सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उज्जैन सिंहस्थपर्वातील अध्यात्मप्रसाराच्या कार्यास मिळालेला भरघोस प्रतिसाद

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती
यांच्या संयुक्त विद्यमाने उज्जैन सिंहस्थपर्वातील
अध्यात्मप्रसाराच्या कार्यास स्थानिक नागरिक, हिंदुत्ववादी
आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून मिळालेला भरघोस प्रतिसाद

1342782638_p-pinglekaka150

  उज्जैन येथील सिंहस्थपर्व पूर्वसिद्धतेसाठी ५ – ६ साधक गेले २ मास (महिने) सतत सेवारत आहेत. फ्लेक्स प्रदर्शन लावणे; सात्त्विक वस्तूंचे वितरण; मेळाक्षेत्रात जागा उपलब्ध करून घेणे आणि त्यावर तंबू उभारण्याचे नियोजन अन् त्यांसाठी साहित्याची जमवाजमव; सिंहस्थ कार्यालयाच्या विविध अनुमती, उदा. भिंत रंगवण्याची, फ्लेक्स लावण्याची अनुमती मिळवणे; जिज्ञासू, हिंदुत्ववादी किंवा धर्माभिमानी यांच्याशी संपर्क करणेे इत्यादी सेवा चालू आहेत. या सेवा करतांना ईश्‍वरच हे कार्य करत आहे, याची अनुभूती साधकांना येत आहे. श्री गुरुकृपेने प्रशासकीय अधिकारी, राज्यकर्ते, स्थानिक व्यापारी आणि नागरिक यांच्याकडून मिळत असलेला उदंड प्रतिसाद अन् प्रसारकार्याला होत असलेले साहाय्य येथे देत आहोत.

१. सिंहस्थपर्व मेळा कार्यालय आणि उज्जैन
नगरपालिका यांच्याकडून मिळत असलेले सहकार्य

१ अ. उज्जैन नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकार्‍यांनी कार्तिक मेळ्यात प्रदर्शन लावण्यासाठी अनुमती आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देणे

 उज्जैन येथे शासनाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे कार्तिक मासात (डिसेंबर २०१५ मध्ये) क्षिप्रा नदीच्या काठी कार्तिक मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळ्यासाठी जागा उपलब्ध करण्यापासून अनेक गोष्टींमध्ये शासनाकडून अनुमती घ्यावी लागते. अनेक मोठेे व्यापारी एक-दीड मास (महिने) आधी पैसे देऊन जागा आरक्षित करतात. आम्हाला मेळ्याविषयी कळले, तेव्हा तो आरंभ होण्यास थोडेच दिवस होते. आम्ही प्रशासकीय अधिकार्‍यांना भेटून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य सांगितल्यावर त्यांनी लगेच वरिष्ठांशी बोलून आम्हाला अनुमती दिली. नगर पालिका स्वतः लावत असलेल्या प्रदर्शनाच्या जवळ त्यांनी ही जागा दिली. त्यासमवेत आसंदी-पटल, वीज इत्यादी सर्व विनामूल्य उपलब्ध करून दिले. शेवटच्या दिवशी आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात सनातन संस्थेने कार्तिक मेळ्यामध्ये अध्यात्माचे ज्ञान देणारे अत्यंत सुंदर प्रदर्शन लावून प्रशासनाला सहकार्य केले, यासाठी संस्थेचे आभार व्यक्त केले. त्यांनी संस्थेला एक स्मृतीचिन्ह (मोमेंटो) आणि अभिनंदनपत्रही दिले आहे. (कार्तिक मेळ्यामध्ये धर्म आणि अध्यात्म यांविषयी प्रदर्शन लावण्यासाठी अनुमती आणि सर्व सुविधा उपलब्ध करून देणार्‍या उज्जैन नगरपालिकेचे सर्व सदस्य अन् प्रशासकीय अधिकारी यांचा आदर्श सर्वांनीच घेण्यासारखा आहे. – संपादक)

१ आ. सिंहस्थपर्वात प्रदर्शनासाठी जागा
उपलब्ध करून देण्यास सर्वतोपरी साहाय्य करणारे
श्री. दिवाकर नातू आणि सिंहस्थ प्राधिकरणाचे अधिकारी !

 सिंहस्थपर्वात सनातन संस्थेचे प्रदर्शन लागावे, यासाठी सिंहस्थ मेळा प्राधिकरण कार्यालयातील अधिकारी आणि त्यांचे साहाय्यक यांचे सातत्याने सहकार्य अन् अनुकूलता लाभत आहे. उज्जैन सिंहस्थ प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. दिवाकर नातू आणि त्यांचे अन्य सहकारी सनातनचे नाशिक सिंहस्थपर्वातील प्रदर्शन पहाण्यास आले होते. सनातनचे कार्य, फ्लेक्स प्रदर्शन आणि ग्रंथसंपदा पाहून त्यांना हे कार्य फारच आवडले. त्या सर्वांनी उज्जैन सिंहस्थपर्वात सर्वतोपरी साहाय्य केले. कार्यालयात केव्हाही गेल्यास ते आत्मियतेने बसवून घेऊन साहाय्य करतात.

१ इ. सिंहस्थपर्वात अध्यात्मप्रसाराचे प्रदर्शन
लावण्यासाठी साधकांना स्वतःहून कार्यालयात बोलावून
जागावाटपाचे कागद साधकांच्या हातात सोपवणारे श्री. कोमल भुतडा !

 कार्तिक मेळ्यातील सनातनचे प्रदर्शन बघून जागावाटप करणारे अधिकारी श्री. कोमल भुतडा अतिशय प्रभावित झाले. त्यांनी सदर प्रदर्शन सिंहस्थपर्वाच्या काळातही लावावे, असे सांगितले. याविषयी प्रक्रिया चालू आहे, असे त्यांना सांगितल्यावर त्यांनी दुसर्‍या दिवशी दूरभाष करण्यास सांगितले. तसे केल्यावर ते प्रदर्शनस्थळी स्वतःची गाडी घेऊन आले आणि साधकांना मेळा कार्यालयात घेऊन गेले. तेथे त्यांनी कागदपत्रांवर सही आणि अन्य प्रक्रिया पूर्ण करून देऊन जागावाटपाचे आदेश साधकांच्या हातात दिले. संस्थेच्या जागेच्या अलॉटमेंटसाठी अधिकार्‍यांनी साधकांना स्वतःहून कार्यालयात बोलावून जागावाटपाचे कागद साधकांच्या हातात सोपवले. सिंहस्थपर्व मेळा केवळ मनोरंजनात्मक न होता येणार्‍या भाविकांना आध्यात्मिक स्तरावरही लाभ व्हावा, यासाठी त्यांची धडपड चालू होती. खरेतर ईश्‍वरच त्यांच्या रूपात साधकांना साहाय्य करायला आला, अशी अनुभूती आली. ही सनातनच्या पवित्र कार्याची पावती आणि ईश्‍वरी कृपेची प्रचीती असल्याचे वाटले.

१ ई. उज्जैन नगरपालिकेने केलेले साहाय्य 

उज्जैन नगरपालिकेचे अनेक पदाधिकारी, महापौर आणि सभापती श्री. सोनू गहलोत यांनी सनातनचे ग्रंथ अन् फ्लेक्स प्रदर्शन कार्तिक मेळ्यात पाहिले होते. सिंहस्थपर्व हे आध्यात्मिक पर्व असल्याने सिंहस्थात या प्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार व्हावा, असे सर्वांना वाटत होते. श्री. सोनू गहलोत यांनी उज्जैन कुंभक्षेत्र पुष्कळ मोठे असल्याने वेगवेगळ्या भागांत १० ते १२ ठिकाणी सनातनचे प्रदर्शन लागावे, अशी अपेक्षा व्यक्त करून साहाय्य करण्यास प्रारंभ केला. भिंती रंगवण्याच्या संदर्भात श्री. सोनू गेहलोत यांना संपर्क केला असता त्यांनी लगेच भिंती रंगवणे चालू करा, असे सांगितले. अनुमती मिळवण्याच्या शासकीय प्रक्रियेतही त्यांनी अधिकार्‍यांना वेळोवेळी सांगून पूर्ण सहकार्य केले.
     नगरपालिकेमधील अधिकार्‍यांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. शहर परिसरात खाजगी अनुमती काढून धर्मशिक्षणाच्या मजकुराची अनुमती मागितल्यावर संस्थेचे व्यापक धर्मकार्य लक्षात घेऊन कायद्याच्या चौकटीत अत्यल्प दराने कर आकारून धर्मप्रसाराच्या कार्यात त्यांनी साहाय्य केले. प्रशासकीय जागांवर कुंभक्षेत्र आणि स्नानांचा घाट परिसर येथे धर्मप्रसारार्थ लिखाण करण्याची अनुमती मिळण्यासाठी त्यांना आवेदन दिल्यावर त्यांनी कोणत्या प्रकारचे लिखाण करणार, ते दाखवावे, असे सांगितले. संस्थेचे अध्यात्म आणि सिंहस्थपर्व यांविषयीचे प्रबोधनात्मक लिखाण, प्रशासन अन् पोलीस यांना सहकार्य करण्याविषयीचे लिखाण त्यांना दाखवल्यावर प्रभावित होऊन त्यांनी संस्थेसह द्विपक्षीय करार केला. त्या अंतर्गत संस्थेला महत्त्वाच्या स्थानांवर आध्यात्मिक माहिती लिहिण्यास त्यांनी विनामूल्य अनुमती दिली. ठिकठिकाणी फ्लेक्स, होर्डिंग इत्यादींच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार करण्याचा संस्थेचा मानस त्यांच्या समक्ष मांडल्यावर त्यांनी त्यासाठीही विनामूल्य अनुमती दिली. एकूणच या सिंहस्थपर्वात आलेले भाविक अध्यात्मदृष्ट्या काहीतरी घेऊन गेले पाहिजेत, ही त्यांची तळमळ होती. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याद्वारे हे साध्य होऊ शकते, हा विश्‍वास त्यांच्यामध्ये निर्माण होणे, हीच प.पू. डॉक्टरांची आम्हा साधकांवरची कृपा आहे, याची जाणीव आम्हा सर्वांना झाली.

२. उज्जैन येथील व्यापार्‍यांकडून मिळत असलेला प्रतिसाद

     उज्जैन सिंहस्थपर्व जवळ यायला लागले, तसे स्थानिक व्यापार्‍यांनी सिंहस्थपर्वासाठी अर्पण व्हावे, या हेतूने सनातनच्या साधकांना घरी आणि दुकानात बोलावून विविध प्रकारे साहाय्य करण्यास प्रत्यक्ष आरंभ केला आहे. वैशिष्ट्य म्हणजे उज्जैन क्षेत्रात सनातन संस्था किंवा हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याची फारशी ओळख नसतांनाही ग्रंथ अन् फ्लेक्स प्रदर्शन यांची छायाचित्रे पाहून अन् संस्थेचे कार्य सांगितल्यावर जिज्ञासू, धर्मप्रेमी सढळ हाताने सनातनला साहाय्य करत आहेत.

२ अ. भाजी बाजारातील व्यापार्‍यांनी केलेले सहकार्य

मुख्य भाजीबाजार आणि मक्सी रोडवरील भाजीबाजार येथील भाजीविक्रेत्यांनी कार्याची माहिती जाणून घेऊन आतापासूनच सिंहस्थाची पूर्वसिद्धता अन् सेवा यांसाठी आलेल्या साधकांच्या भोजनासाठी भाजी अर्पण देणे चालू केले आहे. भाजी बाजारातील अनेक दुकानदारांनी सामूहिक निर्णय घेऊन आठवड्यातून दोनदा साधकांना आठवडाभरासाठी आवश्यक तेवढ्या भाज्या देण्याचा निर्णय घेतला आहे.

२ आ. भिंतींवर आध्यात्मिक माहिती लिहिण्यासाठी
साहित्य अर्पण देणारे रंगसाहित्याची विक्री करणारे व्यापारी

१. व्यावसायिक श्री. हेमचंद्र जैन यांनी तारेचे आणि रंगकामाचे ब्रश, पत्रे अन् भिंत रंगवण्यात कामी येणारे अन्य साहित्य अर्पणात दिले.
 
२. श्री. सुनील ठामरिया यांनी रंगकामासाठी पेंटिंग ब्रश आणि अन्य साहित्य अर्पण देऊन सहकार्य केले.
 
३. श्री. मनीष बन्सल यांनी रंगकामासाठी २० लिटर पांढरा रंग, ब्रश आणि अन्य साहित्य अर्पण दिले.
 
४. रंगकाम व्यवसायिक श्री. खेमजी यांनी ५६ लिटर, तर रंगाचे डीलर श्री. आशिष पुजारा यांनी ६० लिटर पांढरा रंग विनामूल्य उपलब्ध करून दिला.

२ इ. स्वतंत्र पत्रकार आणि झेरॉक्स दुकानाचे
मालक श्री. सुरेश चिपळूणकर यांनी संगणकीय प्रती काढण्यासाठी
आवश्यक कागद अर्पण दिले. पुढेही कागद अर्पण देऊ, असे कळवलेे.

 

३. समाजाकडून मिळत असलेला प्रतिसाद

३ अ. भिंतींवर रंगाने आध्यात्मिक माहिती लिहिणे
आणि फ्लेक्स लावणे, यांसाठी बहुतांश लोकांनी अनुमती देणे

 भिंतींवर रंगाने आध्यात्मिक माहिती लिहिणे किंवा धर्मशिक्षणाचे फ्लेक्स लावणे, यांची अनुमती मिळण्यासाठी १०० लोकांकडे गेल्यावर काही लोक सोडून अन्य सर्वांनी भिंतींवर लिखाण करण्यासाठी किंवा फ्लेक्स लावायला त्यांच्या मालकीची जागा आनंदाने दिली.

३ आ. रंगकामासाठी मोठी मचाण मिळवून देणारे श्री. वासुदेव सोनी !

उज्जैन येथील शासनाने रामघाटावर जाणार्‍या पुलाची भिंत आध्यात्मिक माहिती लिहिण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. ती भिंत २५० फूट रुंद आणि २० फूट उंच असल्याने त्यावर रंगाने लिखाण करायला मचाण आवश्यक असते. अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही ती उपलब्ध होत नव्हती. कार्तिक मेळ्यातील प्रदर्शनाला आलेले जिज्ञासू श्री. वासुदेव सोनी यांना याविषयी सांगितल्यावर ते स्वतः साधकांसह फिरले आणि उज्जैन येथील एका कंत्राटदाराला मचाण उपलब्ध करून देण्यास सांगितले. त्यांनी अत्यल्प दरात मचाण उपलब्ध करून देऊ, असे सांगितल्यावर श्री. वासुदेव सोनी यांनी स्वतः ती रक्कम अर्पण देणार असल्याचे सांगितले.

३ इ. साधकांच्या निवासासाठी जागा उपलब्ध
करून देणारे प्रसिद्ध लेखा परीक्षक श्री. नितीन गरुड !

उज्जैन शहर लहान असल्याने प्रसारासाठी येणार्‍या साधकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात अडचण येत होती. हे बघून सनातनचे हितचिंतक आणि उज्जैन येथील प्रसिद्ध लेखापरीक्षक श्री. नितीन गरुड यांनी त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीची सदनिका निवासासाठी उपलब्ध करून दिली. साधकसंख्या वाढत असल्याने आणखी एक छोटी सदनिका उपलब्ध करून दिली.

३ ई. साधकांच्या निवासाची सोय करणारे
धर्माभिमानी श्री. नीलू उस्ताद आणि वाचक श्री. रवींद्र महाकाळ !

 प्रसारासाठी रंगवण्यास भिंती शोधतांना भेटलेले दुचाकी दुरुस्ती करणारे धर्माभिमानी श्री. नीलू उस्ताद यांनी त्यांचे सभागृह साधकांना विनामूल्य वापरण्यासाठी दिले आहे. सनातन प्रभातचे वाचक श्री. रवींद्र महाकाळ यांनीही त्यांचे निवासस्थान साधकांना साहित्य ठेवणे, निवास यांसाठी देण्याची सिद्धता दाखवली आहे.

३ उ. भांडी आणि साहित्य यांसाठी धनस्वरूपात अर्पण देणे

 सनातनचे कार्य बघून स्थानिक लोकही भांडी किंवा साहित्य यांसाठी धनस्वरूपात अर्पण देऊन साहाय्य करत आहेत. थोडक्यात सर्व ठिकाणांहून देवाच्या कृपेने सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
 

४. देवालयातील व्यवस्थापक आणि पुजारी यांनी केलेले सहकार्य

४ अ. हरसिद्धी मंदिरातील व्यवस्थापकांनी
फ्लेक्स प्रायोजित करून मंदिरात लावणे

 हरसिद्धी मंदिराचे व्यवस्थापक श्री. अवधेश जोशी हे कार्तिक मेळ्यात आले होते. सनातनचे फ्लेक्स बघून ते फार प्रभावित झाले. असे फ्लेक्स प्रत्येक मंदिरात असावेत, यासाठी त्यांनी १० फ्लेक्स प्रायोजित करून त्यांच्या हरसिद्धी मंदिरात लावले.

४ आ. मंदिराच्या भिंतीवर आध्यात्मिक माहिती लिहिण्यास अनुमती देणे

 श्रीमनकामनेश्‍वर मंदिराचे पं. सुखदेव प्रसाद शुक्ला आणि नीलू उस्ताद, चामुण्डामाता मंदिराचे श्री. सुनील चौबे, पशुपतिनाथ मंदिराचे श्री. पुरुषोत्तम चौबे, हनुमान मंदिराचे श्री. शुभम् शर्मा आणि गुमानदेव हनुमान मंदिराचे पं. श्यामनारायण व्यास यांनी त्यांच्या मंदिराच्या जागेतील भिंती आध्यात्मिक माहिती लिहिण्यास उपलब्ध करून दिल्या.
 

५. रामघाटावर प्रदर्शन लावण्यासाठी
साहाय्य करणारी श्रीक्षेत्र पण्डा समिती !

मकरसंक्रांतीच्या दिवशी सोमवती अमावास्या होती. त्या दिवशी क्षिप्रेच्या रामघाटावर पर्वस्नानासाठी येणार्‍या भाविकांना धर्मशिक्षणाचा लाभ व्हावा, यासाठी रामघाटावर प्रदर्शन लावण्याचे नियोजन करण्यात आले होते. मकरसंक्रांतीच्या प्रदर्शनासाठी घाटावर जाऊन संपर्क केला असता श्रीक्षेत्र पण्डा समितीचे उपाध्यक्ष श्री. संजय गुरु यांनी घाटावर प्रदर्शन लावण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. समितीच्या अन्य पुजार्‍यांनी पटल, त्यावरील पलंगपोस असे साहित्य उपलब्ध करून देऊन प्रदर्शन लावण्यात सहकार्य केले. 
 

६. शासकीय विद्यालयाच्या प्राध्यापिका
श्रीमती अल्पना उपाध्याय यांनी केलेले सहकार्य

      उज्जैन येथील शासकीय माधव विद्यालयाच्या कला विभागाच्या प्राध्यापिका श्रीमती अल्पना उपाध्याय यांच्याकडे साधक भिंतींवर आध्यात्मिक माहिती लिहिण्यासाठी अनुमती मागण्यासाठी गेले होते. त्यांना धर्मशिक्षण फलक हा ग्रंथ दाखवल्यावर त्यांना तो पुष्कळ आवडला. त्यांनी लगेच प्राचार्यांची भेट घडवली, कोणत्या भागात लिखाण करायचे, तेही दाखवले. त्यांनी अनुमती देऊन सहकार्य केले. पुढे त्यांनी सांगितले, कला विभागात शिकवतांना कला ही माझी साधनाच आहे, असाच भाव मी ठेवते. साधकांनी त्यांना सांगितले, सनातन संस्था ही कलेच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्ती कशी करायची, याविषयी मार्गदर्शन करते. तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला आणि साधनेविषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा त्यांनी दाखवली.
     सर्व क्षेत्रांतील लोक सकारात्मक होऊन उज्जैन सिंहस्थपर्व मेळ्यापूर्वी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्यासाठी त्यांचा प्रतिसाद मिळणे, हे ईश्‍वर अन् प.पू. डॉक्टर यांनी आम्हा साधकांवर केलेल्या कृपेची पावतीच आहे. संस्थेविषयी विशेष माहिती नसतांनाही लोक उज्जैन सिंहस्थापूर्वी धर्मासाठी कार्यरत होऊन सहकार्य करत आहेत. याप्रकारे पुढे ते हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आपोआप संघटित होऊन धर्मध्वजाखाली एकत्रित येतील आणि ईश्‍वर धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करील, याविषयी साधकांच्या मनात श्रद्धा निर्माण होणे, ही प.पू. डॉक्टरांनी साधकांवर केलेली कृपाच आहे, असे वाटले.
 
– (पू.) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (२८.२.२०१६)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात