ईश्‍वरी अधिष्ठान आणि संतांचे मार्गदर्शन यांमुळे हिंदू अधिवेशनात अनेक अडथळे येऊनही अधिवेशन उत्तमरित्या पार पडणार !

ज्योतिषांनी ग्रहस्थितीनुसार वर्तवलेले
पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे भाकीत !

१. ईश्‍वरी नियोजन आणि संतांचे मार्गदर्शन यांमुळे
हे हिंदू अधिवेशन अविस्मरणीय होईल !

सौ. प्राजक्ता जोशी ज्योतिष फलित विशारद

    रामनाथी, गोवा येथे १९ ते २५.६.२०१६ या कालावधीत सात दिवसीय पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होत आहे. ईश्‍वर नियोजित हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी होणार्‍या या अधिवेशनापूर्वीपासूनच अनेक अडथळे येतील, तरीही केवळ ईश्‍वरी नियोजन, महर्षींचे आणि संतांचे मार्गदर्शन यामुळे हे हिंदू अधिवेशन अविस्मरणीय होईल. देश-विदेशात धर्मकार्याची किर्ती पसरेल.

२. अधिवेशन काळातील ग्रहस्थितीच्या वर्णनावरून व्यष्टी
आणि समष्टी साधनेचे, तसेच दानाचे महत्त्व

२ अ. अयन संधीकालातील दानाचे महत्त्व

    हे अधिवेशन दक्षिणायन आणि उत्तरायण यांच्या दरम्यान होणार आहे, म्हणजेच अधिवेशनाचा हा काळ अयन संधीकाल आहे. संधीकाळात केलेल्या साधनेचे आणि दानाचे महत्त्व सर्वाधिक असून त्याचे फल अधिक पटींनी मिळते, असे शास्त्रात सांगितले आहे. दान हे सत्पात्री असावे आणि त्याचा योग्य विनियोग व्हावा, असे प्रत्येकाला वाटते. यासाठी हिंदु धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) स्थापनेसाठीच्या या धर्मकार्याला दान केल्यास खर्‍या अर्थाने दानधर्म घडेलच आणि साधनेचे फळही मिळेल.

२ आ. अशुभ काळ असला, तरीही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष
निरपेक्षपणे शरणागतभावे सेवा केल्याने अधिक लाभ होईल !

    सप्तर्षि जीवनाडी पट्टीत महर्षींनी आणि अनेक ऋषींनी या वर्षात अनेक नैसर्गिक आपत्ती येणार आहेत, असे सांगितले आहे. यावर्षी गुरु-राहू चांडाळयोग आणि मंगळ-शनि ग्रह एकाच राशीत आहेत. १८.६.२०१६ पासून शनि ग्रहाच्या व्ययस्थानात मंगळ ग्रह वक्री होत आहे. शुक्र ग्रह अस्तंगत आहे. अशा अशुभ काळात अनेक व्यवहारिक अडथळे येण्याची शक्यता असते. केवळ व्यष्टी आणि समष्टी साधनेने अडथळे नाहीसे होतात, असे अनेक द्रष्ट्या ऋषींमुनींनी सांगितले आहे. यासाठी हिंदु धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीच्या कार्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष निरपेक्षपणे शरणागतभावे सेवा केल्याने अधिक लाभ होईल.

२ इ. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत
प्रत्येक व्यक्तीला देवतांचे आशिष लाभणार आहेत !

    धर्माला आलेली ग्लानी दूर करून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या कार्यात प्रत्येक हिंदु धर्माभिमानी व्यक्तीने आपापल्या परीने सहभागी होणे आवश्यक आहे. व्यष्टीपेक्षा समष्टी साधना श्रेष्ठ असल्याने प्रत्येक व्यक्तीला देवतांचे आशिष लाभणार आहेत.

३. पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन काळातील ग्रहस्थिती

   महर्षींनी सांगितल्यानुसार या वर्षी अनेक अशुभ ग्रहयोग आहेत. अधिवेशन काळात गुरु ग्रह सिंह राशीत राहूयुक्त, शुक्र अस्त, शनि शत्रू राशीत, शनि ग्रहाच्या व्ययस्थानात मंगळ, अशी अशुभ ग्रहस्थिती आहे. असे असले, तरीही अधिवेशनाच्या चतुर्थ दिनापासून अधिवेशनाच्या सांगतेपर्यंत ऊर्ध्वमुख नक्षत्र आहे. त्यामुळे या अधिवेशनाची फलनिष्पत्ती उत्तरोत्तर वाढत जाईल. अधिवेशनाचे अचूक आणि परिपूर्ण नियोजन सर्वांनाच प्रभावित करणारे ठरेल. अधिवेशनाच्या या समष्टी कार्याला अनेक संतांचे आशीर्वाद प्राप्त होतील. भगवंताचे अधिष्ठान असणार्‍या या अधिवेशनामुळे जगभर हिंदु धर्मजागृतीच्या कार्याला गती मिळेल. साधना म्हणून सहभागी होणार्‍या अनेकांची आध्यात्मिक प्रगती होईल. अशुभ दिवस किंवा अशुभ योग वैयक्तिक कार्यासाठी अशुभ असले, तरीही समष्टी कार्यासाठी याचे बंधन नाही; कारण येथे नामासहित समष्टी सेवेचे कार्य होत असल्याने ते पुण्यकारक आहे.

३ अ. पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन काळातील प्रत्येक दिवसाचे विशेष योग

   पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या प्रत्येक दिवसाचे विशेष योग पुढीलप्रमाणे असतील.

३ अ १. रविवार – १९.६.२०१६ : या दिवशी ज्येष्ठा हे राक्षस गणी आणि तिर्यकमुख नक्षत्र, विष्टी करण, वृश्‍चिक राशीतील दूषित चंद्र, दूषित चंद्राची शत्रूराशीतील शनीसह युती, चंद्र-हर्षल त्रिकोण योग, मंगळ-हर्षल षडाष्टक योग, असे अशुभ योग असले, तरीही या दिवशी दुपारपर्यंत ज्येष्ठ शुक्ल चतुर्दशी आणि त्यानंतर वटपौर्णिमा ही तिथी आहे. रविवारी प्रारंभ होणार्‍या कार्याला रविसारखे (सूर्यासारखे) तेज प्राप्त होते. या काळात रवि हा ग्रह मिथुन या मित्र राशीत आहे. रवि हा पितृकारक ग्रह असल्याने वडीलधारी व्यक्ती, अनेक संत आणि महर्षी यांचे आशीर्वाद प्राप्त होतील.

३ अ २. सोमवार – २०.६.२०१६ : या दिवशी पौर्णिमा ही तिथी आहे. या दिवशी रवि-चंद्र, चंद्र-शुक्र आणि बुध-शनि यांच्यात प्रतियुती होणार आहे. अधोमुख नक्षत्र आहे. दक्षिणायनाला प्रारंंभ होणार आहे. या दिवशी पुण्यकाल सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत आहे. अयन संधीकालातील या दिवशीच्या सत्रांत ईश्‍वराचे अस्तित्व अनुभवता येईल.

३ अ ३. मंगळवार – २१.६.२०१६ : या दिवशी करिदिन असला, तरीही चंद्र-गुरु नवपंचम योग आणि चंद्र-नेपच्यून लाभयोग आहे. यामुळे दुपारच्या सत्रानंतर या अधिवेशनातील सहभागी हिंदूंचे चिंतन योग्य दिशेने होण्याची शक्यता आहे. अनेक विचारवंत, बौद्धिक क्षेत्रात कार्य करणार्‍या व्यक्ती आणि विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी एकत्र येतील.

३ अ ४. बुधवार – २२.६.२०१६ : अधिवेशनाच्या सत्र समाप्तीपर्यंत (सायंकाळी ५.१८ मि. पर्यंत) उत्तम दिवस आहे. महर्षींनी सांगितल्यानुसार श्रीविष्णूच्या जयंतावताराचे (प.पू. डॉक्टरांचे) ऊर्ध्वमुख नक्षत्र आहे. यामुळे विजय धर्माचा म्हणजे सत्याचाच आहे. प्रथम तीन दिवसांच्या तुलनेत आजपासून अधिवेशनाच्या कार्याला गती येईल. या दिवशी चंद्र-मंगळ लाभयोग असल्याने अधिवेशनात सहभागी असणार्‍या सर्वांचाच उत्साह वृद्धींगत होईल. चंद्र हा ग्रह सर्वाधिक कीर्ती मिळण्यासाठी अतिशय अनुकूल असतो. देश-विदेशातील हिंदूंचा सहभाग वाढेल. कार्य वृद्धींगत होईल. प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून कार्याचा व्यापक प्रसार होईल. सत्कार्य व्यापकत्वाच्या दृष्टीने एखादी घटना घडण्याचा संभव आहे.

३ अ ५. गुरुवार – २३.६.२०१६ : या दिवशी चंद्र-शनि लाभयोगात असून चंद्र शनीच्या मकर राशीत आहे. ऊर्ध्वमुख नक्षत्र आहे. या दिवशी होणार्‍या सत्रातील सूत्रांवर उपस्थितांचे चिंतन वाढेल. विचारांना प्रत्यक्ष कृतीची व्यापक प्रमाणात जोड मिळेल.

३ अ ६. शुक्रवार – २४.६.२०१६ : हा उत्तम दिवस आहे. ऊर्ध्वमुख नक्षत्र आहे. अनेक चांगल्या घटना घडण्याचा संभव आहे.

३ अ ७. शनिवार – २५.६.२०१६ : या दिवशी चंद्र-नेपच्यून युतीयोग कुंभ राशीत (वायुतत्त्वाची रास) आहे. चंद्र हा मनाचा कारक आणि नेपच्यून हा अध्यात्मासारख्या गूढ विषयांचा कारक आहे. आध्यात्मिक अधिष्ठान असणारे हे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन प्रत्येकालाच उत्साही आणि प्रोत्साहित करेल. अधिवेशन संपूच नये, असे अनेकांना वाटण्याची शक्यता आहे. यासाठी प्रत्येक व्यक्ती आणि साधक यांनी आपापल्या परीने यात सहभागी झाले पाहिजे.

   अधिवेशनाचे प्रथम तीन दिवस अशुभ आहेत. प्रथम चार अधिवेशनांचा प्रारंभ शुभ नक्षत्रावर झाला; परंतु यावर्षी प्रारंभदिनी अशुभ नक्षत्र आहे. यासाठी कार्यस्थळी श्री शिवमहिम्नस्तोत्राचे वाचन केल्यास लाभ होईल. (प्रत्यक्षात हे वाचन करण्यात आले. – अधिवेशनाचे आयोजक)

   ज्या कार्याचा परिणाम दीर्घकाळ टिकणे अपेक्षित आहे, अशी कार्ये शुभदिनी ऊर्ध्वमुख नक्षत्रावर करतात. पू. संदीप आळशी यांनी पुढील वर्षीसाठी मुहूर्त आधीच पाहून सुनिश्‍चित करण्यास सांगितला आहे.

   संतांचे मार्गदर्शन आणि ईश्‍वरी अधिष्ठान लाभलेल्या अधिवेशनाविषयीची ग्रहस्थिती देवाने लक्षात आणून दिल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. याविषयी मी ईश्‍वरचरणी पुष्कळ कृतज्ञ आहे.
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.६.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात