पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातील प्रथम दिनाचा वृत्तांत आणि क्षणचित्रे

हिंदु विधीज्ञ परिषदेचे रणझुंजार
अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा विशेष सत्कार !

IMG_5002_1
अधिवक्ता संजीव पुनाळेकर (डावीकडे) यांचा सत्कार करतांना सनातनचे संत पू. नंदकुमार जाधव

केवळ अधिवक्ता नव्हे; हे तर रणझुंजार योद्धा !
महर्षींचे कृपापात्र आपण, निर्भीड धर्मप्रवक्ता ॥

       विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) – वर्ष २०१२ मध्ये पहिल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामध्ये धर्माभिमानी अधिवक्त्यांच्या संघटनासाठी हिंदु विधीज्ञ परिषदेची स्थापना झाली. त्यानंतर केवळ चारच वर्षांत हिंदु विधीज्ञ परिषदेने धर्माशी संबंधित विविध कार्यात सुयश मिळवले. ६४ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर तन, मन आणि धनाने हिंदुत्ववाद्यांना न्यायालयीन साहाय्य करतात. सध्या ते त्यांचा ६० टक्के वेळ धर्मकार्यासाठी देत आहेत. त्यांचे हे कार्य समस्त अधिवक्त्यांना प्रेरणा देणारे आहे.

       या यशस्वीतेविषयी परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांचा सनातनचे संत पू. नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते पुष्पहार, शाल, श्रीफळ आणि सनातन-निर्मित श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

अधिवक्ता पुनाळेकर यांच्या नेतृत्वाखाली
हिंदु विधीज्ञ परिषदेला लाभलेल्या सुयशाची ठळक उदाहरणे

१. मुंबईतील आझाद मैदानात ऑगस्ट २०१२ मध्ये झालेल्या दंगलीतील रझा अकादमीच्या गुंडांकडून हानीभरपाईची वसुली करण्यास शासनाला भाग पाडले.

२. कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरासह ३ सहस्र ६२ देवळांचे नियंत्रण करणार्‍या पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघड केला. आंदोलन उभे केले आणि शासनाला सीआयडी चौकशी करण्यास भाग पाडले.

३. पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची साडेतीनशे एकर आणि शासनाची १० सहस्र एकर हडपलेली भूमी पुन्हा मिळवण्यास शासनाला भाग पाडले.

४. प्लास्टिकच्या माध्यमातून होत असलेल्या राष्ट्रध्वजाच्या अवमानाच्या विरोधात कठोर कारवाई करण्यास शासनाला भाग पाडले.

५. ठाणे स्फोट प्रकरण, मालेगाव स्फोट प्रकरण, मडगाव स्फोट प्रकरण आदींमध्ये नाहक गोवले गेलेल्या निरपराध हिंदूंचे खटले निशुल्क चालवले.

६. मडगाव (गोवा) स्फोटाच्या खोट्या आरोपांतून सनातन संस्थेच्या ६ साधकांची मुक्तता !

७. हिंदूंची धर्मनिष्ठ बाजू निर्भीडपणे विविध वृत्तवाहिन्यांद्वारे समाजापर्यंत पोचवली !

क्षणचित्रे

१. अधिवेशनाचे उद्घाटनपर दीपप्रज्वलन होताच, पाऊस पडण्यास आरंभ झाला. अधिवेशनाला लाभलेला हा वरुणाशीर्वाद होता.

२. सनातनच्या साधिका ज्योतिष फलित विशारद सौ. प्राजक्ता संजय जोशी यांनी अधिवेशनाच्या संदर्भातील ज्योतिषशास्त्रानुसार केलेले विश्‍लेषण वाचून दाखवण्यात आले.

३. उद्घाटन समारंभाच्या प्रारंभी शंखनाद आणि सनातन साधक पुरोहित-पाठशाळेच्या ब्रह्मवृंदाद्वारे वेदमंत्रपठण करण्यात आले.

४. श्री विद्याधिराज सभागृह उपलब्ध करून देणार्‍या श्री रामनाथ देवस्थानचे श्री. रमाकांत आंगले यांचेही या वेळी स्वागत करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात