय षड्यंत्र उघड झाले. येथे दोन्ही गोष्टींचा प्रसार केल्याने उद्देश सफल झाला.

३. प्रभावी वापर कसा करावा ?

अ. एक चित्र सहस्रो शब्दांपेक्षा प्रभावी असते, असे म्हणतात. त्यानुसार या माध्यमात लिखाण प्रसारित करण्यासह छायाचित्रांचाही प्रभावी वापर करायला हवा.

आ. आपल्या नियोजित प्रत्येक कार्यक्रमाचा प्रसार करण्यासाठी आवश्यकतेनुसार पत्रकांची छपाई, भित्तीपत्रके लावणे यांसह सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारेही करण्याचे नियोजन करावे. त्यातही कार्यक्रमाची पूर्वतयारी, प्रत्यक्ष कार्यक्रम, तसेच कार्यक्रमाची वैशिष्ट्ये अशा सर्व स्तरांवर या माध्यमांद्वारे प्रसार करावा. उदा. एखादी सभा वा आंदोलन घेणार असल्यास त्या संदर्भात घेतलेल्या बैठकांचे, प्रसार करतांनाचे, विषय मांडतांनाचे छायाचित्र आदी प्रसारित करावे. यामुळे वातावरण निर्मिती होण्यास साहाय्य होते.

इ. महत्त्वाच्या कार्यक्रमांचे आकर्षक ध्वनीफिती (ऑडिओ) करून प्रसारित कराव्यात. उदा. सभांसाठी आवाहनात्मक वाक्ये, प्रेरणादायी घोषवाक्ये बनवणे

ई. एखादा महत्त्वाचा विषय असल्यास हिंदी आणि इंग्रजी भाषांत त्याच्या पोस्ट बनवल्यास त्या अन्य राज्यांतही प्रसारित करता येतात.

उ. हा प्रसार कोणी करावा, यासंदर्भातही ठरवायला हवे. प्रत्येकाचे कौशल्य आणि क्षमता यांचा अभ्यास करून प्रत्येकाला कार्याचे वाटप करावे. काही जण चांगले संघटन करू शकतात, काही जण चांगले भाषण करू शकतात, तसेच काही जण चांगले लिखाण करू शकतात, काही जणांना प्रत्यक्ष कार्य करण्याची इच्छा असूनही वेळेअभावी धर्मकार्यात सहभागी होता येत नाही; मात्र त्यांना सामाजिक प्रसारमाध्यमांविषयी माहिती आहे, अशांना यासाठी निवडावे.

ऊ. अशा प्रकारे प्रयत्न केल्याने अवघ्या चार वर्षांत हिंदु जनजागृती समितीच्या फेसबूक पेजचे १३.५ लाख सदस्य झाले आहेत. धर्मप्रसाराच्या अनेक फेसबूक पोस्ट ६-७ लाख लोक लाईक करतात. तसेच व्हॉटस्अपच्या माध्यमातून वर्षभरात १ लाखाहून अधिक लोकांपर्यंत प्रतिदिन धर्मप्रसाराच्या पोस्ट पाठवण्याची यंत्रणा सिद्ध झाली आहे. दिवसेंदिवस यात वृद्धी होत आहे.
कमी वेळात, कमी खर्चात इतक्या लोकांपर्यंत धर्मप्रसार होतो. आज समाजातील सर्वच स्तरांतील लोक या माध्यमांत कार्यरत असल्याने सर्वच स्तरावर धर्मप्रसार होत आहे. कालसुसंगत प्रसार पद्धती अवलंबली, तर काळानुसार त्याचे फळही मिळते.

ए. या सर्व कृती करतांना सध्याचे कायदेही कडक होत आहेत. त्याचा विचार करता आपल्याकडून भावनिक स्तरावर कोणतीही प्रक्षोभक किंवा आक्षेपार्ह लिखाण वा चित्र असलेली पोस्ट प्रसारित करू नये.

ऐ. अनेक जण या माध्यमांचा वापर वेळ दवडण्यासाठी म्हणजेच टाइमपास करण्यासाठी करतात. आपल्याला तसे न करता या माध्यमाचा वापर धर्मजागृतीसाठी करायचा आहे, हे लक्षात ठेवायला हवे.

– कु. कृतिका खत्री, प्रवक्ता, सनातन संस्था, नवी देहली