सांप्रदायिकांनो, हिंदु राष्ट्र-निर्मितीचे साक्षीदार नव्हे, भागीदार बना ! – पू. तनुजा ठाकूर, संस्थापक अध्यक्ष, वैदिक उपासना पीठ

सांप्रदायिक ऐक्याविषयीच्या सत्रामध्ये दुमदुमला वैश्‍विक संघटनाचा उद्घोष

विविध संप्रदायांतील संतांनी त्यांच्या
अर्जुनरूपी शिष्याला हिंदु राष्ट्र-स्थापनेचा वसा देण्याचे आवाहन !

पू. तनुजा ठाकूर

      विद्याधिराज सभागृह, रामनाथी (वार्ता.) – आज देशातील ९० कोटी हिंदूंपैकी ८५ टक्के हिंदू हे कोणत्या-ना-कोणत्या संप्रदायानुसार अल्पाधिक प्रमाणात साधना करत आहेत. त्यामुळे संप्रदायांचे ऐक्य झाले, तर या देशात हिंदु राष्ट्र येण्यासाठी आवश्यक जनमत सहज सिद्ध होऊ शकते. माझे सर्व संप्रदायांच्या प्रमुख संतांना आवाहन आहे की, आता तुम्ही हिंदु राष्ट्रासाठी तुमचे अर्जुन, हरिहर-बुक्कराय, चंद्रगुप्त मौर्य, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासम असलेले शिष्य द्या ! त्यांना हिंदु-राष्ट्रासाठी समर्पित करा; कारण राष्ट्र टिकले, तर हिंदु धर्म टिकेल. हिंदु धर्म टिकला, तर सांप्रदायिक टिकतील; कारण त्यांच्यात आणि हिंदु धर्मात अद्वैत आहे. सांप्रदायिकांनो, सद्यस्थितीतील संधीकालाचा लाभ करून घ्या ! हिंदु राष्ट्र-निर्मितीचे साक्षीदार नव्हे, भागीदार बना !, असे विद्युल्लतेसम सळसळते मार्गदर्शन गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील वैदिक उपासना पिठाच्या पू. तनुजा ठाकूर यांनी केले. त्या पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात २० जून या दिवशी सायंकाळच्या सांप्रदायिक ऐक्याशी संबंधित सत्रामध्ये बोलत होत्या.

     या वेळी संत श्री आसारामजीबापू यांच्या शिष्या पू. साध्वी रेखाबहनजी स्पिरिच्युअल रिसर्च फौंडेशनचे पू. सिरीयाक वाले, ऑस्ट्रेलियाचे पू. सिरियाक वाले, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे श्री. प्रदीप खेमका, हिंदु महासभेचे श्री. जितेंद्र ठाकुर उपस्थित होते. या सत्रामध्ये सांप्रदायिकांचे ऐक्य झाल्यास वैश्‍विक स्तरावर संघटन दूर नाही, असा उद्घोष करण्यात आला.

पू. तनुजा ठाकूर यांनी केलेले तेजस्वी मार्गदर्शन !

१. सांप्रदायिकांनी अहंचा त्याग करून निव्वळ हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित झाले पाहिजे.

२. आपण केवळ भारतातच साधना करू शकतो; कारण अन्य देश हे संस्कृतीअभावी नरकासमान झाले आहेत.

३. सांप्रदायिकांच्या अस्तित्वासाठीसुद्धा हिंदु राष्ट्रच आवश्यक आहे.

४. आपल्याला केवळ भारतात नव्हे, तर अखंड भारतवर्षात हिंदु राष्ट्राची स्थापना करावयाची आहे ! त्यासाठी सांप्रदायिकांनी समष्टी ध्येय म्हणून त्यांच्या साधकांना हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात सहभागी होण्यास सांगितले पाहिजे.

पू. तनुजा ठाकूर यांना गुरुतत्त्वासंदर्भात आलेल्या अनुभूती

१. मी वैदिक उपासना पिठाच्या नियतकालिकासाठी संपादकीय लिहिणार होते. तेव्हा मी देवाला मनातून विचारले की, मी काय लिहावे ? तेव्हा सांप्रदायिक ऐक्याचा विषय मला सुचला. तो लिहून दिल्यानंतर दुसर्‍या दिवशी या अधिवेशनातील आयोजकांनी मला सांप्रदायिक ऐक्याविषयीच बोलायचे आहे, असे कळवले. यातून गुरु हेच ईश्‍वर असतात, याची अनुभूती मला आली.

२. मी विदेशात गेल्यानंतर मला तेथील वातावरण सात्त्विकतेच्या दृष्टीने नरकासमान वाटू लागले. मनात आले, मला असे का वाटत आहे ? त्यानंतर मी देवाला विचारले, तेव्हा देवाने सूक्ष्मातून सांगितले की, तूच तर गुरूंना मला धर्मप्रसारासाठी नरकात जावे लागले, तरी चालेल, अशी प्रार्थना केली होतीस ना !

– पू. तनुजा ठाकूर, गाझियाबाद, उत्तरप्रदेश.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात