हिंदुत्वावरील आघात रोखण्यासाठी संतांनी संघटित होणे आवश्यक ! – प.पू. श्रीराम बालकदासजी महात्यागी महाराज

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या अंतर्गत
‘हिंदु राष्ट्र-संघटक अधिवेशना’तील उद्बोधन सत्रात संत-महंतांना आवाहन

IMG_7011_Balakdasji_Maharaj

रामनाथी (गोवा) – हिंदुत्वावर विविध माध्यमांद्वारे आघात होत आहेत. संतांचा छळ होण्याचे प्रमाण प्रतिदिन वाढतच आहे. देशविरोधी आणि धर्मविरोधी षड्यंत्रकार्‍यांनी हिंदुत्व आणि हिंदु संत यांना घेरले आहे. देशभरातील हिंदु संतांचा असंघटितपणा हे याचे मुख्य कारण आहे. ही स्थिती पालटण्यासाठी देशातील संतसमाजाला एका ध्येयाच्या सूत्राने संघटित केले पाहिजे. हिंदु समाज हिंदुत्वनिष्ठांचा अभेद्य गड बनला पाहिजे. यादृष्टीने धोरण ठरवून योजनाबद्ध पद्धतीने ध्येय साध्य होईपर्यंत अविरत कार्य केले पाहिजे, असे मार्गदर्शन ‘छत्तीसगढ गोसेवा आयोगा’चे संरक्षक प.पू. श्रीराम बालकदासजी महात्यागी महाराज यांनी केले. रामनाथी, गोवा येथे २३ जून या दिवशी पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या द्वितीय सत्रातील ‘हिंदु राष्ट्र-संघटक अधिवेशना’च्या ‘हिंदुत्वाचे रक्षण’ या उद्बोधन सत्रात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील हिंदु विद्या केंद्राचे संचालक प्रा. रामेश्‍वर मिश्र, भोपाळ (मध्यप्रदेश) येथील धर्मपाल शोध पिठाच्या संचालिका प्रा. कुसुमलता केडिया आणि हिंदु जनजागृती समितीचे पूर्वोत्तर राज्यांचे समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी प.पू. श्रीराम बालकदासजी महात्यागी महाराज यांचा सन्मान केला.

प.पू. श्रीराम बालकदासजी महात्यागी महाराज पुढे म्हणाले,

१. हिंदूंचे राजकीय दमन आणि सांस्कृतिक शोषण होत आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही, अशा आघातांच्या घटना प्रतिदिन घडत आहेत. हिंदुत्वाच्या विरोधात अशी षड्यंत्रे रचणारे सुरक्षित आहेत आणि हिंदुत्वनिष्ठांना कारावास भोगावा लागत आहे. योगऋषी रामदेवबाबा, स्वामी नित्यानंद, पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू आदी संतांच्या विरोधात मोठी कुभांड रचली गेली आहेत.

२. देशातील संत एकत्रित नाहीत; म्हणून हे आघात होत आहेत. संतसमाज एकत्रित झाला, तर नेहमी विजय आपलाच आहे. संत विरक्त असले, तरी संत हे समाजाचे अंगच आहेत. राष्ट्र, धर्म आणि समाज यांच्या रक्षणार्थ मार्गदर्शन करणे, हेच संताचे कार्य आहे. त्यामुळे राष्ट्र आणि धर्म या दृष्टीने संतांनी संघटितपणे कार्य करणे आवश्यक आहे.

३. आपल्याला दुष्प्रवृत्तीचे भय नाही, केवळ निष्क्रीयतेचे भय आहे. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याप्रमाणे अनेक संघटनांनी पुढे यायला हवे आणि संतांना एकत्रित करण्यासाठी कार्ययोजना बनवली पाहिजे. केवळ लक्षावधी लोकांना रस्त्यावर उतरवून केवळ शक्तीप्रदर्शन करून, आंदोलने करून गोहत्या बंद होत नाही, हा आजवरचा आपला अनुभव आहे.

४. देशातील संत, बुद्धीजीवी लोक संघटित झाले पाहिजेत. यासाठी संतांना भेटले पाहिजे. या संतांना एका सूत्रात जोडले पाहिजे. आपण संकल्प घेऊन कार्यरत राहिलो, तर परमेश्‍वर आपल्याला अवश्य साहाय्य करील.

५. सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक आदी क्षेत्रांत गुलामी असतांना आपल्याला ‘देश गुलाम आहे’, असे वाटत नाही. भारतातील लोक संस्कृतनिष्ठ बनले, तर आपला हिंदु समाज कुठल्याही प्रलोभनांना बळी पडणार नाही आणि समाज अभेद्य किल्ला बनेल. त्यामुळे आपल्या अभेद्य समाजाच्या किल्ल्यात घुसण्याची हिंमत षड्यंत्रकारी करणार नाहीत.

६. हिंदु राष्ट्रासाठी दृढता, एकनिष्ठा आणि समर्पित वृत्तीने कार्य केले पाहिजे. आपण संघटित झालो, तर अधर्मी शक्ती डोके वर काढणार नाहीत.

प.पू. बालकदासजी महाराज यांना हिंदु
जनजागृती समितीविषयी वाटणारा जिव्हाळा !

        प.पू. श्रीराम बालकदासजी महात्यागी महाराज म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समिती ही मला कुटुंबाप्रमाणे आहे. याठिकाणी मार्गदर्शन नव्हे, तर चर्चा करण्यासाठी आलो आहे.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात