भाविकांना साधना सांगण्यासाठी प्रसार पद्धतींचा अवलंब !

प्रदर्शन बघायला जमलेली लोकांची गर्दी
 

     उज्जैन – येथील सिंहस्थपर्वाच्या समाप्तीला केवळ एक आठवडा शिल्लक असल्याने स्नानासाठी घाटावर भाविकांची जशी गर्दी होत आहे त्या प्रमाणेच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या प्रदर्शनाकडेही भाविकांचा ओघ वाढत आहे. येणार्‍या सर्व जिज्ञासूंना साधनेची व्यवस्थित माहिती सांगता यावी, तसेच ग्रंथ बघता यावे म्हणून प्रदर्शनातील साधकांनीही ग्रंथ असलेले अंगफलक घालून जिज्ञासूंना माहिती सांगणे चालू केले आहे. याचा जिज्ञासूंवरही सकारात्मक परिणाम होऊन त्यांच्याकडूनही साधनेविषयक अजून जिज्ञासेने माहिती जाणून घेतली जात आहे. 

अंगफलक घालून सेवा
करतांना साधकांना जाणवलेली वैशिष्ट्ये

१. श्री. मिलिंद पोशे : अंगफलक घालून सेवा केल्यावर आध्यात्मिक उपाय होत असल्याचे जाणवले.

अंगफलक घालून लोकांना माहिती सांगतांना साधक

     स्वत:च्या देहाजवळ चैतन्याचे कवच निर्माण झाले आहे असे वाटले. लोकांच्या मन-बुद्धीवर असलेले आवरणही ग्रंथातील चैतन्यामुळे न्यून होत असल्याचे जाणवले. मागील दिवसांच्या तुलनेत लोकांचा प्रतिसाद अधिक होता. महाप्रसादासाठी (दुपारच्या जेवणासाठी) गेल्यावर रस्त्यात आणि अन्नक्षेत्राच्या ठिकाणी भाविक आश्‍चर्यचकित होत. त्यांना माहिती सांगितल्यावर त्यांनी प्रदर्शनाला भेट देण्याची सिद्धता दाखवली.

२. श्री. अजित धुळाज : अंगफलक घालून सेवा केल्यावर थकवा न येता चैतन्य जाणवत होते, तसेच लोकांचा प्रतिसादही वाढून त्यांना सहजतेने माहिती ग्रहण होत असल्याचे जाणवले.

३. श्री. कार्तिक साळुंखे : अंगफलक घातल्यावर आतून लोकांना माहिती सांगावीशी वाटत होते. आध्यात्मिक उपाय होत असल्याचे जाणवले. लोकांनाही प्रसारातील ही नवीन पद्धत बघून आश्‍चर्य वाटत होते, तसेच ते स्वत:हून ग्रंथांविषयी अधिकाधिक माहिती विचारत होते.

सनातनचे प्रदर्शन ईशनिष्ठा शिकवणारे !
– अखंड बोध गंगातीर्थ, ऋषिकेश, डेहराडून

     १४ मे २०१६ या दिवशी जिज्ञासूंसमवेत भगवे वस्त्र धारण केलेली एक व्यक्ती आली होती. सर्व जिज्ञासूंसह तिलाही माहिती सांगत असतांना ती उत्साहाने प्रदर्शनाचे कौतुक करू लागली. तिने स्वतःची ओळख स्वामी सिद्धांतानंद, अखंड बोध गंगातीर्थ, ऋषिकेश, डेहरादून अशी करून दिली. स्वामी म्हणाले, सिंहस्थपर्वात बरेच संत आले आहेत; पण ते सगळे केवळ गोष्टी सांगतात. तुम्ही लावलेल्या प्रदर्शनात धर्माचरण आणि राष्ट्राची सद्यस्थिती अन त्यावर उपाय म्हणून काय करायला हवे ते सगळे सविस्तरपणे सांगितले आहे. येथे येणार्‍या सर्वांना पूर्ण ज्ञान मिळत आहे. माझा साधनामार्ग वेगळा आहे, तरी मला हे प्रदर्शन फार आवडले. संस्कार, शुद्धता यांसह ईशनिष्ठा शिकवणारे हे प्रदर्शन आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात