प.पू. परशराम पांडे महाराज यांनी प्रतिपादन केलेला गोवा येथील पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या आयोजनातील सूक्ष्म भाग

प.पू. डॉक्टरांनी विश्‍वकल्याणासाठी आयोजित केलेली
इंद्रसभा (अधिवेशन) म्हणजे भगवंताचे निर्गुणातील विराट कार्य असून
सर्वांनी संघटनशक्ती वाढवल्यास महिषासुरमर्दिनीची शक्ती निर्माण होईल !

PP_pande_maharaj
प.पू. परशराम पांडे

गोवा येथील पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन म्हणजे इंद्रसभा आहे. त्यासाठी देवतांना निमंत्रित केले जात आहे. धर्मकार्यामुळे सर्वांचा उद्धार व्हावा, यासाठी धर्मग्लानी दूर करतांना ईश्‍वरच त्यांना निमंत्रित करतो.

 

 

 

१. इंद्र म्हणजे कोण ?

     इंद्र म्हणजे सर्व देवांचा राजा ! सदैव विजयी असणारा, सर्व दृष्टीने सामर्थ्यशाली असणारा, मोठमोठ्या संकटांना सामर्थ्याने सामोरे जाऊन सहस्र यज्ञ यशस्वीपणे संपन्न करणारा शतक्रतो (१०० यज्ञ करणारा), वृत्रहन्ता (वृत्र या असुराला मारणारा) असा तो इंद्र ! अशा इंद्राची सभा म्हणजे आजचे हे पंचम अधिवेशन आहे.

२. इंद्रसभेतील उपस्थिती

     इंद्रसभेत विश्‍वातील इंद्र, दिक्पाल देवता, सप्तर्षि, नवग्रह देवता, ब्रह्मा, विष्णु, महेश, कालभैरव, क्षेत्रपाल देवता, ग्रामदेवता, स्थानदेवता, वास्तुदेवता, राजराजेश्‍वरी, महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली आदी देवता, ऋषीगण, महामुनी, संत, महात्मे, सर्व चैतन्यमय स्रोेत असलेले नद्या, पर्वत, तीर्थक्षेत्रे आदी सूक्ष्म रूपाने उपस्थित असतात. या इंद्रसभेत केवळ मानवाचा विचार न होता सर्व जिवांच्या, प्राणीमात्रांच्या कल्याणास्तव परामर्श घेतला जातो, म्हणजेच येथे सर्व विश्‍वाचे नियोजन केले जाते.

३. सध्या या सभेत कोणाला आमंत्रित केले जाते ?

    समाजात हिंदु धर्मासाठी समर्पणभावाने प्रत्यक्ष कार्य करणार्‍या हिंदु धर्माभिमानी व्यक्तींनाच या सभेमध्ये आमंत्रित केले आहे. जेणेकरून पुढील हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) नियोजनासाठी ते आत्मियतेने कार्य करतील.

४. सध्याचे दुष्ट शक्तीचे प्राबल्य आणि धर्मावर आलेली ग्लानी
दूर होऊन सृष्टीचे संतुलन व्हावे, या उद्देशाने सभेचे आयोजन !

    .चैतन्य हे सगुण-निर्गुण आहे. तेच देवता आणि अन्य सर्वांच्या माध्यमातून कार्य करते. तेच सर्वांवर नियंत्रण ठेवते. ही चैतन्यशक्ती सार्वभौम आहे. ती स्वसंवेद्य आहे. जरी दृश्य स्वरूपात या शक्तीची विविध रूपे दिसत असली, तरी प्रत्यक्षात कार्य करणारी एकच महान शक्ती आहे. सध्या त्रिगुणांचे असंतुलन झाले असल्याने रज-तमांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दुष्ट शक्ती प्रगट होऊन मोठ्या प्रमाणात अनाचार, अधर्माचरण करत आहेत. यासाठी धर्मावर आलेली ग्लानी दूर होऊन सृष्टीचे संतुलन व्हावे आणि सर्वत्र सुखशांती निर्माण व्हावी, हा विचार या सभेत होणार आहे.

५. अधिवेशन म्हणजे निर्गुणातील विराट कार्य !

५ अ. सतत विश्‍वाचाविचार करून विराट शक्ती निर्माण करणे, हीच साधना !

विश्‍वव्यापक विचारांनी ती विराट शक्ती तुमच्यात येते. यासाठी विराट शक्तीला अभिषेक करायचा आहे. त्या विराटाचे चिंतन करायचे आहे. विराटाचे चिंतन म्हणजे शिवपिंडीवर असलेली संततधार ! तसा संतत विराटाचा विचार मनात असला पाहिजे. संतत म्हणजे खंड न पडता ! अशा संतत विचाराला अभिषेक म्हणतात. सतत विश्‍वाचा विचार केल्यानेच विराट शक्ती निर्माण होईल. ही साधना आहे, पूजा आहे. ही पूजा आत्मोद्धारक आहे; म्हणून प्रत्येकाने विराटासोबत राहिल्यास तो विश्‍वव्यापक बनून त्याची विराट शक्ती त्याला मिळू शकते.

५ आ. विराट शक्तीचा लाभ घेण्यासाठी या इंद्रसभेचे प्रयोजन !

अधिवेशन हे निर्गुणातील विराट कार्य आहे. सगुणातील कार्य हे प्राथमिक (पहिल्या वर्गातील धड्याप्रमाणे) असते. आवरणाची पूजा सगुणाची पूजा आहे. निर्गुणातील कार्य हे पुढच्या टप्प्याचे आणि मोठे कार्य आहे. विराट हे निर्गुण आहे. निर्गुण असीमित आहे. सगुण हे सीमित आहे, तर विराट हे अनंत आहे. मनाद्वारे व्यक्त आणि अव्यक्त यांना जोडायचे आहे. ते चैतन्य आणि विराट यांना जोडणारे आहे. विराट होण्यासाठी अभिषेक करायचा आहे. अशा विराट शक्तीचा लाभ घेण्यासाठी ही इंद्रसभा बोलावली आहे.

५ इ. सर्व हिंदु धर्माभिमान्यांनी आपली शक्ती एकवटून
संघटनशक्ती निर्माण केल्यास महिषासुरमर्दिनीची शक्ती निर्माण होणे शक्य !

धर्माचरणाद्वारे अशा महान चैतन्यशक्तीशी अनुसंधानित राहिल्यास ती चैतन्यशक्ती महिषासुरमर्दिनीचे रूप घेऊन प्रगट होईल आणि तीच त्या दुष्टांचे पारिपत्य करून विजय मिळवून देईल. जसे देवादिकांनी आपआपली शक्ती महिषासुर मर्दिनीमध्ये संघटित करून त्याद्वारे मोठमोठ्या अनेक आसुरी शक्ती नष्ट केल्या, तसे सर्व हिंदु धर्माभिमान्यांनी एकत्र येऊन आपली शक्ती एकवटून संघटनशक्ती निर्माण करावी, म्हणजे महिषासुरमर्दिनीची शक्ती निर्माण होईल. आतापर्यंत प्रत्येक धर्माभिमानी एकेकटा कार्य करत होता. त्यामुळे त्यांना अपेक्षित असा विजय मिळत नव्हता; परंतु आता संघटितपणे कार्य करण्याचा लाभ त्यांच्या लक्षात येऊ लागला आहे. प.पू. डॉक्टरांच्या संकल्पशक्तीने हे साध्य होतांना दिसत आहे. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) निर्मिती झाली की, सर्वांच्या विविध समस्या सहज सुटून जातील, यासाठी हिंदु राष्ट्र निर्मितीकडे लक्ष देऊन सर्वांनी त्यानुसार कार्य करावे.)

६. चैतन्यशक्तीचा होणारा लय थांबवून चैतन्यवृद्धी
करण्यासाठी हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) आवश्यकता !

सध्या काळ्या शक्तीच्या आवरणामुळे चैतन्यशक्तीचा लय होत आहे. त्याचे संवर्धन करण्याचे कार्य करायचे आहे. चैतन्यशक्तीच संतुलन प्रस्थापित करत असल्याने विश्‍वशांतीसाठी सत्त्वगुणाद्वारे चैतन्यवृद्धी करणे, हाच यावरील उपाय आहे. त्यासाठी हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) आवश्यकता आहे. वेदांत सांगितल्यानुसार चैतन्याचे स्रोत असलेल्या नद्या, वृक्ष, गाय, बैल आदींच्या माध्यमातून चैतन्याची पुनर्निर्मिती होऊ शकते.

     प.पू. डॉक्टरांनी आयोजित केलेली ही इंद्रसभासुद्धा (अधिवेशनसुद्धा) विश्‍वकल्याणासाठी आहे, हे यावरून दिसून येते.

७. अधिवेशनाला परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा कृपाशीर्वाद !

     या अधिवेशनाला परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा कृपाशीर्वाद लाभला आहेच. वास्तविक हे सर्व कार्य त्यांच्या संकल्पशक्तीद्वारेच होत आहे. या इंद्रसभेत उपस्थित असलेले सर्व जण केवळ निमित्तमात्र आहेत, याची जाणीव ठेवल्यास त्या प्रत्येकाचे कल्याणच होणार आहे.

– प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (९.६.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात