सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनस्थळी अवतरली संतांची मांदियाळी

ग्रंथ बघतांना श्री. खेमराज शर्मा (मध्यभागी) आणि त्यांना माहिती सांगताना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे (उजवीकडे)
पू. रामगिरी बापू यांचा सन्मान करतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
डावीकडून श्री. अनिल वर्मा, श्री. आप्पासाहेब सांगोलकर, पू. (कु.) स्वाती खाडये आणि निशशंका दालानी

   उज्जैन – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनस्थळी संतांची मांदियाळी अवतरली. १८ मे या दिवशी रायपूर, छत्तीसगड येथील सदाविप्र समाज सेवाचे राष्ट्रीय संघटक श्री. खेमराज शर्मा यांनी सनातनच्या प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी सनातन संस्थेचे श्री. मिलिंद पोशे यांनी त्यांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. यावर श्री. शर्मा म्हणाले, प्रदर्शन बघून अनेक साधकांनी केलेल्या तन-मन-धनाच्या त्यागाची जाणीव होते. अशी त्यागी वृती असलेल्या साधकांकडूनच या भूमीवर सनातन हिंदु धर्माची ध्वजा परत फडकेल, याची निश्‍चिती वाटते.

   १९ मे या दिवशी मैहसाना, गुजरात येथील जीवन पथिक आश्रम, कैलाश धामचे पू. रामगिरी बापू यांनी प्रदर्शनाला भेट दिली. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते श्रीफळ आणि ग्रंथ भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. महाराज प्रतिदिन पूजेत सनातनच्या उदबत्त्यांचाच वापर करत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी महाराजांनी पू. डॉ. पिंगळे यांना त्यांच्या आश्रमभेटीचे निमंत्रण दिले.

   १९ मे या दिवशीच राष्ट्रीय सफारी कर्मचारी आयोग, भारत सरकारचे पूर्व मध्यप्रदेश समन्वयक श्री. अनिल वर्मा यांनी श्रीलंका येथील बौद्ध धर्मीय निशशंका दालानी यांनाही प्रदर्शन दाखवण्यासाठी आणले. भारतीय भाषा समजण्यात अडचण असतांनाही निशशंका दालानी यांनी सर्व प्रदर्शन बघितले आणि इंग्रजी भाषेतील धर्मशिक्षा फलक ग्रंथ घेतला. सदर ग्रंथ त्यांना साधकांच्या हस्ते मिळावा, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवल्यावर सनातनच्या संत पू. (कु.) स्वाती खाडये यांच्या उपस्थितीत सनातनचे साधक श्री. आप्पासाहेब सांगोलकर आणि श्री. अनिल वर्मा यांच्या हस्ते त्यांना ग्रंथ देण्यात आला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात