आजपासून रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला प्रारंभ !

Hindu_rashtra

रामनाथी (गोवा) – गत ४ वर्षांच्या यशस्वी अधिवेशनानंतर यावर्षीही फोंडा, गोवा येथील श्री रामनाथ देवस्थानच्या विद्याधिराज सभागृहात अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाचे यंदाचे पाचवे वर्ष आहे.

आज १९ जूनला विविध संतांच्या उपस्थितीत अधिवेशनाचा शुभारंभ होत आहे. यामध्ये संतांचे अमूल्य मार्गदर्शन होईल. या अधिवेशनास भारतातील २२ राज्यांसह नेपाळ आणि श्रीलंका येथील १६१ हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ४०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. अधिवेशनाचे थेट प्रसारण संकेतस्थळाद्वारे होणार असल्याने जगभरातील हिंदू या अधिवेशनाशी जोडलेले असतील. २५ जूनपर्यंत चालणार्‍या या अधिवेशनात हिंदु राष्ट्राच्या अनुषंगाने विचारविनिमय होणार आहे. आसेतुहिमाचल हिंदूंचे अभेद्य संघटन निर्माण करण्याच्या दृष्टीने हे पंचम अधिवेशन मैलाचा दगड ठरणार आहे.

मागील ४ अधिवेशनांत निश्‍चित झालेल्या समान कृती कार्यक्रमांतून प्रेरणा घेऊन हिंदुहिताचे आणि हिंदूसंघटनाचे विविध उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आले आहेत. याच कार्याला अधिक गती देण्याचा प्रयत्न या अधिवेशनाद्वारे होणार आहे. मंदिररक्षण, संस्कृतीरक्षण, गोरक्षा, हिंदूंच्या मानबिंदूंचे रक्षण, धर्मांतर आणि लव्ह जिहाद याविषयी कार्याची पुढील दिशा अधिवेशनात ठरणार आहे. काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, कलम ३७० रहित करणे, गोवंश हत्या बंदी, श्रीराम मंदिराचे पुनर्निर्माण आदी विषयांवर सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे आता हिंदु संघटनांकडून पुढाकार घेऊन हिंदु राष्ट्राचा उद्घोष जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या अधिवेशनाच्या माध्यमातून निर्धार करण्यात येणार आहे.